Ashtavinayak - 6 in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | अष्टविनायक - भाग ६

Featured Books
Categories
Share

अष्टविनायक - भाग ६

अष्टविनायक भाग ६

१०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले.

हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रूपये लागले होते. युरोपीयन लोकाकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या.

त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे.

चिंतामणी हे श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे.

पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते.

थोरले माधवराव पेशवे या गणपतीच्या दर्शनास वारंवार येत असत . त्यांनी आपल्या काळात या मंदिराचा सभामंडप बांधला आणि मंदिराचा विस्तार केला .देवाचे सानिध्य लाभावे म्हणून देवळाजवळच राहण्यासाठी एक वाडाही त्यांनी बांधला होता . तेथे माधवराव आले म्हणजे मराठीशाहीचा दरबारच भरत असे .

वयाच्या २७व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले.

त्यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नांव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला.इथेच त्यांचा अकाली मृत्यू झाला .

या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली त्यानंतर त्यांच्या पत्‍नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे..

त्यांनी मंदिराला सर्व प्रकारे सहाय्य केले होते. त्यामुळे माधवराव आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त मंदिरात कार्तिक महिन्यात रमा-माधव पुण्योत्सव आयोजित केला जातो.

मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.

इथे गणेश चतुर्थी साजरी केली जाते, तसेच गणेश जयंती ही अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यावेळी द्वारयात्रा आयोजित केली जाते आणि भाविक येथे गणपतीचा जन्म साजरा करण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

उत्सवात गणेशास तोफांची सलामी दिली जाते. नंतर गणेशाची पालखी गावात मिरवली जाते व गावातील सर्वांच्या वंशावळीचे वाचन होते.

सहावा गणपती म्हणजे गिरिजात्मज

महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात जुन्नर या तालुक्याच्या ठिकाणापासून उत्तरेस सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या खडकात कोरलेल्या सुमारे ३० बौद्ध लेण्यांच्या मालिकेला “लेण्याद्री” म्हणून संबोधले जाते.
श्री गिरिजात्मज लेण्याद्री गणपती हे अष्टविनायकातील एकमेव गणपतीचे मंदिर लेण्यांमध्ये कोरलेले आहे. लेण्याद्री बाबतची प्राचीन आख्यायिका अशी सांगितली जाते की, पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी लेण्याद्री येथील लेणी एका रात्रीत कोरली.
येथे पुर्व ते पश्चिम एकुण २८ लेणी आहेत. श्री. गिरीजात्मज गणेशाचे मंदिर सातव्या लेण्यामध्ये आहे.
श्री गणेश मंदिर हे दक्षिणाभिमुख आहे.या मंदिरासमोर दोन पाण्याची कुंड आहेत.
तसेच २१ व्या लेण्यातही पाण्याचे कुंड आहे. त्यामध्ये वर्षभर पाणी राहते.
वैशिष्टय म्हणजे साचलेले पाणी असुनही अतिशय स्वच्छ व निसर्गतः थंडगार पाणी या कुंडामध्ये बाराही महिने असते.
हे थंडगार पाणी प्यायल्यानंतर भक्तगण तृप्त होतात. त्यामुळे लेण्याद्रीच्या ३३८ पायऱ्याचढुन गेल्यानंतरही भाविक भक्तांचा थकवा नाहिसा होतो.

गणेश मंदिरातील प्रवेशद्वारासमोर मोठे कोरीव खांब आहेत, त्यावर हत्ती, घोडे, सिंह हे प्राणी कोरलेले आहेत. तसेच इतर लेण्यांच्या प्रवेश द्वारासमोर ही कोरीव खांब आहेत.
श्री गणपतीच्या गाभार्‍यासमोरील सभामंडपात एकुण १८ गुहा आहेत.
या सर्व गुहा ७x१०x१० फुट लांब रूंद असून या सर्व गुहांमध्ये पुर्वी ऋषीमुनींनी तपःसाधना केल्याचे सांगितले जाते. श्री गणेश मंदिराशेजारील ६ व्या आणि १४ व्या लेणीमध्ये बौद्धस्तूप कोरलेले आहेत.
या स्तुपास गोलघुमट या नावांनेही संबोधले जाते. या लेणीचा आकार आतल्याबाजुने वर्तुळाकार कोरीव काम केलेले आहे. या गोलाकारामुळे या लेणीमध्ये आवाजाचा प्रतिध्वनी ऐकु येतो. स्तुपाच्या सभोवताली आकर्षंक कोरीव खांब आहेत.

हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केली जाते.
देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही.
या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत.
मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत.

क्रमशः