Toch chandrama - 18 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | तोच चंद्रमा.. - 18

Featured Books
Categories
Share

तोच चंद्रमा.. - 18

१८

ब्रुनीची होम व्हिजिट

सकाळ सकाळी उठलो.. सुट्टीचा दिवस माझा. कालच्या रात्रीतले सारे आठवत होतो.. नि मी ब्रुनीला माझ्याच नकळत फोन लावला .. अर्धवट झोपेत असावी ती..

"हाय ब्रुनी!"

"हाय.."

"स्टिल स्लीपी? झोपेत आहेस?"

"यस.."

"कालची संध्याकाळ किती छान गेली ना?"

"यस.."

"मी गिटार छान वाजवतो ना?"

"हो.."

"राॅबिन आणि हॅवन ग्रेट आहेत ना?"

"हो.."

"वाटत नाहीत रोबोसारखे.."

"हो ना.."

"केक पण छान होता.."

"हो ना.."

"रघुवीर आणि वर्षा आर ग्रेट .."

"यस्स.."

"मी तुला काल विचारलेला प्रश्न.. त्याचे उत्तर.."

"यस्स .."

"थ्यांक्स ब्रुनी .. आता तू म्हणू नाही शकत की मी प्रपोज केले नि तू उत्तर ही नाहीस दिले.."

"व्हाॅट .. यू चीटर.. मला झोपेत पाहून तू असे करावेसे.. झोप मोडलीस माझी.."

"दॅट्स द ट्रिक .. पण तुझे उत्तर नसल्याने माझी झोप उडालेली त्याचे काय? तेव्हा तुझे उत्तर हवे तर.. याला गनिमी कावा म्हणतात डियर.."

"कावेबाज.."

"ऐक ना ब्रुनी .. कम ओव्हर टुडे टू माय होम.."

"आज?"

"यस्स .. लेट मी इंट्रोड्युस यू टू माय होम.. नाऊ दॅट यू हॅव अॅक्सेप्टेड माय प्रपोजल.."

"मी? कधी?"

"आताच अॅक्सेप्ट केलेस.."

"ते नाही स्टुपिड.. घरी कधी तुझ्या?"

"ब्रुनी .. आज.."

"पण मी अालेले आताच तर.."

"आलेलीस.. पण आता इन नाॅन डिप्लोमॅटिक वे.. म्हणजे नुसती ब्रुनी म्हणून ये.."

"ओके.. संध्याकाळी."

"आणि उठ आता .. किती झोपशील?"

"नाही रे.. तू गेलास ना मग मी हॅवनचा मम्मी मोड सुरू केला.. एवढी महत्त्वाची गोष्ट आईला सांगायला हवीच ना? त्यात खूप उशिरा झोपले मी ना म्हणून.."

"मग काय म्हणाली आई तुझी?"

"ती खूश झाली खूप.. पण फक्त मुलगा थोडा अजून चांगला असता तर बरे झाले असते असे म्हणाली ती.. आणि तुला माहिती आहे.. ममा'स वर्ड आर सुप्रीम .. आता रे काय?"

"ब्रुने, तू चांगलीच जागी झालीयस.. पण तू आता शब्द फिरवू नाही शकत.."

"हा! हा! पण आई तसे खरेच म्हणाली ना.."

"एक काम कर.. तो मम्मी मोड बंद कर.. आणि फाॅर हेवन्स सेक हॅवन मोड सुरू कर.. येतेस ना संध्याकाळी?"

"यस डियर.. येते."

"वेटिंग.."

हे सारे मी बोलत होतो नि राॅबिन माझ्या मागेच उभा होता.

"राॅबिन .."

"बोल ब्रो.. काय मदत हवीय?"

"मदत? मी तुला फक्त मदतीसाठीच बोलवतो की काय?"

"नाही .. पण आजच येणार ब्रुनी तर घरी तुझी बातमी फोडावीच लागेल .. त्यासाठी हू बेटर दॅन ओल्ड ट्रस्टेड आणि फेथफुल राॅबिन?"

"चोरून ऐकायची सवय वाईट ब्रदर राॅबिन .."

"ब्रो, उघड्यावर बसून प्रेमगप्पा मारणे चांगली सवय आहे? मी कधीपासून उभा आहे इथे आणि यू डिडन्ट इव्हन नोटिस .. आता ये पाया पडायला तेव्हा पाहातो.."

"राॅब, मला येऊन किती दिवस झाले रे इकडे?"

"व्हाय?"

"मला वाटते सहा महिने झाले सहज.."

"मग?"

"त्या सहा महिन्यात तू मराठीचा पंडित होण्याकडे मार्गक्रमणा करतोस असे वाटतेय .."

"जस्ट अ मिनिट .. मार्गक्रमणा.. नवा शब्द.."

तो मशीनीत शोधायला लागला..

"असेल.. तसेही असेल .. आणि तू? सहा महिन्यात काय काय केलेस.. पराक्रम .. त्यात हे ब्रुनी प्रकरण शेवटचे.. लास्ट स्ट्राॅ आॅन द उंट!"

तो हे बोलायला नि आई आत यायला एकच गाठ पडली..

"राॅबिन, हे ब्रुनी प्रकरण काय रे? ब्रुनी म्हणता ती तीच ना.. टायटॅनियन?"

"होय मॅडम .." राॅबिनने हळूच माझ्याकडे पाहिले. बहुधा माझे ब्रेन मॅपिंग करून अंदाज घेत असावा ..

"अरे, चांगली मुलगी आहे. तुला काय वाटते अंबर?"

"मला? मला काय वाटायचे आहे?"

"मग ते प्रकरण वगैरे काय म्हणत होता हा राॅबिन?"

"काही नाही .. त्याचे डोके फिरलेय.."

"हुं.. राॅबिनचे डोके कधीच फिरत नाही .. तो असे म्हणतोय म्हणजे पाणी मुरतेय नक्कीच कुठेतरी .."

"मॅडम एक सेकंद .." त्याने पाणी मुरतेयचा अर्थ पाहण्यासाठी मशीनीत डोके घातले..

"नो लिकेज मॅडम.. नो सिपेज.. आय चेक्ड .."

"अरे, पाणी मुरतेय म्हणजे भानगड काहीतरी वेगळीच आहे म्हणतेय मी राॅबिन .."

"हां.. भानगड.. म्हणाल तर ती आहे.."

"म्हणजे?"

"हा अंबरच सांगेल ना.."

"काय रे? हे ब्रुनी प्रकरण आणि भानगड काय आहे?"

मी एकाएकी ध्यैर्य गोळा केले .. मनातल्या मनात ब्रुनी स्मरण केले.. ब्रुनीकडे हॅवनचा मम्मी मोड बंद करायचा आॅप्शन आहे.. तो माझ्याकडे नाही. आई जर रागावली तर काही खरे नाही .. पण तिने आधी ब्रुनीला सँक्शन केलेय.. म्हणजे तसा धोका नाही .. म्हणजे आता सांगून टाकू.. पण ऐन वेळी जीभ चिकटली माझी..

"काही नाही गं. उगीच याच्या अकलेचे एकेक तारे.."

"हो ना? मग ठीक. ब्रुनी खूप चांगली मुलगी आहे. मला आवडली ती. पण आता काही भानगड नाही म्हणतोस तर.. सायलीच्या घरी एकदा भेटते जाऊन .. तशी चांगलीय ती.. पण मला ब्रुनी आवडलेली.. एवढी हुशार मुलगी शोधून नाही सापडायची. सायलीकडे जायला तुला कधी वेळ आहे?"

"मॅडम, आज संध्याकाळी जाता येईल. हो की नाही अंबर? तसा फ्री आहे तो.."

"चालेल. राॅबिन एकदा फोन कर त्यांच्याकडे लगेच.. फिक्स करून टाक.."

"यस मॅडम.."

"राॅबिन, यस मॅडम काय..? आज नको.."

"कां कुणी येणार आहे?"

आता माझ्या धैर्याची परीक्षा आहे.. धीर एकवटून म्हणालो, "होय, आई आज संध्याकाळी ब्रुनी येतेय घरी!"

"कशाला? ते टायटॅनियन्स गेले परत.. तुझे बाबाच त्यांना सोडून आले स्पेस स्टेशनवर .."

"अगं ती तशी नाही येत आहे."

"मग कशी येत आहे?"

"जशी तुला हवी होती ना तशी .."

"म्हणजे मॅडम, ब्रुनी प्रकरण नावाचे प्रकरण ही आहे नि भानगडही."

"म्हणजे राॅबिन म्हणाला ते खरेय.."

"काय म्हणाला राॅबिन?"

"हेच, वरून साधी दिसणारी मुले आतून बदमाष असतात .. कशाचा थांगपत्ता लागू देत नाहीत .."

आई राॅबिनकडे पाहून हसत होती. मला वाटले राॅबिन ने कालच तिला सांगितले असणार म्हणून ती माझी वाट न पाहता झोपून गेली असणार.. काही असो, घरची आघाडी सांभाळली गेली या राॅबिनमुळे.

दोघांनी मिळून मला चांगलेच कात्रीत पकडले..

संध्याकाळी ब्रुनी आली घरी. दिवसेंदिवस ती मला अजूनच सुंदर वाटत होती. येताना ती स्वतः केक बनवून घेऊन आलेली..

"गुड इव्हिनिंग .." ब्रुनी आत येत म्हणाली ..

"हाय! ब्रुनी इज हियर.." राॅबिन जणू जगाला अनाऊन्स करत असावा असे बोलला.

आई आणि बाबा बाहेर आले.. नि मी ही.

ब्रुनी बसली.. तिच्या टायटनवरच्या गोष्टी ऐकवल्या तिने. आपल्या आईबद्दल सांगितले नि टायटनवरच्या एकूण रहाण्याखाण्याबद्दल. आईने आपल्या आईपणास जागत माझ्या बावळटपणाच्या नि धांदरटपणाच्या गोष्टी ऐकवल्या तिला.. दोघांनीही त्या गोष्टी ऐकताना एकमेकांना टाळ्या दिल्या! मग छान जेवण झाले. ब्रुनीने आईकडून चक्क रेसिपीस ऐकून लिहून घेतल्या.. दोघांच्या गप्पा रंगल्या खूप..

बाबा खरे बोलके आमच्यात पण ते जास्त काही बोलले नाहीत. त्यांना ब्रुनी पसंत नव्हती की काय कोणास ठाऊक? पण तसे नसावे. मुळातच ब्रुनीत न आवडण्यासारखे काय मिळणार होते त्यांना?

जाता जाता ब्रुनी आईला सांगून गेली, येईन परत..

मी म्हटले यावे तर लागेलच ना! ती गेली नि आई म्हणाली, "छान आहे ही मुलगी, आपल्याकडे नाही मिळणार अशी एखादी .. हो की नाही हो?"

"खरंय तुझे .." बाबा म्हणाले नि परत गप्प झाले..

बाबा गप्प गप्प का होते हे मला रात्री राॅबिनने सांगितले. म्हणजे माझ्या त्या स्वप्नात पोलिस येऊन केक घेऊन गेलेला तसे काही होणार काय?

रात्री मी बसलेलो. लोक डायरी लिहितात तसा मी दिवसाच्या शेवटी असा दिवसाचा मनातल्या मनात अगदी सचित्र आढावा घेतो. त्यात अर्थातच जास्त भाग ब्रुनीने व्यापलेला होता. इतक्यात राॅबिन आलाच. चेहऱ्यावर नेहमीचे हसणारे भाव नव्हते त्याच्या.

"हाय अंबर ब्रदर.."

"बोल. असा गंभीर का? एनी प्राॅब्लेम विथ युवर प्रोग्रामिंग?"

"नो डियर. ते मी आॅटो रिपेअर करून घेतो.. इट्स समथिंग टू वरी अबाऊट .."

"म्हणजे?"

"अबाऊट ब्रुनी .."

"काय? आणि कोण म्हणाले तुला? आई की बाबा?"

"सर टोल्ड मी.. धिस.."

"काय? ब्रुनी बद्दल? पण ते तर म्हणाले ब्रुनी इज अ नाइस गर्ल.."

"ते खरेय. त्याबद्दल त्यांना नाही प्राॅब्लेम. ही इज वरीड .. इट्स डिप्लोमसी.. इंटरप्लॅनेटरी मॅरेज झाले नाही अजून कधी .."

"मग?"

"मग हे की, त्यांना नाही ठाऊक की दोन्ही देशातली सरकारे हे सर्व घडू देतील का?"

"म्हणजे?"

"अरे, नुसत्या इंटरनॅशनल लग्नांत किती काॅम्प्लिकेशन्स असतात. हे तर इंटरप्लॅनेटरी. इथे नुसतेच इंडियन गव्हर्नमेंट नाही तर बाकीचे पृथ्वीवरचे देश पण इन्व्हाॅल्व्ह होतील. आणि त्यात काय होईल कुणीच सांगू नाही शकत.."

"म्हणून बाबा असे गप्प होते?"

"यस, ही इज वरीड.. पुढे कसे काय होणार? मॅडम म्हणाल्या त्यांना, प्रेमात कसली आलीत अशी बंधनं.. ती सर्वात शुद्ध भावना आहे.."

"मग?"

"सर म्हणाले, ते असेलही. पण डिप्लोमसीत हे कितपत अॅक्सेप्ट करतील कोणास ठाऊक.. मी तुला आज नव्हतो सांगणार हे, पण मलाच इतके टेन्शन आलेय ना.. आयॅम आॅल्सो वरीड अ लाॅट. म्हणून तुला सांगायला आलो.."

"हुं."

"आणि तुला आठवतेय, तुला ब्रुनी बद्दल पहिल्यांदा बोलताना मी हेच सांगितले होते तुला.. कसे पार पडणार सारे कुणास ठाऊक.. मी पाहिलंय पृथ्वीवर असताना .. तिकडे लोक खूपच काय म्हणावे.. इनसिक्युअर असतात."

मला इथे प्यार की ताकत वगैरे डायलाॅग आठवला. प्यार की कोई सीमा नहीं वगैरे आठवले.. पण या आंतरराष्ट्रीय की आंतरग्रहीय राजकारणात त्याची किंमत शून्यच असावी बहुधा. रात्र अशीच गेली विचारात. पुढे काय होणार?

ब्रुनीला बोललो नव्हतो मी हे अजून. कदाचित तिला आधीच माहिती असेल की काय? कोणास ठाऊक!

पुढचे काही दिवस मी नाॅर्मली बोलत राहिलो तिच्याशी. ती पण तशीच तिच्या मंजूळ आवाजात बोलत राहिली. जणू काही होणारच नव्हते ..

आणि एके दिवशी जे होऊ नये ते झालेच..