Father's Day in Marathi Philosophy by Ishwar Trimbak Agam books and stories PDF | फादर्स डे...

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

फादर्स डे...

फादर्स डे...!

वेळ संध्याकाळी सातच्या आसपास. पुण्यातील गजबजलेलं आणि रहदारीचं ठिकाण, हडपसर गाडीतळ. बस स्टॉप वर बसची वाट पाहत एक कुटुंब उभं होतं. आणि त्यांच्याबरोबर एक तीन - साडेतीन वर्षांचं निरागस लेकरू साबणाच्या पाण्याचे फुगे सोडत आनंद घेत होतं. मामा मामीकडे जायचं म्हणून ते पोर खूपच खुश दिसत होतं. बरोबर आणलेली चकली संपली होती. आई पुन्हा स्वीट होम मधून चकली अन मिंटचे पॅकेट घेऊन आली. पोर एकदम खुश झालं. बस आली तसं बापाने पोराला उचलून पटकन आतमध्ये जाऊन जागा पकडली. पोराला सीटवर बसवलं अन सासूलाही बसायला सांगितलं. तसं ते पोर रडवेल्या चेहऱ्याने त्याला म्हणालं,
"पप्पा तू बस ना इथं."

ते शब्द ऐकून त्या बापाचे डोळे पाण्याने डबडबले. आलेला हुंदका कसाबसा आवरत तो म्हणाला,

"हो बाळा... मी मागून येतोय गाडीवर तुला भेटायला."

अन पटकन त्या माणसांच्या गर्दीतून खाली उतरला. खिडकीपाशी येऊन त्याच्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. म्हणाला, "मी येतो गाडीवर पाठीमागून बाळा."

पोराच्या विरहाने त्या बापाचं काळीज तीळ तीळ तुटत होतं. डोळे पाण्यानं भरलेले. थरथरत्या हाताने तो बाप त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होता. त्या पोराला पण समजलं, की आपले आई बाप आपल्याला आजीकडे सोडून चाललेत. त्याचेही डोळे पाण्याने भरलेले. थोड्या वेळापूर्वी हसणारा चेहरा, आईबाबाच्या विरहाने एकदम मलूल झाला होता. एक शब्द पण बोलू शकत नव्हता तो, अशी केविलवाणी अवस्था झाली होती त्याची. अन त्या पोराकडे बघून त्या बापाच्या जीवाला काय वेदना होत होत्या, त्याच तोच जाणे. बस निघाली. पोराला टाटा करण्यासाठी, त्याचा हात उचलत नव्हता. खिडकीत दिसणारं पोरगं डोळ्यांसमोरून दूर जाऊ लागलं. अन त्या बापाच्या डोळ्यांतून टपटप अश्रू जमिनीवर पडले. त्या अश्रुंनाही धरणीला भेटायची ओढच लागली होती जणू. कसाबसा हुंदका दाबून तो घरी जाण्यासाठी माघारी वळला.
-----

रविवार असल्याने आज जरा तो निवांतच उठला, अन नेहमीप्रमाणे व्यायामाला सुरुवात केली. थोड्याचं वेळात त्याचा मुलगा पण उठला. अन उठता उठताच म्हणाला,

"पप्पा, भीम लाव ना?"

त्याला पोगोवर भीम लावुन दिले आणि तो व्यायाम करण्यात मग्न झाला. त्याच्या मुलाचं मधूनच त्याच्या अंगावर उड्या मारणं चालू असायचं. दोन तीन दिवसां पासून तो अन त्याची बायको त्यांच्या मुलाच्या मनाची तयारी करत होते.
'मम्मा तुला खेळणी आणायला जाणार आहे. तेव्हा तू आज्जी कडे राहशील अन स्कूलला पण जाशील. मग चौकात फिरायला जाशील, निशी न स्नेहल बरोबर पण खेळशील.'
अन बरंच काय काय. त्याला हे सर्व सांगायचं कारण असं कि, त्याची बायको वीस दिवसांच्या शालेय प्रशिक्षणासाठी बेहरगावी जाणार होती. मुलाची नर्सरी शाळा सुरु होऊन नुकताच आठवडा झाला होता. रोज सकाळी नऊ ते अकरा पर्यंत शाळा. सगळ्या मुलांना त्यांचे पालक सोडायला यायचे, पोरं जशी त्या शाळेत एन्ट्री करायची तशी त्यांची रडायची सुरुवात. शिक्षक लोक दरवाजा लावून घ्यायचे. कारण, पालक दिसले की मुलं खूपच आकांडतांडव करायची. मुलांना असं वाटायचं, कि आतमध्ये नेमकं असं काय चाललंय, कि सगळेच रडतायत. त्याचा मुलगा तर रडत रडत, "माझ्या मम्मा ला घ्या ना आतमध्ये." असं सारखं त्या मॅडम ला म्हणत असायचा. असं एकंदरीत वातावरण चालू असायचं.

त्याच्या बायकोचं अन त्याच्या आईचं काही जमत नसायचं, म्हणून त्या आपल्या गावीच असायच्या. सुरुवातीला त्याच्या मुलाला जवळ जवळ सात आठ महिने तिच्या माहेरीच ठेवावं लागलं. गावी महिन्या दोन महिन्यातून एखाद दुसऱया वेळी जाणं येणं व्हायचं तेवढंच. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आणि आता शाळेत टाकायचं असल्याने त्याला इकडे आणले होते. शाळा कुठे सुरु होते न होते तोच याच्या बायकोचा परगावी ट्रेनिंगला जायचा प्लॅन. आता मुलाची ठेवायची पंचाईत. वीस पंचवीस दिवस त्याच्या सासुरवाडीला ठेवावे लागणार. त्याला त्याच्या आईला विचारून बघावं असं वाटतं होतं. जेणे करून काही दिवस इथं येऊन राहील. तेवढंच पोरं बापा जवळ. पण त्याच्या बायकोचा त्याला ठाम नकार.

चहा अंघोळ वगैरे उरकून मुलाला फिरायला जाऊ म्हणून तो पेपर, अन बिस्किट्स आणयला गेला. तोपर्यंत त्याची सासूबाई अन सासरेही आलेच होते. दळण थोडंच शिल्लक होतं. पुन्हा त्याने दळण आणि थोडा भाजीपाला वगैरे घेऊन आला. थोड्याच वेळात, जेवणं वगैरे आटोपली. मुलाला त्यांच्या बरोबरच पाठवावे लागणार होते. दुपारी सगळे थोडा वेळ झोपले. त्याचा मुलगाही निवांत झोपला. सातची बस हि डायरेक्ट मामाच्या गावाला जायची, म्हणून त्याअगोदर उठून आवरावं लागणार होतं. त्याची बॅग भरता भरता त्याला त्याच्या मुलासबोतची जेवणा नंतरची दंगल, सकाळच चहा बिस्कीट, छोटा भीम, संध्याकाळी ग्राउंड वरचा बॅटबॉल, असे एक ना अनेक प्रसंग त्याचा डोळ्यासमोरून जाऊ लागले. त्याला उठवताना तर त्याच्या जीवावर होतं. एवढासा पोर, एवढे दिवस आई बापाबरोबर राहतोय आणि आज अचानक त्याला आज्जी बरोबर पाठवताना त्यालाच रडू यायला लागलं होतं. मग त्या मुलाला कसं वाटत असेल?

तो, "बाळा चल, मामा कडे जायचं ना?"

रडवेल्या चेहऱ्याने ते मुल म्हणालं, "मला नाय जायचं मामाकडं, मला इथंच राहायचंय."

"अरे चल बाळा, आपली बस जाईन मग. तुला मी भिंगरी घेऊन देतो, मामीला नाय द्यायची बरं का, फक्त मामालाच द्यायची."

तो खूपच रडवेला झाला होता, 'अन मला नाय जायच' असे सारखं म्हणत होता. पण इलाज नव्हता. त्यानं त्याच्या मुलाला कसंबसं तयार केलं. जाताना एक भिंगरी घेतली, ज्यातून साबण्याच्या पाण्याचे फुगे निघतात. ते पोर एकदम खुश झालं.
जाताना तो त्याला सारखं सांगत होता,

"मम्मा तुला खूप खेळणी आणणार आहे, आणि खूप खाऊ आणणार आहे. तू राहशील ना आज्जीकडे??? निशी आणि वैनी बर खेळायचं बर का! अन स्कूल ला पण जायचं."

ते निरागस पोर त्या भिंगरीमुळे एवढं खुश झालं होतं की, सगळ्याला हो हो म्हणत होत.

काय योगायोग म्हणावं याला! आज फादर्स डे आणि एक बाप त्याच्या पोराला त्याच्यापासून दूर राहण्यासाठी समजावत होता. फादर्स डे च गिफ्ट, त्या तीन साडे तीन वर्षांच्या पोराला देताना त्या बापाच्या जीव तीळ तीळ तुटत होता.

त्याला आता त्याच्या बापाची प्रकर्षाने आठवण यायला लागली. स्वतःच्या पोराला पंधरा दिवस दूर ठेवावं लागेल म्हणून त्याचा जीव तुटत होता. पण स्वतःच्या गावापासून आई बापापासून पंधरा वर्षे झाले बाहेरगावी राहतोय, स्वतःच्या बापाची काय अवस्था होत असेल. असे कित्येक फादर्स डे, बर्थडे आले नि गेले. बापाला कधी साधं शुभेच्छा पण दिल्या नाहीत. सुरुवातीला महिन्या दोन महिन्यातुन गावाला होणारी चक्कर आता फक्त दिवाळी, दसरा आणि जत्रा पुरतीच मर्यादित राहिलीय. खूप वर्षे लोटलीत आता, बापाबरोबर निवांत कधी बोललो होतो आठवत देखील नाही. खूप भडभडून बोलायचंय, हसायचंय, रडायचंय. त्या मुन्नाभाईची शेवटची इच्छा जशी अपुरी राहिली ना! आपल्या बापाला जादू की झप्पी द्यायची. त्याच्या आधी बापाला एकदा मिठी मारायचीय.
-----

जगाचा साधा सरळ नियम आहे,
"कुछ पाने के लिये, कुछ खोना पडता है |"

घरदार सोडून कामासाठी, पैशासाठी शहरामध्ये येणारे खूप असतात. काही इथेच येऊन वसतात तर काही नौकरीसाठी आपल्या आई-बापाला, बायको-पोरांना गावी सोडून येतात. कोण दिवसा तर कुणी तरी कामाला जुंपलेला असतो. आपलं आवरा, मुलांचं आवरा, त्यांना शाळेत सोडा. नंतर ते ट्रॅफिक, सिग्नल्स, रहदारी आणि कामावर वेळेत पोहोचायची घाई. जागोजागी उखडलेले रस्ते, वाहतुकीचा उडलेला बोजवारा, मुंगीच्या गतीनं सरकणारे ट्राफिक, सिग्नल पडताच वाऱ्याच्या गतीनं पाळणाऱ्या गाडया, खचाखच भरलेल्या बसेस, रस्त्यात कुणाचा अपघात झाला तर थांबायलाही वेळ नसतो. उन्हा तान्हात दिवसभर सिग्नलवर थांबणारे पोलीस, त्यांच्याशी हुज्जत घालणारी लोकं, असे कितीतरी प्रसंग पार करत आपण आपलं अस्थित्व टिकवत असतो. या धकाधकीच्या, धावपळीच्या शहरामध्ये आपली ओळख निर्माण करत असतो.

पैशाच्या मागे धावता धावता आपण कितीतरी गोष्टी मागे सोडून जात असतो. मित्र-मैत्रिणी, नातलग, जिवलग या करियरच्या मोहापायी दुरावत असतात.

मुव्ही, शॉपिंग, मॉल्स, होटल्स आता शहरातील झगमगटाची सवय झालेली असते. दैनंदिन वेळापत्रक ठरलेलं असतं. वीकेंड्सचे प्लॅन्स ठरलेले असतात. अशातच कधीतरी चकून एखादा गावाकडचा मित्र भेटतो. आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.

ती कौलारू शाळा...
शाळेच्या मागचा ओढा...
ओढ्यावरचा स्टॅण्डवर जायचा पूल...
ओढ्याच्या कडेचा बाजारतळ...
भैरवनाथाचं-सावतामाळीचं मंदिर...
चोरून खाल्लेल्ल्या चिंचा, बोरं, जांभळं...
तो चौकातला कट्टा...
कट्टयावर बसलेले चुलते, भाऊ, मित्र...
अन त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण...
विसरता विसरत नाहीत...
आपल्या मातीच्या आठवणी...

शहरात कितीही मोठ्या फ्लॅटमध्ये -बंगल्यामध्ये रहा. पण, बापाचं दोन खोल्यांचं घर कधी विसरू नका.
कितीही चांगल्या बेडवर-गादीवर झोपा. पण, आजीने आईने शिवलेल्या गोधडीची उब कधी विसरू नका.
कितीही चांगल्या सोफ्यावर बसा. पण, बापानं बनवलेला लाकडाचा स्टूल-पत्र्याची खुर्ची कधी विसरू नका.
कितीही आलिशान गाडीत फिरा. पण, आपल्या गावाकडच्या बैलगाडीत केलेला प्रवास कधी विसरू नका.
बायको बरोबर टूव्हीलरवर जरूर फिरा. पण, बापाबरोबर ऍटलासच्या सायकलवर शेतात जातानाची मजा कधी विसरू नका.
स्नूकर खेळा, टेबल टेनिस खेळा. पण, मातीतला विटीदांडू आणि गोट्या कधी विसरु नका.
मोठमोठ्या मल्टीप्लेस मध्ये जाऊन सिनेमा बघा. पण, दूरदर्शनवरच्या मालिका, पिक्चर बघत आपण मोठे झालो तो ब्लॅक व्हाईट टीव्ही कधी विसरू नका.
कितीही महागड्या हॉटेलात, कितीही चविष्ट जेवण करा. पण, आईच्या हातची मेथीची भाजी, वांग्याचं भरीत आणि पिठलं भाकरीची चव कधी विसरू नका.

- धन्यवाद

◆◆◆◆◆

दिनांक: १७ जून २०१८
ईश्वर त्रिंबकराव आगम
वडगांव निंबाळकर, बारामती
९७६६९६४३९८