३१. स्वप्न आणि सत्य remaining
कुमार होता तसाच जागी उभा होता जणू तिने दिलेला आवाज त्याने ऐकलाच नाही ... ती परत परत त्याला आवाज देत राहिली पण तिला काहीएक प्रतिसाद मिळाला नाही मग तिला समजलं की कदाचित उंचावरून खाली येणाऱ्या पाण्याच्या आवाजामुळे त्याला हाक ऐकायला जात नसेल ... आता काय बरं करावं ती विचार करत असता अचानक कुमारचा तोल जाऊन तो खाली पडत असल्याचं दिसून आलं ... अन ती जोरात किंचाळली " कुमार sssss "
तो पाण्यासह खाली येत होता ... जसं पाणी मोठमोठ्या काळ्या दगडांवर आदळून समोर वाहत होत तसं कुमार इतक्या उंचावरून खाली पडला तर तिच्या मनात विचार आला आणि तिचा श्वास थांबला ..... पण ते सर्व तसंच पाहत राहिल्याशिवाय ती काहीही करू शकत नव्हती... आता तो मोठमोठ्या दगडांवर खाली पडणार समजताच तिने दोन्ही हाताने चेहरा झाकला ... काही वेळ ती तशीच उभी राहिली , मन आवरत तिने हात बाजूला सारले तर तो एखाद्या अलौकिक शक्तीने हवेतच थांबलेला ... ती चकित झाली , मनात भीती दाटली ... हे काय घडते आहे तिला काहीही उमजत नव्हतं दुसऱ्या क्षणी तिला एक आणखी आश्चर्याचा धक्का बसला ... कुमार हवेत जसा उभा होता तश्याच अवस्थेत त्याच्या पायाखालून वाहत जाणारं पाणी कारंजे उडवीत त्याच्या तळपायाला स्पर्श करून तिथं एक चौकोनी काच तयार झाली ...
ती लगबगीने धावत जाऊन त्याच्या जवळ आली , पुढच्या क्षणी इतर पाच दिशेने म्हणजे कुमारच्या डावीकडून एक हिरव्या रंगाचे किरण आले अन तळहाताला स्पर्शले , उजवीकडून एक पिवळ्या रंगाचे किरण आले अन तळहाताला स्पर्शले , मागच्या बाजूने एक काळ्या रंगाचे किरण आले अन त्याच्या पाठीला स्पर्शले , त्याच्या समोरून एक लाल रंगाचे किरण आले अन त्याच्या छातीला स्पर्शले , शेवटी आभाळातून एक निळ्या रंगाचे किरण आले अन त्याच्या केसांना स्पर्शले ... या पाच दिशेने आलेल्या त्या वेगवेगळ्या किरणांचा कुमारला स्पर्श होताच त्याच्या भोवती काचेची हवाबंद खोली तयार झाली आणि तो जणू बंदिस्त झाला ... ती वारंवार त्याला हाक मारत राहिली पण त्याचा काहीएक उपयोग होत नव्हता ... तिने न राहवून बाजूलाच एक दगड उचलला , कुमार बंदिवान झालेल्या खोलीच्या दिशेने भिरकावला ... काय आश्चर्य ! दगडाने काच तुटली तर नाहीच उलट तोच दगड तिच्या दिशेने परत यायला लागला तिला काय करावं काही समजेना ... तिला वाटलं बस्स संपलं सारं , दगड डोक्याला लागणार या भीतीने घामाच्या धारा कपाळावरून ओघळल्या ती पुरती घामाने चिंब भिजली ...
कसलातरी परिचित आवाज तिला ऐकू आला तिने डोळे उघडले , जरावेळ पापण्या उघडझाप करून ती भानावर आली ... नजरेसमोर गरगर फिरणारे पंख्याचे पाते , बाजूच्या खिडकीतून आत येणारी सूर्यकिरण , पाखरांचा किलबिलाट आणि सकाळचे सहा वाजले अस सांगणारा मोबाईलचा गजर ... डोळे उघडून पाच , दहा मिनिटं झाली तरी ती हालचाल करत नव्हती .... ती हळूच हातावर जोर देऊन अंथरुणावर उठून बसली , डोकं जरा जड झाल्याचं तिला जाणवलं , दोन्ही हाताने चेहऱ्याच्या घाम पुसून तिने तोंडावर आलेले काही केस हातानेच मागे सारले ... उजव्या हात कपाळाला लावून तिने कोपर मांडीवर टेकवला .. स्वतःशीच पुटपुटली ' ते जंगल ,धबधबा , कुमार ... काचेच्या खोलीत बंदिस्त ' .. ते स्वप्न होत तर , पण या अश्या भलत्याच स्वप्नांचा काय अर्थ असावा ?? अजून काही विपरीत घडणार कि काय ? कुमार ठीक तर असेल ना ? एकामागून एक असे कित्येक प्रश्न तिचं डोकं उठवू लागले ... ती पुन्हा पुन्हा रात्रीचं ते स्वप्न आठवू लागली पण जसेच्या तसे काही तिला आठवेना ... सरतेशेवटी ती खूप वैतागली , ती ताडकन बिछान्यावरून खाली उतरली ... मोबाईल उचलताना तिची नजर डायरीवर पडली , काल रात्री डायरी वाचत असताना नकळत झोप लागली आणि पुढचं वाचायचं तसंच राहिलं .. तिला आठवलं , पुढे काय लिहून ठेवलं असेल ? अचानक तिच्या मनात विचार आला पण आता तिला रोजची काम आटपून जेवण तयार करायचं होतं , म्हणून तिने डायरी उचलून बाजूच्या छोट्या टेबलवर ठेवली ... ती बेडरूम मधून बाहेर निघाली , लवकरच काम आटपून तिने दोघांकरिता चहा आणि नाश्ता बनविला , सोबत चहा नाश्ता घेतल्यावर तिने बाकीची काम आटोपली , मग आंघोळ करून तिने देवापुढे ज्योत पेटवली , डोळे मिटून आज पहिल्यांदाच तिने प्रार्थना केली ... " देवा , कुमार लवकर बरा होऊ दे !"
ती देवघरातून बाहेर आली , घड्याळात ९:४५ वाजलेले ... " माझा रुमाल कुठे आहे ? " तिने कपाटातून रुमाल काढून त्याच्या हाती दिला आणि त्याला टिफिन देत दारात उभं राहून ' bey , have a nice day ...' म्हणाली ...
तो दूर जाईपर्यंत ती त्याला पाहत राहिली , मग तो दिसेनासा झाला तिला एकटेपणाची जाणीव झाली ... काही वेळातच पहाटे पहाटेचं ते स्वप्न तिला जास्त तीव्रतेने विचारमग्न करू लागलं ... डोकं जास्तच दुखायला लागलं तसं तिने स्वतःला बाजूच्या खुर्चीत झोकून दिलं .... विचारचक्र तसच फिरत राहिलं ...
रात्री किंवा दिवस असतांना मनात जे काय विचार असतील ते स्वप्नरूपाने नजरेसमोर साकारतात असं मानलं जातं .... मग पहाटे पहाटे पाहिलेलं स्वप्न खरं असतं किंवा स्वप्नात जे काय दिसलं तसंच काहीसं घडणार आहे या अतिलोकप्रिय विधानाचा नेमका काय अर्थ असावा ???