९) निघाले सासुरा!
"दयानंदराव, चला. छान झाले. त्रास संपला."
"हो भाऊजी. पण खरेच फार त्रास झाला हो."
"जाऊ दे ना. शेवट गोड तर सारे गोड. हा सारा योगायोगाचा खेळ आहे. किती कार्यक्रम झाले असतील रे?"
"भाऊजी, प्रत्यक्ष दाखविण्याचे पाऊण शतक आणि एकूण भेटाभेटीचे शतक झाले असेल ."
"रेकॉर्डच झाले म्हणायचे." दामोदरपंत म्हणाले.
"हो ना. भाऊजी, असे अनुभव आले ना की बस्स! विचारुच नका. वेगवेगळे नमुने भेटले बुवा! अनेकदा एकेकाचा राग यायचा, वैतागून जायचा जीव! परंतु आता काही प्रसंग आठवले ना, की हसू येते. अहो, एका ठिकाणी आम्ही जाण्यापूर्वी फोन करून गेलो. समोरून फोनवरच प्रश्नांच्या फेऱ्या झाडल्या गेल्या आणि नंतरच आम्हाला येण्याची परवानगी दिली. त्यानंतर चार-पाच तासांनी आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. तुम्हाला सांगतो भाऊजी, तितक्या कमी वेळात त्या गृहस्थाने आमची सारी माहिती जमवून ठेवली होती. आम्ही आत जाऊन बसलो न बसलो की ते म्हणाले, की तुमच्या मेहुणीच्या दिराच्या मावसभावाची मुलगी दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न करून पळून गेलीय हे खरे आहे का?"
"बाप रे! मग?"
"मी म्हणालो की, बरोबर आहे. पण आमचे फारचे दूरचे नाते आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या मुलीसोबत तिच्या आईवडिलांशीही संबंध नाहीत... असे मी स्पष्टीकरण दिले."
"त्यावर काय म्हणाले ते?" दामोदरपंतांनी विचारले.
"ते म्हणाले, की प्रश्न नाते दूरचे आहे, की जवळचे हा नाही तर ती मुलगी तुमची नातेवाईक आहे त्यामुळे अशा वर्तुळामध्ये आम्ही सोयरसंबंध जोडू शकत नाही. या तुम्ही. असे म्हणत त्यांनी जणू आमच्या हातात नारळ दिला..." दयानंद म्हणाले.
"मला एक प्रश्न पडतो, दयानंद की सध्या मुलींची कमतरता आहे, मुलींची संख्या कमी आहे, पोरांकडची मंडळी परेशान आहेत अशी चर्चा असता..."
"भाऊजी, तसे काही नाही. मुलामुलींच्या संख्येत फार मोठी अशी तफावत नाही. पूर्वीपेक्षा फार तर एकोणवीस- वीस अशी स्थिती आहे. काही वर्षांपूर्वी कसे होते, मुलाचे घराणे या गोष्टीला फार मोठे महत्त्व दिल्या जात असे पण आजकाल कसे, मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मुली स्वतंत्रपणे नोकरी-व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांच्या मतांना, पसंतीला महत्त्व प्राप्त झाले आहे, ते साहजिक आणि क्रमप्राप्त झाले आहे. पण त्यामुळे होतंय काय तर एखाद्या मुलास दोन-तीन मुलींकडून नकार आला, की मग मुलींचे प्रमाण कमी झाले आहे अशी चर्चा सुरु होते..."
"बरोबर आहे, तुझे. पण एक मात्र नक्की, की हीच परिस्थिती कायम राहिली ना तर मग मुलींना हुंडा द्यावा लागेल." दयानंद म्हणाले.
"आपण सातत्याने भ्रुणहत्येमुळे मुलींची संख्या कमी होत आहे असा धोशा लावतोय. मला सांगा, भाऊजी, पूर्वी का गर्भपात होत नव्हते? सासरच्या जाचामुळे नवविवाहितांचे बळी जात नव्हते? आपण आजकाल हम दो, हमारे दो चा नारा अवलंबून वागत आहोत. त्यामुळे मुलींची संख्या कमी होतेय असे कुणी म्हणत असेल तर मग त्याच धोरणानुसार मुलांचीही संख्या कमी होत असेल ना? परिस्थिती बदलतेय परंतु सध्या तेवढी भयावह नाही. भाऊजी, माझ्या मित्राचा दत्तू नावाचा मुलगा ज्या शाळेत मुख्याध्यापक आहे ना,त्या शाळेत मुलामुलींची संख्या पाहता आजही मुलींचे प्रमाण दहा टक्क्यांनी अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या गावी एकच शाळा आहे. दुसरे असे, की काही महिन्यांपूर्वी आमच्या कुटुंबात अशीच चर्चा रंगलेली असताना छाया आणि सरस्वतीने मिळून आपल्या पाहुण्यांकडे, आमच्या परिचितांकडे असलेल्या लहान-मोठ्या अविवाहित मुलामुलींची यादी केली. त्यानुसार आपल्या वर्तूळात मुलांपेक्षा मुली जास्त आहेत. परंतु प्राप्त परिस्थितीचा विचार केला असता मुलांसाठी धोक्याची घंटा घणघणते आहे..."
"असे असले तरीही मुले पसंत-नापसंतीचा किंवा लपवाछपवीचा आपला उद्योग सोडायला तयार नाहीत. तुला मला स्वतःला मित्राच्या मुलीसंदर्भात आलेला अनुभव सांगतो, मुलाकडील लोकांनी सांगितले, की मुलगा चंद्रपूर येथे मोठ्या पदावर नोकरीला आहे. त्याने मुलीला पसंतीचा निरोपही दिला पण मित्राच्या मनात काय पाल चुकचुकली ते माहिती नाही परंतु त्याच्या म्हणण्याखातर आम्ही दोघांनी चंद्रपूर गाठले. सरळ त्या मुलाच्या कार्यालयात गेलो तर तो मुलगा चक्क सकाळी कार्यालयाची झाडझुड करताना आढळला. तो चपराशी होता... तेही रोजंदारीवर! गावी येऊन आम्ही त्याच्या बापाची अशी हजेरी घेतली म्हणशील..."
"काही फायदा नाही हो भाऊजी." दयानंद म्हणाला.
"पण त्रास देणारी मंडळी हे का विसरतात, की ते आज वरपक्षाचे असले तरीही उद्या त्यांनाही मुली उजवायच्या आहेत." दामोदर म्हणाले.
"भाऊजी, कसे आहे, ही माणसे वर्तमान पाहतात. भविष्याची चिंता करीत नाहीत, विचारही करीत नाहीत. आज आपला दिवस आहे, हुकमाचा एक्का आपल्या हाती आहे ना तर घ्या हात धुऊन. उद्याचे उद्या बघता येईल." दयानंदांनी स्वतःचा विचार मांडला.
"दयानंद, अशी विचारसरणी समाजासाठी घातक ठरते आहे."
"तुम्हा-आम्हा विचार करणारांसाठी घातक असू शकते परंतु ज्यांच्याकडे सामाजिक विचारच नाहीत अशा माणसांकडून अपेक्षा करणेही चुकीचे आहे..." मेहुण्या-मेहुण्यातील अशी चर्चा रंगलेली असताना आकाश आणि अलका तिथे आले.
"बाबा, परवाचे काय ठरवले आहे?" आकाशने विचारले.
"ठरवायचे काय? आपल्याला कुठे दूर गावी जायचे आहे? जवळच तर आहे..." दयानंदांना हाताने थांबविण्याचा इशारा करत अलका म्हणाली,
"बाबा, आम्ही ते म्हणत नाहीत. आमच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा तोंडावर आला आहे. आम्ही सकाळपासून वाट पाहतोय, की कुणीतरी आम्हाला नवीन कपडे घेण्यासाठी म्हणेल, विचारेल. पण कसचे काय?"
"आपल्या घरात तर सामसूम दिसतेय. कुणाच्याही लेखी आमची काही किंमतच नाही. मामा, आमचे काही चुकले का?" आकाशने विचारले.
"दयानंद, मला वाटते पोरांचा मुद्दा बरोबर, तर्कसंगत आहे."
"हिप... हिप...हुर्यो..." आकाश- अलकाने विजयी नारा दिला.
"भाऊजी, तुम्हीसुद्धा?" दयानंदांनी आश्चर्याने विचारले.
"काय झाले रे? सचिन जिंकला, की भारताने शतक मारले?" बाहेर येत बाईंनी विचारले. तसे सारे गदगदा हसत असल्याचे पाहून बाईंनी दामोदरपंतांकडे पाहिले. तसे त्यांनी विचारले,
"तुला असे विचारायचे आहे का, की सचिनने शतक मारले का? भारत जिंकला का? तू उलटे विचारलेस म्हणून सारे हसताहेत." दामोदरपंतांनी समजावून सांगितले.
"तेच ते हो. समजून घ्यायचे सोडून हसायला काय झाले? विळा भोपळ्यावर पडला काय किंवा भोपळा विळ्यावर पडला काय? एकच की. मग ही कार्टी का गलका करीत आहेत?"
"झाले. आल्या राष्ट्रपती! आता ही काय आपल्या प्रस्तावावर सही करणार?" आकाशने अलकाला विचारले.
"अरे, मंत्रिमंडळाने पाठविलेल्या ठरावावर राष्ट्रपतींना सही करावीच लागते." दामोदर म्हणाले.
"अहो, काय म्हणतात ही पोरटी? तुम्हाला सांगते यांच्या अवास्तव मागण्यांना मुळीच भीक घालू नका." बाईंच्या पाठोपाठ आलेली सरस्वती म्हणाली.
"मुळात आम्ही अवास्तव मागणी केलेलीच नाही. हो ना हो, मामा?" आकाशने विचारले.
"होय. त्यांनी साखरपुड्यानिमित्ताने नवीन कपड्यांची मागणी केली आहे." दामोदर म्हणाले.
"आम्ही काय जुनेच कपडे घालून यायचे का? आमचे सोड, पण लोक तुम्हाला काय म्हणतील? हाही विचार आम्हालाच करावा लागणार ना?" आकाश म्हणाला.
"व्वा! काय विचार करताय? काही कपडबिपडे मिळणार नाहीत."
"सरस्वती, अस काय करतीस? बहिणीच्या साखरपुड्यात नवीन कपडे घालून हिंडायची हौस असते मुलांची. दयानंद, दे त्यांना नवीन कपडे घ्यायला पैसे." बाई ठाम, निर्णायक आवाजात म्हणाली.
"जियो,मेरी आत्तू जियो!" असे म्हणत अलकाने बाईला मिठी मारली. आत्या तिला कवटाळत असताना छाया दिवाणखान्यात आली. तिचा नट्टापट्टा पाहून अलकाने आकाशकडे बघत स्मित केले. तितक्यात सरस्वतीने विचारले,
"छाया, कुठे बाहेर निघाली आहेस का?"
"आई, असे कसे विचारतेस तू? भाऊजी येणार आहेत ना त्यांचे नवीन कपडे घेऊन! आई, तुझ्या माहितीसाठी सांगते, भाऊजींच्या बहिणीलाही त्यांनी साखरपुड्याचा ड्रेस घेतलाय म्हणे... छाया ताईच्या पसंतीचा!" अलका म्हणाली.
"हो क्का! लग्न होणे बाकी आहे तरीही माणसे एवढी परक्याप्रमाणे का वागत असतील हो मामा?"
"काय झाले आकाश?" दामोदरपंतांनी विचारले.
"आता बघा ना, चार दिवसांपूर्वी लग्न ठरलेय त्यामुळे नणंद झालेल्या व्यक्तीसाठी आमची ताई स्वतःच्या पसंतीने ड्रेस घेतीय पण पाठच्या लहान भावंडांसाठी ड्रेस घेणे तर सोडा पण आईबाबांना सांगतही नाही. कलियुग अलके, भारी कलियुग!" आकाशचा तो मस्त अंदाज पाहून सारे हसत असताना बाहेर मोटारसायकल थांबल्याचा आवाज आला. तशी छाया आरक्त चेहऱ्याने आत खोलीत जायला निघालेली पाहून आकाश म्हणाला,
"ताई, थांब. जाऊ नको.मिनिटभरात मलाच पुन्हा बोलवायला यावे लागेल. या वयात आता मला कशाला त्रास देतेस? सोसवत नाही ग?" आकाशच्या बोलण्याचा अंदाज, भावार्थ समजताच सर्वांना हसणे आवरणे मुश्किल झाले. हास्याची कारंजी फुललेली असताना श्रीपाल आत आल्याचे पाहून आकाश- अलका उठून उभे राहिले.
"हा माझा ड्रेस, ही छायाची साडी आणि ह्या आमच्या दोघांच्याही अंगठ्या..." असे बोलत बोलत सोफ्यावर बसताना सारी खरेदी दयानंदांकडे देत श्रीपाल म्हणाला.
"अहो, आधी बसा तर. अग, काही चहा, फराळ बघ." दयानंद म्हणाला.
"नको. काही नको. झालंय माझे." श्रीपाल म्हणाला.
"बाईआत्या, आई, साडी कशी आहे?" छायाने विचारले.
"तुझी पण कमाल आहे ताई, तुमच्या दोघांच्या चॉईसला कुणी नाव ठेऊ शकेल का?" आकाशने विचारले.
"तसे काही नाही बरे. नसेल पसंत तर बदलून आणू." श्रीपाल हलकेच म्हणाला.
"श्रीपालराव, तुम्ही कशाला आकाशकडे लक्ष देता? खरेच खूप छान आहे हो. तुम्हा दोघांचे पसंतीचे सूर जुळलेले पाहून आनंद झाला. समाधान वाटले." दामोदर म्हणाले.
"नाही तरी तुमची पसंती खरेच चांगली आहे हो." बाई छायाकडे बघत म्हणाली आणि श्रीपालसह सारे दिलखुलासपणे हसले.
"मी काय म्हणतो दयानंद, मला वाटते, नियोजित वधूवरास त्यांची चुळबुळ लक्षात घेऊन त्यांचा अधिक अंत न पाहता, त्यांनी परवानगी मागितलेली नसताना आपण उदार अंतःकरणाने त्यांना बाहेर जाण्याची अनुमती द्यावी. काय म्हणतोस आकाश?"
"मामाश्री, तथास्तु!..." आकाश आणि मामांमधील तसे खेळकर द्वंद्व पाहून सारे हसत असताना श्रीपाल-छाया पडत्या फळाची आज्ञा घेत लगेचच बाहेर पडले. तसा आकाशचा आवाज आला,
"ताई, तुम्हाला परवानगी दिलीय त्यामुळे येताना माझ्यासाठी कॅडबरीचे चॉकलेट आण हं..." तसा श्रीपाल म्हणाला,
"आकाश, तू स्वतःचे नुकसान करून घेतलेस. मी तुमच्यासाठी छान आईस्क्रीम पाठवणार होतो."
"भाऊजी, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही आईस्क्रीम पाठवू शकता. चला. आई, मी आता मस्तपैकी स्नान करून बाहेर जातो."
"आकाश, तू अजून स्नान केले नाहीस? दररोज सायंकाळी स्नान करतोस का?"
"हो आत्या. पण का असे विचारतेस? शॉवरखाली बसले ना की मस्तच वाटते." आकाश म्हणाला.
"आकाश, तू सचिनचा चाहता आहेस ना?"
"आत्या, हे काय विचारणे झाले? भक्त, फॅन, रसिक, चाहता वगैरे वगैरे सारे काही आहे. तो माझा आदर्श आहे. आत्या, तुला सांगतो, सचिनने जर गुरुमंत्र द्यायला सुरुवात केली ना तर मी कसलाही विचार न करता त्याचे शिष्यत्व पत्करीन."
"शिष्यत्व? आदर्श? अर्थ तरी कळतो का रे? तुझ्या माहितीसाठी सांगते, सचिनने गुरुमंत्र द्यायला सुरुवात केली आहे..."
"काय सांगतेस आत्या? कधी..."
"अरे, तुझा आदर्श, सर्वस्व असलेला सचिन इतरांना 'पाणी वाचवा' असा गुरुमंत्र देतोय. तेही आधी स्वतःचा शॉवर कायमचा बंद करून इतरांना 'पाणी वाचवा' या मोहिमेत सामील होण्याचा आग्रह आणि आवाहन करतोय.स्वतःला त्याचे शिष्य म्हणविणारे तुझ्यासारखे लोक चक्क शॉवरखाली सकाळ-सायंकाळ बसता? असे का? खरे तर, तुमच्यासारख्या तरुणांनी चौकार, षटकारावर, शतकावर आणि त्याच्या विक्रमांवर नाचताना त्याच्या 'पाणी वाचवा' या मोहिमेत पुढाकार घ्यायला हवा. त्याचा पाणी वाचवा हा संदेश घरोघरी पोहोचवायला हवा. पण तुम्ही आजची तरुणाई आदर्श कशाचा ठेवता तर हेयर स्टाईल, कपडे, त्याच्याकडे असलेल्या गाड्यांचा! " बाई म्हणाली
"अहो वन्स, तुमचे विचार खरोखरच महत्त्वाचे आहेत हो. नवल..."
"अग, त्यात नवल ते का वाटावे? प्रत्येकाला असा एखादा आदर्श असायलाच हवा. मग तो घरातील असो की समाजातील कुणी असेल पण कुणाच्याही विचाराचे अंधानुकरण व्हायला नको. त्या आदर्श व्यक्तीचे विचार समाजापर्यंत नेताना अगोदर ते स्वतः अंगीकृत करायला हवे. 'लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण ' असेही व्हायला नको."
"बाप रे ! आत्या तू प्रोफेसर व्हायला हवे होते ग..."
"अरे, ती प्रोफेसर, हेडमास्तर, राष्ट्रपती सारे काही आहे पण केवळ माझ्यासाठी..."
"व्वा! बाई, व्वा! मानले तुला." पंचगिरी म्हणाले.
"नुसतीच वाहवा करू नकोस तर लग्नाच्या दिवशी सावधान कार्यालयात मोठ्ठा पडदा लावून क्रिकेटचा सामना दाखविण्याची व्यवस्था कर..." बाई बोलत असताना पंचगिरींनी आश्चर्याने विचारले,
"म्हणजे? बाई, तू क्रिकेट पाहतेस?"
"अहो, दयानंदजी, तुमची बहीण नुसतेच क्रिकेट पाहते असे नाही तर क्रिकेट पाहता पाहता स्वयंपाक करते त्यामुळे आम्ही क्रिकेट खातोसुद्धा." दामोदर म्हणाले.
"तुला काय वाटले, मी क्रिकेट निरक्षर आहे?" बाईंनी विचारले.
"तसे नाही गं. यापूर्वी तू आमच्याकडे आल्यावर आम्ही सारे क्रिकेट पाहतो म्हणून तू आमच्यावर डाफरायचीस आणि ..."
"आत्तू, मला एक सांगशील का?" अलकाने विचारले.
"विचार. अलके विचार..." असे म्हणत बाई सरसावून बसल्याचे पाहून सारे हसत असताना अलकाने विचारले,
"आत्या, क्रिकेटमध्ये भल्याभल्या फलंदाजांना सतावणारा, चकवणारा 'दुसरा' चेंडू म्हणजे काय गं?"
"व्वा! काय पण प्रश्न आहे? माझी परीक्षा घेतेस? कॉलेजमध्ये जाणारी असूनही तुझी उजळणी इतकी कच्ची कशी गं?" बाईने उलट विचारले.
"म्हणजे? इथे माझ्या उजळणीचा प्रश्न येतोच कुठे?" अलकाने असमंजसपणे विचारले.
"अग, बालवाडीत शिकणाऱ्या मुलाला तू हा प्रश्न विचारला तर तोही सांगेल की, पहिल्या चेंडूनंतर येणारा पुढला चेंडू म्हणजे दुसरा. साधी गोष्ट आहे." बाई म्हणाली.
"बाप रे बाप! आत्तू, खरेच, की तुला बरीच माहिती आहे गं." अलका हसत म्हणाली.
"बाबा, मी जरा बाहेर जाऊन येतो.काही आणायचे आहे का? फर्दीबाई, आपले काही आणायचे आहे का?" सरस्वतीकडे बघत आकाशने विचारले.
"फर्दीबाई? हा काय प्रकार आहे?" दामोदरपंतांनी विचारले.
"भाऊजी, आमच्यापैकी कुणीही बाहेर जायचे म्हटले की, सरस्वतीची सामानाची यादी... फर्दी तयार असते म्हणून पोरांनी तिचे नाव ..."
"जसे काय सामान मला एकटीलाच लागते. सांगून-सांगूनही एखादी गोष्ट आणायचे विसरतात परंतु घरात नसली, कुणाला काही मिळाले नाही, की मग प्रत्येक जण बेंबीच्या देठापासून ओरडतात."
"सरस्वती, जाऊ दे ना. अरे, आकाश तू एवढ्या लवकर आंघोळलास का?" बाईने विचारले.
"हो. आत्या, तू माझे डोळे उघडलेस. मी आजपासून शॉवर बंद केला आहे. घरीही कुणाला शॉवर लावू देणार नाही. सचिनची शपथ घेऊन सांगतो. नाही तर असे करतो एखादा प्लंबर आणून शॉवरच बंद करून टाकतो."
"वो सचिनके भगत, मै ऐसा नही होने दुंगी। मेरा शॉवर बंद नही करने दुंगी। "अलका वेगळ्याच अंदाजात म्हणाली.
"वा ग, मेरी झाँसी कि रानी, वा! शाब्बास!"
"आत्ते, तू अलकीला प्रोत्साहन देतेस?" आकाशने विचारले.
"अरे, ती ज्या स्वरामध्ये बोलली ना त्या तिच्या धाडसाचे मी कौतुक केले. सर्वांनी पाण्याची काटकसर केलीच पाहिजे. अलका, तुलाही या गोष्टीची सुरुवात करावीच लागेल शिवाय तुझ्या मैत्रिणींना पटवून द्यावे लागेल." बाई निग्रहाने म्हणाल्या.
"आत्या, अलकी आणि हिच्या एकूण एक मैत्रिणी सचिनवर मरतात..."
"आक्श्या, बघ हं..."
"खोटे बोलतोय का? भारताने विश्वचषक जिंकला, बावीस वर्षानंतर सचिनचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे आणि सचिनला आवडतात म्हणून अलकाने मैत्रिणींना वडापावची पार्टी दिली होती तेही बाबाला न सांगता आईकडून पैसे घेऊन..." असे म्हणत आकाश पळतच बाहेर गेला...
तशी खमंग, खारटगोड चर्चा सुरू असताना दयानंद रजिस्टरमध्ये पत्रिकांच्या निमत्रितांची यादी करीत होते.
"अग, त्या.. आपल्या म्हणजे तुझ्या भावाच्या बायकोच्या बहिणीच्या लग्न झालेल्या पोरीचे नाव काय आहे गं?"
"दयानंद, एवढ्या लांबून कशाला विचारतोस? सरळ विचार ना, तुझ्या भावजयीच्या भाचीचे नाव काय आहे म्हणून?" दामोदरपंत म्हणाले.
"भाऊजी, मला ना हा नात्यांचा गुंताच समजतही नाही आणि सोडवताही येत नाही. फार तारांबळ उडते हो आणि मग कुणी तरी विसरून राहते." दयानंदांनी स्पष्ट केले.
"हे बघा. कुणीही विसरायला नको. नाही तर मग सगळीकडे बोंबाबोंब! आपल्या घरी पहिलेच लग्न आहे पण म्हणून आपल्याला कुणी समजून घेणार नाही, की विसरले असतील म्हणून! एवढे मोठे कार्य करताना एखादी साधी गोष्ट विसरली तर त्याचा तेवढा बाऊ का करावा? जो तो बाह्या सावरूनच असतो..."
"आई, तू तरी का कमी आहेस का?" अलकाने विचारले.
"आता मी काय केले?" सरस्वतीने विचारले.
"मागच्या वर्षी मावशीकडे सत्यनारायणाची पूजा झाली. पण आपल्याला बोलवायला विसरले तेव्हा तू काय मावशीला फोनवर का कमी शिव्या दिल्या होत्या?"
"मग? सोडते की काय तिला? एवढे साधे लक्षात राहत नाही? ती मला विसरते म्हणजे काय?"
"अग, तिने सत्यनारायणाच्या पूजेला आपल्याला बोलावले नाही, आपणही तिला छायाच्या लग्नाला बोलावू नये. फिट्टमफाट!..." दयानंदाचे बोल ऐकत असताना सरस्वती भडकून म्हणाली,
"डोंबल्याची आलीय फिट्टमफाट! तुम्हाला तर अशीच संधी पाहिजे असते. कितीही झाले तरी लहान बहीण आहे माझी."
"अग, गमतीने म्हणाला तो." बाईंनी भावाची म्हणजे दयानंदाची बाजू घेतली.
"ही अशी गंमत असते होय. हा विषय जरी तिला कळला ना तर कित्ती वाईट वाटेल तिला." डबडबल्या डोळ्यांनी सरस्वती म्हणाली. तो विषय तिथेच संपला...