Mala Kahi Sangachany - 28 in Marathi Fiction Stories by Praful R Shejao books and stories PDF | मला काही सांगाचंय.... - २८

Featured Books
Categories
Share

मला काही सांगाचंय.... - २८

२८. गतकाळ

ती बराच वेळ बिछान्यावर पाठ टेकवून बसलेली होती आणि दुपारी घाई घाईत काम केल्याने तिला जरा थकवा जाणवत होता . तिने एकावर एक अश्या दोन उश्या ठेवल्या , जरा खाली सरकून तिने त्यावर मान टेकवली . डायरी हातात घेऊन वाचतांना बरोबर उजेड येत आहे कि नाही म्हणून तिने एकदा वाचून पाहिलं आणि हवा तितका प्रकाश डायरीच्या कागदांवर पडत नसल्यामुळे तिने तो नाईट लॅम्प जवळ ओढला . आता ती पूर्ण बिछान्यावर झोपून , किंचित मान वर ठेवून , दोन्ही हाताचे कोपर गादीत रोवून , हाताने डायरी नीट पकडून पुढे वाचायला लागली ...

कुमारने डायरीत समोर लिहिलं होतं .... ... .. .

काही दिवसांतच माझी बारावीची परीक्षा संपली होती आणि उन्हाळी सुटीला सुरुवात झाली होती ... मग काय कबीर आणि पुस्तक यांच्या सहवासात पुन्हा एकदा वेळ मजेत जात होता ,नवनवीन वाचायला मिळत होत , शिकायला मिळत होत ... दुपारचा वेळ खेळण्यात जायचा तर कधी कुणाच्या शेतात जाऊन आंबे पळवून आणण्यात असे दिवस जात होते ... यावेळी एक नवीन गोष्ट आवडीत जुळली ती म्हणजे सिनेमा अन त्यात होणारी मारामारी , गाणी ... बरंच काही ..

दररोज एक दोन सिनेमा पाहून व्हायचा , सिनेमातील गाणी नकळत आपलीशी वाटायला लागली होती , तोंडपाठ झाली होती ... एकांतात ओठांवर एखादं दुसरं गाणं येत होत आणि त्यातील भाव मनाला स्पर्श करून जात होते ...

मला प्रेम म्हणजे काय ? आणि त्यासंबंधीत जे काही प्रश्न निर्माण झाले होते त्यापैकी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला हिंदी आणि मराठी चित्रपट यांतून मिळाली होती ... प्रत्येक वेळी नवीन काहीतरी भन्नाट सिनेमात व्हायचं , नवनवीन अभिनेता आणि अभिनेत्री असायचे ... सिनेमात घडणारे कधी आपलंसं वाटायचं आणि कधी नव्हे तर मला सिनेमा पाहायचा जणू काही छंद जडला , रोजच सिनेमा पाहायचा म्हणून मनाला आतुरता लागलेली असायची ...

कधी अभिनेता ऐवजी स्वतःला त्यात असल्याचा भास व्हायचा इतका सिनेमाशी एकरूप होऊन जायचो मग वेळेचं भान राहत नव्हतं .... दुपारचा वेळ असाच निघून जात होता , सिनेमातील अभिनेत्यासारखी केसांची वळण लावण्याची नकळत सवय झाली आणि कधी आवडत्या अभिनेत्याला मारेकरी मारहाण केली कि आपण त्यांना मारावं अस वाटून जायचं तर अभिनेता कधी कधी मरण पावला कि खूप वाईट वाटायचं ... आता कसं व्हायचं ? त्याच्या कुटुंबियांचं काय होईल ? असे बिनकामाचे प्रश्न पडायचे , अभिनेता इतक्यात मरायला नको होता ... असं मनात येऊन जायचं पण दुसऱ्या सिनेमात तोच अभिनेता पुन्हा आला कि इतका मार खाल्ला , भळाभळा रक्त गेलं आणि मेल्यावर चितेवर जाळतांना सुध्दा दाखवलं मग तो अजून जिवंत कसा ? हाही एक मोठा प्रश्न मला पडायचा ...

काही दिवसांनी हळूहळू समजून आलं की सिनेमातील सर्वकाही तेवढ्यापुरते असते आणि खोटं खोटं म्हणून ते मरतात ... मग ते एक वाईट वाटायचं खूळ मनातून निघून गेलं , सिनेमाची कथा आणि गाणी यांची आवड मात्र कायम होती ...

माझे पेपर जरी संपले पण तिची अकरावी चे पेपर व्हायचे होते . मी कॉलेजला जायचं काहीएक कारण नव्हतं पण तिला भेटायचं म्हणून कधी कधी ती पेपर देऊन परत यायच्यावेळी नेमका तिच्या मागावर राहायचो हि शक्कल मला सिनेमाने शिकवली होती आणि काही तिच्याशी संपर्क साधावा यामुळे आचरणात आली होती ...

एकटा असतांना , तर कधी कबीर सोबत तिच्या सोबत बोलतांना नकळत तिचं रूप न्याहाळायला लागलो होतो ... तिला पाहतांना मन कुठेतरी हरवलं अस वाटायचं याआधी अस मी कधीच कुणाच्याच बाबतीत अनुभवलं नव्हतं हे सारं काही माझ्यासाठी नवं होतं ... तिला आठवतांना नकळत सिनेमातील अश्यावेळेत अभिनेत्याने गायलेली गाणी गात बसायचो तर ती समोर असतांना सिनेमातील एखादा प्रसंग आम्ही दोघे अभिनेता आणि अभिनेत्री जसे मला भासायचो ...

असं का वाटायचं याचं उत्तर मला मिळत नव्हतं त्याला कारण म्हणजे तेव्हा मी शोधायचा प्रयत्न केला नाही ... मला तितकंसं आवश्यक वाटत नव्हतं ... बस असाच अनुभव येत राहो हि एक इच्छा मनात होती ... तिचा सहवास , बोलणं नेहमी असंच राहावं यापलीकडे कोणतीच आशा , अपेक्षा नव्हती ...

मला मित्र म्हणूनच तिच्यासोबत जुळलेलं नातं जास्त आवडलं होत ... हक्काचं , गंमतीचं , थट्टा मस्करीचं ... दोघेही मनात आलं ते बोलून टाकायचो बोलतांना विचार करावा असं कधी वाटलं नाही तशी वेळ येतच नव्हती ना कधी आली ...

ती मन लावून डायरीत आणखी काय लिहिलं ते वाचत असताना अचानक नाईट लॅम्प बंद झाला अन पाठोपाठ पंखा मंद गतीने फिरत तोही थांबला ... संपूर्ण खोलीत अंधार पसरला , बाजूच्या टेबलवर हाताने चाचपडत तिने मोबाईल शोधला , टॉर्च लावला आणि समोर वाचायला लागली ... दोन चार ओळी वाचल्या न वाचल्या तर तिला घामानं कपाळ भिजल्याचं जाणवलं ... पंखा बंद पडताच तिल उकळायला लागलं पण कुमारने आणखी काय लिहून ठेवलं याची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देत नव्हती ... अखेर काही वेळातच तिला चिंब घाम फुटला न राहवून तिने डायरी तशीच जिथपर्यंत वाचून झाली तशीच उलट बिछान्यावर ठेवली , ती बेडरूमच्या बाहेर आली ....

उजव्या हाताने कपाळावर आलेला घाम पुसत , डाव्या हातात मोबाईलचा टॉर्च समोर करून तिने त्याला हाक मारली ...

" अहो , लाईट गेली ना ... "

हातात मोबाईल घेऊन तो बाहेर येत " हो , अचानक कशी काय लाईट गेली ? "

" तुम्ही तरी हि आतच बसून आहात ..? "

" लाईट गेली अन मी लगेच मोबाईलचं इंटरनेट सुरु केलं ... "

" अस होय , तरी म्हटलं मला आत किती उकळत होतं आणि तुम्ही आतून बाहेरपन आला नाहीत ... "

" बरं ते जाऊ दे , चल बाहेर मस्त गार वारा सुटला असेल आपण गच्चीवर जाऊया ... "

" चला " म्हणत तिने होकार दिला आणि दोघे गच्चीवर आले ...

त्याचा अंदाज खरा होता ... बाहेर गार वारा सुटलेला , जरा निळसर आभाळ .... जणू चांदण्यांची चादर अंगावर ओढून , दिवसभर पूर्वेकडून पश्चिमेकडे रोजचाच निसर्गाने ठरवून दिलेला प्रवास करून थकलेला सूर्य झोपी गेलेला , चंद्राची मनमोहक कोर लक्ष वेधून घेत होती ... मध्ये एखादी चांदणी चटक होऊन मंद मंद प्रकाशात चमकत होती ...

घामाने चिंब शरीराला गार वारा स्पर्श करून गेला आणि जागीच गोठल्यागत दोघे तसेच उभे राहिले ... तो गार वारा त्यावेळी न थांबता तसाच निरंतर वाहत राहावा असं त्यांना वाटलं ... वाऱ्याची ती झुळूक झरकन आली अन निघून गेली त्या क्षणिक सुखाने वेळेचं म्हणजे लाईट गेलेली आहे आणि आरामात झोप घ्यायची वेळ आहे याचे भान हरपून ते दोघे झोपाळ्यावर बसले ... हळूहळू झोपाळा पायाने झुलवत वर पाहू लागले ... चोहीकडे अंधार पसरलेला , वर नयनरम्य देखावा कुणी कलाकाराने आजन्म मेहनतीने डोळ्याचं पारणं फिटाव इतकं मोहक चित्र साकाराव तसे ते मग्न होऊन त्या क्षणाचा आस्वाद घेत असता यासर्वांत मध्येच कुठेतरी लाल रंगाचे चमचम करत सरकतांना दिसलं...

" अगं ते बघ "

जरा आश्चर्याने " कुठे ? कुठे ? "

तिला बोटाने दाखवत " ते तिथे बघ , लाल रंगाची चांदणी .."

पटकन वर अन लगेच त्याच्याकडे नजर वळवून " लाल रंगाची चांदणी , माझा वरचा मजला काही रिकामा नाही ... "

जरा हळू आवाजात स्वतःलाच ऐकू येईल असे ' काय बोलतेस ...? '

" काय म्हणालात ? ... .. विमान आहे ते ... "

" खरं कि काय ? मला वाटलं आज लाल रंगाची चांदणी आली आभाळात ... रोज रोज तोच एक रंग लावून कंटाळली असेल तर केला आज लाल रंगाने मेकअप ... " तिला रोखून पाहत तो म्हणाला ...

ती खळखळून हसली ... तो तिला पाहतच राहिला , बऱ्याच दिवसांनी ते दोघे जण एकत्र झोपाळ्यावर बसले होते ... जुन्या काही गच्चीवरच्या आठवणी एकमेकांना सांगत बराच वेळ झाला आणि गतकाळात रमलेल्या त्या दोघांना अचानक बाजूचा लाईट सुरु झाल्याने , लख्ख प्रकाश पडल्याने भान आलं ... तिने त्याच्या खांद्यावर ठेवलेली मान न राहवून काढली , दोघे गतकाळातून परत वास्तव्यात सोबत परतून आले ...

ते झोपळ्याहून खाली उतरले , तिने हात वर उंचावून जांभई दिली अन तिला पाहून त्यालाही जांभई आली ... सवय दुसरं काय ... दोघे पाठोपाठ जिना उतरून हॉलमध्ये आले ... तो उरलेलं काम पूर्ण करायचं म्हणून पुन्हा त्याच्या रूममध्ये गेला आणि ती बेडरुममध्ये .....