Bhatkanti - Aathvanichya gard ranatali - 10 in Marathi Fiction Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १०

Featured Books
Categories
Share

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १०

सुप्री- संजनाची गाडी आली एकदाची आणि त्यांचा प्रवास सुरु झाला.
" काय गं ... काय सांगितलं घरी तू.. " ,
" काय सांगणार ... खोटेच बोलली ना ... मैत्रिणीचे लग्न आहे असं सांगितलं. दोन्ही ठिकाणी. घरी आणि सरांना... आता सरांना काय माहित आहे सर्व.. मी तुझ्यासोबतच जाणार ते.. हे माहीत असते त्यांना. so , ते झालं... पण घरी किती चौकशी केली. कोणती मैत्रीण , नाव काय.. कुठे राहते... सांगितलं मग ... गावाला लग्न आहे.. म्हणून चालली.. तू काय सांगितलं घरी " ,
" सवाल आहे काय ... तुझंच नाव सांगितलं... बोलली , संजना सोबत चालली आहे.. तिला सोबत पाहिजे म्हणून मला घेऊन जाते आहे.. " सुप्रीच्या या वाक्यावर संजनाने हात मारला कपाळावर.


" तरी कुठे शोधायचे आकाशला ... ठरवलं आहे का ... " संजना...
" नाही तस ... पण त्याला मेसेज करून ठेवला आहे... आहेस तिथे थांब.. कॉल तर लागत नाही... " सुप्रीने सांगितलं. बाहेर पावसाची काळोखी तशीच होती. पहिला पाऊस ना !! संजनाचे लक्ष खिडकीच्या बाहेरच होते.
" तुला काय झालं ग .... एकदम शांत झालीस. " सुप्रीने संजनाला कोपराने ढकललं.
" नाही... मनात विचार आला. आकाशचा... तुला पटणार नाही म्हणून बोलली नाही... " ,
" बोल तर ... पटेल कि नाही ते नंतर... " ,
" ok ... बघ हा ... आकाशाला तू अडकवून ठेवले आहेस , असं मला वाटते. राग नको मानू हा... " ,
" का ... अस कस वाटलं तुला ... " ,
" मी आणि तुही पाहिलं त्याला ... २ वर्ष इथे शहरात थांबून होता... कसा डोळे भरून आभाळाकडे पाहत असायचा. आणि आता त्याला त्या फोटोग्राफी कॅम्प साठी पाठवलं तर कसा त्याच्या मूळ स्वभावाकडे वळला तो..... बघ ना ... त्याला सुप्रीला कॉल करावा हे लक्षात सुद्धा नाही. तुमचे नाते छानच आहे... त्यात काही वादच नाही. पण पुढे कधी पुन्हा अशी घालमेल सुरु झाली कि नाही राहवणार त्याला... हे मात्र नक्की... जशे ते पिंजऱ्यात पक्षी कसे सारखा उडायचा प्रयत्न करत असतात तसा आकाश वाटला मला. सॉरी सुप्री... but मनात जे आले ते बोलली... " संजनाच्या बोलण्यात तथ्य होते. सुप्री काही न बोलता तशीच खिडकीपाशी डोकं ठेवून बाहेर बघू लागली.


============================== =============================


आकाश भरभर चालत होता. तरी पाऊस गाठणार हे माहित होते त्याला. समोर एक मंदिर दिसतं होते. त्यापुढे गाव होते. गावाकडे न जाता आकाशची पावलं देवळाकडे वळली. एक गणपतीची मूर्ती सोडली तर मंदिरात कोणीच नव्हते. मंदिर गावापासून तसं लांबच होते, जरा वरच्या बाजूला. आकाशने बॅग खाली ठेवली आणि आजूबाजूला न्याहाळू लागला. बऱ्याच दिवसांनी आकाश असा निवांत बसला होता. समोर काही अंतरावर कसलीशी शेतं वाऱ्यावर डोलत होती. मंदिराच्या आजूबाजूला कोणीतरी जाई-जुईची झाडे लावली होती. बरीच फुले फुलली होती. वाऱ्यासोबत तो सुगंध दरवळत होता. जणू काही समोरच्या त्या काळ्या - तांबड्या मातीलाही जाई-जुईचा गंध आलेला होता. हिरव्या झालेल्या झाडाचा रंग, आता आजूबाजूला मिसळून गेला होता. माणसाशिवाय असलेले जंगलच आता गर्दी करून कोणीतरी येणार आहे, त्याची सर्व वाट बघत आहेत असेच भास होत होता.


मधेच एखादी वीज चमकून जायची, भर दुपारी ... रात्रीलाही लाजवेल असा काळोख केला होता पावसाने. सूर्यदेवाचे काहीच चालणार नाही. मृग नक्षत्राची सुरुवात होती ती. गावात लक्ष गेलं आकाशचे. कौलारू घरे. काही शेणानी सारवली असतील ना. पहिल्या पावसात त्या शेणाचा गंध मिसळून एक वेगळंच रसायन तयार होईल. मग उधळतील मनांचे घोडे. वेडावून जायला होते अश्याने अगदी. आता तरी कमीच धावपळ दिसत आहे गावात. पावसापासून आपले सामान आवरत असतील. पण पावसाने एकदा का सुरुवात केली कि येतील सर्व बाहेर भिजायला. पहिल्या पावसात.... शहरात तर नाकं मुरडतात लगेच. या गावकऱ्यांना माहित पावसाची किंमत. आकाश स्वतःशीच हसला.


पाचच मिनिटात पावसाची सुरुवात. पहिला पाऊस !! आकाश मनोमन सुखावला. पानांवरती मोती सांडावे ,असेच काही घडत होते समोर. मित्र आलेला भेटीला. गावाकडे जाणारी वळणवाट आता दिशेनाशी झालेली. वेगवेगळे , छोटे छोटे पाण्याचे ओहोळ ..... त्या पायवाटेवर एकमेकांना भेटत - मिठी मारत , एकमेकांच्या हातात हात घालून चालते झालेले. गावाकडच्या अंगणातल्या तुळशी वृंदावनाला सुद्धा गाणी सुचत असतील आता. बाया- बापड्यांचे पाय आपसूकच , ती आभाळातून पडणारी ओली नाणी वेचायला बाहेर पडलेली असतील. वाऱ्याने सुद्धा पायात पैंजण बांधावे आणि बेभान होऊन ताल धरावा त्याने, असच वाटतं होते. मनाला तो हिरवा मोह होणारच मग.. समोरच्या शेतात काही ठिकाणी भर पावसात धुक्याची चादर पसरली होती निसर्गाने. एका कोपऱ्यात , घरांच्या नजरा चुकवून आलेल्या तरुण पोरी... सर्वा देखत भिजता येतं नाही म्हणून ... गुपचूप तिथे भिजत होत्या... आनंद अनुभवत होत्या. कुठे एका झाडावर पक्ष्यांचे एक जोडपं एकमेकाला बिलगून बसलेलं होते, मातीचा गंध तर आता जाई-जुईच्या फुलांचाही वरचढ होऊ घातला होता. आकाशला हे नवीन नव्हतं तरी दूर राहिल्याने कदाचित त्याची किंमत कित्येक पटीने वाढली होती.


अचानक त्याला काही आठवलं, त्याचा पहिला प्रवास... असंच ते पहिलं निसर्गाचं दर्शन... हरपून गेलेलो ना. आकाशला जुने दिवस आठवले. तेव्हा तर अगदी नवखा होतो मी या निसर्गाला आणि पावसालाही. तरीही सामावून घेतलं मला त्याने. मलाही आणि पूजालाही. अरेच्या !! पूजा .... किती वर्षांनी आठवण झाली तिची. एकत्र प्रवास सुरु केलेला ना आम्ही. किती भटकायचो. त्यानंतर तो जिप्सी लोकांचा ग्रुप येऊन भेटला आम्हाला. जवळपास ३-४ वर्ष एकत्र होतो आम्ही. त्यानंतर वेगळे झालो आम्ही. कशी असेल पूजा. तिला आठवत असेन का मी... निरोप घेताना बोललो होतो तिला, मनात एक लहानशी जागा ठेव माझ्यासाठी.... छान जमायचे आमचे, छानच हसायची. प्रत्येक वेळेला कधी वेगळं शोधत असायची. प्रत्येकाला मदत करावी असे तिचे म्हणणे आणि करायची सुद्धा मदत. छान बोलायची. छान कविता करायची. आता करत असेल का कविता... त्यापेक्षा आता फिरत असेल कुठे का .... मी तरी २ वर्ष शहरात होतो. पुन्हा भेट झालीच तर बोलेल... २ पावसाळे जास्त बघितले तुझ्यापेक्षा... सुप्री तेव्हाच भेटली असती तर कदाचित एवढा फिरलो नसतो किंवा इतके भटकंती करूही शकलो नसतो. अचानक त्याला त्या रखवालदाराचे वाक्य आठवलं. खरंच का... लग्नानंतर हि अशी भटकंती बंद होईल ..... म्हणजे ..... हि शेवटची भटकंती आपली...


असा विचार आला आणि वीज कडाडली. आकाश त्या सर्व विचारातून बाहेर आला क्षणात, समोर घडत असलेल्या प्रत्येक क्षणात जगावे असेच ठरवले होते ना आपण. मग आता का पुढचा विचार करावा, येतील ते क्षण छानच असतील , आणि ते सुंदर कसे बनवायचे ते सांगायला निसर्ग आहेच. पावसाचा थंडावा चहुबाहुला पसरला होता. सर्व धरतीला त्याने आता कवेत घेतलं होते. आकाश त्या मंदिरात पहुडला. झोप लागली तर... चिंता नाही... वीज येईल झोप मोडायला आणि भानावर आणायला... तोपर्यंत आठवणीत रमून जाऊ . आकाश खूष होता. सॅक डोक्याखाली घेतली आणि तसाच झोपून तो पहिला पाऊस बघू लागला. इतकं विशाल तरी ओलं झालेलं आभाळ खाली त्याच्या भेटीला आलेलं ना !!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: