Mala Kahi Sangachany - 33 - 2 in Marathi Fiction Stories by Praful R Shejao books and stories PDF | मला काही सांगाचंय..... ३३ - २

Featured Books
Categories
Share

मला काही सांगाचंय..... ३३ - २

३३. आशा , निराशा remaining

बस शहरातील स्थानकात पोहोचली , प्रवाश्याच्या खाली उतरण्याच्या गडबडीने तिला एक दोन जणांचा धक्का लागला अन तिला जाग आली ... गर्दीतून वाट काढीत ती बसमधून खाली उतरली . बस स्थानकात जणू काही यात्रा भरली अस तिला भासलं ... ती पायी चालत बस स्थानकातून बाहेर निघाली , उन्ह चांगलंच तापलेलं ... खांद्यावरची हॅन्डबाग जरा डोक्यावर धरून तिने झपझप पावलं उचलली , मुख्य रस्त्यावर आली तिथं बाजूलाच कडुनिंबाची विशाल सावली देणारी झाडं लावली होती ... ती एक झाडाच्या सावलीत उभी राहिली ... तिने सुजितला फोन करून बस स्थानक ला आल्याचं सांगितलं , त्यावर सुजितने लगेच येतो असं बोलून फोन ठेवला ... जरावेळ विचार करून तिने आजूबाजूला नजर फिरवली , तिला टरबूज नजरेस आले आणि तिने विकत घेतले ... तर सुट्टे पैसे नसल्याने तिने आणखी द्राक्ष सुध्दा खरेदी केले ... झाडाच्या सावलीत परत येऊन ती सुजित येण्याची वाट पाहत थांबली ...


काही वेळातच सुजित बस स्थानकजवळ आला ... त्याने इकडे तिकडे नजर फिरवली , त्याला झाडाखाली ती उभी दिसली ... तिला घेऊन तो दवाखाण्याकडे जायला निघाला , वाटेत तिने कुमार कसा आहे ? डॉक्टर काय म्हणताहेत ? काही काळजीचं कारण तर नाही ना ? मनात होते नव्हते सर्व विचारून घेतले ... सुजितने तिला सर्व ठीक आहे , असं सांगितलं ... फक्त कुमार अजून कुणाशीच बोलला नाही तर बहुतेक बोलतांना त्याला त्रास होत असावा असं डॉक्टरांचं म्हणणं असल्याचं हि त्याने तिला सांगितलं ...


तिच्या मनात विचार आला , कित्येक दिवसानंतर कुमारने फोन केला होता , अचानक अपघात घडला , त्यादिवशी भेटायला आले होते तर कुमार बेशुध्द होता आणि आज तरी त्याच्यासोबत दोन शब्द बोलायला मिळेल या आशेने त्याला बघायला आले पण पदरी निराशा येणार याची कल्पना नव्हती ... मध्येच आलेल्या खड्ड्याने दुचाकी ला झटका बसला आणि तिच्या मनात फिरणार विचारचक्र थांबलं .


सुजित , " तू आज सकाळी त्याला भेटला का ? " तिने विचारलं .


" नाही , त्याला विश्रांती घेऊ द्या , असं डॉक्टर म्हणाले त्यामुळे त्याला भेटणं जमलं नाही .."


" बाकी आणखी कोण कोण भेटायला आले आहे ? "


" त्याचे तीन मित्र आले आहेत म्हणजे रस्त्याने असतील .."


" हो काय .. छान ! "


या उत्तराबरोबर त्याला ऋतुराजची दुचाकी पंक्चर झाल्याची आठवण झाली , त्यांनी दुचाकी दुरुस्त तर केली असेल ना ? मी सांगितलेला पत्ता त्यांना मिळाला कि नाही ? तो मी परत फोन करणार म्हणून माझ्या फोनची वाट पाहत असेल असे विचार एकाचवेळी त्याच्या डोक्यात नाचायला लागले ... थोड्या वेळातच बोलता बोलता ते दवाखान्यात पोहोचले . ते कुमारच्या रुमजवळ आले , त्याचे आई वडील आशा निराशा अश्या मिश्र भाव असलेल्या चेहऱ्याने जणू कुमार लवकर बरा व्हावा फक्त इतकीच प्रार्थना करत होते ... तिने जवळ जाऊन त्या माऊलीच्या खांद्यावर हात ठेवला . तिने नजर वर करून तिला पाहिले , दुसऱ्या क्षणी आसवांनी पापण्यांचा बांध मोडला . सरी झरझर वाहू लागल्या ...


हातातील टरबूज , द्राक्ष सुजितला देत ती बाजूला बसली .. धीर देऊ लागली , " काकू , स्वतःला सांभाळा , काळजी करू नका , कुमार लवकरच ठीक होईल "


ती माऊली तिच्या गळ्यात गळा घालून रडायला लागली , " काकू अस हिम्मत सोडून कसं चालेल ? "


असं बोलतांना खर तर तिचा कंठ दाटून आला पण तिने तसं जाणवू दिल नाही ... " सुजित , हे फळ कुमार खायला दिलं तर चालेल का ? जरा डॉक्टर किंवा नर्स ला विचारून घे , मला काही कल्पना नव्हती म्हणून मी हे घेऊन आले .."


" हो " फक्त इतकंच बोलून तो निघून गेला ... त्या दोघींना जरावेळ मोकळीक मिळाली तर बरं होईल असं त्याला वाटलं . डॉक्टरला त्याने ती फळ कुमारला दिली तर चालतील का ते विचारलं आणि नर्सजवळ ती पिशवी दिली , तो बाहेर हॉलमध्ये आला ... त्याने अनिरुध्दला फोन लावला , पलीकडून त्याला प्रतिसाद मिळाला " हॅलो सुजित "


" हॅलो अनिरुध्द , कुठे आहे ? दुचाकीचा पंक्चर दुरुस्त केला की नाही ? "


" सुजित , इकडे जरा जास्त भानगड वाट्याला आली ... "


" काय झालं ? ऋतुराजला फोन दे बरं "


" हॅलो सुजित , अरे दुचाकी पंक्चर झाली होती , दुकानाला आलो तर ट्यूब बदलावी लागली म्हणून परत इकडे तिकडे शोधाशोध करून ट्यूब मिळवली ... अजून अर्धा तास तरी लागेल . "


" अरे यार , हि तर भलतीच भानगड झाली . "


" कुमार आता कसा आहे ? " तिघांनी एकसाथ विचारलं ...


" ठीक आहे , मी अजून भेटलो नाही , बरं ती आली ... "


" काय ? ती आली , तिच्याकडून आठवणीने डायरी घे आणि आम्ही येईपर्यंत शक्यतोवर तिला थांबव . " तिघांनी एक एक शब्द मध्ये बोलून मिळूनच हे वाक्य पूर्ण केलं ...


" ठीक आहे , ठेवतो " म्हणत त्याने फोन ठेवला ... तो हॉलमधून कुमारच्या रूमकडे जायला निघाला ... मला तर डायरीचा जसा विसरच पडला होता , बरं झालं ऋतुराजला फोन केला , त्यामुळं डायरी परत घ्यायचं कळलं ... आणखी विसर पडायच्या आधी तिला डायरी मागणं योग्य राहील असे मनातच विचार करत तो त्यांच्याजवळ पोहोचला ....