sher - 6 in Marathi Adventure Stories by निलेश गोगरकर books and stories PDF | शेर 6 (अंतिम भाग )

Featured Books
  • उजाले की ओर –संस्मरण

    मनुष्य का स्वभाव है कि वह सोचता बहुत है। सोचना गलत नहीं है ल...

  • You Are My Choice - 40

    आकाश श्रेया के बेड के पास एक डेस्क पे बैठा। "यू शुड रेस्ट। ह...

  • True Love

    Hello everyone this is a short story so, please give me rati...

  • मुक्त - भाग 3

    --------मुक्त -----(3)        खुशक हवा का चलना शुरू था... आज...

  • Krick और Nakchadi - 1

    ये एक ऐसी प्रेम कहानी है जो साथ, समर्पण और त्याग की मसाल काय...

Categories
Share

शेर 6 (अंतिम भाग )

मागील भागावरून पुढे......


दुसऱ्या दिवशी सकाळी शेखर तयार होऊन खाली आला. बाळु ने त्याला कॉफ़ी आणून दिली. त्या दोघींची तयारी अजून झाली नव्हती. त्यांची वाट बघत शेखर चीं अजून एकदा कॉफी झाली. पण त्या दोघी काही निघण्याचे नाव काढत नव्हत्या.
बराच वेळ झाल्यावर दोघी बाहेर आल्या. शेखर त्यांना बघतच बसला. दोघीही दिसायला सुंदरच होत्या. पण आता पूर्ण शृंगार केल्यावर तर त्यांच्या वरून नजर हटत नव्हती. सुजाता ने डार्क जीन्स वर यल्लो टॉप घातला होता. मोकळे सोडलेले केस. हातात मोठे घड्याळ दुसऱ्या हातात एक नाजूक ब्रेसलेट.... एकदम छान दिसत होती. सुकन्या ने मोरपिशी रंगाचा ड्रेस घातला होता. एका खांद्यावरून ओढणी सोडली होती. कानात लहान रिंग्स , डोळ्याला आय लायनर, हातात नाजूक घड्याळ , केसाची बांधलेली एक वेगळीच वेणी, ओठावर फिक्कट लिपस्टिक एकदम छान दिसत होती... शेखर अवाक होऊन तिचे रूप बघत होता. त्याच्या तश्या बघण्याने ती खुप लाजली.

" अहं... अहं......" सुजाताने दोघांना भानावर आणले.

" आता जायचे की इथेच एकमेकांना बघत बसणार आहात ? "
ती पुढे म्हणाली.

" हा... चला... "

" शेखर सर , ऐकाना... मी काय म्हणत होती आपण महालक्ष्मी ला जाऊन मग पुढे जाऊया कां ? "

" हो.... चालेल ना.. चांगलेच आहे... "

तिघे कार जवळ आले. त्याने मागचा दरवाजा उघडला. सुजाता आत बसल्यावर त्याने दरवाजा बंद केला. आणी सुकन्या साठी पुढील दरवाजा उघडला. ती तर अशी लाजली. पण ती काही न बोलता पुढे बसली.

" तुम्हाला माहित आहे कां शेखर सर , ही सीट कोणाची असते... " मुद्दाम सुकन्या च्या सीट कडे इशारा करत सुजाता ने विचारले.

" नाही ग... कोणाची ? "

" पत्नीचीं.... आता तुम्ही दीदी ला तिथे बसवलेत म्हणजे.. "

" सुजाता... फाजीलपण पुरे झाला हा... " सुकन्या तिला दटावत म्हणाली. खरंतर तिला ही खूप बरं वाटत होते. त्या दोघात असलेला कडूपणा आता हळूहळू कमी होत होता.

" बरं बाबा.. मी आता डोळे मिटूनच घेते. असे समजा की फक्त तुम्हीच दोघे इथे आहात.. "

" सुजाता... " सुकन्या चिडून ओरडली.

" अरे... एक मिनिट माझा मोबाईल आताच राहिला... "
सुजाता म्हणाली आणी आत मोबाईल आणायला पळाली.

" आज अचानक महालक्ष्मी कां आठवली ? "

" काही नाही सहज म्हणले जातोच आहे तर तिच्या दर्शनाने सुरवात करू..."

" तू काय नवीन बिजनेस वैगरे उघडत आहेस कां ?" शेखर ने तिची गंमत करत विचारले. त्यावर चिडून तिने त्याच्या हातावर एक गुद्दी मारली आणी गाल फुगवून बसली...

" अग मस्करी केली... आता तुझी मस्करी नाही करणार तर कोणाची करणार ? " तिच्या डोळ्यात खोल बघत त्याने विचारले.

" शेखर सर ... "

" काय लावलेय सर... सर... शेखर म्हणालीस तरी चालेल.. नाही तू शेखरच म्हण... त्यात जो आपलेपणा आहे तो शेखर सर मध्ये नाही... "

आता मात्र तिला खात्री झाली की हा आपल्या प्रेमात पडला आहे.त्यांच्यातील सगळं दुरावा आता दूर झाला आहे याची तिला खात्री पटली. तिला मनातून खुप बरं वाटले. तिने मानेनेच त्याला होकार दिला.

" चला... निघूया... " सुजाता मागे बसत म्हणाली...
आणी त्याने सफाईदार वळण घेत गाडी गेट बाहेर काढली.
महालक्ष्मी ला तिघे पोचले तर तिथे अजिबात गर्दी नव्हती. तुरळक भाविक जे रोज यायचे ते सोडले तर फारसे कोणी नव्हते.

" दोन ताट घ्या... एक तुमचे आणी एक आमचे.." शेखर सूचना करत म्हणाला.

" तुझ्या आई चे इतके मोठे ऑपरेशन झाले त्यातून बरी होऊन आई घरी आलीय त्यासाठी..." तो पुढे म्हणाला. सुकन्या त्याच्या बोलण्याने प्रभावित झाली. आपल्या आईचीं किती काळजी करतो.

" दीदी आपले ताट मी घेते. ह्यांचे ताट तू घे... काय माहित कदाचित देवीच्या मनात असेच काही असावे... "

" सुजाता... ss.." सुकन्या तिच्यावर डोळे वटारत ओरडली. ती आज काही जास्तच बोलत होती.

" बरं बाई राहिले...." सुजाता म्हणाली. अखेर शेखरने तिला डोळ्यांनी इशारा केला. की बाई आता शांत राहा जरा...

पुजाऱ्याने शेखर ला ओळखले. दरवर्षी चांगली घसघशीत देणगी मंदिराला त्यांच्या कंपनी कडून मिळत होती. त्या देणगी मधून लोक कार्याला हातभार लागत होता. कित्येक लोकांनां आजारपणात मदत मिळत होती. अश्या दानशूर लोकांमुळेच तर समाजातील गरीब लोकांना वेगवेगळ्या समस्या मधून बाहेर यायला मदत होत होती.
पुजाऱ्याने तिघांना आत गाभाऱ्यात घेतले. अगदी आई महालक्ष्मी च्या चरणाशी जाऊन त्याच्या हस्ते त्यांनी देवींची ओटी भरून घेतली. दोघी खूप खुश झाल्या. अगदी देवीच्या पायाला हात लावून त्यांना आज देवीला नमस्कार करायला मिळाला होता. कोणाला शक्यतो आत सोडत नसताना आज फक्त शेखर मुळे त्यांना खास vip माणसासारखे आत सोडण्यात आले होते.

बाहेर येऊन तिघे काही वेळ मंदिरात बसले. आणी मग तेथून बाहेर पडले..

" शेखर सर.. मला भूक लागली आहे.. " सुजाता म्हणाली.

" हो.... मला पण शेखर... सकाळी उशीर झाला म्हणून काही खाल्ले नाही तसेच बाहेर पडलो... "

" शेखर...? " सुजाता डोळे मोठे करत दोघां कडे बघत विचारत होती.
आता मात्र सुकन्याने लाजून मान खाली घातली... आणी शेखर हसत होता...

" काही तरी घडलेय आणी जे मला माहित नाही..." सुजाता बोलली.

" काही घडले नाही.... तू चल गाडीत जाऊन बस..." शेखर ने तिला पुढे पाठवले.. आणी तो सुकन्या बरोबर चालू लागला.
तिघांनी नाश्या केला. मग मस्त फिरायला सुरवात केली. गेटवे ऑफ इंडिया , हँगिंग गार्डन , दुपारी एक पिक्चर बघून संध्याकाळी ते मरीन लाईन्स ला क्विन नेकलेस म्हणून फेमस असलेल्या समुद्राच्या मोठ्या मोठ्या दगडी कट्यावर बसले. सुजाता त्या दोघां पासून काहीशी लांब बसली होती. तिचे कानात हेडफोन घालून गाणे ऐकणे चालू होते.
सुकन्या त्याच्या अगदी बाजूला बसली होती . तो खरोखर एक चांगला माणूस आहे हे तिला आता पर्यंत लक्षात आले होते. दिवसभर त्याच्या बरोबर असून पण त्याने कधी तिला स्पर्श पण केला नव्हता. थिएटर मध्ये पण चुकून त्याचा तिला स्पर्श झाला तरी तो सॉरी म्हणून सावरून बसत होता. स्त्रीला चुकून झालेला स्पर्श आणी मुद्दाम केलेला स्पर्श लगेचच लक्षात येतो. ईश्वराने त्यांना तशी देणगीच दिली आहे. त्यामुळे एखादी मुलगी आपल्या भावी जोडीदारात शोधात असलेले सगळे गुण त्यात तिला दिसत होते. तो प्रेमळ होता. त्याला माणुसकी होती. धाडसी होता. स्वतःच्या पायावर उभा होता. आणी सगळ्यात जास्त तिच्यावर प्रेम करत होता. अजून काय हवे होते? बस्स आता त्याने आपल्याला एकदा विचारावे... काही गोष्टी होत्या पण त्या शॉर्ट आउट करता येण्यासारख्या होत्या. पण बराच वेळ तो काहीच बोलला नाही. शांतचित्ताने तो समुद्रावरून येणारी खारी हवा आपल्या फुफुसात भरून घेत होता. मंद लाटेवर डुलणाऱ्या होड्या बघत तो अजून पण विचारात गढला होता.

" चला जाऊ या कां ? " सुजाता पण उठून आली.

" अग जाऊ ना... काय एव्हडी घाई आहे ." सुकन्या घरी जाण्याचे लांबवत होती. त्याला अजून काही वेळ हवा असेल म्हणून ती मुद्दाम थांबत होती. पण तो शांतच बसला होता.

" शेखर तू काहीच बोलणार नाहीस कां ? असेच बसून मी बोर झालेय." शेवटी ती म्हणाली.

" हो कां ? सॉरी... अग खुप दिवसांनी असा समुद्रावर बसलो आहे ना म्हणून त्यातच गुंतून गेलो... "

" ह्म्म्म... "

" तुला सुजाता नी सांगितले की नाही ? "

" काय ? "

" माझ्या बद्दल...?"

" काय शेर बद्दल ? " आता तिला पण गंम्मत वाटत होती. सुजाता तिला म्हणाली होती की तो तिच्यावर प्रेम करतोय म्हणून पण ती आता नेमका तोच विषय बोलत नव्हती. तिला त्याच्या तोंडून ऐकायचे होते.

" शेर बद्दल नाही...माझ्या बद्दल , आपल्या दोघां बद्दल.."

" काय ? मला नीटसे समजले नाही.. "

" सुकन्या ,..... तू मला खूप आवडतेस. तुला पहिल्यांदाच जेव्हा शॉपवर पाहिले तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. तुझ्या सोबत उर्वरित आयुष्य घालवावे असे मला वाटते आहे. तुला काय वाटते आहे ? मी आहे कां तूझ्या लायक?" तो असे म्हणताच तिने पटकन त्याचा हात धरला.

" शेखर असे काय विचारतोस? तुझ्या सारखा मुलगा ज्या मुलीच्या आयुष्यात असेल ती खरोखर भाग्यवान असेल. मला सुजाता म्हणाली होती पण मला तुझ्या तोंडून ऐकायचे होते. " ती हळुवार त्याच्या बाजूला सरकली. दोघांचे हात एकमेकांच्या हातात होते. आता दोघे एकमेकांच्या साथीने मावळतीला चाललेल्या सूर्याच्या साक्षीने आपल्या नवीन नात्याची सुरवात करणार होते.

त्या रात्री बाबा नी तिच्या आई समोर हा विषय काढला. त्यावर आईने तिचे मत विचारले. बाबा , आई , सुजाता शेखर सगळे असतानाच तिने दोन अटी घातल्या.

एकतर लग्ना नंतर आई आणी सुजाता तिच्या बरोबर राहतील. त्याला आईने विरोध केला. त्या मानी स्त्री ला असे जावयाच्या घरी राहणे कसे रुचणार होते?
दुसरे म्हणजे तीला शेखर बरोबर एकांतात काही बोलायचे होते .

त्या प्रमाणे ती शेखरच्या रूम मध्ये गेली.

" बोल... "

" शेखर माझे पण तुझ्यावर खुप प्रेम आहे.. पण तुझे हे शेर प्रकरण मला काही स्वस्थ बसू देणार नाही. मला पण वाटते की तुझ्या नावाचे मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात घालावे. तुझ्या नावाचे कुंकू कपाळी लावावे पण ते कुंकू कधीही पुसले जाऊ शकते हे मी कसे विसरू ? लोकांचा संसार उभा करताना कधी माझा संसार पण उध्वस्थ होऊ शकतो हे मी नाही रे विसरू शकत... "

" तुला काय म्हणायचे आहे ? "

" जो पर्यंत शेर आहे तोपर्यंत माझ्या डोक्यावर टांगती तलवार आहे म्हणून जो प्रयन्त शेर आहे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही... हीच माझी फायनल अट आहे. "

" ते कसे शक्य आहे... " तो गोंधळला...
" नाही.. नाही ते शक्य नाही... "

" बघ शेखर मला पण तुझ्याशी लग्न करायचे आहे पण शेर असताना हे शक्य नाही... त्यामुळे त्यावर विचार कर..."

" त्यात विचार काय करायचा...? शेर कदापि बंद होणार नाही. किमान मी असे पर्यंत तरी नाहीच.. "

" मग काय पुढे बोलणेच व्यर्थ आहे..पण मला वाटते तू एकदा आपल्या माणसाबरोबर ह्यावर चर्चा करावीस त्यांचा ही सल्ला घ्यावास.."

" ठीक आहे तू म्हणतेस म्हणून मी माझ्या माणसांना विचारतो.. उद्या माझ्या बरोबर तू पण ऑफिस ला ये आपण सगळ्यांना ह्या गोष्टीची माहिती देऊ त्यांचे मत जाणून घेऊ..." शेखर म्हणाला. पण त्याला खात्री होती की त्याची माणसे काहीही झाले तरी त्याची साथ सोडणार नाहीत. उगाचच तिच्या मनात शंका नको. सगळ्यांचा विचार ऐकून कदाचित तिचा विचार बदलेल. जर ती खरोखर प्रेम करत असेल तर....

" ठीक आहे...." ती म्हणाली. आणी सावकाश पाऊले टाकत त्याच्या समोर आली. त्याच्या गहिऱ्या डोळ्यात डोळे टाकून तिने शांतपणे पाहिले. आणी पुढे होत त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले.

" जर सगळे काही सुरळीत झाले तर मी तुझीच आहे. आणी मला त्यात आनंदच आहे. " असे म्हणून ती त्याच्या रूम मधून बाहेर पडली.
शेखर बिचारा कधी ह्या प्रेमाच्या भानगडीत न पडलेला. त्याला मुलींच्या ह्या अदा कश्या माहित असणार? बिचारा भारावून गेला. पण त्याला काय माहित की हा गुगली होता आणी त्याची विकेट काढायलाच तो टाकला होता.

खाली येऊन शेखर ने आम्हाला काही वेळ हवा आहे असे सांगितले आणी वेळ मारून नेली.

दुसऱ्या दिवशी शेखर बरोबर सुकन्या पण ऑफिस ला आली. त्यांनी आपल्या सगळ्या माणसांना बोलावून घेतले.

" मित्रांनो , आजवर तुम्ही सगळ्यांनी मला मनापासून साथ दिलीत. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही माझी साथ सोडली नाहीत पण आज एक पेच आपल्या समोर आला आहे. त्यावर तुमचा सल्ला जाणून घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. " शेखर म्हणाला आणी क्षणभर थांबला. सगळे कान देईन त्याचे बोलणे ऐकत होते.
" ही सुकन्या.. काही दिवसापूर्वी माझी हिच्याशी ओळख झाली. आणी मी प्रेमात पडलो. पण लग्नासाठी हिची एक अट आहे.... शेर बंद करणे.........."
" असे काही होईल असे मला ही वाटले नव्हते. नाहीतर प्रेमात पडलोच नसतो. ह्या पुढे मी कधीही अशी चूक करणार नाही. आल्या प्रसंगामधून कसा मार्ग काढायचा हे तुम्ही मला सांगा.... घाई नाही.... दोन दिवस विचार करा आणी मग आपला निर्णय कळवा. जर शेर ह्या पुढे ही आपले काम करत राहावी असे वाटत असेल तर. आपण ह्या पुढे ही काम करत राहू... आणी जरी तुमचा निर्णय शेर विसर्जित करण्याचा असला तरी कोणाला कुठे जायची गरज नाही . सगळ्यांना आपण पंचरत्न च्या परिवारात सामील करून घेऊ... कोणाला नोकरीची चिंता करण्याचे कारण नाही.... "

शेखरच्या बोलण्यावर सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. लोक कुजबुजत तिथून निघून गेले. शेखर धपक्कन आपल्या खुर्चीत पडला. त्याला असे वाटत होते की कोणी त्याच्यातील सगळी शक्तीच काढून घेतली आहे. आता केबिन मध्ये तो आणी सुकन्या दोघेच होते. तिने सावकाश त्याचा हात हातात घेतला त्याला हळुवार कुरवाळत तिने त्याला धीर दिला.

दोन दिवसा नंतर परत सगळे जमले. ह्या दोन दिवसात शेखर बराचसा सावरला होता. आपली माणसे कधीही शेर बंद करूया असे म्हणणार नाहीत ह्याचा त्याला ठाम विश्वास होता. त्यामुळे नंतर सुकन्या ला कसे समजावून सांगायचे ह्याचाच विचार तो करत होता.
पण झाले भलतेच सगळ्यांनी शेर विसर्जित करण्यावर शिक्कामोर्तब केले. हा शेखर ला खुप मोठा झटका होता . त्याला कळतच नव्हते की आपल्या माणसांनी असा निर्णय कां घ्यावा ? पण तिला सांगितल्या प्रमाणे आता शेर बंदच करावी लागणार होती. आता काही कारणे देऊन चालणार नव्हते.

" ठीक आहे.. तुमच्या सगळ्यांचा निर्णय मला मान्य आहे.
विनू , सारंग आपल्या हातात किती कामे पेंडिंग आहेत ? "

" आहेत काही... पण फारसी महत्वाची नाहीत. आम्ही दोघे बघून घेतो... "

" किती दिवस लागतील? "

" तीन एक महिने लागतील. "

" बरं... सहा महिने... सहा महिन्यात सगळे कामे आटपून पूर्णपणे शटडाऊन करायचे.... शेरचा कोणताही मागमूस राहता कामा नये..." शेखर चा आवाज जड झाला होता.

" ठीक आहे..." विनू म्हणाला.... पण सगळ्यांच्याच मनावर ताण आला होता. थोड्याफार फरकाने सगळ्यांची तीच अवस्था होती सुकन्या वगळता... ती मनातून खूप खुश होती. पण तिला माहीत नव्हते की शेखरच्या माणसानी त्याच्या वरील प्रेमापोटी हा निर्णय घेतला आहे. जर तो म्हणाला की पुन्हा अशी चूक होणार नाही तर खरोखर तो परत नाहीच अशी चूक करणार. कदाचित तो पुढे लग्न ही करणार नाही. सुकन्या त्याला सर्व बाजूने अनुरूप होती. म्हणून सगळ्यांनी विचार केला की शेर काय परत पण उभी करू... माणसे तर इथेच आहेत मग त्याला कितीसा वेळ लागणार आहे पण जर ती त्याच्या आयुष्यातून गेली तर मग काही खरं नव्हते.

सगळे निघून गेले. सुन्न मनस्थितीत शेखर आपल्या खुर्चीत बसून होता. काल आलेल्या पोरीने त्याला अस्मान दाखवले होते. त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. सुकन्या ने त्याला आपल्या छातीशी लावले. त्याला आता खरं धीर देण्याची गरज होती. त्या संध्याकाळी दोघांनी घरी पुढील सहा महिन्यात लग्न करत असल्याचे जाहीर केले. आणी घरी ही सगळे आनंदात होते.

बघता बघता सहा महिने झाले. शेर च्या सगळ्या माणसांना शिफ्ट केले गेले. उद्या पासून शेर चीं माणसे पांढरपेशा दहा ते सहा ही ड्युटी करणार होते. परेश भाई ने सगळ्यांना कामाची रूपरेषा सांगून ठेवली होती.

आपल्या रूम मध्ये शेखर हातात व्हिस्कीचा ग्लास घेऊन उभा होता. जुन्या आठवणी , शेरचीं जुनी प्रकरणे त्याला आठवत होती. तो इतका विचारात बुडाला होता की सुकन्या कधी त्याच्या रूम मध्ये आली त्याला कळलेच नाही.

तिने आल्या आल्या त्याच्या हातातील ग्लास काढून घेतला.

" अग हे काय ?"

" काही नाही.... आज मी खूप खुश आहे. आणी माझा आनंद मी कोणाबरोबर वाटणार ? तूच एक आहेस ना ?"

" अरे वा...." तिच्या आनंदात उगाच विरजण नको म्हणून तो म्हणाला.

" शेखर आज मी खरोखर खूप खुश आहे. आज पासून आपण आपल्या नवीन आयुष्याला सुरवात करणार आहोत.." त्याला मिठीत घेत ती म्हणाली. आपसूक त्याचे हात ही तिच्या भोवती पडले. ती अशी मिठीत असताना शेखर सगळे काही विसरला..तिचा कामुक गंध , शरीराची उब त्याला बैचेन करत होती. हलकेच त्याचे हात तिच्या भोंवती जरा जास्तच आवळले गेले. तिच्या ही ते लक्षात आले पण त्याच्या मिठीतुन सुटण्याची अजिबात तसदी न घेता ती आणखीन त्याला घट्ट चिटकली.

" आता लग्नानंतर तू ह्या रूम मध्येच येणार आहेस तर ही रूम तुला हवी तशी सजव... तुझ्या आवडीचा रंग , आवडीचे पडदे आणी आता बेड पण मोठा घेऊ , काय ? मी एकटाच थोडी झोपणार आहे." त्याने मिश्किल स्वरात तिला म्हंटले.

" हट्...." ती त्याला ढकलून पळणार होती. पण तो शेखर होता त्याला आधीच अंदाज आला होता त्यामुळे तो सावध होता. ती पळण्याआधीच त्याने तिला परत पाठमोरी पकडून आपल्या अंगावर खेचली. मागून दोन्ही बाजूने तिच्या कमरेवर हात गुंफून त्याने तिला आपल्या जवळच धरून ठेवले. दोघे एकमेकांना घट्ट चिटकले होते. दोघांचे श्वास जोरात धावत होते . त्याने मागूनच हळूच तिच्या गालावर किस केले . त्याच्या त्या कृतीने ती शहारली.. एक गोड लहर तिच्या शरीरभर पसरत गेली.

" आई विचारात होती..... लग्न कधी करताय ? " तिने सावकाश विचारले.

" तुला माझ्यावर विश्वास नाही ?"

" आहे. स्वतः पेक्षा ही जास्त..."

" मग झाले तर...." तो क्षणभर थांबला.
" आईला सांग जरी उद्याचा मुहूर्त असला तरी मी लग्नाला तयार आहे. " त्याच्या उत्तराने ती खुश झाली.

" खरंच...." पण तरीही तिने खात्री साठी पुन्हा विचारले.

" अगदी खरं.... " तिच्या कानाला एक हलकेच चावा घेत तो म्हणाला.. ती पुन्हा शहारली... तिने डोळे बंद केले. आणी स्वतःला त्याच्या सुपूर्द केले. खूप दिवस दोघांनी वाट पाहिली होती. आपापल्या मर्यादेत दोघे रहात होते. पण आता जेव्हा एकमेकांच्या जवळ आल्यावर हे सगळे थोपवणे काहीसे कठीण वाटत होते. तिची अवस्था त्याच्या लक्षात आली. पण इतक्या दिवसात कधी ही आपली मर्यादा न ओलांडणारा शेखर आता पण सावध झाला. त्याने तिला सोडले... त्याच्या त्या प्रतिसादावर ती काहीशी चमकली... पण आता त्याच्या बरोबर राहून ती त्याला बऱ्यापैकी समजू शकत होती.
ती सावकाश वळली. आणी तिने आपले ओठ त्याच्या ओठात टाकले. काही क्षण एकमेकांत आकंठ बुडाल्यावर तिने त्याला सोडले.

" आई ला सांग लवकर मुहूर्त काढा.... आता जास्त थांबणे मला पण कठीण आहे..... काय ? " हसतच तो म्हणाला...
त्यावर लाजून ती खाली पळाली. आणी शेखरने पुन्हा ग्लास उचलला... आता मात्र त्याच्या डोळ्यात पाणी होते.
आज शेर कायमची संपली होती.. हे अश्रू त्या साठीच होते....


© सर्वाधिकार लेखकाकडे....

============ समाप्त ==============