३४. लपंडाव
कुमारचे आई वडील तिच्याशी काही जुन्या आठवणी तेव्हा ताज्या झाल्याने पुन्हा एकदा नव्याने आठवून बोलत होते , ती सारं मन लावून फक्त ऐकत होती ... मध्येच त्यांना दिलासा देत होती , तिला पूर्ण कल्पना होती की कुमार म्हणजे त्यांचा एकमेव आधार .. नियतीनं का असा खेळ मांडला अस तिला क्षणभर वाटून गेलं , काही वेळानंतर जुन्या आठवणीत भिजवून तो भावनारूपी पाऊस शांत झाला ... सोबतच त्यांचं बोलणं थांबलं आणि तिच्या मनात पावसानंतर तळं साचावं तसे विचार एकामागून एक साचायला लागले ... मध्येच त्याच्या डायरीत वाचलेले काही प्रसंग त्या साचलेल्या पाण्यात होडी बनून इकडे तिकडे बेभान होऊन जलविहार करू लागले ... इतक्यात तिला कुणीतरी तिच्या बाजूला येऊन उभा असल्याची जाणीव झाली , तिने मान जरा वर उचलून बाजूला पाहिले ... तर तिला सुजित दिसला पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे बदलले अस तिला जाणवलं ... त्याला काहीतरी बोलायचं किंवा विचारायचं आहे असं त्याचे हावभाव सांगत होते पण तो स्वतःहून काही बोलला नाही तेव्हा तिनेच विचारलं ... " सुजित , काय झालं ? तु जरा गोंधळलेला दिसतोस ... सर्व ठीक आहे ना ? "
तिने स्वतःच विचारलं हे फार छान झालं पण इथे तिला डायरी बद्दल विचारणं योग्य नाही हे लक्षात घेऊन त्याने ऋतुराज , अनिरुध्द आणि आर्यन कुमार भेटायला येत असताना ते दुचाकी पंक्चर झाल्याने जरा अडचणीत आले त्यामुळे मी थोडा वेळ त्रस्त झालो बाकी काही नाही असे सांगत त्याने डायरीचं बोलायचं कसतरी टाळलं ... इतकं बोलत असतांना तिने तिची हँडबॅग कुठे ठेवली म्हणून तिच्या आजूबाजूला नजर फिरवली तर तिने हँडबॅग खांद्यांची काढून आता मांडीवर ठेवली होती ...
त्याने सांगितलेलं स्पष्टीकरण तिला तितकंसं पटलं नाही पण इथे जास्त बोलण बरोबर नाही हे ध्यानात घेऊन तिने मिळालेलं उत्तर समाधानकारक नाही असं मनातलं मनातच हेरलं आणि नंतर सुजित ला विचारावं असं ठरवून तिने प्रतिसाद दिला " अस्स होय तर .. " आणि पुन्हा तिथं शांतता पसरली . काही वेळानंतर डॉक्टर नर्स सोबत कुमारच्या रूममध्ये गेले , त्याला तपासून परत आले ... सर्वजण कुमार आता कसा आहे ? काही बोलला का ? हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर पुढे जमले ..
सर्वांचे चेहरे पाहून डॉक्टर देवांश यांना कुमारचे आई वडील आणि इतर आप्तेष्ट यांच्या मनातील भावना , प्रश्न सवयीने न सांगता समजले आणि कुणी काहीएक विचारण्याआधी ते म्हणाले , " कुमारच्या तब्येतीत आता खूप सुधार झाला आहे आणि लवकरच तो पूर्णपणे बरा होईल , काळजीचं मुळीच कारण नाही ... "
सगळ्यांच्या मनावरचं चिंतेच सावट दूर झालं , दडपण कमी झाल्याने चेहऱ्यावर काहीसं तेज आलं होतं , आतापर्यंत मनात अंकुरलेली आशेची पालवी भक्कम आधार घेऊन डोळ्यात विश्वासाची चमक आली अन ती चमक एकमेकांच्या नजरेत नजर मिळवून पाहिल्याने आणखी प्रखर झाली ... प्रत्येकाला ते बोलणं ऐकून हायस वाटलं , मन प्रसन्न झाल्याची नव्याने पुन्हा एकदा त्यांना अनुभूती येत होती ...
पण आईच मन इतक्यावर समाधानी होणार तरी कसं ? ती माऊली समोर होऊन म्हणाली , " डॉक्टरसाहेब माझा कुमार काही बोलला का ? भूक लागली अस विचारलं का ? आई बाबा कुठे आहे ? म्हणाला असेल " इतकं बोलून तिला सुख आणि दुःख अश्या मिश्र भावनेनं , चार पावलं अंतरावर असून मुलाची अशी विचारपूस करावी लागत असल्याने परत गहिवरून आलं ... तिच्या पापण्या ओलावल्या , आसवं गालावरून नकळत खाली ओघळले अन ती ते वाहणारे थेंब टिपणार इतक्यात सर्रकन ते आसवं फरशीवर खाली पडले ... सर्व तिला आधार देत समजावीत होते , एकमेकांना दिलासा देत होते पण प्रशांतच्या नजरेतून आईचे ते फरशीवर पडलेले आसवं सुटले नाहीत कुणाचंच लक्ष नाही हे जाणून त्याने खिशातला रुमाल बाहेर काढला आणि तसाच तो रुमाल त्या आसवांच्या थेंबावर नकळत पडला असं दाखवून आईचे अनमोल आसवं स्वतःच्या रुमालाने उचलून जणू मनात जपून ठेवले ...
तिने जवळ घेऊन त्या माऊलीला खांद्याचा आधार देऊन मन मोकळं करू दिलं , काहीवेळाने भावनेचा ओघ ढळला मग तिला बाजूच्या खुर्चीत बसविले . इतक्या वेळात सगळे जण डॉक्टरला , " कुमारला भेटता येईल का ? " म्हणून विचारत होते तर सध्या तरी त्याला आणखी आरामाची गरज आहे असं उत्तर ऐकून त्यांची जरा निराशा झाली .. पण तो ठीक आहे आणि लवकरच बरा होईल कळल्याने ते सारे समाधान लाभले आणि थोड्या वेळाने कुमारला भेटता येईल या आशेने ते सुखावले ...
कुमारला आणखी काही वेळ आरामाची आवश्यकता आहे हे कळल्यावर सर्वजण परत आपापल्या जागी विसावले , सुजित ने तिला मॅसेज करून बाहेर हॉलनजीक कँटीन मध्ये भेटायला बोलाविले , ती मॅसेज वाचून तेथून उठली आणि कँटीनमध्ये पोहोचली , सुजितने इथे का बोलावलं याचा अंदाज तिला आधी होताच ... दोघांनी सोबत चहा घेतला पण विषयाला कुणीच हात घालेना तेव्हा पुढाकार घेऊन तिने विचारलं " सुजित , तू मला इथं का बोलावलं ? काही प्रॉब्लेम तर नाही ना .."
तिने बोलायला सुरुवात केली , त्याला बरं वाटलं ... " नाही , प्रॉब्लेम वगैरे काही नाही , सहजच ... "
" सहज ! डॉक्टर येण्यापूर्वी सुध्दा तुला काही तरी विचारायचं आहे असं वाटत होतं ..."
रिकामा झालेला चहाचा ग्लास टेबलवर गोल गोल फिरवत , मध्येच दोन्ही हात टेबलवर ठेवून तळहात एकावर एक ठेवले " मी तुला , तुझ्या हँडबॅग मध्ये चुकून आलेलं नोटबुक येतेवेळी आणायला सांगितलं होतं ..."
continue...