३९. सोबती - जुने कि नवे - 1
ती विचार करत झपाझप पाच सहा पावलं टाकत किचनमध्ये शिरली . तिने फरशीवर पडलेला ग्लास उचलून ओट्यावर ठेवला , मांजर उपद्वाप करून कुठे लपली ते पाहायला लागली पण मांजर काही तिच्या नजरेस आली नाही ... तरी काहीतरी आवाज करून , कुठे कोपऱ्यात लपून बसली असेल तर पळून जाईल म्हणून तिने एक दोनदा हाकलून द्यायचं म्हणून प्रयत्न केला , जरावेळ हालचाल होते का ते पाहून तिने फ्रीज उघडला आणि थंडगार पाण्याची एक बॉटल बाहेर काढली ... दोन तीन घोट पाणी ती तिथंच प्यायली , मांजर बहुतेक निघून गेली असावी असा विचार करून ती बॉटल सोबत घेऊन परत बेडरूमध्ये आली ... बराचवेळ एकाच ठिकाणी बसून वाचण्याचा तिला जरा कंटाळा आला म्हणून तिने बेडवर ठेवलेली डायरी हातात घेतली , दारातून बाहेर पडतांना तिने पंखा बंद केला आणि ती हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसली ... तिने एका हातातील पाण्याची बॉटल टेबलवर ठेवली , डायरी वाचायला सुरुवात केली ...
माझी ग्रॅज्युअशनच्या पहिल्या वर्ष्याची परीक्षा झाली आणि कॉलेजला सुट्टी लागली होती ... पुन्हा एकदा सुट्टीचा आनंद होता पण उन्हात भटकंती करून आंबे आणणे , दिवसभर सायकली फिरवणे आणि काही जुने छंद तितके सुटले होते , पुस्तक वाचणे , सिनेमा पाहणे आणि कबीरला भेटणे ह्या गोष्टी मात्र अजून तरी तश्याच होत्या ... एक बदल झाला होता तो म्हणजे माझ्या वागणुकीत , आता तिला भेटल्यावर पूर्वीसारखं काहीच राहिलं नव्हतं , ती बोलत असतांना तिचा प्रत्येक हावभाव मी जोपासत होतो , तिचं बोलणं , हसणं , राहणं सगळं सगळं हवंहवंसं आणि कितीतरी जास्त आवडायला लागलं होतं ... तिला नुसतं बघत राहावं असं वाटायचं , मी काहीएक विचार न करता तिला डोळे भरून पाहत राहायचो ... ती बोलत बसायची मी नुसतंच ऐकत राहायचो , बोलता बोलता ती मध्येच एखादी चापट मारून म्हणायची , " कुमार , इतक्यात तु जरा शांत नाही का झाला ? आपण सोबत असतांना नुसतं मीच बोलत असते ... " त्यावर तिला सांगावंसं वाटत होतं की तुझं अस बिनधास्त बोलणं , मध्येच हसणं मला खूप आवडतं म्हणून मी बोलत नाही ... तू बोलत असताना तुला बघत राहावंसं वाटतं .. ! पण तिच्यासमोर ओठांतून शब्द बाहेर येत नव्हते आणि मी तिला " सहजच " असं उत्तर देऊन मोकळा व्हायचो ... रोज नवनवीन पुस्तक वाचणं , सिनेमा बघणं , कबीर आणि किर्तीप्रिया सोबत तास तास भर गप्पा मारणं या दिनक्रमात सुट्ट्या कमी कमी होत होत्या ...
एक दिवस तोही उगवला , बारावीचा निकाल लागला होता ... मला तिचा निकाल आधीच कळला होता कारण तिचा दहावीचा निकाल जाहीर झाला तेव्हा जी योजना आखली होती तिच यावर्षी सुध्दा ..! तिचा रोल नंबर मी तिच्या नकळत मिळवला होता आणि तिच्याआधी सायबर कॅफेवर जाऊन मी निकाल बघितला होता , ती बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती ... तर यावेळी तिला तसं माहित होऊ न देता तिच्याकडून पेढे खाऊन तोंड गोड केलं ... तिला शुभेच्छा दिल्या होत्या , ती बारावी उत्तीर्ण झाली याचा मला तिच्यापेक्षा किती तरी जास्त आनंद झाला होता , कारण ती सुद्धा आता ग्रॅज्युअशन ला प्रवेश घेणार आणि तिचं कॉलेज सुध्दा माझ्यासोबतच सकाळी असणार ... काही दिवसांनी माझा पहिल्या वर्षी चा निकाल जाहीर झाला , यावेळी मी चांगल्या टक्के मिळवून वर्गातून प्रथम क्रमांक पटकावला होता आणि मनी आनंद मावत नव्हता ... घरी , वस्तीत सर्वांनी खूप खूप कौतुक केलं होतं आणि मी त्यांच्या आशीर्वाद व आपुलकीनं सुखावलो होतो . त्यादिवशी तिला भेटलो , तिनेही शुभेच्छा दिल्या , नंतर कबीर जवळ जाऊन निवांत बसलो , " कबीर , दोस्ता आज मी खूप खुश आहे , वर्गातून पहिला आलो म्हणून आणि घरच्यांची स्वप्न साकार करण्याची क्षमता माझ्यात आहे याची जाणीव झाली म्हणून ... थोड्या वेळापूर्वी तिला भेटलो , तिने मला शुभेच्छा देत म्हटलं " तु खूप हुशार आहे " अस जेव्हा तिने म्हटलं तेव्हा जे वाटलं ते शब्दांत मांडायला जमणार नाही ... ती माझ्या आयुष्यात आली आणि सर्व बदलायला लागलं कधी कधी असं वाटतं . ती आयुष्यभर माझ्या सोबत राहावी इतकंच मागणं आहे ... "
पुन्हा एकदा कॉलेज सुरु झालं पण यावर्षी माझा उत्साह पार शिगेला पोहोचला होता , ती ग्रॅज्युअशन च्या पहिल्या वर्ष्याला आणि मी दुसऱ्या वर्ष्याला होतो ... कॉलेजला दोघेही सोबत जात होतो , परत येतांनी सोबत येत होतो , शिवाय वर्गातून प्रथम आल्याने माझी वर्गप्रतिनिधी म्हणून निवड झाली होती म्हणून एक नवी ओळख मिळाली होती आणि इतर शिक्षकांसोबत परिचय झाला होता ... माझं कॉलेज जीवन आणखी आनंदी झालं होतं . वर्गात आणि कॉलेजमध्ये सन्मानाने वावरत होतो आणि आत्मविश्वास वाढला होता म्हणून विविध प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होत असे , असाच एक दिवस , दिनांक ५ सप्टेंबर , शिक्षकदिन निमित्त मी भाषणसाठी नावं दिलं होतं . याआधीही मी भाषण केले होते पण यावेळी एक गडबड झाली होती , मी चक्क भाषण करतांना सांगावयाचे मुद्दे विसरलो होतो आणि मी निराश झालो , घरी आल्यावर सरळ कबीरजवळ गेलो ...
" कबीर , कबीर ... आज मी एक गडबड केली माहित आहे ? ऐक ना सांगतो , मी भाषण देत असता , भाषण विसरलो माझं नशीब कि मुलांच्या लक्षात यायच्या आधी मी भाषणाचा कसातरी शेवट केला ... अस व्हायला नको होत निदान एक वर्गप्रतिनिधी असतांना मला असं अपेक्षित नाही ... खरं कारण ऐकलं तर तू माझ्यावर हसशील , स्टेजवर जाऊन जेव्हा मी भाषणाला सुरुवात केली आणि सर्व विद्यार्थी नजर टाकली तेव्हा माझ्या समोरच्या मुलींच्या दुसऱ्याच रांगेत किर्तीप्रिया बसली होती ... मग काय तिच्या नजरेला नजर भिडली अन सर्वकाही जणू जागीच थांबलं असं मला वाटलं मी मध्येच बोलता बोलता काहीवेळ थांबलो , भानावर आलो तर पुढचा मुद्दा आठवत नव्हता मग नाईलाजाने तिथेच भाषणाचा शेवट करावा लागला ... "
continue...