७) निघाले सासुरा!
चहा झालेला असताना बाई म्हणाली, "सरस्वती, आपण दुपारी आमंत्रण म्हणजे पत्रिका कुणाकुणाला द्यायच्या ती यादी करूया. वाटते गं, महिना आहे पण दिवस असे चुटकीसरशी निघून जातात..." सरस्वती त्यावर काही बोलणार तितक्यात दयानंद आणि दामोदरपंतांचे आगमन झाले.
"झाले बुवा झाले. एक मोठ्ठे काम झाले. सावधान बुक झाले. कुलकर्ण्यांचे समाधान झाले. आता पुढल्या तयारीला लागले पाहिजे." दामोदर बोलत असताना फोन खणाणला.
"हॅलो, मी कुलकर्णी बोलतोय."
"मी तुम्हाला फोन करणार होतो. सावधान बुक झाले बरं का."
"वा! वा! छान! परवाच्या दिवशी चांगला मुहूर्त आहे. तेव्हा म्हटलं साखरपुडा करुन घेऊया."
"परवा? एवढ्या लवकर?" दयानंदांनी विचारले.
"मग काय झाले? अहो, आत्ताच श्रीपालचा फोन आला होता, त्या दोघांनी त्यांचे कपडे, अंगठ्या, शालींची खरेदीही केली. महत्त्वाची खरेदी झाली. आता छाटछूट कामे होत राहतील."
"कुलकर्णीसाहेब, खरेच दाद द्यावी लागेल तुम्हाला."
"का हो, काय झाले?"
"अहो, साखरपुड्याच्या व्यवस्थेला तुम्ही छाटछूट म्हणता?"
"दयानंदजी, आजकाल काय अवघड आहे? एका फोनवर सारी व्यवस्था होते. अहो, परवाचे उदाहरण सांगतो, आमच्या साडुच्या पुतणीला पाहावयास म्हणून मुलाकडचे लोक आले होते. मुलीने दिलेले पोहे खाता-खाता त्यांनी पसंती दिली. चहाचा घुटके घेत-घेत बोलाचाली झाली."
"काय सांगता? खरे की काय?"
"अहो, खरेच सांगतोय. पुढची कथा तर ऐका. बोलाचाली झाल्याबरोबर सायंकाळपर्यंत सोने, कपडा आणि इतर सारी खरेदी आटोपली. खरेदीला जाता-येताना, खरेदी करताना दोघांनीही आपापल्या पाहुण्या- राहुण्यांना, ईष्टमित्रांना, स्वकियांना फोन करून दुसरे दिवशी सकाळपर्यंत पोहोचण्याचे आमंत्रण दिले. अहो, स्वप्नवत स्थिती अशी, की पोरगी पाहायला म्हणून आलेले पाहुणे दुसऱ्या दिवशी सकाळी यथासांग, रीतीप्रमाणे लग्न लावून, सून घेऊनच परतले. आता बोला."
"काय बोलावे? 'चट मंगनी पट ब्याह!' ही खात्री पटली. आहे म्हणा, कर्मधर्म संयोगाने सारे एका फोनवर घरपोच मिळते. ठीक आहे. परवा किती वाजता यावे?" पंचगिरींनी विचारले.
"सकाळी दहा वाजेपर्यंत या. कार्यक्रम घरीच ठेवला आहे. एक विचारु का? नाही, गैरसोय होऊ नये म्हणून एक सांगा, आपली किती माणसे येतील?"
"आपली अपेक्षा किती माणसांची आहे?" दयानंदांनी उलट विचारले.
"तसे नाही. प्रश्न संख्येचा नाही तर व्यवस्थेचा आहे. तारांबळ होऊ नाही म्हणून मनमोकळेपणाने विचारले."
"दहा-बारा माणसे होतील आमची." दयानंद हलकेच म्हणाले.
"ठीक आहे. पंधरा माणसे तुमची गृहीत धरतो. या. परवाच्या दिवशी भेटूया." कुलकर्णी म्हणाले.
पंचगिरी फोन ठेवत दामोदरपंतांना म्हणाले, "भाऊजी, कुलकर्ण्यांकडे तर जोरात तयारी चालू आहे."
"एकुलत्या एक मुलाचे लग्न आहे. महत्त्वाचे म्हणजे मंडळी हौशी आहे."
"त्यांच्या हौसेखातर आपल्या नाकीनऊ येऊ नयेत म्हणजे मिळवलं."
"तसे काहीही होणार नाही. सारे व्यवस्थित होईल. मला एक निःसंकोचपणे सांग, पैश्याची काही अडचण तर नाही ना?" दामोदरपंतांनी विचारले.
"नाही. सारे व्यवस्थित आहे. शिवाय तशी अडचण असती तर सर्वात आधी तुम्हालाच सांगतिले असते. छायाचे लग्न थोडे लांबल्याने अंदाजपत्रक कोलमडतेय पण सेन्सेक लवकर सावरण्याची चिन्हं आहेत. मुख्य आणि महत्त्वाचे म्हणजे तसे पाहिले तर श्रीपालचे ठिकाण स्वस्तातच मिळालेय म्हणून तोंडमिळवणी होत आहे."
"गुड! तर मग लागा तयारीला. आता जेवणे झाली, की संभाव्य माणसांची यादी, आहेराची यादी, त्यातही कुणाला पूर्ण आहेर, कुणाकडे साडी आणि टॉवेल टोपी आणि कुणाला भेटवस्तू अशी एक यादी तयार करूया. किराणासामानाची यादीही तयार करूया." दामोदर म्हणाले.
"भाऊजी, एक विचार माझ्या डोक्यात घोळतोय तो असा, की आपण आहेर घेतला आणि दिलाच नाही तर म्हणजे आहेरबंदी केली तर? कसे आहे, उगीच दीडशे-दोनशे साड्या, टॉवेल-टोपी आणि पंचवीस-तीस जणांची शर्ट-पँटची खरेदी करावी लागेल. हे झाले आपण करणार असलेल्या आहेराचे. समोरून आम्हालाही तेवढेच आहेर येणार. ह्या आहेराच्या साड्यापैकी दोन-चार साड्या सोडल्या तर इतर साड्या वापरताही येत नाहीत आणि ठेवताही येत नाहीत."
"दयानंद, अगदी बरोबर आहे. पण आहेरबंदी हा प्रकार म्हणावा तसा अजून पचनी पडला नाही किंवा रुढ झाला नाही. लोकांची मानसिकता बदलायला वेळ लागेल. आज जे कुणी 'लग्न चालू, आहेर बंद!' हा विचार करीत आहेत ते एक प्रकारचे धाडसच आहे. महत्त्वाचे म्हणजे या तुझ्या विचाराशी सरस्वती सहमत आहे का?"
"अजून तिच्याशी बोललोच नाही. प्रथम तुमच्याशीच बोलतोय."
"ठीक आहे. जेवण झाल्यानंतर बोलू. तोपर्यंत छायाही येईल." तितक्यात तिथे आलेली अलका म्हणाली,
"बाबा, मामा, जेवायला चला."
सारे एकदाच जेवायला बसले. त्यांची जेवणे सुरू असताना छाया बाहेरून आल्याचे पाहून आकाश म्हणाला, "ताई आली. ताई, ये ना. जेवायला बस."
"आकाश, आता तिला आपल्यासोबतचे जेवण गोड लागेल का?" अलकाने डोळे मिचकावत विचारले.
"अरे, हो. विसरलोच की. आपली ताई आत्ताच तिच्या दृष्टीने जगातील सर्वात लाडक्या, अतिप्रिय व्यक्तीबरोबर जेवून आली असणार. का गं ताई, जेवलात ना दोघेही? का बसलात एकमेकांना पाहत? आँखोही आँखों मे इशारा हो गया और खाना वैसे ही रह गया।..."
"आक्श्या..."
"छाया, गमतीचे सोड. जेवण झालंय ना?" सरस्वतीने विचारले.
"हो आई, जेवले."
"काय खाल्लेस गं?" बाईने विचारले आणि आकाश पटकन म्हणाला,
"दिल आणि डोकं! आत्या, ताईने की नाही, श्रीपालचे डोके नक्कीच खाल्ले असणार..."
"आ..का..श..." छाया पुन्हा ओरडली.
"चिडलीरे चिडली! ए ताई, भाऊजींसोबत वादविवाद तर झाला नाही ना?"
"आकाश, थांब बरे. अरे, ती आत्ताच थकूनभागून घरी ..."
"आ..ई, अतिप्रिय माणसाच्या सहवासात थकवा येत नाही तर आलेला थकवा रफूचक्कर होतो."
"अच्छा! बराच अनुभव दिसतोय, की तुला अतिप्रिय माणसांचा, त्यांच्या सहवासातून पळून जाणाऱ्या थकव्याचा." छाया हसत म्हणाली.
"म..म..मी..." आकाश रेंगाळला.
"पकडला. ताईने चोर पकडला." अलकाही छायाला मिळाली.
"चोर? कोण? मी काय केले?" आकाशने विचारले.
"ते आम्हाला कसे माहिती असणार? थकवा पळवणारी ती कोण आहे हे तू सांगितल्याशिवाय कोणाला कसे कळणार बरे?" छायाने आकाशला चिडविण्याच्या मिळालेल्या संधीचा फायदा घेतला.
"ताई, भलतासलता आरोप करू नको हं..." आकाश हलकेच म्हणाला.
"आरोप आणि मी? मग तू असा का गडबडतोस?" छायाने विचारले.
"आकाश, तिने टाकलेल्या गुगलीवर तू साफ त्रिफळाचित झालास हं." दामोदर म्हणाले.
"अरे, छायाने दगड मारून बघितला आणि तू गडबडलास बघ." बाई म्हणाली.
"आत्या, पण माझ्या दगडाने अपेक्षित यश साधले ना? आक्या, कोण आहे रे ती?" छाया आकाशच्या पाठी लागली.
"बाबा, टाका ना, ताईच्या लग्नातच आकाशच्या लग्नाचा बार उडवून. नाही तरी, ताईच्या लग्नानंतर मी एकटीच पडेन. करमणार नाही." अलका हसत म्हणाली.
"करमणार नाही का? बाबा, काल तुम्ही तो कुणीतरी मुलगा आहे असे म्हणत होता ना... आपल्या अलकासाठीच म्हणत होतात ना?" आकाशने तसे विचारताच अलका रडवेली होत विचारले,
"आई, बाबा हे काय हो..." असे म्हणत ती जेवण अर्धवट टाकून उठली.
"बघ. उठवलेस ना तिला भरल्या ताटावरून?" सरस्वतीने रागाने विचारले.
"उठू दे ग. एकत्र कुटुंबात आणि दोन-तीन अपत्ये असणाऱ्या घरात अशा गमतीजमती होतच असतात नाही तर आजकालच्या 'हम दो हमारे दो या एक...' या धावपळीच्या जमान्यात असे प्रसंग कुठे पाहायला मिळतात. तू जेव. येईल थोड्या वेळाने ती. नाही तरी तिचे जेवण झालेच होते." बाई म्हणाली. काही क्षणातच हसतखेळत जेवणे झाली तरीही सरस्वतीचे लक्ष जेवणात नव्हते. अलका गेली त्या खोलीकडे ती अधूनमधून बघत होती. जेवणानंतर सारे दिवाणखान्यात येऊन बसताच अलकाही तिथे आली. गप्पांचा फड रंगात आलेला असताना छायाचा भ्रमणध्वनी वाजला त्यावर श्रीपालचे नाव दिसताच ती इकडेतिकडे बघू लागली.
"भाऊजींचाच आहे ना? मग जा. जा. आतमध्ये जाऊन निवांत बोल. आम्ही कुणीही तिकडे येणार नाही. अलके, जायचे नाही हं..." आकाश तिला चिडवत असताना त्याला वेडावत छाया लगबगीने आत गेल्याचे पाहून दिवाणखान्यातील सारेच हास्यसागरात बुडाले. तितक्यात दामोदर म्हणाले,
"आकाश, एक कोरे रजिस्टर घेऊन ये. लग्नाच्या साऱ्या नोंदी एकाच ठिकाणी असाव्यात."
"ठीक आहे, मामा." आकाश म्हणाला.
"अग, त्या स्वयंपाकीनबाईंचा फोन नंबर आहे ना? तिलाही बोलावून घे. उद्यापासूनच तिला कामाला यायला सांग. तिच्यापासून सामानाची यादी घेतली म्हणजे आपल्याला सामान आणता येईल." दयानंद म्हणाले.
"अहो, तारीख ठरलीच आहे तर मग आपल्या अनिलला बोलावून पत्रिकेचेही सांगा." सरस्वतीने सुचविले.
"अग, आधी यादी करा म्हणजे पत्रिका किती छापाव्या लागतील याचा अंदाज येईल. बरे, आहेराचे कसे?" दामोदरपंतांनी विचारले.
"कसे म्हणजे? प्रत्येकाला आहेर करायचा आहे. ती आहेराची यादी उद्या करूया." सरस्वती ठामपणे म्हणाली.
"यादी करता येईल ग. पण मला काय म्हणायचे, आहेर दिले-घेतले नाही तर? म्हणजे मी तसा विचार करतोय." दयानंद म्हणाले.
"व्वा! बाबा, व्वा! ग्रेट आयडिया हं." आकाश म्हणाला.
"तसं कसं म्हणता हो? आपल्या घरचे पहिलेच कार्य आणि आहेरबंदी म्हणजे कसं ओकं ओकं वाटेल हो." सरस्वती म्हणाली तसा आकाश पटकन म्हणाला,
"आई, ओकं ओकं नाही तर ओके ओके वाटेल ग." कुणी काही बोलण्यापूर्वीच दामोदर म्हणाले,
"दयानंदा, तुझे बरोबर आहे. पण तू कितीही नाही म्हणालास तरी लोक ऐकणार नाहीत."
"महत्त्वाचे म्हणजे आपण सगळीकडे हट्टाने आहेर केले आहेत. त्यामुळे आहेर न घेण्यासाठी आपले कुणी ऐकेल असे वाटत नाही."
"फिजुल खर्च आहे ग. मला सांग, तुला कमीतकमी दीडशे साड्या येतील त्यापैकी आठ-दहा साड्या सोडल्या तर बाकीच्या कपाटात पडून राहणार. तिथे तरी कुठे जागा आहे? आपण जिथे जिथे आहेर केले त्यांनी त्या त्या वेळी परतीचा आहेर केलाच आहे ना? तुला आलेल्या किती साड्या तू नेसल्या आहेस?" दयानंदांनी विचारले.
"तरीही मला हा विचार पटत नाही हो." सरस्वती म्हणाली.
"आई, बाबांचे अगदी बरोबर आहे ग. " आकाश म्हणाला.
"अरे, सरस्वतीचे तरी कुठे चूक आहे? परवा आमच्या तिकडे एका गृहस्थाने 'आहेर स्वीकारले जाणार नाहीत!' अशी पत्रिकेत टीप टाकली. लग्न लागले आणि लोकांनी त्या नवरा-बायकोला घेरले. आहेर घ्या असा ते हट्ट धरून बसले. ते जोडपे बिचारे हात जोडून, गयावया करीत आहेर नको असे विनवत होते पण कुणी ऐकतच नव्हते. बळेबळे त्यांना कुंकू लावून आहेर त्यांच्या हातात तर नगदी आहेराचे खिशात कोंबत होते. त्या जोडप्याची स्थिती अत्यंत अवघडल्यासारखी झाली होती. काही पाहुणे असेही होते, की त्यांनी पत्रिकेतील ती सूचना तंतोतंत पाळली होती आणि सोबत कोणत्याही प्रकारचे आहेर आणले नव्हते. घडत असलेल्या प्रकारामुळे त्यांचे चेहरे उतरले होते. आपण आहेर आणला नाही ही अपराधीपणाची भावना त्यांना बोचत होती. एका बाजूला उभे राहून घडत असलेला प्रकार बघत असताना काही बायकांनी आपापल्या नवऱ्यांना घरात कपाटात ठेवलेला किंवा बाजारातून आहेर आणण्यासाठी पिटाळले. आली का नाही परेशानी?" बाईंनी विचारले.
"अहो, यांच्या मित्राच्या मुलीचे लग्न होते. त्यांनीही 'आहेर नको' अशी ठाम भूमिका घेतली होती पण कुणी ऐकायलाच तयार नव्हते. मग त्या पठ्ठ्याने काय केले तर 'आत्ता आलो' असे म्हणत बायकोला खुणावले आणि दोघे चक्क नवरदेवाच्या खोलीत जाऊन बसले... लपूनच समजा की. इकडे लोकांनी शोध शोध शोधले परंतु दोघेही दिसत नाहीत म्हटल्यावर निघून गेले." सरस्वती म्हणाली.
"माझ्या एका मित्राच्या घरी तर चक्क भांडणेच झाली." आकाश म्हणाला.
"ती कशामुळे?"
"आहेर न स्वीकारण्याच्या भूमिकेमुळे! त्यांनी पत्रिकेत तशी सूचना छापली होती. लोकांनी आणलेले आहेर स्वीकारले नाहीत पण स्वतः मात्र जमलेल्या लोकांना आहेर द्यायला सुरुवात केली. ते पाहून त्यांचा एक पाहुणा चांगलाच खवळला, संतापला. तो म्हणाला, तुम्ही आमचे आहेर घ्यायला नकार देत आहात तर आम्ही तुमचे आहेर कसे काय स्वीकारणार?"
"अगदी बरोबर आहे. मग पुढे काय झाले?" बाईंनी विचारले.
"मित्राचे आईवडील म्हणाले, आमच्या घरी पहिलेच लग्न आहे. आमचा आहेर घ्यावाच लागेल. मग तो रागावलेला पाहुणा म्हणाला, की अहो, आहेर ही रीत आहे, तशी आपली परंपरा आणि संस्कृती आहे. तुम्हाला ती मोडीत काढायची असेल तर आमचा नकार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणूनच या क्षणापर्यंत आम्ही तुमच्या या निर्णयाचे कौतुकच करीत होतो पण ती परंपरा पूर्णपणे निकालात काढा ना. असा अर्धवट, एकतर्फी, तुमच्या बाजूने ठरवू नका ना.आम्ही आहेर करू शकत नाही, आमची तशी आर्थिक परिस्थिती नाही असे तुम्हाला वाटले काय? आहेर घ्यावा नि द्यावा ही परंपरा जपा. आम्ही तुमचा आहेर घेणार नाही म्हणजे घेणारच नाही. चल ग..." असे म्हणत ते गृहस्थ न जेवताच निघून गेले.
"ऐकलत? असे प्रकार होतात. मंगलसमयी सारे मंगलच घडावे. ते काही नाही. आहेर द्यायचे आणि घ्यायचेसुद्धा. येणारे आहेर किंवा आपण करू ते आहेर कसेही असोत त्यामागे एक आदर असतो, सन्मानाची भावना असते. भलेही कपाटात पडून राहतील पण भावना जपणे महत्त्वाचे आहे. आहेरबंदी हा एक प्रकारचा अपमान आहे. आहेराशिवाय लग्नाला पूर्णत्व लाभत नाही. ज्याला जसा परवडेल तसा आहेर होईल. कुणाला आवडो न आवडो. माझ्या घरी पहिलेच लग्न आहे. मांडवात येणारी प्रत्येक सवाष्ण स्त्री कुंकू लावून आणि मला परवडेल तशा या ना त्या स्वरुपात आहेर घेऊनच जाईल." सरस्वती निग्रहाने म्हणाली.
"बाबा, परवाच माझ्या मैत्रिणीच्या नातेवाइकाकडे लग्न झाले. त्यांनीही पत्रिकेत आहेर नको असे छापले होते. तरीही लग्न लागल्याबरोबर त्यांचे नातलग, मित्र आहेर घेण्यासाठी गळ घाळू लागले."
"बघा. शेवटी त्यांना घ्यावेच लागले असतील?"
"आई, नाही ग. ते स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहिले. सर्वांनी त्यांना अक्षरशः घेराव घातला. कुणी बळजबरीने हातात देऊ लागले. त्यावेळी ते म्हणाले, की तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, की आम्हाला धर्मसंकटात टाकू नका. कारण आम्ही आमच्या गुरूंच्या प्रतिमेसमोर शपथ घेतलीय. तेव्हा आम्हाला माफ करा. तुमची उपस्थिती आणि आशीर्वाद हाच आमच्यासाठी अनमोल आहेर..."
"व्वा! मग ?" दामोदरपंतांनी विचारले.
"मामा, सर्वांचा नाइलाज झाला. त्यांनी अगदी जवळच्या म्हणजे बहीण, आत्या, मामा अशा नातेवाईकांकडूनही आहेर घेतले नाहीत आणि कुणालाही केले नाहीत." अलका म्हणाली.
" पण असा आग्रह, निर्धार किती जण करु शकतात आणि किती लोक त्यांना त्यांच्या निर्णयावर ठाम राहू देतात?" सरस्वतीने विचारले.
"सरस्वती, तुम्ही आहेर घ्या किंवा नाही याबाबतीत आम्ही तुम्हाला कोणताही आग्रह करणार नाही परंतु एक गोष्ट निश्चित सांगेन, की आहेर नको ही बाब आता स्वीकारलीच पाहिजे. कसं असतं अनेक लोक असे असतात, की खरेच त्यांची आर्थिक स्थिती तशी नसते. ही मंडळी मग कर्जबाजारी होऊन वेळ साजरी करतात, प्रसंग निभावून नेतात. आपण थोडा वेगळा विचार करूया. मला सांगा तुम्हाला किती नऊवारी आणि किती सहावार साड्या घ्याव्या लागतील?" दामोदरपंतांनी विचारले.
"सव्वाशे तरी नक्कीच लागतील." सरस्वतीने सांगितले.
"साधारण किंवा मध्यम किंमतीच्या म्हटल्या तरी जवळपास अठरा ते वीस हजार रुपयांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. सरस्वती, तुम्ही हा खर्च करू शकाल. दैवयोगाने तुमची परिस्थिती चांगली आहे. पण एखाद्या कुटुंबाची तशी ऐपतच नसेल तर? त्याला जिवाचा आटापिटा करून, कर्ज काढून किंवा काही तरी विकून म्हणा, गहाण टाकून का होईना आहेराचे सोपस्कार पार पाडावेच लागतील. दुसरे एक, या शे-सव्वाशे बायकांपैकी किती बायका तुम्ही आहेरात दिलेल्या साड्या नेसतील? तुम्ही कितीही भारीची साडी घ्या... दुसऱ्या स्त्रीचे कशाला तुझ्या या बाईवन्सचेच उदाहरण घे. तू आणलेली साडी हिला पसंत पडेल याची खात्री तू देऊ शकशील? शिवाय तुला ज्या साड्या येतील त्यापैकी तुला किती साड्या आवडतील? हौशीने नेसता येतील अशा किती साड्या निवडशील? आहेरात आलेल्या साड्या जर कपाटाची शोभा वाढविणार असतील तर? थोडा विचार कर, आपला म्हणजे आहेर करणाऱ्या सर्वांचाच पैसा व्यर्थच जातो ना? कुणी असेही म्हणू शकते, की आहेरात आलेल्या साड्या इतरांकडे आहेर करण्यासाठी उपयोगात येतात. पण त्यातही रिस्क आहेच की. अशीच आहेरात आलेली एक साडी परवा हिने दुसऱ्या घरी आहेर म्हणून दिली आणि भानगडच झाली..." दामोदरपंतांना अडवत सरस्वतीने विचारले.
"ती कशी?"
"हिने दिलेली साडी त्या बाईने दुसऱ्या एका बाईला आहेरात दिलेली. त्या दुसऱ्या बाईने तीच साडी हिला आहेर म्हणून दिली. हिने तीच साडी मूळ मालकीनबाईला आहेरात दिली. त्या बाईने आपणच दिलेली साडी आपल्याकडे परत आल्याचे ओळखले. योगायोगाने त्या मांडवात ती क्रमांक दोनची महिला उपस्थित होती. त्या पहिल्या बाईने त्या दुसऱ्या बाईची भर मांडवात अशी खरडपट्टी काढली म्हणता अगदी एकमेकींचे केस धरण्यापर्यंत मजल गेली..."
"भाऊजी, एक मात्र नक्की आहे हं, ह्या बायकांना आहेरात दिलेल्या-घेतलेल्या साड्या अगदी रंग, पदर, डिझाईन यासह लक्षात राहतात." पंचगिरी म्हणाले.
"ते तुमचं सगळं मला पटतंय पण पूर्वापार चालत आलेल्या परंपरांमागे काही शास्त्र आहे, प्रत्येक गोष्टीला काही अर्थ आहे..."
"सरस्वती, या गोष्टी आज कोण पाळतंय? आज इंटरनेटच्या माध्यमातून लग्न होत आहेत. जिथे वधूवराच्या शरीरावर पवित्र, मंगल अक्षता तरी पडतात का? मोठमोठ्या शहरातील लग्नाचा वृत्तांत तू कधी ऐकला आहेस का? या शहरातील लग्न केवळ तासा-दोन तासात आटोपतात. अक्षता टाकून जेवणाची पाकिटे घेऊन सारे बाहेर पडतात."
"भाऊजी, आपण का अशा मोठ्या शहरात राहणारी आहोत? त्यांच्या परंपरा त्यांना लखलाभ. ते काहीही करतात म्हणून आपण त्यांचे अंधानुकरण करताना आपल्या परंपरांना का तिलांजली द्यावी?"
"अहो, तुम्ही स्वतःच्याच पायावर का धोंडा पाडून घेत आहात?" बाईंनी दामोदरपंतांना विचारले.
"म्हणजे?"
"आहेर बंद म्हटल्यावर का तुम्हाला ज्येष्ठ जावयाचा आहेर मिळणार आहे? किती वर्षांपासून तोंड धुऊन बसलात आणि आता..." बाईचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच दामोदरपंत गडबडीने म्हणाले,
"बाप रे! हे तर माझ्या लक्षातच नव्हते. बरे झाले, तू आठवण करून दिली ते. अहो, दयानंद महाराज, एक दया करा,आहेरबंदी करू नका हो... " त्यांचा बोलण्याचा अंदाज पाहून सारे जोरजोराने हसू लागले.
"आई, श्रीपालकडेही आहेर घेणार नाहीत आणि कुणाला करणारही नाहीत." छाया म्हणाली.
"असेल बाई! त्यांचे त्यांच्यापाशी. त्यांना ते जमत असेल पण मला जमायचे नाही..."
"सरस्वती, शांत हो. जरा दमाने घे. " बाई म्हणाल्या.
"वन्स, तसे नाही पण रीतीरिवाज, पूर्वजांनी ज्या विधी, नियम लावलेत त्यामागे काही कारण असते हो. उगीच काही तरी खुळ काढायचे म्हणजे? परंपरा नाकारून आगळेवेगळे करताना काही वेगळे घडले, की मग 'हे असे केले म्हणून किंवा तसे केले नाही म्हणून हा प्रसंग ओढवला' असे वाटायला नको..." सरस्वती बोलत असताना दामोदर म्हणाले,
"दयानंदराव, आहेर घ्या आणि आहेर करा. आता जमणार नाही. अहो, तुमच्या गृहमंत्र्याचीच तशी इच्छा आहे म्हटल्यावर कुणाचे काय चालणार?"
"म्हणजे मामा, तुम्ही तुमच्या गृहमंत्र्याची म्हणजे आत्याची आज्ञा..."
"अगदी शिरसावंद्य मानतो. आकाश, तुला नाही ते समजणार. अजून अवकाश आहे." दामोदरपंत सांगत असताना सारे हसू लागले. तितक्यात आकाश म्हणाला,
"मामा, परवा वर्तमानपत्रात आहेरासंबंधीच्या एका गमतीदार प्रसंगाचे वर्णन आले आहे."
"गमतीदार प्रसंग? आहेराच्या संदर्भात?" दामोदरपंतांनी विचारले.
"मामा, एका माणसाकडे दोन मुलींचे लग्न होते. त्याच्या मोठ्या मुलीच्या लग्नानंतर पंधरा दिवसांनी लहान मुलीचे लग्न होते. परिस्थिती सर्वसाधारण होती. त्यामुळे दोन्ही मुलींचे लग्न एकाच मांडवात करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. डबल होणाऱ्या खर्चाला आळा बसावा म्हणून त्याने पहिल्या मुलीच्या लग्नात आहेर बंदी जाहीर केली..."
"आणि मग दुसऱ्या मुलीच्या लग्नात?" सरस्वतीने घाईघाईने मध्येच विचारले.
"ऐक तर! पहिल्या वेळी आहेर करायचा नाही या सवलतीचा लाभ घेत पाहुणे-राहुणे, चुलत-चुलत, मावस-मावस, ईष्टमित्रांसह सारे जण झाडून पुसून आले. तशा अनपेक्षित गर्दीमुळे वधुकडील सारी गणितं कोलमडली. तीन वेळा स्वयंपाक करूनही वधूवरासाठी हॉटेलमधून दोन ताटे आणावी लागली..."
"म्हणजे हौसे-गवसे-नवसे साऱ्यांनीच गर्दी केली तर..."
"अगदी तसेच झाले." आकाश म्हणाला.
"आता सांगा. आहेरबंदीमुळे आपली अशीच फजिती झाली तर?" सरस्वतीने विचारले.
"आई, ऐक तर दुसऱ्या मुलीच्या लग्नात काय झाले ते. त्यांनी दुसऱ्या लग्नात आहेर स्वीकारले जातील अशीच टीप टाकली..."
"काय सांगतोस आकाश? अशी टीप टाकली?" बाईने विचारले.
"खरे सांगतोय आत्या. वाटल्यास तुला पेपर दाखवतो. तशी टीप टाकल्यामुळे अगदी सख्खे, अत्यंत जवळचे असेच पाहुणे आले. पहिल्या मुलीच्या लग्नात आलेल्या लोकांपैकी आहेर करावा लागणार या भीतीने पंच्याहत्तर टक्के लोकांनी जणू दुसऱ्या लग्नावर बहिष्कार टाकला."
"अरे, व्वा! चांगलाच विनोद झाला की. " दयानंद म्हणाले तसा आकाश पुढे म्हणाला,
"आई-बाबा, आपण एक करूया का, आई, ऐकून तर घे. आहेर न करता त्याचा मोबदला म्हणून काही हजार रुपये देणगी म्हणून एखाद्या वृद्धाश्रमात किंवा अनाथालयात अशा ठिकाणी देऊया."
"आकाश, तुझा विचार चांगलाच आहे किंवा असेही करता येईल, की शहरातील देवळांसमोर जी दीन, गरीब, दिव्यांग मंडळी बसलेली असते अशानांही कपडे, पांघरणं किंवा नगदी रक्कम देऊन त्यांना मदतही करता येईल. काय म्हणतेस सरस्वती?" दामोदरपंतांच्या प्रश्नावर सरस्वतीने नकारार्थी मान हलवली आणि ती उठून आत गेली...
**