कादंबरी - जीवलगा .. भाग -१२ वा .
ले- अरुण वि.देशपांडे
-------------------------------------------------------------------------------------
स्वतःशी संवाद करता येणे म्हणजे एक चिंतन -समाधी असते " अशा मानसिक अवस्थेत आपल्याला खूप काही जाणून घेता येत असते ,"आपणच आपले एक विश्लेषक होऊन विश्लेषण करू शकतो , याचा एक फायदा असा होतो ..तो म्हणजे ..आपल्यातील प्लस बाजू कोणत्या आणि मायनस बाजू कोणत्या ? हे उमगू लागते ,"प्रत्येकाने अधून-मधून आपल्या स्वतःचा धांडोळा घेता आला तर जरूर घेतला पाहिजे , स्वतःच्या बद्दल थोडी तरी जागरूकता आणि बांधिलकी मनात असायला हवी "..
खूप वेळा पासून नेहा हे पुस्तक वाचीत होती . आजकाल व्यक्तिमत्व -विकास ", या बद्दल मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे ",मधुरीमाने नेहाला हे पुस्तक देतांना म्हटले.
."अहो नेहाकाकू ..हे पुस्तक वाचून काढा , अजिबात कंटाळा करायचा नाही.
एकूण एक पान वाचत जायचे आणि पुस्तक संपवायचे
.वाचून झाल्यावर ..तू एक काम करायचे ---"
या पुस्तकात .आपले प्रतिबिंब किती आहे ? हे पहायचे ..आपण कुठे कुठे , कशा कशात , किती कमी पडतो आहोत ? हे शोधायचे ,
आणि आपल्यातील कमीपणा दूर करायचा प्रयत्न करायचा ",
काही दिवसात अनुकूल बदल दिसू लागतील ,झालेले बदल जाणवू लागतील.
एक नवी नेहा नक्कीच दिसू लागेल.मधुरीमाच्या सांगण्याची आठवण झाली
आणि ..नेहा स्वतःशीच म्हणाली ..यस, हे अगदी बरोबर आहे, आणि मला तर हे करायलाच हवे आहे !
हे सगळ आठवण्याचे कारण .गेल्या काही दिवसापूर्वी घडलेला एक प्रसंग ..
त्या दिवसाने खरे तर ..नेहाला एक मोठी जाणीव करून दिली होती ..खूप काही गोष्टी ..व्यक्ती दिसते कशी ? यावर सुद्धा खूप अवलंबून असतात .
माणसाचा स्वभाव सहवासात कळून येतो ,पण, त्याच्या विषयीचे मत ? ते तर प्रथम-दर्शनी भेटीतच होते त्याचे काय ?
म्हणून तर म्हणतात न - First impression is last impression ".
.याचीच प्रचीती नेहाला त्यादिशीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आली.आत्ता हे तो प्रसंग तिला जसाच्या तसा आठवला ...
मावशीच्या मैत्रीण -मंडळाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. पुरुष मंडळी येणार नसल्यामुळे ..मावशीच्या सोबत यावेळी नेहाने जावे " असे ठरले ,
कारण मधुरिमा दुसर्या महत्वाच्या कामासाठी अगोदरच बाहेर असणार होती.
जेष्ठ नागरिक असूनही .मावशी आणि काका ..त्यांच्या राहण्याच्या बाबतीत खूप नीट- नेटके आणि व्यवस्थित होते आपल्याला .शोभेल अशा रंगसंगतीचे कपडे ते नेहमी वापरीत
,त्यामुळे हे दोघेही नेहमीच अगदी छान रुबाबदार व्यक्ती वाटायचे . आजच्या कार्यक्रमासाठी सुद्धा मावशी अगदी छान तयार झाल्या होत्या .
त्या उलट नेहा.. तिच्या वयाला अजिबात न शोभणार्या रंगाच्या सैलसर गबाळ्या वाटणाऱ्या ड्रेस मध्ये तयार झाली होती ,
मधुरीमाने अगदी मागे लागून नेहाला तिचे केस कट करायला लावले होते ,त्यामुळे तेलकट केसांची वेणी ,आणि तेलकट चेहेर्याची नेहा .आता ठीक ठीक दिसते आहे ..
असे स्वतः नेहाच .आरश्यात पाहून म्हणू लागली होती .
छान आणि व्यवस्थित मावशी सोबत अगदी साधरण दिसणारी नेहा पाहून..
काकांना बोलल्या शिवाय राहवले नाही..ते म्हणाले ..
ए -नेहा , तू जरा अजून छान तयार झाली असतीस तर बरे झाले असते , कार्यक्रमात इतर सगळ्यांना पाहशील
,मग तुझे तुलाच कळेल ,तू किती बेंगरूळ -गबाळी राहतेस ते..!
काकांच्या बोलण्याची स्पष्ट पद्धत ..नेहाला दुखावणारी आहे ..हे मावशीला जाणवले ,
त्या म्हणाल्या ..अहो , काही हरकत नाही..तिथे घेतील नेहाला सगळे सांभाळून ..कुणी नावे ठेवणार नाही तिला . सगळ्यांना माहिती आहे .नेहा माझी भाची आहे ते.
काकांच्या कमेंटने नाही म्हटले तरी ..आज नेहाला विचार करण्यास भाग पाडले होते..
पण एकदम कसे बदलणार न आपण तरी ?मन तयारच होत नव्हते , आताच थोडे थोडे बदल करतो आहे तर मनातून खूप भीती वाटत असते .
.गावाकडे गेल्यावर .घरचे काय म्हणतील ? त्यांना असे आवडणार नाही ,हे नेहाला माहिती होते
.पण, आता इथे राहतांना तर आपल्याला इथे शोभून दिसेल असेच रहायचे शिकावे लागणार आहे हे तर नक्की ..मधुरीमाला आपला हा प्रोब्लेम सांगितला पाहिजे .
कार्यक्रमाच्या ठिकाणी .मावशींच्यासोबत नेहा पोंचली . खूप छान सजावट केलेला होल , जमलेल्या जेष्ठ नागरिक -महिला ,
काही श्रीमंत ,काही मध्यमवर्गीय अशा होत्या . पण सगळ्याजणी कशा टापटीप आणि छान दिसत होत्या .
भरजरी साड्या ,साध्या पण सुंदर रंगसंगतीच्या साड्या नेसलेल्या , तर काही जणी एकदम लेटेस्ट डिझायनर ड्रेसमध्ये होत्या ,
काहीजणीना जीन-आणि top..अशा अवतारात पाहून नेहाने आश्चर्याने डोळे विस्फारले ..अशा लेटेस्ट ड्रेस मध्ये मोठ्या बायकांना ती आज पहिल्यांदाच पाहत होती .
मावशी सगळ्यात मिसळून मस्त गप्पा करण्यात गुंतल्या होत्या .मोकळ्या मनाने हसणे आणि एकमेकींना टाळ्या देत भेटणे "हे सारे काही पहाणे नेहाला खूप अनोखे वाटत होते .
कोपर्यातल्या एका खुर्चीवर बसून ती कुणाशी काही न बोलता ,चालू असलेला कार्यक्रम पाहत होती .
तिच्या मागेच खाद्यपदार्थांचे स्टाल लावलेले होते .
इतर बायकांच्या सोबत आलेल्या काही मुली नेहाच्या वयाच्या होत्या .नेहाच्या समोरच बसून त्यांच्या गप्पा आणि खाणे सुरु झाले होते
.त्या चटपटीत आणि स्मार्ट मुलींचे नेहाकडे अजिबात लक्ष नव्हते ,त्यांच्या दृष्टीने नेहा कुणीच नव्हती ..
त्या मुलींचा ग्रुप स्वतःतच गुंगलेला होता . इतक्यात तिथे नेहाच्या मावशी त्या मुलींच्या ग्रुपजवळ आल्या ,
त्या सर्व मुलींनी .मावशींना हाय,हेल्लो करीत म्हटले ..किती छान दिसतंय तुम्ही ,वेल ड्रेस लेडी .
मावशींनी हसून थांकू म्हंटले , त्यांनी नेहाला त्यांच्याजवळ बोलावले आणि त्या मुलींना म्हणाल्या
..गर्ल्स ..ही नेहा , माझी भाची , मी तिची मावशी ..आज पहिल्यांदाच माझ्या सोबत आलीय अशा फंक्शनला , तिला तुमच्या सोबत असू द्या प्लीज.
त्या मुलींना मावशींचे सांगणे खरे वाटले नसावे ..त्या म्हणल्या ..अहो मावशी ..तुमच्या सोबत येणारी ती मधुरिमा नाही दिसली ,
किती छान फ्रेंड झाली आहे आमची ,किती स्मार्टआहे ती,रियली ग्रेट .ती नाही दिसली .
.मग हिला पाहून आम्हाला वाटले ..तुम्ही सोबत म्हणून कुणी केअर-टेकर ..या मुलीला आणले असावे .
सॉरी- मावशी ..तिच्याकडे पाहून आम्हाला ती तुमची भाची आहे "असे मुळीच वाटले नाही. , ओके - आता .आम्ही या मुलीकडे लक्ष देऊ.
मावशी निघून गेल्या .आणि त्या मुलींनी नेहाला .आपल्यापासून दूरच ठेवले ..
फक्त एकदा तिच्याकडे अविश्वासाने पाहून घेतले .
.नेहाला त्यांच्या नजरेत दिसत होते
..नेहा ..अशी कशी मावशीची भाची ,? गबाळी कुठली !
कार्यक्रम संपल्यावर ..घरी जातांना .नेहाला त्या मुलींची नजर आणि त्यातील त्यांनी न बोललेले शब्द्च ऐकू येत होते ,
ती गप्प बसून राहिली ,मावशींना अंदाज आला असावा .त्या पोरींनी नेहला बद्दल नक्कीच चांगल्या कमेंट्स पास केलेल्या नाहीत.
नेहाला अधिक वाईट वाटेल ,आता आपणही काही न बोलेले बरे ! त्यापण काही न बोलता घरात शिरल्या.
आजच्या प्रसंगाने नेहा स्वतःवर खूप नाराज होऊन गेली ..काहीतरी केलेच पाहिजे आपण आता ..
.-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी पुढच्या भागात ..भाग- १३ वा लवकरच येतो आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी ..जीवलगा ..भाग -१२ वा .
ले .अरुण वि.देशपांडे -पुणे
.९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------