Trushna ajunahi atrupt - 4 in Marathi Horror Stories by Vrushali books and stories PDF | तृष्णा अजुनही अतृप्त - भाग ४

Featured Books
Categories
Share

तृष्णा अजुनही अतृप्त - भाग ४

आताच प्रणयात न्हाऊन निघालेल अंग सावरत ती तिच्या मऊशार बेडवर विसावली. बाजुचीच मऊ गुलाबी फुलांची चादर तिने आपल्या देहाभोवती गुंडाळली... बराच वेळ झाला तो कुठेतरी निघून गेला होता.. आताशा तिला त्याला अजिबातच सोडवत नव्हतं. काय काय आणि कसं कसं सुख पेरत होता तो तिच्या आयुष्यात. तिच्या मऊ तांबूस सोनेरी कुरळ्या केसांना अजूनही त्याच्या स्पर्शाचा गंध येत होता. हलक्या नाजूक मोरपीसासारखी फिरणारी त्याची बोटं अजूनही तिच्या मानेवर रेंगाळत होती... नुसत्या त्याच्या स्पर्शाच्या आठवणीने ती रोमांचित झाली... त्याच्या खट्याळ आठवणीने ती स्वतःशीच हसली. हा माणूस असता तर.. हे असं लपून लपून भेटण्यापेक्षा किती मनमुराद जगलो असतो.. नाहीतर तो अनय... शी... बाबांना हाच विचित्र मनुष्य भेटला होता का माझं लग्न करायला... पण दुसर होत तरी कोण मला स्वीकारणार... तो... तो तर सगळ्यात चांगला मुलगा होता माझ्यासाठी पण मला सोडून निघून गेला... माझ्या प्रेमाला समजून न घेता पायदळी तुडवून गेला... त्याने एकदा हाक मारली असती ना सगळ सोडून विरघळून गेली असती त्याच्यात.... आणि हा... हा तर कसल्या शक्तीचा प्रकार आहे काय माहित... जेव्हा जवळ येतो तनामनावर मोहिनी घालतो... आठवत नाही बाकी काहीच.... मग आज तो कसा आठवला... ती चपापली... काहीतरी नक्कीच चुकलं होत.... इतक्या वर्षांनी तो आठवला होता..

-----------------------------------------------------------------------
ओम जसा जसा पुढे जात होता तसा समोर दिसणारा प्रकाश अजुन प्रखर होत होता. त्या प्रकाशापासून हातभर अंतरावर असताना अगदी लख्ख उजेड पडला. त्या तेजाने बावरून ओमने आपल्या उजव्या हाताने डोळ्यांना आडोसा दिला. हळू हळू करत त्याने डोळे उघडले. समोर एक उंचच उंच फुलं आणि वेलींच नक्षीकाम केलेली पुरातन दगडी भिंत होती. अगदी उंचावर बारीक जाळीच कोरीवकाम केलेल होत. भिंतीवर मधोमध पुरुषभर उंचीचा नक्षीदार खांब कोरलेला होता. त्या खांबाच्या टोकावर साधारण फुटबॉल एवढ्या आकाराचा एक ओबडधोबड दगड होता. त्या दगडातून इतका प्रखर प्रकाश पाझरत होता. त्याने हळूच गळ्यातील लॉकेट पाहिल ते ही समोरच्या दगडाइतकच झळाळत होत... कदाचित त्याच्या गळ्यातील खडा हा त्या दगडाचाच भाग असावा...

आता पुढे काय...त्याच्या तिन्ही बाजूला तशाच मोठाल्या भिंती होत्या. मागे परतून पुन्हा काळोखात बुडून जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. इथूनही कुठे जाता येणार नव्हतं. त्यात श्वास घेणही अवघड होऊ लागलं. जमिनीपासून हे भुयार बरच खाली असाव. लवकर मार्ग शोधला नाही तर इथेच गुदमरून मरण्याची शक्यता होती. त्याने पुन्हा एकवार भिंतींवर नजर फिरवली. उंचच उंच नक्षी शिवाय त्याला काहीच सापडलं नाही. काहीतरी आठवून त्याने भिंतीवर हात फिरवला. कदाचित कुठेतरी कळ असावी. परंतु कितीही त्या भिंतीना चाचपडल तरीही काहीच होत नव्हतं. भिंतीवरच्या नक्षीतील फुल, वेली सगळ पुन्हा पुन्हा चाचपडून झाल. तो वैतागुन गेला. आधी इतका विचित्र प्रवास आणि त्यात हे भुयार.. तो थोडा मागे सरकला. आधीच इथे बंदिस्त वातावरण असल्याने हवेत दबाव जाणवत होता. त्यात धडपड करून फक्त दमायला होत होत. त्याने खांबाकडे पाहिलं. त्यावर अतिशय नाजूक कोरीवकाम करून खांब सजवला होता. परंतु मधल्या भागावरची नक्षी थोडी विसंगत भासत होती. त्याने सहजच खांबावर हात फिरवला मात्र त्यावरची विसंगत वाटणारी बरीचशी नक्षी कोसळून पडली. ओम घाबरून गेला... हे काय आता नवीन... त्याचे हातपाय थरथरू लागले. त्याच्या छातीची धडधड त्याच्या कानाना ऐकू येऊ लागली. त्याने पुन्हा वाकून तुटलेल्या भागाकडे पाहिलं. आतल्या बाजूला काहीतरी कोरलेल होत. प्रथमदर्शनी कोणत्यातरी प्राचीन भाषेत लिहिल्याप्रमाणे वाटत होत. त्याने हळुवारपणे त्या शब्दांवर हात फिरवला. त्याला काहीतरी आठवल्यासारख वाटलं. त्याच्या डोळ्यांसमोर उडत उडत काही शब्दांनी फेर धरला. त्याला ती लिपी ओळखीची वाटत होती परंतु समजत नव्हती तरीही उगाचच वाचण्याचा प्रयत्न करत होता. त्यालाही कळायच्या आधी नकळत त्याच्या तोंडून काही शब्द उच्चारले गेले. त्याक्षणी ते दगडी खांबातील कोरलेली अक्षरे अचानक सोनेरी रंगात चमकू लागली. भूकंप झाल्यासारखी पायाखाली जमीन हादरू लागली. भिंती जोराने हलू लागल्या. पूर्ण भुयार डळमळू लागलं. आणि बघता बघता भिंती बाजूला सरकून पुढे जायचा मार्ग मोकळा झाला.

धूळ खाली बसताच ओमने आपले गच्च मिटलेले डोळे उघडले. भिंतीच्या आत अजुन एक भुयार होते. आतल्या भागात दोन्ही बाजूला दिवे जळत असल्याने ओमने निर्धास्तपणे चालायला सुरुवात केली. इथल्या भागातील वातावरण अगदी मोकळे आणि तणावमुक्त होते. त्याने आधी छातीभरून शुद्ध हवेत एक खोल श्वास घेतला. मगापासून अंगभर पसरलेली मरगळ क्षणात दूर झाली. आणि दुप्पट उत्साहाने व वेगाने तो पुढे चालू लागला. पूर्ण रस्त्यात दोन्ही बाजूला सुगंधी जळते पलीते असल्याने अंधाराचा मागमूस नव्हता. त्या गुहेतून एका बाजूने छोटासा झरा खळाळून वाहत होता. त्या झऱ्याच्या आवाजाची एक मधुर खळखळ वातावरण प्रसन्न बनवत होती. पायाखालची माती इतकी मऊ होती की पावलांचा आवाजही उमटत नव्हता. पुढे जांभळट दगडी पायऱ्यांची चढण होती. त्यावर दोन्ही बाजूला लाल मातीच्या पणत्यांची आरास होती. पायऱ्या चढून वर आल्यावर एक छोटंसं दगडी सभागृह होत. तिथे मध्येच यज्ञाभोवती काहीजण त्याची वाट पाहत असल्यासारखे उपस्थित होते.

" ये ओम " त्यातील एका पाठमोऱ्या व्यक्तीने मागे न बघताच त्याच स्वागत केलं.

" गुरुजी... " आवाजावरून ओमने पटकन त्यांना ओळखलं. जेव्हा पहिली भेट झाली होती तेव्हा ते किती थकल्यासारखे वाटत होती. त्याला पटकन पहिली भेट आठवली. आणि आज मात्र त्यांच्यात नवचैतन्य संचारलं होत. कोणी विश्वासही ठेवला नसता की हे तेच गुरुजी आहेत.