Mala Kahi Sangachany - 37 in Marathi Fiction Stories by Praful R Shejao books and stories PDF | मला काही सांगाचंय..... - ३७

Featured Books
Categories
Share

मला काही सांगाचंय..... - ३७

३७. स्वार्थ

कँटीन मध्ये पाहिलेला तो मुलगा आणि कुमार दोघेही त्यांच्या जीवनात आलेल्या परिस्थितीचा सामना करत आहे , आपण कुमारवर जे बेतलं ते बदलू शकत नाही तर निदान त्याच्या कुटुंबियांना आधार देऊ शकतो याचं समाधान मानून ते वॉर्डमध्ये पोहोचले . प्रत्येकाच्या मनात कुमारला काहीतरी विचारायचं होतं , पहिलं म्हणजे अपघात कसा झाला ? आता कस वाटतंय ? हे सर्वांना समान प्रश्न पडले होते तर सोबतच आजवर डायरीचं गुपित का लपवून ठेवलं ? आमच्यावर , आपल्या मैत्रीवर तुला विश्वास नव्हता का ? असे प्रश्न चारही जणांना वेढा घालून होते याशिवाय सुजितला पडलेला प्रश्न जरा वेगळाच होता , मैत्रीत , जीवनात वाटेला आलेलं सुख दुःख नेहमी वाटून घ्यायचं असतं तर कुमारने मीच नाही आणखी कुणाजवळ तरी व्यक्त व्हायला हवं होतं त्याऐवजी त्याने डायरी लिहिण्याचं का ठरवलं ???

तर अनिरुध्दला पडलेला एक प्रश्न म्हणजे " कुमारने स्वतःबद्दल डायरीत जे लिहून ठेवलं त्याचबरोबर आमच्या चारही जणांकरिता ' सोनेरी क्षण ' हे काय लिहून ठेवलं ? आणि का ? हि सुध्दा त्याच्या नजरेत एक अनपेक्षित गोष्ट होती ... डायरी सोबतच सोनेरी क्षण याचा पण त्याने कुणालाच थांग पत्ता लागू दिला नाही ...

आर्यन सुध्दा काही अश्याच विचारात मग्न होता आणि ऋतुराज सुध्दा ... जरावेळ आणखी थांबून सुजित , आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज कुमारला भेटायला त्याच्या रूममध्ये गेले ... आत प्रवेश करताच त्यांची नजरानजर झाली , त्याच्या चेहऱ्यावरचे तेज जरा कमी झाले होते . त्याला जवळून पाहताच त्यांच्या लक्षात आले , काहीवेळ त्याला नुसतं निरखून पाहण्यात वेळ निघून गेला .. " कुमार , आता कसा आहेस ? बरं वाटतं ना ? " सुजितने त्याला विचारलं आणि कुमार त्यावर काहीतरी बोलेल या अपेक्षेने प्रश्नांना जरा विराम देत तो बोलायचा थांबला ... सर्वांनी कुमारकडे आशेने पाहिले पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही . काही वेळ शांतता पसरली मग न राहवून आर्यन म्हणाला , " कुमार , तुला इतकं कसं लागलं ? म्हणजे तुझा अपघात कसा झाला ? " इतकं बोलून तोही त्याच्या उत्तराची वाट बघत थांबला . यावेळी त्यांना आशेची पुसट किरण नजरेस आली , कुमारने हात पुढे करून जराशीच पण ओठांची हालचाल केली ,तो हळूच पुटपुटला म्हणून त्याचा आवाज कुणालाच ऐकू आला नाही ...

त्याने पुढे केलेला हात हातात घेऊन अनिरुध्द त्याच्या जवळ बसला , " कुमार , बोल , तुला काय म्हणायचंय ? काही हवंय का ? त्रास तर होत नाहीये ना ? " त्याला एकदम जवळून नजरे ला नजर देत तो विचारू लागला , यावेळी त्याने मान वर उचलायचा प्रयत्न केला तेव्हा सर्वांनी मिळून त्याला तसाच पडून रहा , तुला आणखी त्रास होईल असे सांगत कसेतरी थांबविले .

अनिरुध्दने विचारलेल्या प्रश्नांना सुध्दा त्याने बोलून काहीही प्रतिसाद दिला नाही , सर्वांची निराशा झाली होती तरी सरतेशेवटी एक अखेरचा प्रयत्न म्हणून , " कुमार , हे अचानक काय झालं ? काही तरी बोल , आज तुला या अश्या अवस्थेत पाहून आम्हाला काय वाटतंय तुला काय सांगू , काका काकू , प्रशांत तुझी खूप काळजी करताहेत , तु काहीतरी बोल .. " ऋतुराज म्हणाला , यावर कुमार नक्की बोलेल हि अपेक्षा सुध्दा खोटी ठरली ..

" आम्हा सर्वांना फक्त एकच वाटतं की तु लवकर बरा व्हावा आणि ज्या कुमारला आम्ही ओळखतो , जो मित्राच्या हाकेला धावून येतो , मदतीला सदैव तत्पर असतो , सर्वांचा आधार ... तो कुमार आम्हाला हवा आहे ... " सुजित सर्वांच्या मनातलं बोलला . इतकं बोलूनहि त्याने काहीएक प्रतिसाद दिला नाही तेव्हा सुजित भावूक झाला , नकळत एक अनामिक क्षणाला त्याच्या पापण्या ओलावल्या ... त्याचे आसवांनी भिजलेले डोळे पाहून ते तिघे जण हि भावूक झाले , एकमेकांना समजावत एकवार त्यांनी कुमारला पाहिले . " सगळं काही ठीक होईल , तु काळजी करू नकोस .. " ते रूम बाहेर पडले .

कुमारचे आई वडील , प्रशांत , सुजितचे वडील , आकाशचे वडील , आकाश ते चौघे बाहेर यायची वाट पाहतच होते पण त्याचे पडलेले चेहरे पाहून त्यांना न सांगता सर्वकाही समजलं ... रूमपासून दूर एक कोपऱ्याजवळ जाऊन ते थांबले ... " कुमार काही बोलतच नाही , किती सारं त्याला विचारायचं होतं .." आर्यन म्हणाला , त्याला दुजोरा देत सुजित , " हो ना , काय झालं ? काही कळत नाही .. "

अनिरुध्द , " मलाही त्याला विचारायचं होत , का त्याने डायरी बद्दल सर्वांपासून लपवून ठेवलं ? आणि अजून बरंच काही ... " पण त्याला भेटून काही माहिती करून घेता आला नाही , कुमार समोर असून मनातले सारे प्रश्न जसेच्या तसे राहिले ...

अनिरुध्द , " तुझं म्हणणं मला कळतंय पण कुमारवर जे बेतलं त्याची आपल्याला काहीएक कल्पना नाही आणि आता ह्याक्षणी तो ज्या परिस्थितीत आहे ती आपण पूर्णपणे अनुभवू शकत नाही ... "

" पण निदान तो काहीतरी बोलायला हवा ना " आर्यन म्हणाला ... " तो बोलेल नक्की बोलेल , त्याला बरं वाटलं की .. " ऋतुराज आर्यनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला .

जरावेळ सगळे शांत झाले , अनिरुध्द , " सुजित , तु तिला डायरी सोबत आण , असं फोन करून एकदा आठवण करून दिली असती तर आज तरी आम्हाला डायरी वाचायला मिळाली असती ... "

" हे अगदी बरोबर आहे ... " आर्यन आणि ऋतुराज दोघेही सोबतच बोलले ...

" दोस्तहो , तुम्ही परत सुरु झाले का ? ती उद्या येतेवेळी आणणार असं म्हणाली ... आज ती डायरी आणायला विसरली त्यांत माझी चूक नाही आणि तिचीसुद्धा ... " सुजित

" चूक कशी नाही , तिला आठवण करून द्यायची होती ना ... म्हणे माझी चूक नाही ... " आर्यन जरा रागात बोलला .

" नाहीतर काय ? स्वतः डायरी हाती लागली , डायरीचं कुणालाच माहित नव्हतं , कुमारला न विचारता वाचून काढली आणि ... " अनिरुध्द सुध्दा जरा मोठयाने बोलला ...

त्यांच्याकडे एक नजर फिरवून " आपल्या मैत्रीच्या नात्याला स्वार्थीपणाचा स्पर्श तर झाला नाही ना ? कारण यावेळी कुमार ची अशी अवस्था असून आपण त्याची डायरी , तो अस का वागला ? , त्याने आपल्याला सांगितलं का नाही ? हे महत्त्वाचं नाही तरी याचा विचार करतो आहे आणि वाद घालतो आहे .. कुमारने हे सर्व गुपित उघड केलं नाही यामागे नक्कीच काही कारण असेल असं तुम्हाला नाही का वाटतं ...? " इतकं बोलून सुजित गप्प झाला .

जरावेळ विचार करून " सुजित , हो तुझं अगदी बरोबर आहे , यावेळी कुमार वर हि वेळ असतांना इतर गोष्टींना महत्व द्यायलाच नको , मी मान्य करतो माझं चुकलं , मला माफ कर मी तुझ्याशी रागावून बोललो ... "

" होय , कुमारने जर डायरी लिहिल्याचे सर्वांपासून गुप्त ठेवलं तर त्यामागे नक्कीच कारण असेल किंवा त्याचाही नाईलाज असावा .." अनिरुध्द

" सुजित , आपल्या मैत्रीच्या नात्याला स्वार्थीपणाचा स्पर्श होता होता राहिला , तो वेळेवर आम्हाला सावध केलं ... " ऋतुराज

" आता कुमार ठीक झाला आणि तो स्वतःहून जेव्हा कधी डायरीबद्दल सांगेल तेव्हाच मला ती डायरी वाचायची आहे नाहीतर नाही , जे गुपित त्याने काळजात तिजोरीबंद केलं ते त्याच्याजवळ राहो ... " आर्यन

" मी सुद्धा यापुढे डायरीचा विषय काढणार नाही ... कुमार स्वतः मला सांगेल तर मला त्यात जास्त समाधान मिळेल .. बस् कुमार लवकर बरा झाला पाहिजे ... " अनिरुध्द

" मी काही असं म्हणणार नाही , मला नक्कीच ते डायरीचं गूढ माहित करून घ्यायचं आहे पण मी ते वेळेवर टाकून देतो जस सुजितला काहीएक कल्पना नसतांना अचानक ते कळलं तसं काहीसं माझ्याबाबतीत व्हायला पाहिजे नाहीतर मी सुद्धा स्वतःहून डायरी मिळविण्याचा आणि वाचण्याचा हट्ट करणार नाही ... पण संधी मिळाली तर मी ती गमविणार नाही .... " ऋतुराजच्या बोलण्याने ते जरा चक्रावले ... काहीवेळ जुन्या आठवणी ताज्या करून सर्वजण कुमारच्या रुमकडे जायला निघाले ...

वास्तविकता हि कल्पनेपेक्षा नेहमीच वेगळी असते तर कधी कधी अगदीच अनपेक्षित सुध्दा ..! एखादी गोष्ट , व्यक्ती , परिस्थिती कल्पनेच्या आधारावर , विचारांचे पाढे वाचून किंवा तर्क वितर्क करून पूर्णतः समजून घेणे शक्य नाही , म्हणूनच कित्येकदा नेहमी सहवासात असणारे लोक अचानक काहीतरी वेगळे वागले , बोलले कि मन ते मानत नाही आणि आपण म्हणतो ' तू अस काही करशील किंवा वागशील अस मला कधीच वाटलं नव्हतं , मला तुझ्याकडून असं उत्तर अपेक्षित नव्हतं , मला तुला ओळखता आलं नाही , माझी चूक झाली कि तुझ्यावर विश्वास ठेवला ...'

पण यांत समोरच्या व्यक्तीची पुर्णपणे चूक नसते , कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि वेळ , परिस्थितीचा माणसांच्या स्वभावावर , वागणुकीवर प्रभाव पडतो .. जे आज आहे , जसं आहे ते तसच्या तसं कायम राहील अशी अपेक्षा ठेवणं , खुळेपणाच आहे .. आपला स्वभाव हा कायमस्वरूपी नाही , माणसांची आवड हि वेळ , सहवास , पैसा आणि नजरेसमोरील पर्याय यामुळे बदलत असते ... जे काय मिळवलं त्यापेक्षा आणखी सरस मिळविण्याची वृत्ती जन्म घेते , अपेक्षा दिवसेंदिवस वाढत जातात ... जर अपेक्षांची पूर्तता झाली तर समाधान मिळतं , पण ते कायम राहिल कि नाही हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं ..