Love touch.... in Marathi Love Stories by Avinash Ramdas Lashkare books and stories PDF | प्रेमस्पर्श....

Featured Books
Categories
Share

प्रेमस्पर्श....


प्रेमस्पर्श

मला तुला सोडून कधीच जाऊ वाटणार नाही..! पण तुला एकटीला इथेच सोडून जाणे माझ्याही हातात नाही , मी कितीही विनवणी केली तरी माझा आवाज कोणी ऐकणार नाही की तुझाही आवाज कोणी ऐकणार नाही, होरे माझंही तसच आहे तुझ्या काय आणि माझ्या काय दोघांच्याही मनात आले तरी काही करू शकत नाही, पण मात्र एक की मी तुझ्या आधी इथून जावे कारण तू इथून मला सोडून गेल्यानंतर मला इथे एकटीला तुझ्या विना एकही क्षण श्वास घेणं शक्य नाही. पण मला नेहमी वाटत आपण एकाच छताखाली हवे जे काही छोटे आयुष्य आहे आपले ते तुला मनापासून समोर पाहूनच जगावे तुझ्यातच रंगून जावे तुझ्या समोरच जगावे आणि मरावेही तुझ्या समोरच, कारण आपण कधी एकत्र येणे आणि एकत्र जगणेही शक्य नाही आता आपल्याकडे खूप कमी वेळ आहे.
आता ही कमी वेळच आपल्या पूर्ण आयुष्याची वेळ आहे असे समजून जगुयात, हो अगदी तू म्हणतोस तसेच जगुयात, आणि खूप आनंदात राहुयात आता किती जरी खटाटोप केला तरी आपले मरण अटळ आहे. परंतु आपण मेलो तरी आपले प्रेम कधी मारणार नाही तर ह्या विशाल अनंतात विलीन होऊन आपले प्रेम अमर होणार आहे कारण तितके प्रेम आपण केले आहे ह्या इवलुश्या जीवनात खूप छान तू मला मी तुला साथ दिली हे मलाही विसरता येणार नाही आणि तुलाही विसरता येणार नाही.

खर तर सर्व काही आपल्याला जो कोणी विकत घेईल त्याच्या हातात आहे आपले उरलेले आयुष्य...!!
एक लक्षात ठेव तू कोणाच्याही घरात जाशील तेव्हा त्या घराला पूर्ण पणे अंधारातून मुक्त करशील आपला तो तर धर्म आहे आणि जीवनाचा उद्देश प्रेम तर आपण केले पण याचा काही उपयोग नाही कारण आपल्या प्रेमाचा शेवट या इथेच होत आहे हीच मोठी शोकांतिका आहे आपला जीवनाचा उद्देश फक्त आणि फक्त स्वतःच्या शरीराची होळी करून प्रकाश निर्माण करणे हे विसरून आपण चक्क प्रेम करून बसलो..!
ते दोघेजण आपसात बोलत असताना त्यांच्या कानावर एक आवाज येतो, काका एक कँडल द्या ओ....!
त्याच क्षणाला दोघेही एक मेकांकडे पाणवलेल्या डोळ्यांनी पाहू लागले, दोघांनाही कळून चुकले होते आता आपल्यातून एका जणाची खरेदी होणार होती , ते दोघेच शिल्लक असल्याने त्यातील एक जाणार दुसऱ्याला सोडून जाणार होता पुन्हा आता दोघांनी एकमेकांकडे पाहिले त्यांना तर असे वाटत होते ह्या ठिकाणावरून जावे तर दोघांनीही सोबत जावे पण आज नियतीच्या मनात वेगळेच गणित होते बाहेर अंधकार आणि काळ्याकुट्ट ढगाआड गेलेला चंद्र आणि पावसाचे वातावरण हवेत पसरलेला गारवा तसं भयभीत वातावरण होतेच आणि काही प्रमाणात प्रेमाचा अंकुर फुटवा त्यासाठी ही पोषक वातावरण होते, परंतु आज दोन प्रेमी युगुल अश्याच वातावरणात कायमस्वरूपी विलग होणार होते तेही नेमके त्याच वातावरणात ज्या वातावरणा मध्ये एकमेकांची साथ हवी असते.....
मेण व बत्ती या दोघांनीही पाणवलेल्या डोळ्यांनी शेवटचा निरोप घेण्यास तयार झाली होती आणि दोघांपैकी कोण जाणार हे अजून तरी निश्चित नव्हते जाणाऱ्याचा आज मृत्यू निश्चित होता म्हणून दोघांनाही वाटत असे मी स्वतः जावे इथे राहून विरहाच्या आठवणीत दररोज मरण्यापेक्षा एकदाच मरावे...!
ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केले मागील काही दिवसांमध्ये त्याचा विसर होणे आता शक्य नव्हते दुसऱ्याच्या घरात प्रकाश देत आपल्या शरीराची झीज करत मरणे केव्हाही उत्तम ... असे दोघेही विचारात असतांना, तेवढ्यात दुकानदार त्या दोघांकडे हात करत एकाला घेणार असतो तेव्हा दोघेही एक मेकांकडे पाहतात आणि दुकानदार बत्तीला आपल्या हातात घेतो तेव्हा आज बत्तीच्या मनासारखे झालेले असते , तसेच या मध्ये एक गडद दुःख आणि आनंद ही लपलेला असतो की जो दाखवता येत नसतो आनंद या साठी की मरण एकाच दिवशी येणार होत इथे राहून दररोज थोड-थोड मरण्यापेक्षा, दुकानदार आपल्या हातात बत्तीला घेत सरळ दुकानाच्या काऊंटर वर ठेवतो ,
मुलगा हातातील पैसे देत तिथून बत्तीला एका हातात घेऊन त्याच्या घराच्या दिशेने निघतो तेव्हा कायमचे नजरेआड होण्याआधी त्यांच्या मनात आलेले विचार त्या दोघांनी आजपर्यंत जो प्रेमाचा रंग जपून ठेवला होता तो आता कुठेतरी अजूनही उठून दिसायला लागला होता,दोघांनी मिळून भरलेला प्रेमाचा रंग एकच होता खूप स्वप्न रंगवले होते पण आज ह्याच क्षणाला ती सर्व स्वप्न बाहेरच्या वतावरणात विरून जाणार होती कायमची..! मनात निर्माण झालेला दुःखाचा डोंगर मनातच दाबत शेवटचा निरोप घेतला डोळ्यांनी. थोड्याच दिवसांमध्ये बहरून आलेली प्रेम कहाणी आता जीवनाच्या शेवटच्या क्षणाला येऊन पोहचली होती की ह्या क्षणा नंतर दोघेही ह्या जन्मात एकमेकांना कधीच पाहू शकत नव्हते , दोघांच्या मनात आज ह्या शेवटच्या क्षणाला एकच खंत होती की, आपण इतके एकमेकांना प्रेम करून सुद्धा साधा एक स्पर्शही आपण एकमेकांना ह्या सजीवांप्रमाणे करू शकलो नाही आपण निर्जीव असलो तरी आपल्याला मन आहे एकतरी स्पर्श होऊन आपला "प्रेमस्पर्श" घडायला हवा होता...!
दोघेही इतके प्रेम करून निर्जीव असल्यामुळे दोघांनीही एकमेकांना डोळे भरून पाहिले कायमस्वरूपी दोघेही आता विलग झाली होती...प्रेमाच्या रंगाने रंगवलेले इन्द्रधनुष्याचे सप्त रंग आज फिके पडताना दोघेही उघड्या डोळ्यांनी पहात होते , पाणवलेल्या डोळ्यांनी दोघांनीही एकमेकांना शेवटचे पाहिले व बत्ती आता पूर्णपणे आडमोरी झाली होती, हे सर्व त्या दोघांच्या इच्छेविरुद्ध घडत होते , मेण आहे त्याच जागी दुकानामध्ये गप बसून होता कारण तो आता एकटा पडला होता,तो देवाला कोसत होता आज जे घडले फार वाईट घडले पण मला अजूनही खूप प्रेम द्याचे होते बत्तीला पण आता ते शक्य नाही तरी बत्ती आज ज्या घरात गेली असेल ते घर तेजस्वी प्रकाशाने न्हाऊन निघू दे आणि तिथला अंधकार दूर करण्यास देवा तिला थोडी मदत करशील.....

बत्ती इकडे तोपर्यंत मुलाच्या घरी पोहचते लाईट गेल्यामुळे घरात अंधार असतो ढगाआड गेलेला चंद्र अधून मधून दर्शन देत असतो तेव्हा पडणाऱ्या प्रकाशात तेव्हा अधून मधून घरात मंद प्रकाश घरात प्रवेश करत होता तेव्हा कुठे घरात थोडे फार दिसत असे बाहेरील वतावरण अजूनही तसेच होते त्यात म्हणावा तसा कुठलाच बदल नव्हता झाला थंडगार वारा पाऊस येण्याची चाहूल देऊन जात होता.
मुलाची आई म्हणते माझ्याकडे दे बत्ती मी पेटवते असे म्हणून ती काडेपेटीची काडी पेटविते आणि बत्तीच्या आत्मरूपी धाग्याला लावते जसा जळत्या काडीचा स्पर्श त्या आत्मरूपी दोरीला त्याच वेगाने घरात लख्ख प्रकाश पडतो क्षणार्धात अंधार संपुष्टात येतो घरातील समोरील खोली प्रकाशमय होते. मुलाची आई हातात पेटलेली बत्ती घेऊन ती एका रिकाम्या वाटीमध्ये पेटलेल्या बत्तीला आडवे करून तिच्या शरीराचे द्रावरूपी थेंम्ब त्या वाटीमध्ये टाकते आणि त्याच थेंबांनवर बत्तीला उभे करते आणि बत्ती त्या वाटीत आता घट्ट उभी असते डोक्यावर जळता पेट चालू असतो, मुलाच्या आईला बत्तीला जणू हेच सांगायचे होते तुझे आयुष्य फक्त प्रकाश देण्यासाठीच होते आणि तुझ्या आयुष्याचा शेवटही यातच होणार आहे. म्हणून बत्ती मनात विचार करते म्हणजे माझा जन्म फक्त आणि फक्त प्रकाश देण्यासाठी झाला आहे इतके दिवस मेण बरोबर जीवापाड प्रेम केले ते काय होते निर्जीव असलो तरी आम्हाला मन असते आम्ही हालचाल नाही करू शकत पण खरं प्रेम करू शकतो कुठलाही स्पर्श नाही झाला तरी कारण आम्ही निर्जीव आहोत पण आमचे मन निर्जीव नाही ....
आता आयुष्याचे काही वेळच शिल्लक आहे ह्याच वाटीमध्ये माझे मरण निश्चित आहे आणि माझ्या उरलेल्या आस्थी ह्याच वाटीत शिल्लक राहणार आहेत परंतु देवा माझ्या मेणला खूप मोठे आयुष्य दे मी आता त्याला कधीच पाहू शकत नाही आणि पानवलेल्या डोळ्यांतून वाटीमध्ये शरीराची झीज होत थेंम्ब ओघळेच्या रूपाने साचत होते, तेव्हा तिला नकळत एक कविता म्हणते....

अंधाऱ्या रातीला प्रकाशमय मी करते
प्रेमाचा ह्या क्षणाला मी ध्यास सोडते

जीवन जगताना एकच इच्छा होती
दोघांच्याही मनाविरुद्ध झाली नियती

जीवापाड प्रेम करूनही प्रेमस्पर्श नाही झाला
नियतीने देवा इथे बरोबर एक डाव साधला

नियती का घेत आहे माझ्या प्रेमाची परीक्षा
आता मरणाच्या दरातही का देत आहे शिक्षा

निर्जीव असूनही आमचे काय नाही चुकले
मग देवा मी माझ्या प्रेमाला का ?आज मुकले,

अखंड गुंतले होते मी मेणाच्या प्रेमात
आज कळते मला मी होते प्रेमाच्या भ्रमात......

परंतु मागच्या खोली मध्ये ज्या ठिकाणी मुलगा आज रात्री उद्याच्या परीक्षेसाठी अभ्यास करणार असतो तिथे आता प्रकाशाची गरज असते म्हणून मुलाची आई म्हणते जा परत दुकानात आणी अजून एक घेऊन ये ही बत्ती ह्याच खोलीत राहूदे नाहीतर इकडं अंधार पडल, माहीत नाही बाहेरचं वादळ कवा थांबल आणि गेलेली लाईट परत कवा येईल.
आईच व मुलाचं संभाषण एकूण बत्तीला खूप आनंद होतो ती मनात विचार करते आता मेण ही ह्याच घरात येणार समोरा समोर असणार तो जरी मागील खोलीत असला तरी जीवनाच्या शेवटच्या क्षणाला त्याच्याशी बोलू तरी शकते आणि तोही माझ्याशी बोलू शकतो या पेक्षा जीवनाचा चांगला शेवट काय असावा...! मनोमन देवाचे आभार मानते आता आतुरता लागून असते की त्याने लवकरात लवकर घरात यावे .. आता घरामध्ये ती तीळा तीळा ने जळत असताना ती दुःखात नव्हती कारण तिचा मेण पुन्हा एकदा तिला दिसणार होता बोलणार होता, त्याच्यासोबत जीवन जगण्याची आणि मरणाची इच्छा होती ती आज खरोखर पूर्ण होणार होती. लवकरात लवकर मुलाने दुकानात जावे आणि येताना मेणाला सोबत घेऊन येणे असेच वाटत होते .

दुकानामध्ये मेण आहे त्याच जागी होता मनात असंख्य विचार घोळत होते बत्ती सोबतचे सर्व दिवस आठवत होता अनेक दिवस अनेक रात्री सोबतिला ती असताना तिच्या सोबतचे दिवस आणि आता एकटा असतानाचे दिवस ह्यामधील फरक त्याला स्पष्ट दिसत होते ती एकटा असल्यामुळे त्याला तर अगदी नरक यातनाच वाटत होत्या. मला इथे सुखरूप ठेवून ती स्वतः मरणाच्या दारात गेली हे आठवून तो खूप रडत होता.
तेव्हा तो समोर दुकानात त्याच मुलाला पाहतो थोड्या वेळापूर्वी ज्या मुलाने बत्तीला आपल्या घरी नेले तोच मुलगा पुन्हा दुकानात थोडं आश्चर्य वाटत कुतूहलाने पहात होता की हा मुलगा पुन्हा का आला असेल तितक्यात तो मुलगा म्हटला काका आजून एक द्या हे वाक्य ऐकताच त्याच्या आनंदाला पारा उरला नाही काही क्षण हे सगळं एखादं सुंदर स्वप्न आहे की काय असेच वाटत होते पण हे स्वप्न नसून सत्य आहे जेव्हा दुकानदार मेण ना आपल्या हातात घेत मुलाच्या हातात ठेवतो मेण ला समजते आता आपण बत्तीला पाहू शकतो आणि तिच्याशी बोलू शकतो मीही त्याच घरी जात आहे देवाचे आभार कसे मानावे शब्द सुचत नव्हते मुलगा जेव्हा घरी जाण्यास निघतो तेव्हा मेणाची नजर मागे दुकानातील त्या ठिकानाकडे जाते ज्या ठिकाणी प्रथम आणि शेवटची भेट त्यांची झालेली असते त्या जागेकडे व्याकुळ नजरेने पहात असतो ह्याच ठिकाणी माझी आणि तीची भेट झाली होती एकमेकांची नजर ह्याच ठिकाणी भिडली होती एकमेकांवर जीवापाड प्रेमही ह्याच ठिकाणी झाले होते
आणि प्रेमाच्या वृक्षाची पहिली पालवीही ह्याच ठिकाणी फुटली होती हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी आम्ही दोघेही पुन्हा येऊ शकत नाही की आमच्या जीवात जीव असेपर्यंत ही जागाही कधी विसरू शकत नाही.
तिकडे घरी बत्ती मेण ची येण्याची आतुरतेने वाट पहात होती त्याने लवकरात लवकर यावे कारण माझे जीवन आता खूप कमी राहिले आहे त्यापूर्वी त्याने यावे व माझे मरणही त्याच्या समोरच यावे असे मनात ती विचार करत असताना मेण व मुलगा दोघेही आता दारात येऊन पोहचतात. मेण दारातून आत पाहतो त्याला त्याची बत्ती एका वाटीत पेटलेली दिसते आज ती नेहमी पेक्षा खूप सुंदर दिसत असते जशी ती एकप्रकारे लग्नासाठी नटून बसली असावी असाच भास त्यावेळेस त्याला होतो.घरातील पहिल्या खोलीत लक्ख प्रकाश पडला होता दोघांची आता पुन्हा एकदा नजरा नजर होते ही नजर जरी वेगळ्या ठिकाणी भेटली होती तरी त्यात तितकेच प्रेम दडले होते काही वेळेपूर्वी तुटलेला प्रेमधागा आता पुन्हा नव्याने त्याला गाठण बसलेली होती.
दोघेही आता घरातील पहिल्या खोलीत असतात मुलाची आई मेण ला काडीने पेटविते तसा घरात दोघांचा मिळून प्रेमप्रकाश जणू निर्माण होतो बाहेरील वातावरण आणि घरातील प्रकाश हे वेगळेच गणित तयार झालेले असते मुलाची आई मेणलाही एका वाटीत ठेवते आणी मुलाच्या हातात देऊन मागच्या खोलीत अभ्यास करण्यासाठी सांगते तसा तो मुलगा मेणला घेऊन मागील खोलीकडे निघतो तेव्हा बत्ती भावुक होऊन म्हणते तू जरी मागच्या खोलीत चाललास तरी तू तिथून माझ्याशी बोलू शकतो या पेक्षा चांगले मरण ते काय असावे, मी मरत असताना तू पुन्हा कधी दिसशील याची कल्पनाही मी केली नव्हती
मेण पाणवलेल्या डोळे भरून फक्त पहात असतो मुलगा मेण ला घेऊन मागच्या खोलीत घेऊन त्याच्या प्रकाशात अभ्यास करत बसतो
बत्ती पहिल्या खोलीत मेण दुसऱ्या खोलीत आशा परिस्थिती मध्ये बत्ती म्हणते मेणला एक विचारू का मेण म्हणतो जीवनाच्या ह्या नाजूक वेळी तू का परवानगी मागतेस मला तू सरळ बोलू शकतेस बत्ती म्हणते मी तुझ्या आधी ह्या जगातून निघून जाईल माझा आत्मा कुठे कसा आत्मा हवेत कुठे कसा नाहीसा होईल या बद्दल मला काय पण तुलाही कल्पना करणे शक्य नाही परंतु माझी एक इच्छा होती की आपला ह्या जीवनात एकदा तरी एकमेकांना प्रेमस्पर्श व्हावा इतकीच इच्छा आहे.
मेण म्हणतो तू माझ्यावर जिवापाड प्रेम करतेस मला माहित आहे आता काहीच क्षण शिल्लक आहेत तुझ्या जीवनाचे तरीही तू माझाच विचार करतेस परंतू मी ह्या जगात पहिलाच प्रेमवीर असेल की, जो आपल्या प्रियसीची शेवटची इच्छा ही पूर्ण करू शकत नाही.
आज माझीच मला लाज वाटत आहे, देवाने निर्जीव वस्तुंना का मन दिले असेल, मग हालचाल करण्याचे सामर्थ्य का नाही दिले पूर्ण जीवनात एकदा तरी हालचाल करण्याचे सामर्थ्य देयला हवे होते जेणे करून मी आज बत्तीला एकदा तरी स्वतःहून स्पर्श करू शकलो असतो.
बत्ती म्हणते मी खूप भाग्यशाली आहे कारण तुझ्या सारखा प्रेमवीर मला माझ्या जीवनात लाभला जो की माझ्यावर जीवापाड प्रेम आजही करतो.
मेण म्हणतो आपले आयुष्यही किती छोटे आहे बघना स्वप्ने पहायची तीही खूप लवकर पूर्ण होण्यासाठी पण वेळही नसते प्रेम झाल्यावर स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याआधीच आपले मरण आणि जीवन संपत आलेले असते.
बत्ती म्हणते माझे मरण आता अगदी जवळ आले आहे पण मला त्याचे काहीच वाटत नाही कारण मी तुझ्या आधी ह्या जगातून जाणार आहे तसेच माझे मरण तुला पाहत असताना येणार ह्या पेक्षा चांगले मरण काय असावे त्यातही मी तुझ्या आधी मरणार त्यामुळे मला ती वेदना जनवणारच नाही जी वेदना एकट राहिल्यावर होते...
जीवन आपले आता काही वेळेसाठी फक्त शिल्लक आहे तरी आपले प्रेम किंचितही आज ह्या क्षणापर्यंत कमी झाले नाही की आपल्यात कुठले मतभेत नाही या पेक्षा चांगले प्रेम काय असू शकते आता आपले प्रेम फक्त ह्या जगात अमर व्हावे एवढीच इच्छा आहे परंतु आपल्या मनातील गोष्टी कोणालाच समजणार नाहीत तर हे आपले प्रेमही कोणालाच कळणार नाही आपले हे प्रेम खरंच अमर व्हावे व सर्वांना माहीत व्हावे पण हे शक्य नाही... तितक्यात अजून वरच्या काळजीच्या आवाजात बोलते तुझा किती लख्ख प्रकाश आहे मागच्या खोलीत मग अरे माझा का असा आता अंधुक प्रकाश होत चालला आहे.
मेण ढसा ढसा रडत म्हणतो आयुष्य आपल्या हातात नाही आणि तुझा प्रकाश आता अंधुक होत चालला आहे कारण तुझे अस्तित्व आता काही मोजक्याच क्षणासाठी शिल्लक राहिले आहे तुझ्या आत्म रुपी धाग्यातून तेवणारा प्रकाश गायब होईल मला हे सहन होत नाही देवा मला का तू आधी मरण नाही दिले मला खरंच सहन होत नाही मला तुझ्या आधी मरण हवे होते
आणि रडायला लागतो..
बत्ती पाणवलेल्या डोळ्यांनी एकटक मेण कडे पहात म्हणते मी आता जात आहे पण मी गेल्यानंतर तू माझ्या आठवणीत रडत बसू नकोस आपल्या जीवनाचे आणि आपल्यावर देवाने दिलेले कार्य म्हणजे अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणे आहे त्यामुळे तू रडत न बसता जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत घरात प्रकाश तेवत ठेव मी नाही म्हटले तरी मला जावंच लागणार आहे. मला तू दिलेलं प्रेम.......आणि बत्तीचा अवाज एकदम बंद होतो व बत्ती विझते आत्मरूपी धाग्यातून एक अंधुकसा धूर बाहेर पडतो पहिल्या खोलीत अंधकार पसरतो.....
आता मेणला हे सहनच होत नाही तो पाहिल्या पेक्षा जास्त शरीरातून धारा वाहू लागतो आणि त्यालाही हे जग लवकरात लवकर सोडावे वाटू लागते मेणाचेही आयुष्याचे काही मोजकेच क्षण शिल्लक असतात तेव्हा तो मनात खूप खोल वर विचार करु लागतो, आणि भूतकाळातील बत्ती सोबत घालवलेले शेवटचे सुंदर क्षण आठवू लागतो आणी तेव्हा त्याच्या समोर बत्तीचे शेवटचं क्षण दिसतात व नकळत तो एक गीत गातो...

स्वः स्वतःस पेटवूनी अंधाराशी लढतोय ऐकला मी
माझ्याच जीवनाच्या वाटेवर जळत चाललोय मी

क्षणा क्षणाला झिजताना पाहिले तिला मी
क्षणा क्षणाला झिजताना पाहतोय मला मी

इवलुसे हृदय माझे त्यातून पाझरते मरे पर्यंत मी
बत्तीच्या जाणाऱ्या वाटेवरचा साक्षीदार आहे मी

त्याच वाटेने जाण्यास तयार झालोय आता मी
सुंदर प्रेमकहाणीचा अंत पहातोय आता ऐकला मी

देवा तुम्ही एका निर्जीवाला मन देऊन चूक केली
जीवनाची शेवटची इच्छा ती मनातच ठेवून गेली

दुःख आमचे डोंगराएवढे कळेल का ह्या जगाला
देवा फक्त तुम्ही मन का दिले आम्हाला जगायला

फक्त प्रकाशासाठी शरीर लागते झिजावे
प्रेमासाठी इतकेसे जीवन कोणालाच नसावे

पहिल्या भेटीतील तो आजही आठवतो हर्ष
जीवनाच्या शेवटी राहून गेला तो प्रेमस्पर्श.

मेणाच्या मनात ही कविता चालू असतानाच मेण चा तेवत असणारा प्रकाश काही क्षणात नाहीसा होतो आणी घरभर पूर्ण अंधार पडतो, आता पर्यंत मेणाच्या प्रकाशात अभ्यास करणारा मुलगा थोडासा व्यतिथ होतो कारण अभ्यास अजून बाकी असतो परंतु आता घरात प्रकाश निर्माण करण्यासाठी काहीच शिल्लक नसते बाहेरील चंद्राची शीतल छाया आता वतातवरण शांत झाल्यामुळे पसरलेली असते,घरात पडलेल्या त्याच शीतल प्रकाशात तो मुलगा एकटक विझलेल्या मेणच्या अवशेषांकडे पहात असतो तेव्हा त्याला एक नवीन युक्ती सुचती तसा तो ताडकन उठून घरातील देवाचा स्टील चा जुना दिवा घेतो बत्तीचे व मेणचे अवशेष एकत्रित करून त्या दिव्यात ठेवतो व मधोमध एक दोरी ठेवतो हातात काडेपेटीची काडी पेटवितो आणि दिव्यातील दोरीला लावतो. जो प्रकाश आता घरात पडतो तसा प्रकाश आज पर्यंत मुलाने पाहिलेला नसतो घरात पडलेला प्रकाश पाहून त्याला आता असे वाटते की हे माझे स्वप्न तर नाही ना....आता तो पुन्हा अभ्यास करण्यास सुरुवात करतो.
खडाडून जाग यावी जशी की झोपलेल्या च्या अंगावरती थंड पाण्याचा शिडकावा करावा आणि झोपलेल्याला जाग यावी अगदी त्याप्रकारे आता मेणला आणि बत्तीला जाग आली दोघांचा पहिला आवाज बरोबर निघाला दोघांच्या मुखातून आपोआप एकमेकांचे नाव आले तसे दोघांनी देवाचे आभार मानले दोघांनीही एका दिव्यामध्ये झालेला पुनर्जन्म बघून खूप आनंद झाला हे सर्व ह्या मुलाची करामत बघून दोघांनीही त्या मुलाचे मनोमन आभार मानले दोघांनी आता एकमेकांकडे पाहिले हा आपला पुनर्जन्म झाला कारण आपण केलेल्या प्रेमाची जाणीव ह्या मुला पर्यंत देवाने पोहचवली आणि आपला प्रेमस्पर्श घडून आलाय दोघांचाही एक मेकांना प्रथमच स्पर्श करत प्रेम म्हणजे काय ह्याचा अनुभव आता जणू त्यांना आला होता... आपण दोघेपण जास्त काळासाठी नाही आहोत अगदी थोडा वेळच असणार आहोत परंतु पुनर्जन्म आणि प्रेमस्पर्श हया दोन्ही गोष्टी त्या दोघांनी जिवंत जीवनात अनुभवता आले नव्हते परंतु आज पुनर्जन्म झाल्याने घडून आला होता. ते दोघे निर्जीव असूनही त्यांना आज निर्जीव असल्याचे वाटत नव्हते,
मुलगा अभ्यास करता करता कधी झोपी गेला कळले नाही तसेच घरातील सर्वजण झोपी गेले होते आणी घरामध्ये फक्त हे दोघेच जागे होते तसेच ही आता मात्र त्यांची शेवटच्या क्षणीची जाग होती उद्याचा सूर्य त्यांना दिसणार नव्हता.
बाहेर दिसणारा चंद्र आज त्यांना खिडकिवाटे डोकावून पहात होता आणि त्यांच्या नितळ प्रेमाचा साक्षीदार झाला होता. आज चंद्रही हळहळला होता एका प्रेमाचा अंत होताना तो पहात होता. बाहेरील वातावरण आज प्रेममय झाले होते बाहेरचे वातावरणही जणू आज त्यांच्यासाठीच अवतरले होते.आज सगळे वतातवरण शांत झाले होते वाराही वाहत नसताना झाडाची पाने आज मुदामच सळसळ आवाज करत होती बहुतेक एका नितळ प्रेमाचा अंत जवळ पाहुन ती हळहळली होती. दोघांचाही आता प्रकाश मंदवला होता चंद्राचा कंठ दाटून आला असतानाही त्यांना शेवटची इच्छा काय म्हणून विचारले आणि चंद्र आज प्रथमच रडायला लागला , दोघांनीही एकमेकांना शेवटच्या नजरेने न्हाळले व चंद्राकडे पाहून म्हणाले चांदू मामा आमच्या दोघांचे मिळून मेणबत्ती हे नाव ह्या जगात अमर कर....
तसा तो दिवा विझला आणि तेव्हा पासून आज पर्यंत मेणबत्ती चा उगम झाला.
सकाळी जेव्हा मुलगा उठतो व त्याची नजर विझलेल्या दिव्याकडे जाते तेव्हा त्याला दिव्यात एका हृदयाची तयार झालेली आकृती दिसते ते पाहून त्या मुलाला आश्चर्य वाटते तेव्हा त्याच्या मनात सुचलेली ही कहाणी त्याने आपल्या पुढे मांडली तसेच त्यांच्या कविताही त्याला रडवून गेल्या मग त्याचाही मनात शेवटी एक कविता आली....

हृदय जाळूनी शेवट केला प्रेमाचा
अंत झाला दोन प्रेमळ मनाचा
दिव्यामध्ये तेवत होते शेवटचे क्षण
प्रेमामध्ये न्हाहून निघाले ते मन
दिव्यामध्ये हृदयाचा आकार करुनी
अमर झाले प्रेम तुमचे तुम्ही मरूनी
प्रसन्न झाली आज तुमच्यामुळे धरणीमाता
विचार करायला लावला तुम्ही जाता जाता....
......अविनाश लष्करे.