३८. बहर - निसटून गेलेले क्षण
ती तिच्या शहरात पोहोचली , लगबगीने चालत ती घरी आली , आवाराचे गेट उघडून ती अंगणातील तुळशी वृन्दावनाजवळ थांबली . हँडबॅग मधून चावी काढून तिने कुलूप उघडलं नंतर दरवाजा ... चावी काढतांना हातात घेतलेली हँडबॅग तिने हॉलमध्ये आल्याआल्या टेबलवर ठेवली , किचनमध्ये जाऊन तिने थंडगार पाण्याची बॉटल बाहेर काढली आणि ती बेडरुममध्ये शिरली , बेडवर बसून ती दोन चार घोट पाणी प्यायली , तिने साडीच्या पदराने चेहऱ्यावर आलेला घाम पुसला आणि पंखा सुरु केला , पटकन मागे वळून ड्रेसिंग टेबल जवळ आली आणि तिने डायरी हातात घेतली ... ती वाचायला सुरुवात करणार तोच तिच्या मनात विचार आला , " मी अशी का वागले ? सुजीतशी डायरी घरीच विसरले अस खोटं का बोलले ? फक्त कुमार ने डायरीत लिहिलेलं वाचायचं राहून गेलं होतं म्हणून ना ...? पण हा स्वार्थ नाही का ? कितीतरी दिवसापासून , नाही वर्ष्यापासून गुपित असलेल्या कितीतरी गोष्टी कुमारने यांत लिहून ठेवल्या आहेत .... या डायरीबद्दल कुणाला काहीएक कल्पना नसेल , पण इतक्या वर्ष्या नंतर हि डायरी मला मिळाली यामागे नक्कीच नियतीचा एखादा चांगला हेतू असावा ... " असं म्हणत तिने स्वतःला समजावलं , तिने डायरी वाचायला सुरुवात केली ...
माझा बारावीचा निकाल लागला आणि दोन तीन दिवसांनंतर स्वतः घरी येऊन ती माझ्या सर्व नोट्स घेऊन गेली होती ... माझी ग्रॅज्युएशन ला ऍडमिशन करायची गडबड सुरु झाली होती ... मनात एक नवीन उत्साह होता पण सोबतच किर्तीप्रियाचं कॉलेज दुपारी आणि माझं सकाळी याची जरा खंत होती पण आता नाईलाज होता , म्हटलं असो , पुढल्या वर्षी तिलासुध्दा ग्रॅज्युअशनला ऍडमिशन केल्यानंतर सकाळीच कॉलेजला यावं लागेल , तेव्हा सोबतच जाता येता येईल ... तिचं बारावीचं कॉलेज लवकरच सुरू झालं होतं आणि निम्मा पावसाळा संपला , ऑगस्ट महिन्यात माझे पदवीचे वर्ग नियमित होत होते ... पुन्हा एकदा नवीन शिक्षक , नवे मित्र आयुष्यात आले होते . बरंच काही नवीन शिकायला मिळत होते ...
एक दिवस ११ ते १२ शेवटचा लेक्चर झाला नाही म्हणून मी लवकरच घरी जायला निघालो होतो , अर्ध्या रस्त्यात पाऊस सुरू झाला , आडोश्याला थांबावं म्हटलं तर जागा नव्हती म्हणून मी जोरात सायकल चालवत होतो ... इतक्यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडून माझ्या पुढे मी तिला पाहिलं तर ती घरी परत जातांना दिसली , मी सायकलचा वेग वाढवला जरा जवळ जाताच तिला आवाज दिला ... " किर्तीप्रिया ... " तिने लगेच सायकल हळू चालवत मागे पाहिले . तोवर मी तिच्या अगदी जवळ पोहोचलो होतो .. पाऊस चांगलाच बरसत होता आणि आम्ही दोघेही पावसात भिजत होतो ... " किर्तीप्रिया , काही घरी राहील का ? परत जात आहे म्हणून विचारलं .. "
" नाही रे , पावसाने भिजवलं ना आणि कॉलेजला जाईपर्यंत पूर्ण भिजले असते म्हणून म्हटलं , आज कॉलेजला जायचं राहू द्यावं ... "
" अस्स झालं तर .. "
" हो ना , बघ पाऊस वेळेवरच आला , अशी चिंब भिजून कॉलेजला कशी जाणार ? "
" तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे , घरी परत येतांना भिजलं तर काही फरक पडत नाही . "
" हं , पण तु कसा काय लवकर आला ? "
" आज माझा शेवटचा लेक्चर ऑफ होता म्हणून .. " चांगलं झालं असं मनातच बडबडलो .
तिच्याशी बोलत बोलत घरी आलो , आम्ही दोघेही पावसाने पुरते ओलेचिंब झालो होतो ... तिच्या घराजवळ पोहोचलो तरी आज पावसामुळे कॉलेजला जात आलं नाही अशी तक्रार ती करत होती , मी मात्र त्याच पावसाला धन्यवाद देत होतो की ' तुझ्यामुळे आज आमचा संवाद घडून आला आणि तुझ्या निमित्याने आज तिची भेट झाली , तिला पावसात चिंब भिजलेलं आज पहिल्यांदा पाहिलं होतं . तिच्या चेहऱ्यावर थांबलेले पावसाचे थेंब तिची सुंदरता आणखी वाढवत होते ...
त्यादिवसानंतर ती मनात अगदी खोलवर घर करून गेली , तिचं ते रूप जणू काही हृदयात ठसलं , अस का होत होतं ? मला कळत नव्हतं ... सिनेमा पाहून प्रेम म्हणजे काय ते समजलं होतं पण आमचं मैत्रीचं नातं कि प्रितीचं ? हा प्रश्न तोपर्यंत मला पडला नव्हता ... नंतरच्या दिवसात पाऊस पडला की ती पावसात भिजलेली किर्तीप्रिया नजरेसमोर यायची आणि अजूनही येते ...
कॉलेजला जाण्या येण्याची वेळ वेगळी असल्याने तेव्हा भेट होत नव्हती , कधी कधी आठ दहा दिवसांनंतर ती दिसायची , पण घाई गडबड असली की नजरेसमोर असायची मग काय मनात असून देखील तिच्याशी बोलणं होत नव्हतं ,ती किती किती दिवस दिसली नाही की मन बेचैन व्हायचं ? का ? कळत नव्हतं ... काही दिवस निघून गेले सवय झाली , हळूहळू बोलणं कमी झालं होतं ... मी कॉलेजच्या वातावरणात रमलो होतो . याच वर्षी आर्यन आणि ऋतुराज सोबत घट्ट मैत्री झाली होती .
एक दिवस असा उगवला कि तो मी कधीच विसरू शकत नाही , तिने स्वतःहून मला विचारलं होत की , " कुमार , आम्ही सहकुटुंब यात्रेला जाणार आहोत , तु सोबत येशील का ? " मी लगेच होकार दिला होता , सर्वजण तयारी करून यात्रेला जायला निघालो , आधी देवदर्शन झालं , स्वयंपाक आणि जेवण असा बेत घरच्यांनी ठरवला होता म्हणून जेवण तयार होईपर्यंत आम्ही मनसोक्त यात्रा फिरलो , ती काहीही घेण्याआधी हे ' चांगलं दिसेल ना ? घेऊ का ? ' इतकं विचारत होती ... तिचं सर्व खरेदी करून झाल्यावर मी तिच्या पसंतीचं " k " अक्षराचं लॉकेट माझ्यासाठी घेतलं होतं , सहजच .... त्यादिवशी दिवसभर घरून निघाल्यापासून परत येईपर्यंत भरपूर गप्पा आणि फिरणं झालं होतं , तिच्या परिवारासोबत चांगलाच परिचय झाला होता .
continue....