३८. बहर - निसटून गेलेले क्षण - 3
असंच जरा आनंद , नाराजी , नवे मित्र आणि जुन्या आठवणी जमा करून ते वर्ष संपलं , नवीन वर्ष सुरु होणार होत , यावेळी मात्र मी ग्रिटींग कार्ड बनवायचं नाही असं ठरवलं होतं आणि तिला भेटूनच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या असा मनात विचार केला होता ... म्हणून सकाळीच लवकर उठून तयार झालो , तिला जाऊन भेटलो आणि दोघांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या ... मी खुश होतो की नवीन वर्ष्याची सुरुवात छान झाली , कॉलेजचं गॅदरिंग असल्याने सर्व विद्यार्थी एकाच वेळी परिसरात गोळा झाले होते , दिवसभर एकापेक्षा एक असे नाट्य , नृत्य , सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते , संपूर्ण दिवस मौजमजा केली ... कार्यक्रम संपला , परत येतेवेळी आम्ही सोबतच घरी आलो होतो , त्यादिवशी तिने पांढराशुभ्र ड्रेस ज्यावर फिकट केशरी रंगाचे फुलं होते , तिने कपाळावर कुंकवाचा लहानसा शोभेल असा टिळा लावला होता आणि ती त्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती पण मी माझे शब्द आवरले .... मनात असून तिची स्तुती केली नाही , तिच्याशी बोलत बोलत सायकल चालवत होतो , कितीतरी वेळा ओठांवर आलं की तिला म्हणावं " किर्तीप्रिया , आज तू खूप सुंदर दिसत आहे ... " पण मनातील भाव शब्द बनून ओठांतून बाहेर येत नव्हते ... अस आधी केव्हाच झालं नव्हतं आमची मैत्री इतकी घट्ट झाली होती की एकमेकांशी बोलतांना विचार करायची वेळ यापूर्वी माझ्यावर कधीच आली नव्हती , मग आजच का अस होत होतं ? मला काहीएक कळत नव्हतं ... सरतेशेवटी अंतर संपलं आणि आम्ही घरी पोहोचलो , सायकल अंगणात उभी करून तसाच कबीरजवळ गेलो , " कबीर , कबीर ... तुला परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ..! " त्याने आपल्या हिरव्यागार पानांचा सळसळ असा आवाज करून जणू मला प्रतिसाद दिला होता . मग मी त्याला टेकून जरा वेळ बसलो ...
" कबीर , इतक्यात माझ्यासोबत काय होत आहे आणि का ? काहीही कळत नाहीये . ती समोर असली की मी सारं काही विसरून फक्त आणि फक्त तिला पाहत असतो , तिच्या प्रत्येक गोष्टीच निरीक्षण करत असतो , ती समोर असली की तिला पाहतच राहावं अस होऊन जातं .... तीच बोलणं ऐकत राहावं आणि हि वेळ अशीच थांबून राहावी , वेळ समोर जाऊच नये असं वाटतं , कधी मनसोक्त तिच्याशी बोलतो तर कधी शब्दाने बोलायला जमत नाही ... आजचं उदाहरण बघ ना , तिने मस्त पैकी केशरी रंगाचे फ़ुलं असलेला पांढरा शुभ्र ड्रेस घातला होता आणि ती खूप छान दिसत होती पण तिला मी तसं सांगू शकलो नाही ... का ? हा प्रश्न आज मला पडला . पहिल्यांदा मनातलं तिला सांगतांना शब्द ओठांतून बाहेर पडले नाही आणि तिला नुसतंच पाहत होतो ... " कबीरला सांगितल्यावर जरा मन हलकं झालं होतं पण तो प्रश्न तसाच होता आणि महिनाभर तसाच राहिला ...
नवीन वर्षाचा पहिला महिना , जानेवारी सर्रकन निघून गेला आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं . महिन्याच्या पहिल्या तारेखेपासूनच वेलेन्टाइन डे ची चर्चा सुरू झाली होती आणि तेव्हाच मलाही यादिवसाबद्दल नव्यानेच माहिती मिळाली , एकमेकांवर प्रेम करणारी मंडळी यादिवशी आपलं प्रेम गुलाबाचं फुलं देऊन व्यक्त करतात हे हि कळलं होतं पण माझ्या आणि तिच्या मधील नातं नेमकं कोणतं ? याबद्दल मी जरा साशंक होतो ... हि शंका दूर करणं मला आवश्यक वाटलं ते म्हणजे तेव्हाच नवीन वातावरण आणि तरुणाईचा उत्साह पाहून ... असंच एक दिवस वर्गात लेक्चर ऑफ असतांना ग्रुपमध्ये पिवळा आणि लाल गुलाब याचे संकेत मित्रांच्या चर्चेतून समजले की मैत्रीसाठी पिवळा गुलाब आणि प्रेमासाठी लाल गुलाब ... तेव्हा माझी शंका जरा कमी झाली जोपर्यंत नेमकं प्रेम प्रकरण काय ते कळत नाही ना तोपर्यंत आपली मैत्रीचं जिंदाबाद !!! वेलेन्टाइन डे ला तिला शुभेच्छा सह पिवळा गुलाब द्यायचा मी ठरवलं होतं , पण यावेळीही माझं दुर्दैव आड आलं आणि ती त्यादिवशी कॉलेजला आलीच नव्हती , तिच्या घरी जाऊन तिला भेटणं मला योग्य कि अयोग्य ठरवता आलं नाही आणि अगोदर तिच्यासाठी बनवलेल्या दोन ग्रिटींग कार्ड च्या सोबतीला ते फुलं पण सामील झालं ... परत एक आठवण म्हणून ... काही दिवसांनी ते फुलं कोमेजलं , सुगंध उडून गेला , मग ते फुलही सुकलं ... तिला द्यायचं म्हणून निवडलेलं ते पहिलं गुलाबाचं फुलं ... त्याला असंच गमावणं मला आवडलं नव्हतं , म्हणून एक प्लास्टिकचे पारदर्शी पाकीट बनवून मी त्यात ते जपून ठेवलं होतं ... ग्रिटींग कार्ड ठेवलेल्या बॉक्समध्ये आणि मनाच्या एका खोल कप्प्यामध्ये .....
दरम्यान कॉलेजच्या सराव परिक्षेला सुरुवात झाली होती , परीक्षा संपली ... होळीचा सण आला , दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती... मनात गेल्या वर्षीची आठवण ताजी झाली होती , तिची कशी गंमत केली होती आठवून एकटाच हसत होतो ... त्या आठवणीतच मनात विचार होता की उद्या परत एकदा तो क्षण अनुभवायला मिळेल का ? कि आणखी काही नवीन गोष्ट नशिबात आहे की काय ? पण कुणी मला रंग लावेल म्हणून मी दिवसभर बाहेर पडलो नाही आणि तिची माझी भेट झाली नाही ... बारावीची अखेरची परीक्षा घेतली जाणार होती , तेव्हा तिला अभ्यासात मदत करायला म्हणून अधून मधून भेट व्हायची ... लवकरच परीक्षा संपली आणि सुट्ट्यांना सुरुवात झाली होती ...
तर इतक्यात एक अनपेक्षित गोष्ट घडली होती , एप्रिल महिना ... तिचा वाढदिवस मला आठवण होता आणि गेल्या वर्षी झालेली माझी फजिती सुध्दा , पण तरीही यावेळेस तिला शुभेच्छा देण्यासाठी मन आतुर झालं होतं , गेल्या वर्षी बनवलेलं ग्रिटींग कार्ड एक नजर पाहिलं ते अगदी जसंच्या तसं होतं पण एक आठवण म्हणून मी जपून ठेवलं होतं ... म्हणूनच ते यावेळी तिला द्यायचं मी टाळलं आणि पुन्हा त्यापेक्षा सुंदर अस ग्रिटींग कार्ड बनवलं , तो दिवस उजळण्याची वाट पाहत होतो ... तिला किती आनंद होईल अशी कल्पना मनात अकुंरली पण परत एकदा माझं दुर्भाग्य जिंकलं , सकाळी लवकर तयार होऊन तिच्या घरी जाऊन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो तर दाराला कुलूप लावलं होतं .. ती कुटुंबासह आदल्या दिवशी संध्याकाळीच बाहेरगावी गेल्याच समजलं , उदास मनाने परतलो , मन कश्यातच रमत नव्हतं म्हणून ते कार्ड घेऊन कबीरजवळ गेलो कितीतरी वेळ त्याच्या आडोश्याला बसून राहिलो होतो , पुन्हा पुन्हा ते ग्रिटींग नजरेसमोर धरत होतो आणि नशिबाला दोष देत होतो ... तासनतास तसाच बसून राहिलो , एकवेळ अशी आली की सारं काही असह्य झालं , मन पहिल्यांदा दुखल्याची जाणीव झाली होती , मी सरसर झाडावर चढलो , जणू कबीरच्या खांद्यावर डोकं ठेवून ते दुःख , ती वेदना कमी होईल , अस वाटलं होतं पण जे झालं अगदीच अनपेक्षित होतं ...
झाडाच्या सर्वांत उंच फांदीवर हात जाईल तिथं मी उभा राहिलो , मनात कोणताच विचार नव्हता , फक्त आणि फक्त एकच गोष्ट होती ती म्हणजे प्रत्येकवेळी वाटेला आलेलं अपयश ..! तेव्हा नकळत मी अंगठ्याच्या वाढलेल्या नखाने कुणाच्याच नजरेत येणार नाही इतक्या उंचावर तिचं नाव कोरलं , कितीतरी वेळ तिथेच बसून त्याकडे पाहत होतो आणि वारंवार नखाने कोरून अजून खोल ते नावं ठळक केलं होतं .... काही वेळ असाच निघून गेला , मी असा का वागलो ? माझं मलाच कळेना पण मन जरा शांत झालं होतं ... त्यादिवशी संध्याकाळ झाली तरी घरी परतलो नव्हतो ... सोबतच तिच्या आणि माझ्या नात्याची मला नव्याने ओळख झाली होती ... मैत्रिपलीकडे आपलं नातं जुळलं याची जाणीव मला झाली होती आणि त्यानिमित्याने तिच्या , माझ्या जवळच्या आठवणीत आणखी एक भर पडली होती ...
continue....