सणवाराला सकाळपासून चालेली जेवणाची लगबग पोटात कावळे जमा करतं…मिनिटामिनटाला आवंढे गिळणं चालू होतं…पण अजूनही तुम्ही भूकेच्या तटावर उभे राहत निमूटपणे सहनशक्तीशीं निकराची लढाई करत असता….कधी एकदा नैवदयाचं ताट देवापुढं ठेवलं जातयं, आणि तुम्ही जेवताय असं होऊन जातं…जीभेचं तातकळणं सुरु व्हायला लागतं…पण अजून अवकाश असतो… जेवणाच्या तयारीची लगबग सुरु होते एकदाची… तुम्ही स्वयंपाकघराच्या बाहेर उभे राहत नुसताच कानोसा घेत असता…. जसाजसा एकएक जिन्नस एकमेकांत घुसळत जातो, आगीचा धग अजून एकात एक मसाल्यांच्या चाललेल्या सरमिसळीला आपला-आपला रंग चढवत चाललेला असतो…आपल लक्ष कुठं दुसरीकडे लागतचं नसतं…. अजूनही कितीतरी वेळ आपलं आंवढ गिळणं चालू असतं… एकाएक वाफेला वाट मोकळी होते… आगीचे धग कमी होतात… अख्ख्या घरभर घमघमाट पसरतो…. अवकाशीचा एक एक क्षण आता ओसरायला लागतो… तुम्ही पहिल्याच पंगतीत बसण्याचा इरादा राखत जागेचा अंदाज घेत भिंतीलगतचा कोपरा पकडता……शेवटी एकदाची केळ्याची मोठामोठाली पान जेवण्यासाठी म्हणून माडलीं जातात… तुम्ही आपल कसंबसं माडी घालत जमिनीवर थपकान मारता… जेवणाची पातेली एक-एक करत बाहेर जेवणावळीत यायला सुरवात होते. केळ्याच्या पानात एका मागोमाग एक जिन्नस आखीव-रेखीव मांडायला सुरवात होते….नैवदयाचं ताट मग देवापुढचा प्रवास आटपून शेवटी तुमच्याच पुढे येऊन थबकत… तुम्ही तुमच्या संयमाच्या सीमाचा कस लागण्याअगोदर गलितगात्र झालेल्या जीभेवरच्या आंकाक्षाच हेलकावणं थांबवता…. ती प्रत्येक दरवळ आता नाकापर्यतचा आभास न बनता अनुभव होण्यास सज्ज असते…. तुम्ही केळीच्या पानाभोवती पाणी शिपंडता… आजूबाजूचे चेहरे, ही एव्हाना तुमच्याकडे घुटमळत न राहता आपल्याआपल्या पानाभोवती पाहू लागतात… उपासाची धरणं तुटून पडतात… अहाहा जीभेचे चोचले पुरवणं चालू असतं…. वरण, भाज्या यांच्या वाटया खाली होणं, त्या भरणं…. पुन्हा संपण…. चालू असतं….उदरशांतीचा परमोच्चबिंदू गाठण्याचा यज्ञ अगदी जोरात चालू असतो.. एकाक्षणी पोटातली जागा संपते पण जीभेचा मोह काही संपत नाही…. आता तुम्हाला तुमचं स्वतःच जेवण संपवून उठणं कठीण होऊन बसतं… तुम्ही मांडयाची घडी मोडून उभे राहण्यासाठी आधार शोधता… पावलानां वाट करीत तुम्ही कसेबसे मोरीजवळ येता… हात धुताणाचं तुम्हासं जेवण्याच्या पंसतीचा ढेकर शरीर देऊन जातं, तुम्ही तोंड आणि हात पुसायला फडकं शोधता… तेही, नेहमीप्रमाणे आजही सापडत नाही…. तुम्ही निमूटपणे हात आपल्याच अंगावरच्या कपडयांना पुसून टाकता…दुसरी पंगत बसते….तुम्ही मात्र पंख्याखालची हवेशीर गारेगार जागा शोधत असता…आता घरभर पसरलेल्या घमघमाटात तुम्हाला काडीचंही स्वारस्य उरलेलं नसतं… जवळच दुमडलेंल्या चटईला पायानेच एकसंध करत तुम्ही तुमचं अन्नपूर्णने भरलेलं धड जमिनीवर टाकायला मोकळे होता…. तिथंल्यातिथं जागेवर उशी शोधायला लागता… नाही सापडत… जास्त आळसावलेल्यामुळे आता परत उठून शोधायला तुमच्या अंगात त्राण उरलेला नसतो… जमिनाच्या एखादया उंचवटयाचा टेकू शोधणं चालू असतं…. तोही काही सापडत नाही…त्याचं न सापडणं रुखरुख वाढवत.. दोन-तीनदा कोपरा दुमडून पाहता…. पण नाही… ठरल्यासारखं काही होत नसतं… डोक काही मनासारखं टेकू करु देत नसतं… जमिनीला टेकलेलं अंग आता काही उठायला तयार नसतं..… तुम्ही जवळच ठेवलेला जेवणाच्या वेळचा बसायला घेतलेला पाट उशी म्हणून डोक्याखाली ठेवता… डोळे आता छपराकडे वळतात….
जोरदार एकजात अडखळण्याचा न थांबता आवाज करणारा पंखा… सुशेगादीपणाची एक हलकी लहर… मनासारख्या जेवण्यामुळे दोन घास जास्ती पोटात गेल्यावर आलेली सुस्ती… उघडया जमिनीवर झोपल्यामुळे आपोआप आलेला मोकळेपणा… भिंतीजवळच्या कोप-यात दात कोरायला भेटलेली नेहमीपेक्षा जास्त निमूळती अगरबत्तीची काडी… अहाहा… आणि भरपेट जेवल्यामुळे लकत आलेले तुमचे डोळे… निवांतपणात एकरुप झालेला डोक्यावरच्या पंख्याचा कानात लय तयार करणारा आवाज… आणि त्यातच एकाएकी तुमची लागलेली तंद्री… असा संगम जूळून आल्यावर पुहडणं गाढ झोपेत बदलायला कितीसा वेळ लागणार.… फिरणा-या त्या पंख्याकडे एक टक पाहता पाहता मस्त पेंगण होतं खरं…. पण अजून झोपेचा अंमल पूर्णपणे सुरु झालेला नसतो…. मनासारखं जेवण असल्यामुळे दोन घास जास्तीचे खाल्यावर आपसूकच एक सुस्ती येते आणि एक मंद असा आळस तुम्हाला झोपच्या कवेत घेवून जाण्यास भाग पाडतो, उदयाची कोणतीही चिंता नसल्यावर सुखासीन होण्याच्या अवस्थतेला सगळयात सुदंर प्रंसग काय असेल तर ती म्हणजे दुपारची झोप.
बाकीच्यांची पण आवराआवरा संपलेली असते….प्रत्येकजण जमिनला पाठ लावायला सुरवात करतो …वारादेखील आता मोकळ्या झोपाळ्याला झोका दयायला लागतो… त्यांच्या जीर्ण होत चालेल्या बिजागरांना गंज चढल्यामुळे एकजात झोकात किरकिर होणारा आवाज निवांतपणाला त्यांची स्तब्धता मोडायला भाग पाडतो. तुमच्या झोपेला खोलवर मुरायला अश्याच एकसुरी आवाजाची गरज असते. दुपारच्या शांततेत एक आस पकडून निर्विवाद चाललेल्या पंखाची एकटक साद मनाशी एकरुप करत हळूहळू डोळ्यांची होणारी लगबग आपोआप मिटवत क्षणार्धात त्या काळोखी डोहात खूप खोलवर घेवून जाते… क्षुल्लकश्या वा-याच्यां झुळकी सरशी हलणा-या नारळयाच्या झावळ्याचा आवाज, इतर आजूबाजूच्या झाडाच्या पानाची होणारी सळसळ….सगळं काही झोपेला पूरक….तुमच्या झोपचं सांग्रसंगीत गायन सुरु झालेलं असंत…. झोपेच्या अगदी खालच्या डोहात भ्रमच्या तळापाशी तुम्ही येउन ठेपता…. आजूबाजूच्या जगाचा गंध तुम्हाला आता राहत नाही… तुम्ही हळूहळू तिथल्या वातावरणात रममाण व्हायला लागता, नव्हे जुळवून घेवू पाहता… नाही… तुम्ही तिथे नकळतपणे ओढलें जाता…. तुमच्याच भासाने तयार झालेली एक अनभिज्ञ दुनिया… तुम्ही येणा-या प्रत्येक क्षणाला नव्याने पहात असता… काहीतरी गवसत असतं … काहीतरी निसटत असतं… इतक्या झपाटयाने हे सगळ होतं असतं की तुम्हाला हे सगळं साठवून ठेवायला अवकाशचं भेटतच नाही. जाग आल्यावर सर्व काही लक्षात राहावं अशी इच्छा असते म्हणून झोपेतच काही लक्षात ठेवू पाहता… पण नाही तुमची झोप तुम्हाला या भ्रमाची सावली गडद करुच देत नाही… नकळत डोळा उघडतो… तुमच्या पापण्या फक्त चाहूल घेतात… त्या उघडतात ख-या पण, झोप आपला अंमल दाखवयला सुरवात करतें… त्या पापण्या पुन्हा मिटल्या जातात.. तुम्ही झोप घेत आहात हे देखील तुम्ही विसरुन जाता… तुम्ही पुन्हा भम्रनगरीत शिरता… तुमचं शरीर आता नियंत्रण सोडतं… एखादा ढेकर जेवण तृप्तीचा इशारा देऊन जातं… पण इथं त्याचा मागमूसही नसतो… तसं होणं साहजिकच असतं… अहोहो… काहीतरी अस्पष्ट, काही कळ्ण्यापलीकडचं अनेक विचारांनी भरलेलं गलबतं इथं येवून थबकत… कुठला विचार घ्यायचा कुठला नाय घ्यायचा… तुमचं तूमीच ठरवता… खरोखरं कन्ट्रोल नसतो.. हळूहळू इथल्या नवीन स्टो-या सुरु होतात…आजची काय असेल?…
तुम्ही एका जंगलाच्या सुरवातीला आहात…हे असंच काहीतरी सुरु होतं…कधीही न अनुभवलेलं…विचाराचा कोणता कोपरा मन कधी पकडेल सांगता येत नाही…तुम्ही यात गुरफटत जाता…कधी काळी डोळ्यात साठवलेलं, कुठे विचार केललं…कुठून कुठून काय काय गोळा करेल सांगता यायचं नाय… तुम्हाला पुढे काय असेल याचीचं उत्सुकता लागून राहीलेली असते…तुम्ही मागे वळून सुध्दा बघत नाही… समोर तुम्हाला फक्त मोठमोठाली झाडं दिसतात…एकमेकांत पार गुरफटलेली… फांदीला फांदी बिलगलेली… चालायला वाट सुचेल तसं चालत सुटायचं… सतत घोंघावणारा वारा अचानक सुरु होतो… डोक्यावरती बघितलं तर नुसतीचं झाडं… मोकळं आकाश कुठे दिसतचं नाय… तुम्ही वाट काढत सुटता… स्वप्नाचं हे एक बरं असतं… तुम्ही स्वतःलाच स्वतः बघू शकत असता… तुम्ही जास्त विचार न करता, हा झाडाझाडातून चालेला प्रवास संपावयाच्या मागे असता… तुम्हाला जंगलात जोराजोरात वारा जाणवायला लागतो. प्रकाश मागच्या पेक्षा अधिक वाटू लागतो…इकडे तुम्ही एका कुशीवरुन दुस-या कुशीवर सरकता…कुणीतरी पंख्याचा स्पीड तीनवरुन पाचवर करत आणि खिडक्या उघडल्या जातात. कानावर जितकं काही आदळतं त्यावरुन तुम्ही केलेला तो निव्वळ अंदाज असतो…पण तो खरा असतो…पण अजूनही तुम्ही स्वप्नातच असता. हळूहळू फांदया एकमेकाला जोरजोरात आदळायला लागतात…तुमच्या आसपासची सगळी झाड आवाज करायला लागता…तुम्ही चालणं सोडलेलं नसतं…तुम्ही चालत असता…जंगल काही संपत नाही…तुम्ही कुठेतरी मनाशी ठरवलेलं असतं, जंगल संपणार… शेवटी तो तुमचाच भास… पण त्या दोन फांदयाचं वेगळचं चालू असतं… त्याचं गुरफटणं काही नेहमीचं नसतं… त्या सोसाटयाच्या वा-यात त्याचं एकमेकावंर आदळणं अजूनच वेगाने सुरु होतं… तुम्ही एक-दोनदा निरुखून पाहायचा प्रयत्न करता… दर क्षणाला असचं होत असतं… तुम्ही पुन्हा मागे वळून पाहता… खूप दूर आल्याचं कळत… सरळ वाट असल्यामुळे काही वाटत नाही… पण खरचं खूप दूर आलेले असता… पण वारा काही कमी होत नाही…. त्या प्रत्येक फांदीने आपली किमान मर्यादा ओंलाडलेली असतें त्याचं एकमेकांना घासत राहणं आता काहीतरी वाईटाची चाहूल करुन देतं…. तुम्ही मागे वळून पाहता… मागच्या बाजूची झाडं आवाज करत असतात… नव्हे! त्यांनी आता पेट घेतलेला असतो…. जंगलात वणवा सुरु होतो… ते प्रत्येक हिरवं पान आता जळीतकांड बनत जातयं… क्षणार्धात होत्याचं नव्हतं होत असतं…. पान न पान आता काळभोर बनत चालयं… आग संपूर्ण जंगलाला वेढा घालत चालयं… तुमचं पळणं सुरु होतं….किती पळाल… तुम्ही दोन क्षण थांबून पाहता. आगीच्या डोबांतून काहीशी झाड बाकी आहेत… ती ही एव्हाना त्या वणव्याच्या तडाख्यात कैद होतात…आता तुम्ही थकता…ही आग आता तुम्हाला गिळल्याशिवाय राहणार नाही… परतीच्या सगळ्या वाटा बंद झाल्यात….आणि तुमचा पुढे पळण्याचा रस्तासुदधा… चारी बाजूच्या आगीने आधीच तुमचा जीव कासावीस झालाय… आगीची धग तुम्हालां जाणवायला लागते…. पुढे वाट संपलीय… तळं…!!!!!
एका तळ्याकाठी येवून थांबता… तुम्ही आणि ती आगसुध्दा….पण तुम्ही वाचणार कसे…तुम्हाला जिवंत राहायचयं… तुम्ही तळ्याच्या सभोवार एकदा नजर मारता…. एक नजर काहीतरी दाखवते पण तुमचा काही विश्वास बसत नाही तुम्ही पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी रोखून बघता… अक्राळविक्राळ राक्षसी….मगरी… त्यांच्याकडे पाहवसंही वाटतं नाहीयं… नुसत्या सावजाकडे फिरलेल्या त्याच्या त्या आसुसलेल्या नजरा… मातम सुरु झालाय. कहर! यांच्यापेक्षा वेगळा काय असतो?…. त्या मगरींनाही ती धग सहन होत नसते. त्या तळ्याच्या दिशेने येत असतात ख-या…. पण त्यातल्या त्यात एक मगर तुमच्याकडे बघत असते… तिला त्या आगीची पर्वा नसावी बहुतेक…. मनुष्य खाल्ला नसेल इतक्या दिवसातं… तुम्ही अजूनही तळ्याजवळच आहात…. अजूनही पाण्यात उतरत नाही… पाण्यात उतरुन तरी नेमकं काय करणार?… तुम्हाला पोहता कुठं येतयं…. ती मगर इतर मगरीप्रमाणे पाण्यात न जाता तुमची शिकार करु पाहतेय…. तुमच्या मेंदूचा पार भुगा झालाय… विचार नेमका काय करावा काही सुचतं नाहीय…. साला प्रत्यक्ष आयुष्यात पण असेच घाबरगुडें इंथ तरी थोडे धाडसाने वागा… पण नाही… शेवटी ते तुम्हीच असता डरपोक… तुम्ही गर्भगळीत होता… तुमची जिदद, शौर्यं सगळं खोटं असतं… हो तुम्ही घाबरता!… ती मगर अजूनही तळ्याच्या काठावर असते… तुम्ही ही तळ्यापाशीच… आगीचे सगळे लोट आता तळ्याकाठी येवून ठेपलेयतं…. ती मगर तुमच्यावर झेपावणार… पण इतक्यात जवळ्याच्या झाडाची फांदी आगीसकट मगरीवर पडते… आणि दुस-या क्षणाला ती मोठाली मगर तळ्यात गुडूप होते… तुमचे हातपाय लटपटायला लागतात… मरणाची हमखास हमी देणारा प्रंसग….
एक खोल तळ…. तळ्याभोवताली सगळ्याबाजूने पेटलेला वणवा… तळ्यात जमा झालेल्या मगरी…. आणि पोहता न येताही नाईलाजाने मगरीने भरलेल्या तळ्यात शिरलेले तुम्ही… स्वतःचीच मरणासन्न अवस्था तुम्ही तळ्याच्याच एका बाजूने पाहत असता… नाही ते तुम्ही स्वतः आहात… झोपतले… हीचं संधी आहे तुम्हाला मरणानंतरची अवस्था जाणून घ्यायची… तुम्ही गाढ झोपेत आहात…. श्वासोश्वास जोरजोरात सुरु आहेत… त्या तळ्यातल्या तुमचं काय होणार… तुम्ही पुन्हा कूस बदलता… नकळत पापण्या उघडतात… समोरची खिडकी दिसते… पण डोळे दुस-या क्षणाला मिटतात… पण तुम्हाला कळत… हा भास आहे….हे स्वप्न आहे… पण तुम्ही स्वतःलाच जाणीव होऊ देत नाही…. मन आता आतल्या एका मनाशी खोटं वागत…
आता चित्र स्पष्ट आहे तुम्ही एक स्वप्न बघताय… भीषण स्वप्न… तुम्ही या दोन्ही पातळ्यावर समान अवस्थेत आहात… अशी संधी क्वचितच भेटते…..तुम्हाला जंगलात घोघवणारा वारा आणि खिडकीपलीकडून येणारी थंडगार हवा एकाचवेळी जाणवतेय…असा अनुभव सहजासहजी येत नाही…तुम्ही मनाशी पक्कं केलयं…आज ही अवस्था जाणून घ्यायची म्हणजे घ्यायचीच..
तुम्ही स्वतःला मगरीच्या स्वाधीन केलयं… आगीच्या लोटांनी आता तळंही नाही सोंडलय… त्यांनी आता तिथंही मुसंडी मारलीय… या अवस्थेत मगरीनीं जरी काही नाही केलं तरी बुडून मरणं तरी खात्रीने असणार… तुम्ही ती अवस्था अनभवु पाहता… आगीने आपला निसर्गनियम आज पाळला नाही ! ! ते आगीचे लोळ पाण्यापेक्षा वरचढ होत चाललेत… अक्षरशः तळ्याच्या चारीबाजूनां आगीने वेढा घातलाय… हिरव्यागार जंगलाचा काळाकोळसा बनून गेलाय.. पण मगरीना पोहता येत होतं.. त्या तळ्याच्या तळाशी जायला लागल्यायत बहुतेक आणि तुम्हाला पोहता येत नाहीय… तुम्ही गटागळ्या खायला लागता.. यस आज तुम्हाला ती अवस्था कळेल त्या तळ्यातल्या बुडण्या-या माणसाचं मन सुदधा तुमचंच आहे…
इकडे तुमच्या कपाळाभोवती घाम जमा झालायं.. अंगात घातलेला शर्ट ओलाचिंब झालाय… इतकं घामाघूम होऊनसुदधा तुम्ही आज काहीतरी नक्की जगावेगळं अनुभवणार या खुशीची मनाच्या एका कोपराने तयारी करायला सुरवात केलीय… तुमच्या नाकातोडांत पाणी जातं… तुम्ही पाय हालवू पाहता…. “तुम्ही पुन्हा-पुन्हा वरती डोकावू पाहता…. ती मगाची मगर आता तुमच्या जवळ येतें…..एक मन म्हणत असतं… फक्त येथून निमूटपणे सुटका व्हावी हिचं अपेक्षा”… एक मन खुशीत असतं… “कदाचित मला आता मरणानंतरीची अवस्था कळेल”…
हया तळ्याकाठी मरणार आहे ते तुमचंच मन आहे… भम्राला, स्वप्नाला शरीरी आकार नसतो…. तुम्ही गुदमरुन लागता… हे सगळं मरणनाटय या खिडकीपाशी येऊन थांबलयं…तुमचा श्वास गुदमरु लागतो… कुणीतरी गदागदा जोरजोरात हलवायला लागतं….तुम्हाला जाग येतें…. ती अवस्था तुटली जाते…. तुम्ही आता पुन्हा एकदा येथे जगायला सुरवात करता…. जो पाट तुम्ही उशी म्हणून घेतलेला होता तो डोक्यावरुन सटकतो…. ती समान अवस्था नाहीशी होते… आणि तुम्ही परत मूळ जगात येता. “काय घाम जमा झालाय कपाळावर, उठ आता दिवाबत्तीची वेळ झालीय” आई बडबडायला सुरवात करते. तुम्हीची तंद्री निघून जाते, आपण ही झोप दुपार समजून झोपल्यामुळे अजून रात्र बाकी असल्याचा एक मूड तयार होऊनच झोपी जातो खरे, पण नंतर एका झटक्यात आपल्याला जाग येते, तुम्ही थोडे कावरेबावरे होता… आगीचे लोट मनात घर करुन बसतात… तुम्ही चटईवरुन तडक उठता… स्वयंपाकघरातलं गॅस कनेक्शन नीट असल्याची खातरजमा करता…. सर्व काही ठीक असतं… तुम्ही मोरीत येता, तोंडावर पाणी मारता… तुम्ही काय गमवलयं ते तुमचं तुम्हालाच ठाऊक असतं…तिथंल सगळ काही स्पष्ट आठवतं नाही… तुम्हाला तुमच्या स्मरणशक्तीची कीव येतें….साला मागच्या क्षणाच्या निमूटत्या झलका जरी गवसल्या असत्या तरी चाललं असतं….एकदमचं बाहेर पडलो…मागचं सुपडा साफ करत तुमचं नेहमीच जग जगायला तुम्ही मोकळे होता…. भूक, प्रेम, असुया, नाती सगळं काही जाणीव करुन देतं येथे असण्याची पण तरी देखील तिथे काही नक्की असेल… भम्राचं अस्तित्व नक्की असेल… काय झालं ते आठवतं नाय….शे… नाही… यार! झोप गेली… तो भ्रम गेला.. ती नशा गेली… तो झोपेचा अंमल गेला.. तिथूंन सुटका झाली खरी पण तिथंल अस्तित्व ईथे छळत राहत तुम्हाला…तुम्ही नेमकं काय झालं ते आठवू पाहता…. नेमका अर्थ लावू पाहता त्या स्वप्नाचां…. नंतरचे कितीतरी उपवास, त्यानंतरचा नैवदय, ती भरपेट जेवणाची दुपार, त्यानंतर तुम्ही त्या स्वप्नाची…. त्या भ्रमाची… त्या समानअवस्थेची वाट बघत असता… ती दोन्ही ठिकाणी एकाच वेळी जगण्याचा फील पुन्हा अनभवू पाहता…. आभासीपणाच्या भासाचं जाणवणं आता दुरापास्त होवून जातं…. आता ते पुन्हा गवसणं मुश्कील वाटतं…. तुम्ही तरीही न निराश होता अजूनही प्रतिक्षेत असता ते क्षण अनुभवण्यासाठी… जिथे या अभासी जगाची ती आखीव रेष थोडीशी का होईना, साफ होईल…. तुम्ही वाट पाहताय त्या दुपारच्या झोपेची…
-लेखनवाला