Bhatkanti - Aathvanichya gard ranatali - 7 in Marathi Fiction Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ७

Featured Books
Categories
Share

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ७

आकाशला आता खूप मोकळ मोकळं वाटतं होते. गेले ३ दिवस नुसता भटकत होता. कोणाचेच आणि कसलेच tension नाही. कोणाला फोन करायचा नाही कि कोणाचा फोन येणे नाही. असा विचार आला मनात आणि त्याला आठवलं. सुप्रीला तर फक्त मेसेज केला, फोन करायला पाहिजे. लगेच त्याने मोबाईल बाहेर काढला. range कुठे होती. या मोबाईलचे असेच असते, जेव्हा पाहिजे असतो तेव्हा उपयोग नाही होतं. बाकीचे तासनतास कसे डोके खुपसून बसलेले असतात काय माहित मोबाईल मध्ये. त्याने पुन्हा मोबाईल बॅगेत टाकला. आणि गावात फेरफटका मारू लागला.


गाव तसं लहानच होते. तरी आखीव -रेखीव होते. कौलारू घरे, प्रत्येक घरासमोर एक छोटेसे अंगण. एका बाजूला आमराई होती. केवढी मोठी ती... पावसाळा सुरु झाला नसला तरी आंबे संपले होते. बाकी त्या आंब्यांचा मधुर सुवास तेव्हढा मागे राहिला होता. आकाश आपसूकच वळला तिथे. आमराईत आत शिरणार तोच त्याच्या रखवालदाराने त्याला अडवलं. त्याने आकाशला निरखून पाहिलं.


" शहरातले वाटता.. हि आमराई आहे... वाट चुकलात वाटते... आत कोणाला जायला नाही.. " ,
" मी काही घेणार नाही... फक्त फोटो काढायचे होते... तुम्ही बोलता तर नाही जात... " आकाशने हसून निरोप घेतला.
" थांबा थांबा ..... तुम्ही चांगले वाटता... फोटो काढायचे आहेत तर जावा आत ... पण चुकलात तर आत मध्ये... गर्द झाडी आहे ना आत ... " त्या वाक्यावर आकाशला हसू आलं. आपण पण आठवणींना असंच म्हणतो ना ...


" का हसलात .... आणि इथेच का आलात... " आकाश आतमध्ये शिरला सुद्धा , त्याच्या मागे मागे ते रखवालदार. " तुम्ही हरवलात तर कुठे शोधत बसणार .... म्हणून आलो मागे ... " आकाशने विचारण्याआधीच त्यांनी सांगून टाकले. आकाश पटापट फोटो काढत होता. मध्येच थांबून बघत राहायचा कुठेतरी.

" मी लहान होतो ना .... तेव्हा एकदा... माझ्या वडिलांसोबत आलेलो... अश्या ठिकाणी, जागा हीच होती का माहित नाही.... पण अशीच आमराई होती. मोट्ठी... त्या आमराईच्या दुसऱ्या टोकाला एक लोखंडी बाक होता, तिथे बसवले होते मला आणि जाताना सांगून गेले, मी येईपर्यंत जागचे हलायाचे नाही... तसाच बसून होतो.. किती वेळ माहित नाही.... पण तेव्हा पासून या निसर्गाची सवय लागली असं वाटते. " आकाश सांगत होता आणि तो ऐकतं होता.


आकाशचे फोटो काढणे सुरूच होते. " तुम्ही फोटोग्राफर आहात का... " त्याचा प्रश्न.
" हो ... " ,
" मग गावात का आलात ... फोटोसाठी का .. " ,
" सहज... मला आवडते गावं " त्याची बडबड सुरूच होती. मध्ये मध्ये थांबून आकाश फोटो काढतच होता. बराच वेळ चालत चालत ते दोघे आमराईच्या दुसऱ्या टोकाला पोहोचले.
" तो बघा ..... तुम्ही बोललात तसंच लोखंडी बाक आहे.. " आकाशने हि पाहिलं ते. खरच कि !!


आकाश बोलला तसा लोखंडी बाक होता तिथे, गंजलेला.. इतक्या वर्षात पाऊस - पाण्याने त्याची तशी अवस्था झाली असावी. आकाशने हात फिरवला त्यावरून.


" मला इथे ४-५ वर्ष झाली रखवालदारी करून. एवढ्या वर्षात मी कधी आलोच नाही इतका आतमध्ये. मालकाने सुद्धा इथे कधी पाठवले नाही मला. हा बाक आहे हे माहीतच नाही मला. तुम्हाला बरी आठवण राहिली एवढ्या वर्षात... मानलं पाहिजे तुम्हाला... " तो रखवालदार म्हणाला. आकाश मनोमन हसला.


" आठवणी कधीच पाठ सोडत नाहीत. वडिलांनी तेव्हा बसायला सांगितले होते. कुठे गेलेले माहित नाही. शहाण्या बाळासारखा बसून राहिलो होतो इथे. शांत .... आजूबाजूला.... फक्त वाऱ्याचा आभास , झाडांची पाने डोलायची त्या वाऱ्यावर ... त्यांचा आवाज आणि पक्ष्यांची किलबिल... संध्याकाळ पर्यंत बसून होतो एकटाच... वडील तर विसरून गेलेले मला. आई आलेली धावत धावत शोधायला... आठवत नाही... त्यानंतर कधी वडिलांनी मला सोबत फिरायला नेले असेल... " आकाशने पुन्हा त्या लोखंडी बाकाकडे पाहिलं. " मनात घट्ट जागा करून गेली ती आठवण... "


============================== ============================


पूजा - कादंबरीचा पुढचा प्रवास सुरु झालेला. एका वळणावर मुक्कामाला थांबले सगळे. दुपार होती. जेवणाची तयारी सुरु होती. कादंबरी जेवण करण्यात मग्न होती. पूजा मात्र कुठंतरी हरवली होती. खूप वेळ पूजाचा काही पत्ता नाही म्हणून कादंबरी तिचा कानोसा घेत पुढे आली. बघते तर पूजा काहीतरी लिहीत बसली होती. कादंबरी हळूच वाकून बघून आली.


" काय लोकं किती बिझी झालीत... बघत पण नाहीत ... " तसा पूजाने तिच्या पायावर चिमटा काढला.
" लिहिते आहे काहीतरी .... आपल्या ब्लॉगसाठी... " कादंबरी शेजारीच बसली तिच्या.
" मॅडमजी ... आपण सध्या तरी कोणत्या ठिकाणी पोहोचलो नाही. मग कश्याबद्दल लिहिते आहेस तू.. तसे मला फोटो काढता येतील ना ... " पूजाने कादंबरीकडे पाहत एक उसासा सोडला. लिखाण बंद केले


" किती घाई असते ना तुला... सांगेन बोलली ना... अजून ठरले नाही कुठे जायचे ते... " तस कादंबरीने तिच्या डोक्यात टपली मारली.


" जायचे कुठे माहित नाही आणि माहित नसलेल्या ठिकाणाची माहिती लिहीत बसली आहेस.. वेडी-बिडी झालीस कि काय... " पूजा काय बोलणार यावर.


" जागा माहित आहे फक्त रस्ता नवा आहे. सगळे तयार असतील तर निघू... तिथे ... " पूजा उठली आणि जेवणाची तयारी सुरु होती तिथे आली.


सर्व जेवायला बसले. " मी काही बोलू का.. " कादंबरी सहित सर्वांनी पूजाकडे पाहिलं. " पुढचा प्रवास ठरल्याप्रमाणे होतं नाही आहे. " तसा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला.


" का ... काही प्रॉब्लेम झाला आहे का... " एकाने विचारलं.


" नाही. आपण दरवर्षी पावसाळ्यात, जेव्हा शहरातून पुन्हा गावाकडे निघतो, तेव्हा एक ठरलेली वाट असते आपली. फक्त तीच बदलली आहे मी.. " ,
" तेच ... आपण इतकी वर्ष हा प्रवास करतो आहे. पावसाळ्यात तोच मार्ग जास्त सोयीचा आणि सुरक्षित वाटतो. म्हणून आपली ठरलेली वाट आहे ती.. " त्या 'जिप्सी ' ग्रुप मधल्या सर्वात जुन्या, मोठ्या व्यक्तीने प्रश्न काढला.


" सगळं ठीक.. पण या वेळेस ... जरा बदलायचा विचार करते आहे. म्हणून वाट सुद्धा बदलली. कोणालाच त्रास होणार नाही, किंबहुना एक वेगळा अनुभव... इतक्या वर्षात काही नवीन केल्याचे सुख मिळेल सर्वांना... " पूजा छान बोलली. पटलं सर्वाना. जेवण संपली आणि सगळ्यांनी पूजाला संमती दर्शवली. पूजा खुश. संध्याकाळी आभाळ भरले. पावसाचा वावर जरी जाणवत नसला तरी थंडावा आलेला. पूजा - कादंबरी त्यांच्या तंबूंत बसलेल्या होत्या. तंबूच्या दारातून थंड हवा आत येतं होती.


" नक्की ... का ... असं......... तुला....... क....... रा ........ वं........ सं........ वा ....... ट........ लं " कादंबरीचा लांबलचक प्रश्न. पूजा बाहेरच वातावरण न्याहाळत होती.
" वाटलं सहजच... " ,
" सांग कि " कादंबरीने तिच्या खांद्यावर हात टाकला.
" काही शोधायचे आहे. " ,
" काय हरवलं आहे " ,
" हरवलं काही नाही... आठवणी, काही आठवणी लहानपणी मागे सोडून आली. त्या अश्याच विखुरल्या आहेत. त्यांनाच वेचायला जायचे आहे... सारे तयार आहेत ... येशील ना तू ... " ,
" मग काय ... तुझ्या सोबत किधर भी डार्लिंग .... एका पायावर ..... एका पायाच्या बोटावर .... एका पायाच्या बोटाच्या नखावर सुद्धा... " पूजा हसली तिचे डायलॉग ऐकून.... " कार्टून आहेस खरच "

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: