Darjedar sakaratmak kaam karnyache promis dhya in Marathi Philosophy by Pradip gajanan joshi books and stories PDF | दर्जेदार सकारात्मक काम करण्याचे प्रॉमिस ध्या

Featured Books
Categories
Share

दर्जेदार सकारात्मक काम करण्याचे प्रॉमिस ध्या

दर्जेदार सकारात्मक काम करण्याचे प्रॉमिस ध्या
आज काय तर म्हणे प्रॉमिस डे. शुद्ध मराठीत वचन देण्याचा दिवस. रोझ डे, व्हॅलेंटाईन डे, किस डे, लव्ह डे हे दिवस साजरे करून नेमके काय साधले जाते कोणास ठाऊक? खरे तर या साऱ्या मागे प्रियकर व प्रियसी यांची प्रेमाची सुप्त भावना दडलेली आहे असे म्हटले तर त्यात वावगे काहीच नाही. बघा ना हे शब्द जरी नुसते उच्चारले तरी आपल्या मनात दोन जीवांच्या प्रेमाचेच विचार येतात. आई, वडील, मित्र, नातेवाईक, सहकारी यांचा विचार आपण का करत नाही. असे डे साजरे करायला विरोध असण्याचे कारण नाही कारण तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. विरोध झाला तरी त्याला कोणी जुमानणार नाही. कारण एखादी गोष्ट करु नका असे वारंवार सांगूनही तीच गोष्ट करण्याकडे आपला कल असतो.
असो तर मुद्दा हा आहे की आज सकाळी सकाळी मोबाईलवर प्रॉमिस डे च्या शुभेच्छा असा संदेश वाचायला मिळाला. मात्र त्यात तरुणाईने एकमेकांना दिलेल्या प्रॉमिस चा अधिक भरणा होता. माझ्या डोक्यात मात्र वेगळाच विचार आला. केवळ प्रेमाच्या संदर्भात प्रॉमिस किंवा वचन हा शब्द वापरण्यात अधिकतर प्रमाणात येतो. त्याचा अन्य क्षेत्रात जेथे आपला वारंवार संबंध असतो तेथे वापर करायला काय हरकत आहे.
तुम्ही आईवडिलांना वृद्धापकाळी चांगले सभाळण्याचे प्रॉमिस देऊ शकता. आपल्या सहकार्याला कधीही न फसविण्याचे प्रॉमिस देऊ शकता. जी आपल्या जीवनात सुख दुःखाच्या प्रसंगी ठामपणे उभी राहिली. जिच्या सहकार्याने आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला त्या आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहण्याचे प्रॉमिस तुम्ही देऊ शकता.
ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता तेथे प्रमाणिक पणे व निष्ठेने काम करण्याचे प्रॉमिस तुम्ही देऊ शकता. अशी कितीतरी प्रॉमिस किंवा वचने आहेत जी आपण देऊ शकतो व ती ठामपणे पाळू शकतो. भ्रष्टाचार न करणे, लाच न घेणे, दुसऱ्याला दुःख यातना न देणे, कोणाचीही फसवणूक न करणे, आचरण शुद्ध ठेवणे अशी कितीतरी प्रॉमिस आपण या निमित्ताने देऊ शकतो.
मी जवळपास 1980 सालापासून लेखन करीत आहे. फार मोठा प्रतिभावंत लेखक नसलो तरी वाचकांशी माझी नाळ जोडलेली आहे. अगदी पहिल्यापासून मला सकारात्मक लिहणे आवडते. जीवनाकडे माझा पाहण्याचा दृष्टीकोन देखील तसाच आहे. रडगाणे गाणारी माणसे मला आवडतच नाहीत. लेखन करण्याआधीच मला ते जमेल काय? वाचक ते स्वीकारतील काय? त्यावर टीकेची झोड उठेल काय? आशा फालतू प्रश्नांची चर्चा करण्यात काय अर्थ आहे? लेखन तुम्ही कसेही करा कौतुक करणारे कौतुक करतात टीका करणारे टीका करतात. मी मला जे पटते ते लिहतो मग कोणी ते स्वीकारले अगर नाकारले तरी त्याचा मी फारसा विचार करत नाही. आजच्या प्रॉमिस डे च्या निमित्ताने मी चांगलेच व सकारात्मक , जीवन आनंददायी बनवणारे लेखन करीन अशी ग्वाही देतो.
लेखनापासून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. एक तर आपली वैचारिक पातळी वाढते. समाजातील कोणत्या गोष्टी आत्मसार करावयाच्या व कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे याची एक प्रकारची प्रगल्भता आपल्यात येते. प्रॉमिस डे च्या निमित्ताने आणखी एक विचार माझ्या मनात येतो की आपण दिलेले प्रॉमिस पाळता येत असेल तरच ते ध्यावे. काही जण भरभरून प्रॉमिस देतात मात्र दिलेल्या प्रॉमिसचा त्यांना विसर पडतो. चांगले बोलणे, चांगले लिहणे, चांगली मैत्री करणे, चांगले सहकार्य करणे,चांगला विचार करणे, चांगले वागणे, चांगला संस्कार करणे, चांगले शिक्षण देणे, चांगले खाणे, चांगले सुचवणे आशा कितीतरी गोष्टी आपण करू शकतो.
पती पत्नीने केलेले प्रॉमिस, कामगार व मालक यांनी केलेले प्रॉमिस, प्रियकर व प्रियसिने केलेले प्रॉमिस, गुरू शिष्याने केलेले प्रॉमिस जरी वेगवेगळे असले तरी त्या त्या पातळीवर त्याला महत्व असते.
प्रदीप जोशी मुक्त पत्रकार मोबा 9881157709