Mala Kahi Sangachany - 40-4 in Marathi Fiction Stories by Praful R Shejao books and stories PDF | मला काही सांगाचंय.... - ४० - ४

Featured Books
Categories
Share

मला काही सांगाचंय.... - ४० - ४

४०. एक घाव आणखी - 4

" जवळपास ६ वाजता , डॉक्टरांनी कुमारला तपासलं तेव्हा तो त्यांच्याशी बोलला आणि डॉक्टरांना त्याचा आजार समजला , कुमारने डॉक्टरांना विचारलं की ' मी कुठे आहे , तुम्ही कोण आहे ? ' त्यावर डॉक्टरांनी , ' तुझा अपघात झाला आणि तुझं ऑपरेशन केलं ... ' असं सांगितल्यावर तो काहीही बोलला नाही , अस डॉक्टर म्हणाले होते , डॉक्टरांनी जेव्हा परत त्याला विचारलं की ' कुमार , आता तुला कसं वाटत आहे ? ' तेव्हा , त्यांना एक नजर पाहून तो सारखा इकडे तिकडे पाहत होता , तर डॉक्टरांनी परत त्याला ,' कुमार तुला बरं वाटत नाही का ? ' अस विचारल्यावर , ' कोण कुमार ? मी ? ' अस तो म्हणाला होता , आणखी जरावेळ आई वडील , प्रशांत आणि मित्र परिवार बद्दल त्याला विचारल्यावर ' मला काही माहित नाही ? मला काही एक आठवत नाही . ' असे तो म्हणाला होता , अस डॉक्टरांनी सांगितले ... "

" या सगळ्याचा अर्थ काय ? मला काहीच समजत नाहीये ... "

" डॉक्टरांच्या भाषेत सांगायचे झाले तर कुमारला ' स्मृतिभ्रंश ' हा आजार झाला आहे ... "

" स्मृतिभ्रंश ? ? ? हा कसला आजार आहे ? कुमारला कसा झाला ? "

" आपल्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कुमार आजवर जे आयुष्य जगला त्याचा त्याला आता पूर्णपणे विसर पडला आहे , आता त्याला काहीच आठवण नाही ... "

" काय ? ? ? पण हे कसं शक्य आहे ? कुणी स्वतःच सारं आयुष्य कस काय विसरू शकत ? मला हे मान्य नाही .. नक्की काहीतरी चुकले . "

" आधी आम्हाला सुद्धा यावर विश्वास बसला नाही पण डॉक्टरांनी खात्री करून नंतर हे सर्वांना सांगितलं ... "

" पण असं अचानक का आणि कसं झालं ? "

" त्याचा अपघात झाला , नंतर तो बेशुध्द होता आणि त्याच्या डोक्याला मार लागला होता यामुळे अस झालं असे डॉक्टर म्हणाले ... "

" मला तर अजूनही यावर विश्वासच बसत नाही की कुमार सर्व विसरला ... स्वतःच अस्तित्व सुध्दा ! "

" स्वतःला सावर , आणि हो , मला आणखी एक महत्वाचं बोलायचं होतं म्हणून तुला फोन केला होता ... "

" बोल ना , काय म्हणतोस .. ? "

" तुझ्या बॅगमध्ये एक बुक चुकून आलं होतं ना ते म्हणजे कुमारने लिहिलेली डायरी आहे आणि या संकटातून त्याची सुटका करायला त्या डायरीचीचं आता आपल्याला मदत होईल ... "

" बरं ठीक आहे , उद्याला येतेवेळी मी ती डायरी आठवणीने सोबत घेऊन येते ... "

" ठीक आहे , मी फोन ठेवतो ... " असं बोलून त्याने फोन कट केला ...

त्याच्याशी फोनवर बोलून झालं आणि तिला नवीन प्रश्नांनी घेरलं , कुमार सोबत अस का झालं ? खरंच अस होऊ शकते का ? इतके वर्ष जगलेलं जीवन सहजासहजी कसं विसरता येईल ? स्वतःच्या नावाचा देखील विसर पडावा हे तर अगदीच अशक्य ! आपलं आयुष्य म्हणजे एक पुस्तक आणि कुमारच्या आतापर्यंतच्या जीवनाचे सारे पान कोरेच , त्याने जे क्षण पुन्हा जगून डायरीत लिहिले ते सुध्दा तो विसरला असेल का ? डायरीचा विचार मनात येताच तिला नवा प्रश्न पडला , सुजितला डायरीबद्दल कसं कळलं ? त्याने डायरी कधी बघीतली , त्याने ती डायरी वाचली असेल का ? आणि जर त्याला डायरीचं गुपित माहिती आहे तर तो इतक्या सहजतेने कसा वागू शकतो ... ... ... सुजितने कुमारच्या आजाराबद्दल सांगितल्यावर तिच्या मनावर एक घाव बसला आणि डायरीचं बोलून एक घाव आणखी ...! तिचं मन जरासं ताळ्यावर आलं होतं पण कुमार सोबत जे झालं ते ऐकून ती परत एकदा विचारांच्या वादळात अडकली , मन विचलित अन कश्यातच रमेनास झालं , ती नावालाच किचन मध्ये होती तर राहून राहून तिच्या मनात कुमार आणि त्याच्या डायरी बद्दल विचारचक्र फिरू लागले ... तिने कसतरी काहीवेळ स्वतःला स्वयंपाकात झोकून जेवण बनवलं , रोजच्या सारखेच तिने दोघांसाठी ताट वाढले पण आज घास घशाखाली जात नव्हता . ती समोर तो बसलेला आणि ताट वाढून घेतलेलं होत म्हणून दोन चार घास जेवली , त्याला ऑफिसची उर्वरित कामं करायची होती जेवण लवकर आटोपून बाजूच्या खोलीत गेला , तिच्या ताटात वाढून घेतलेलं सर्व जसच्या तसंच होतं , तिने दोघांचे ताट किचनमध्ये ठेवले , तिने बेडरूमध्ये जाऊन बिछान्यावर अंग टाकले तसे नाईट लॅम्पच्या मंद उजेडात , नीरव शांततेत असंख्य विचारांनी तिला वेढा घातला आणि जसजशी रात्र झाली तसतसा विचारांचा प्रभाव वाढत राहिला , मन बेचैन होऊन भावनांचा पूर डोळ्यातून वाहिला , आसवांच्या धारांनी उशी जरा ओली झाली , रात्र अशीच ढळली पण तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही ...