वाशी नाकावरच्या मेन रस्त्यावर ती म्हातारी मागच्या दोन दिवसांपासून भीख मागत बसली होती, राहायची चेंबूरला…. म्हातारीचा नवरा वारला बाई जवानीत असताना, एकुलता एक मुलगा मस्त सिंधी कॉलनीजवळच्या सरळ रेषेत असलेल्या म्हाडाच्या ब्लिडिंगच्या शेवटच्या टोकाला लागून पसरलेल्या वीस-पचवीस घराच्या बैठया चाळीपैंकी एका घरात राहतो, एकच रुम त्यात पडदा टाकून किचन आतल्या बाजूला, सलग मोरी, तरी ही म्हातारी इथं अशी रस्त्यावर का? अशी दीनवाणी…. अंगावरचं लुगडं ते तसचं, दोन दिवस झाले….. अंगाला पाणी नव्हतं…. डोक्याला तेल नव्हतं, त्या हमरस्त्यावरुन येणारा-जाणा-याकडे हात पसरवून एक-दोन रुपयांसाठी तातकळत ती उभी होती, लोक जी काही भीख देत होते त्या पैशांत दिवसातून दोनदा वडापाव खाऊन झाले होते, रात्रीची झोप तिथं त्या बसडेपोच्या मागे असलेल्या बाकडयापाशी घेत होती, आजचा तिसरा दिवस, हो तिच्या पोटच्या पोरांने तीला घराबाहेर काढली, पोराचं लग्न लावून दिलं त्याला झाले आता सहा महिने, नवरा वारला तरुणपणी, हे मुबंईच घर केलं पोराच्या नावाने आणि पोराबरोबर मागची कित्येक वर्ष इथं या चाळीत राहत होती, हे जेव्हा पासून मुलाचं लग्न झालं तेव्हापासून आई-मुलांमध्ये खटके सुरु झाले आणि मग काय भांडण वाढत गेली, सुरवातीला चाळीतली लोक येऊन समजावत पण नंतर नंतर त्यांनाही लक्ष देणं सोडून दिलं…. आता हे रोजचं होतं होतं? भांडण कश्यावरुन…सांगतो पुढे… सासू सूना भांडत बसत… आणि आई म्हणे पोराला तू सूनेची बाजू घेतोस… भांडण अशी तशी होत नसतं… पार नको नको त्या शिव्या देई सासू सुनेला… या असल्या शिव्या त्या सूनेने बापजन्मात ऐकलेल्या नव्हत्या, पोराला हे सगळं समजत होतं, तो समजून सागें आईला….. पण नाही कश्यातच कमीपणा येत नव्हता. आता तीन दिवसापूर्वी पण असाच खटका उडला…. कोणी आजूबाजूचा माणूस आला नाही भांडण रोखायला, पण आज त्या पोरांन कहरच केला, सरळ आज आपल्याच आईच्या झिंज्या उपटत तिला घराच्या बाहेर काढलं… आता मात्र आजूबाजूची लोकं तमाशा बघू लागली… ती धाय मोकलून रडत होती… आता त्यांची बायको नुसती तावातावाने बोलत होती “उगीच का ऐकून घ्यायचं, गप्प खावं गप्प बसावं, तर नाय…हा दिवस रात्र हैदोस, बाकीच्या सासवा बघा, काही जाच होतो का सूनानां?, आता किती दिवस ऐकून घेऊ….. मी रांड-छिनाल, बोडकी बोलत सुटते, आमच्या आई-बापाने नाय शिकवलं आम्हाला अश्या शिव्या दयायला….”. इकडे ती म्हातारी बाहेर येताच सुरु झाली ”कडू कुठची, झवाडे, तुझ्या आईच्या गांडीत घातला पाय….”, पोरांन थेट घरातून उठून साटकन एक आईच्या मुस्काटात मारली…. झालं…. आता मात्र तिथं तमाशा बघत उभ्या असलेल्या एकानं येऊन म्हातारीला आणि त्या पोरांला वेगळं करायचा प्रयत्न केला….. पण नाही! तो आज ऐकायलाच तयार नव्हता, “जा चालती हो इथून, वाटेला लाग” त्याने म्हातारीला पार रस्त्याच्या दिशेला भिरकवून दिलं, म्हातारी तिथंच जमिनीवर बसली, त्यानं आतल्या खोलीतून लगेचच एक सारखं….. सतत…. सामान….. आणून बाहेर फेकू लागला, तिच्या कपडयाचं गाठोड, चपला सगळं आता रस्त्यावर दिसत होतं, “अरे भडव्या, काय करतोस, माझ्याचं घरातून मलाच बाहेर काढतोस, तुझा फोदरा तुझा” तिचा आवाज अजून वाढतच चालला होता. तो भांडण रोखायला गेलेला तिथचं थांबला, “चल चालती हो इथून, पुन्हा इथं दिसलीस तर याद राख, गप्प दोन घास गिळत बसायचे तर दिवस-रात्र शिव्या…, नुसता क्लेश….त्या काय पूर्वीच्या बायका वाटल्या की ऐकून घेतील सासूचं…सारखं आपलं राडं-छिनाल करुन शिव्या दयायच्या…कश्याला त्या हरीभक्त परायण्याच्या माळा घालतेस…टाक काढून…कश्याला देवाचं नाम जपतेस…मनात नुसतं कपट….इथूनं नीघ…. नाय पायजे मला तू….पोटची आई म्हणून इतके दिवस सहन केलं… पण आता नाय… इथून निघं नाय तर बघ तो धोंडा टाकतो तुझ्या डोक्यावर” आजूबाजूची लोकं कुजबूजत होती, ही नुसती गर्दी जमा झाली, “बघा हो कशी पोर बिघडतात लग्न झाल्यावर, हया म्हातारीला पण गप्प राहायला काय होतयं, हो आली तेव्हा पासून सून शांतच दिसतेयं, हे सासू-सुनाचं असं चालयचं, आज काय हा पोरगा ठेवतं नाय बघं म्हातारीला” लोकं सारखी बोलत होती पण कोणी पुढे यायला धजावत नव्हतं…
ती म्हातारी तिथूंन उठली, गाठोडं घेतलं, चपला घातल्या पायात आणि गेली निघून…मुंबईत कोणी नातेवाईक नव्हताच… आणि कोणी नातेवाईक आपुलकी दाखवत ठेवून घेईल यांची काही शाश्वती नव्हती… तीची एक सख्खी बहिण होती ती राहायची मलकापूर…पार बुलढाण्याला.. तिकडें एस-टीने जायला पैशे नको का?… स्वतःच असं गाव राहायलचं नव्हतं…कोयनेच्या धरणाला जमीन गेली त्यांची भ्ररपाई भेटली त्या गावाला कधी गेलीच नाही…. मग आता असं पोटच्या पोरांनेच घराबाहेर काढल्यावर ती नुसतीच चालत सुटली… नुसतीच चालत.. रस्ता दिसेल तशी चालत सुटली… तिला आपलं काही चुकलं असं वाटतचं नव्हतं.. आपणं असं गप्प राहिलो असतो तर आज मुलाने घराबाहेर काढलं नसतं, असं काही काही वाटतं नव्हतं.. आपल्या पोटच्या पोराने आपल्या कानाखाली मारावी, आपलं पोरगं आपल्या हातात राहिलं नाही… असचं तिला सारखं येऊन जाऊन मनातल्या मनात वाटून राहत होतं…
आता मात्र घराबाहेरची एकूण गर्दी कमी झाली होती, त्यातल्या त्यात एका शेजा-याने धीर करत त्याला “अरे कितीबी वाईट वेडंवाकडं बोलली म्हातारी…. तरी आई हाय तुझी, जा इथं कुठं लांब गेली नसेल आण तिला परत आण…” असं बोला… “नाय आणार तिला, यायचं असेल घरात तर येईल परत स्वतःच्या पायाने … आजपासून मेली मला ती….तिच्या नावाने आंघोळ करतो बघ उदया..” शब्द उचारता उचारता थोडं का होईना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं… “अरे आई आहेस ना..म पोराचं सुख कश्यात आहे ते पाहवत नाही…” तो शेजारी आता उठून निघून जाऊ लागला… त्यांची बायको मात्र पुटपुटत होती “सकाळ संध्याकाळ सुनेला शिव्या घालत बसायच्या…सारखं पाण्यात पाहत राहायचं.. माझ्याच्यानं नाही होतं.” ती वेळ गेली तितकीच पण एकूण त्यांच्या चेह-यावर कुठल्याही पश्चातापाच्या खुणा दिसत नव्हत्या, त्यांच्या बायकोला याचं काहीच सोयरसुतक नव्हतं, ती कसल्यातरी मोठया शापातून सुटल्याच्या त-हेत होती.
“अरे पण लोकांना कश्याला हसायला संधी देतोस, जे काही आहे आपलं ते आपलं… आपल्यापुरतचं ठेवायचं..आणि तुला तरी आधार कोण आहे सांग ना…” समजवण्यासाठी घरात आलेला एक वडीलधारा माणूस आता तिथून निघून गेला…बाकीची लोक आपआपासात कुजबूजताना म्हणतात “…बघा लहानाचा मोठा केला आईने…बाप मेला हा लहान असताना..तशीच जर असती गेली असती कुणाबरोबर.. पोराला वा-यावर टाकून…पण नाही…बाई पतिव्रता…नवरा मेला तरुणपणी…पण दुसरं लग्न नाय म्हणजे नाय..आणि एवढं वाढवून सवरुन पोराने काय केलं..चांगले पांग फेडले..काढलं आईला घराच्या बाहेर.. अरे एवढं जर नाय पटत तर एवढी जर हिमंत आहे तर स्वतः घे भाडयाने रुम आणि राह म्हणावं.. आईला का काढतोस तिच्याच घरातनं…“, “अरे तिनं पण कश्याला पोराच्या नावावर रुम करायची उदया झाली असती एसआरए स्कीममध्ये रुम बिल्डींगमध्ये झाली असती म्हातारीच्या नावाने काय फरक पडला असता… आता कुठं गं गेली असलं…हया म्हातारीचं पण तोंड काय कमी होतं.. गटाराची भांडण म्हणू नको की.. पाण्याची.. ही नुसती भसाडया आवाजात सुरु व्हायची.. कोणी कधी लागत होतं का तिच्या नादाला..आपण गप्प बसलं की आपोआप गप्प बसायची..“ या सगळ्या आजूबाजूच्या शेजा-यांच्या एकमेंकाना दिलेल्या प्रतिक्रिया…
————————————-
आज या घरात म्हातारी नव्हती, लग्न होऊन सहा महिन्यानंतर…ची ही पहिली रात्र असेल जिथं ती दोघं एकत्र एकांतात होते, त्यांची त्यांची जी काही प्राव्हसी होती ती त्यांना आज भेटत होती.. रात्रीचे बारा वाजत आले…आजूबाजूचा एरिया शांत होता…एखादया लांबवर सुरु असलेल्या घरातल्या टी.व्ही. चा आवाज आज स्पष्ट ऐकू येत होता.. दोघं त्या अंथरुणावर नुसतेच पडून होते… त्या डोक्यावरच्या पंख्याकडे बघत.. त्या गरगर करण्या-या पाताकडे नजर जाताच त्याला तो लग्नानंतरच्या रात्रीचा पहिला दिवस आठवला…त्याने किचन आणि बाहेरच्या त्या खोलीच्या भागा मधोमध प्राइव्हसीसाठी म्हणून लाकडाची भिंतीसारखी मांडणी केली. अंथरुणं तयार होती… पिण्याचा तांब्या होता… तो या क्षणासाठी आतुरला होता.. ती ही आतुरली होती… पलीकडच्या त्या लाकडाच्या भिंतीपलीकडे किचनमध्ये निजलेल्या त्यांच्या आईचे डोळे मात्र सताड उघडे होते, अख्या घरभर काळोख होता, देवहा-यातला लाल झिरोचा बल्ब तेवढा चालू होता, पण म्हातारीने डोळे का बरं उघडे ठेवले होते.. त्या लाकडाच्या फटीमधून त्या अंधुक प्रकाशात नक्की काही तरी बघायला म्हणून ती अशी जागी होती… नाही ठाऊक… आता ते दोन जीव..कश्याच्या म्हणजे कश्याच्याच भान स्वरात नव्हते.. त्या दोघाचा स्वतंत्र असा कोश बनत चालला होता… त्याचं एकमेकातं विरघळ्णं सुरु होतं..त्या मथंनाचा तो अंतिम क्षण येणारं इतक्यात…म्हातारी खाकरली.. झालं…तो क्षण..तो कोश…ते विरघळणं.. संगळ निसटलं.. त्या एका क्षणासोबत पुढचा बराच काळ नुसताच कासावीस करणारा भास त्या दोघांना खायला उठला…पुढे काहीचं झालं नाही.. सकाळ झाली… सगळं जग उठलं..रहाटगाडे सुरु झाले..
दोन-तीन दिवसानंतर तो कामावर गेला.. खास मित्राच्या खास चौकश्या सुरु झाल्या… त्यांच्या असंतोषी उत्तराने त्या खास मित्रांनी त्याला लॉर्जचा पर्याय सुचवला… फक्त दोन तासाचें पाचशे.. आणि हयाचा आठ तासाचा पगार दोनशे… “हया असल्या गोष्टींसाठी पैशाचा विचार नाही करायचा…” मित्र म्हणाले “पण नाही नी बिन नाही…”
तो तयार झाला..ती ही तयार झाली…घराजवळच्या लॉजपाशी ते गेले… आज पहिल्यांदाच तो लॉजवर जात होता…. त्यानें मान खाली घालतच रेट विचारले…. ती ही तशीच त्यांच्या मागे उभी होती…”पॅनकाड आय डी प्रूफ आहे का….?” तिथला तो कांऊटरवरचा माणूस छिदम हसत विचारत होता “पाचशे..” असं हाताने दाखवलं. पाचशे, आणि पॅन पुढे केलं…. देण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं… झाला… आज तो ख-या अर्थाने सुखासुखी सुख अनुभवणार होता, आता त्याला कसलंही पाप करत असल्याचं मनात ठेवावसं वाटत नव्हतं… ती लॉजची रुम आटोपशीर होती… आटोपण्या लायक… त्यानं दरवाजा आतून लावून घेतला… समोरच्या घडयाळ्यात बघितलं दुपारचे बारा वाजलेत… त्याला दोन वाजता रुमच्या बाहेर पडायचं होतं… ठरलं.. तो आता या पुढच्या क्षणाला अख्खं जग विसरणार होता आणि ती देखील… झालं ही तसचं… साधारण एक तासानंतर त्या दोघांच्याही चेह-यावर समाधान होतं.. त्याला आता त्या पाचशे रुपयांची किंमत कळली म्हणा की त्यांला आता ते पाचशे खर्च केल्याची फिकीर नव्हती… तो ही समाधानी होता.. ती ही होती… आता दुपारचे एक वाजत आले… ते आता उघडया शरीरासकट नुसतेच गप्पा मारत होते.. भावी आयुष्याची पेरणी चालू होती.. इतक्यात त्या लॉर्जच्या खोलीच्या दरवाज्यांची बेल वाजली…
दुपारी दोन वाजता ते पोलीस स्टेशनला होते, एका नवीनच रुजु झालेल्या ऑफिसरनं धाड घातली लॉजवर… तिथं वेश्याव्यवसाय चालतो म्हणत आता मिडियाचे कॅमेरा ही रेंगाळू लागले, तिथं काही नेहमीचे चेहरे नेहमीच्या सवयीने चेहरे लपवत होते, यांच त्या दोघांना अजिबात भान नव्हतं, त्या दोघाच्या उघडया निष्पाप चेहरावर वांरवांर कॅमेरा रोखला जात होता, खरी परिस्थिती सांगून कधी एकदा निसटतोय असं त्या दोघांना होत होतं..या नव्याने रुजु झालेल्या ऑफिसरनं मागच्या ऑफिसरपेक्षा फक्त पाच टक्क्याची वाढ मागितली.. त्या लॉजमालकाचं आणि या ऑफिसरचं फिसकटलं.. बाकी मध्यस्थांनी या टक्केवारीचं भांडण सावरायचा प्रयत्न केला.. पण शेवटी कायदयात जेवढं जमेल तेवढं पिरगळून टाकायचा राजकीय आदेश खात्रीपूर्वक आल्यावर..लॉजवर धाड टाकण्यात आली… दुस-या दिवशी पेपरात हेडलाईन होती…तळमजल्यात अनधिकृत शंभर खोल्या असल्याची…
इथं पोलीसस्टेशला सुरवातीला या दोघाचं ऐकायला तिथला तो हवालदार अजिबात तयार होईना.. ‘घरदार सोडून लॉज ही काय जागा आहे का?’ च्या वार्ता तो करु लागला, मग त्यांने नाईलाजाने त्या खास मित्रापैकी एकाला फोन केला, त्याने लगेच एका स्थानिक ओळखीच्या राजकीय पक्षाच्या पदाधिका-याला फोन लावला, झाला प्रकार सांगितला… त्या लॉज आणि पोलिसस्टेशन प्रकरणातून सुटका झाली… आणि या पुढे असल्या गोष्टी लॉजवर न करण्याचा त्या दोघांनी कानाला खडा लावला…
————————————-
त्यांच्या आईचं लग्न झालं तेव्हा तिंच वय होत निव्वळ सोळा… लग्नानंतर एका वर्षात पदरात मूल पडलं…. ते मूल सहा महिन्याचं व्हायच्या आतच नव-यांचा अकस्मात मूत्यू झाला… आणि सुरु झाला… एका परिकोषातल्या ताज्या टवटवीत फुलाचा विखारी उन्हात थिजत थिजत कोमजण्याचा प्रवास… ती तशीच एकटी…थिजत राहिली.. कोणीही तिच्यापाशी गेलं नाही… आणि तिनं कुणाला जवळ केलं नाही… करु दिलं नाही… पापडाच्या पीठयाच्या रोजंदारीवर, रोज पापड लाटायच्या कामातून रोजी रोटी कमवायची….अख्खं आयुष्य हेच केलं… दिवस रात्र…हेचं… एका शरीराच्या सुखाच्या म्हणून ज्या काही गरजा होत्या… त्या तशाच दाबत राहिल्या… कधी कुणी तिला दुस-या लग्नाचा सल्ला दिला नाही… तिच्या मनाच्या एका कोप-यात सतत वाटे किमान कुणीतरी नुसत म्हणावं तरी की कुणी तरी आधार शोध… कुणी तरी… अशी नको एकटीच जगूस… थिजत राहूस… सरळ सरळ नको… किमान वेडवाकडं वळण घेत तरी म्हणावं… बाकी हीच माणसं कुठं काही हिचं चालू तर नाही आहे ना कुणाशी, याचं मात्र बारकाईने लक्ष ठेवून असतं….असं करता करता…खूप वर्ष लोटली… आणि आता तिच्या मुलाचं लग्न ठरलं… बाकी नाही म्हणाल तरं… किचनच्या भागापासून पारटिशयन करत लाकडी भिंत टाकण्याचं काम तिनचं सांगितलं… पण जशी तिच्या मुलाची लग्नानंतरची पहिली रात्र आली आणि ती स्वतःच्याच आतल्या त्या खोलवरच्या गढून बसलेल्या, अडून बसलेल्या, इतकी वर्ष रोखून ठेवलेल्या त्या भावनाचं मोठं जाळं तयार करु लागली…म्हणजे ते आपोआप ते सगळं ती टक लावून त्या लाकडी फटीच्या आडून बघत होती.. तिला हलके जरी असले तरी आवाज एकू येतं होते… आणि एका क्षणाला तिला ‘ हे मला या जगाने करु दिलं नाही’, ‘आता मी या जगाला.. अगदी माझ्या मुलाला.. तरी का करु देऊ असं…’ असं काहीसं विचित्र मनात येऊ लागलं…आणि ती मुददाम खाकरली.. हे सगळं कळत नकळत मुलाला कळालं…
लॉज प्रकरणानंतर त्याने बाहेरचा मार्ग न पत्करण्याचं ठरवलं… दिवसाचं ठीक होतं पण रात्रीचं काय.. तो किती रोखणार स्वतःला.. पण त्यांची आई पार… पार…वेगळीच वागायची..मध्येच किचनची लाईट काय लावायची, मध्येच पाणी पिण्यासाठी उठायची, मुददामून खोकत बसायची… आणि या सा-यात त्या नवीन लग्न करुन आलेल्या मुलीला माहेर असं नव्हतचं, तिकडं बुलढाण्यालाच येळगावं का कुठे तरी गाव तिचं…आई-बाप दोघ वारली, लग्न मोठया बहिणीने जमवून उरकून दिलं…त्या येळगावच्या राहात्या घरी आता मोठी बहिण राहते…तिकडं जाणचं शक्य नव्हतं… तिला आता इथं असं खुराडयात खितपत पडत संसार करण्याशिवाय गत्यंतर नव्हता.
एकदा का मुलगा कामावर गेला की सुनेबरोबर सासू भांडत बसायची, उगाचचं, तिचं म्हातारपण वयानुसार नव्हतं पण अनुभवाच्या पायी होतं… आज या सा-यांचा परिपाक हा होता की ती अशी दीनवाण्यासारखी कुठेतरी भटकत होती…नाही म्हटलं तरी बाकी जगापैकी फार कमी लोकांना नेमकं कश्यासाठी मुलानं आईला बाहेर काढलं यांची जाणीव होती…
————————————-
एक तरुण पोरगा, जो प्रादेशिक जमातवादी संघटना चालवतो… फारच तोकडी… फारच कमी लोक ओळखायची त्याला, संघटन नव्हत काही इतकं खास, त्याला समाजसेवा करण्याचा फार शौक, त्याला आपला बॅनर चौकाचौकात असायला हवा अशी खुमखुमी होती, राजकारण्यातल्या वरच्या लोकांशी त्यांचे लागेंबांधे होते, पण ते सगळे राजकारणी स्वत:च राजकीय उपेक्षित होते, आणि ते नेमके त्यांच उपेक्षित वंचित समाजाचे प्रतिनिधित्व करत होते, ही आपली माणसं आणि आपणं सत्तेच्या क्रेंद्रस्थानी असावे अशी या तरुणांची मनोमन इच्छा होती. ही राजकीय लोक ही अश्या तरुण पोरांना जवढयास तेवढं म्हणून काही फुल ना फुलांची पाकळी म्हणून मदत करत, त्यातून हा काही आपली जमेल तेवढी समाजसेवा करायचा, हया समाजसेवेत काय येई, तर शाळ्या सुरु होण्याअगोदर गरजूं मुलांना वहया वाटप, कोणत्या तरी दवाखान्यात फळवाटप, रस्त्यावरच्या भिखा-यांना कपडेवाटप, याशिवाय राजकीय पुढा-यांच्या हस्ते स्थानिक कामासाठी निधी मिळावा म्हणून गाठीभेटी घेणं, एरियात लादीकरण, पाणीपुरवठा इत्यादी गोष्टीत जमेल तेवढा सहभाग ठेवणे…. याशिवाय तो एक राजकीय मतप्रदर्शन करणारं फेसबुक पेज चालवे, तुफान प्रतिसाद होता, जवळ जवळ अठरा हजार लाईक्स होत्या पेजला, त्यांच्यावर जबरी टीका होई, आणि जीव ओवाळून टाकणारा पांठिबाही मिळे, तो या सगळ्यांने सुखावून जाई, हे सगळे तो सरकारी नोकरीत राहून करत होता….. आणि सरकारी नोकरीत असल्याकारणाने हे अगदी शक्य झालं… आजही हा असाच त्या नेहमीच्या भिखा-यासाठी म्हणून कपडे आणि फळ वाटप करायला आला, यातली खूप सारीजण त्याला आता ओळखीची झाली होती आज नवीन म्हातारी बघून तो चकाकला आणि तिला विचारलं “हो मावशी नवीन दिसायतायं, कुठूंन आला गावावरना…..दुष्काळी भाग का….” “नाय इथं चेबूंरवरुन … पोरांन घराबाहेर काढलं माझ्याच मला…” ती म्हणत होती “लग्नाअगोदर पोरगा चांगला होता…बायको आल्यापासून पार बदलला… तेव्हा वाटलं होत इथं पण एसआरए स्कीम येणार आहे तेव्हा घर पोराच्या नावावर केलं तर बरं होईल कागदपत्रासाठी पण झालं उलट, बिल्डींगीतली खोली तर नाही पण इथं आपल्याच घरातनं बाहेर काढलं पोरानं…..” हे म्हातारीचं बोलणं ऐकून आता त्यांच्यातला समाजसेवक जागा झाला… त्यानें एकाला फोन लावला, हा एनजीओवाला… दोघं आणि ती म्हातारी तिघं मिळून रिक्षाने त्या म्हाडा कॉलनीच्या समोरच्या त्या चाळीपाशी येऊन ठेपले..
————————————-
दरवाजा ठोठवला गेला, दार उघडलं, नवरा बायको घराबाहेर आले, तो समाजसेवक, त्याचा एनजीओवाला साथीदार आणि ती म्हातारी दारासमोर उभी बघून त्या नवरा बायकोच्या कपाळावर आठया उभ्या राहिल्या, त्या समाजसेवकाने सुरवातीला एक टक तेवढं ते दहा बाय दहाचं घर दरवाजामधूनचं रोखून बघू लागला, त्याला हे जोडपं नरमलेलं वाटलं….. आणि मग गोष्टी कश्या चढवून सांगायच्या या विचारानं तो बोलू लागला, “माझं नाव किशोर जाभागें…..हे सुशील प्रसादे… हे एनजीओ चालवतात… समाजसेवाचं काम आहे याचं… यांच्या एनजीओकडून मदत चालू असताना या भेटल्या…. तर तेव्हा या तुमच्या आईने मला सगळी त्यांची गोष्ट सांगितलीयं…. शोभत का असं स्वतःच्या आईला असं घराबाहेर काढता ते, अहो इथं लोक आईवडिलासाठी झिकझिकतात आणि तुम्ही स्वतःच्या आईलाच मारता काय… अहो रस्त्यावरती भीख मागत बसल्या होत्या… पोरगा जिंवत असताना असं त्यांना वणवण करायला लावता…… तुम्हाला जेल होईल…”
त्या म्हातारीचा पोरगा म्हटला “एवढाचं जर पुळका येतोय, तर घेवून जा तुम्हाच्या घरी… अहो मी काय वेडा वाटलो का की घराबाहेर काढायला, या म्हातारीलाच जाम चरबी आलीय, दोन घास सुखानं खाऊन निजायचं तर…” आता हा पुढं काही बरळणारं इतक्यात… त्यांची बायको पुढे आली… तिनं त्या तिघानां घरात बोलवलं… तिला हा तमाशा पुन्हा नको होता….कदाचित तिला आपण सासूला घराबाहेर काढून चूक केल्याचं आतून जाणवलं होतं बहुतेक… तरी काही लोकं जमली घराबाहेर… तिनं घरात आल्या आल्या पाणी पुढं केलं… दरवाजा आड केला…. बाहेर असलेली लोक तरी त्या उरलेल्या फटीतून पाहू लागली.
आता समाजसेवकाची नजर त्या आतल्या दहा बाय दहाच्या रुमवर गेली, त्या लाकडी भिंतीपलीकडच्या… किचन मधून गार चहा आला… घराच्या अगदी मधोमध वरल्या भिंतीवर जुनाट झालेला फोटो होता, “हे मिस्टर का? संपलेला चहाचा कप खाली ठेवतं समाजसेवक बोलला, “हा…. हा जन्मला तेव्हा माझं नुकतचं सतरावं लागलं होतं, हा निपजला आणि हयाचा बाप गेला, लोक म्हणायची बापचं जन्म घेवून आला…काय एकऐकाच…..” म्हातारीनें आपला अर्धवट संपलेला चहाचा कप खाली ठेवत आपल्या पोराकडे आणि सुनेकडे एक कटाक्ष टाकत एकदम कमी आवाजात बोलली. “तरुणपणी वारलें का तुमचे मिस्टर…..”त्या फोटोकडे अधिकच निरखून बघत तो एनजीओवाला म्हणाला, “हा हुते वीस वरशाचे…. अन्नाचा गोळा टिकत नव्हता पोटात… पार टी.बी झाला….शरीरात …कुणी माणूस यायला मागत नव्हता जवळ… पार किंचाळत किंचाळत मेला माझा नवरा… कुणी कुणी आलं नाही त्यांच्या मयताला… का तर रोग पसरलं म्हणून….शेवटी बीएमसीची गाडी आली नी गेली घेवून…आता काय” म्हातारीचे हुदंके थांबतच नव्हते, आजूबाजूला घराबाहेर माणूस दबा धरुन आतलं बोलणं ऐकत होती.
“आता एवढा वेळ झाला आम्ही त्यांची बाजू ऐकतोय, पण तुमचं ही काहीतरी म्हणणं असेलच की, एवढा कसला त्रास होतोय, तुम्हाला तुमच्याच आईकडून की तुम्ही त्यांना घराबाहेर काढलतं…” तो एनजीओवाला बोलत होता….दोघं नवरा बायको चडीचूप..हा नुसता शांतपणा त्या समाजसेवकाला गप्प बसवेना, तो म्हातारीला उददेशून मुददामहून घाटी लहेजा पकडून बोलायचा प्रयत्न करत सहज म्हणाला, “आता या वयात कशाला करता सुनेबरोबर भांडण, गप्प खावं, निजावं तर हाय का ?… आता थोडया दिवसानं नातवडं होताली त्यासनी त्याना कुणी बघायचं…”
नातवडांचं नाव काढलं नी सुनेचा राग आरपार गेला तिनं तिथली तीनही चहाची कप उचली नी आवाज ऐकू जाईल एवढया जोरात मोरीत जाऊन ठेवली….
नेमकी खरी गोम काय आहे, कश्यामुळे भांडण होत्यायत हे सांगायला कुणीच तयार नव्हतं, आणि मोकळ्या तोंडाने बोलायला कुणी तयारचं नव्हतं… इकडं बाहेरनं एक वडीलधारा माणूस सारखं त्या दोघां… समाजसेवकाला आणि एनजीओवाल्याला खुणावत होता, शेवटी वैतागून समाजसेवकानं त्या एनजीओवाल्याला खूण केली आणि काय ते एकदाचं एकून ये म्हणून सांगितलं….तो एनजीओवाला बाहेर येताच त्या वडीलधा-यानं थेट त्याला पान टपरीपाशी नेला, आणि सांगत सुटला…
नवरा आणि बायको दोघं आता किचनमध्ये गेले….…बोलून टाकायचं का? काय प्रोब्लम आहे ते, दोघ नवरा बायको विचारात होती, त्या म्हातारीला कश्याचचं सुख दुख नव्हतं, ती काय आता घर सोडून जाणार नव्हती, तिला दुनियेचा रहाटगाडा आता कळून चुकला होता…..
“झालं ते झालं आमची चुक झाली आता नाय होणार माफ करा….” दोघं नवराबायको किचनमधून बाहेर येत म्हणाली.
प्रकरण हातावेगळं होतयं, याचं पुरेपूर समाधान आता समाजसेवकाच्या नजरेत होतं, त्यानं आता आपल्या संस्थेचं नाव सांगण्यासाठी थजवणार इतक्यात तो एनजीओवाला आणि वडीलधारा यांनी समाजसेवकासं बाहेर येण्यांची खूण केली, पुन्हा त्या पानपटटीपाशी थोडी सल्लामसलत झाली आणि ते तिघें पुन्हा त्या घरात घुसले, सतराव्या वरशी लग्नाचा आणि पोरगा निपजल्यानंतर बापाच्या मरण्याचा उल्लेख म्हातारीच्या तोंडून का आला होता यांची नेमकी टयूब समाजसेवक आणि एनजीओवाल्याच्या डोक्यात आता त्या वडीलधा-याबरोबर पानपटटीच्या येथे बोलताना पेटली. मग मात्र नेमकं कारण लक्षात आल्यावर एनजीओवाल्यानं आणि समाजसेवकानं आटोपत घेत काही पुढे मागे न करता तिघांना म्हणाला “ अहो आजी आता तुम्ही पण समजून घ्याना अहो नवीन लग्न झालयं त्याचं..जा कुठेतरी , नाहीतर तुम्ही दोघं जावा देवदर्शनाला….. नातू हवाय का नको…”
म्हातारी म्हटलं तरी वय पन्नाशीच्या आतच होतं, विचारावं का की पुन्हा लग्न करता का, की दयावी एरियातल्या नगरसेवकानं खास नागिरकासाठी दिलेली मोफत तिरुपती दर्शनाची ऑफर समाजसेवकाच्या डोक्यात विषय तरळत होता.
“तुम्ही मला आई सारख्या आहात तरी विचारतो तुम्हाला खरचं लग्न करायची इच्छा आहे का …..? मी अशी पन्नाशीच्या माणसांची लग्न जुळवणा-यानां ओळखतो…” एनजीओवाल्यानं आजीबाईनां विचारुन टाकलं.
आता कायतरी नवीन बघायला भेटणार म्हणून आजूबाजूला लोकं जमा होऊ लागली,
त्या म्हातारीचं तोडं खाली झुकलेलचं…..बहुतेक तिला चुकचुकल्यासारखं वाटतं होतं…
थोडसं नवरा बायको म्हणून तुम्हीपण अडस्ट करा, अहो एकदा का नातवंड झाली की मग मात्र खेळवायला पाहिजे का नको…. आता नवीन लग्न झालयं म्हणून वाटतयं तुम्हाला सगळं छान छान, एकदा पोर खेळू लागली आजूबाजूला की मग कळतो संसार काय ते, अहो म्हातारं माणूस असलं की बरं असतं… तेवढचं त्यांना पण नातवंडाला खेळवल्याचं…सुख… का म्हणून हस करुन घेता…? तो समाजसेवक आणि एनजीओवाला आळीपाळीने ही वाक्य बोलतं होते, आणि ते नवराबायको माना डोलवत होते.
————————————-
आता म्हातारीणं रातीचं खाकरणं, लाईटी लावणं बंद केलं, तीने तिला आलेल्या लग्नाच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला. साठा उत्तराची कहाणी सुफळ झाली, पुढच्या काही महिन्यातच पाळणा हलला, म्हातारी इथचं राहते पोरासोबत. त्या समाजसेवकाला आता निवडणुकाचे वेध लागले होते, तो आपली चहाकपवाली निशाणी घेत दारोदार प्रचार करता करता त्या म्हातारीच्या घराजवळ येत “बरे हायत ना सगळे” म्हणत हात जोडत पुढच्या दिशेने निघून गेला.
————————————-
-लेखनवाला