१५
टायटॅनियन भेट
टायटन आणि आमच्या घरचे काय नाते असावे? टायटनचे शिष्टमंडळ आॅफिसच्या कामासाठी आलेले. त्यांनी वाकडी वाट करून आमच्या घरी यायचे काही कारण नव्हते खरेतर. पण बाबांना दुसऱ्या दिवशी सकाळी काॅल आला त्यांचा. इकडच्या लोकांशी संबंध जोडणे म्हणजे डिनर डिप्लोमसी आली! आईने आजवर टायटनचे नावही ऐकले नव्हते! खरेतर त्यांची ही पहिली भेट नव्हती चंद्रावर पण आईला ते माहिती असायचे कारण नसावे..
"हे टायटन काय आहे हो? कुठल्या देशात आहे?"
"ओळख?"
"मी काय ओळखणार.. फार पूर्वी म्हणजे मी काॅलेजात असताना टायटन नावाची घड्याळे असायची एवढीच माहिती आहे मला. मला माझ्या बाबांनी बक्षीस दिलेले एक बीए झाले तेव्हा."
"राॅबिन .. डझ एनीवन नो हिअर व्हेअर इज टायटन?"
"सर.. अंबरला ठाऊक आहे.. इन फॅक्ट.." शेवटचे वाक्य तोंडातल्या तोंडात बोलला तो.. "त्याला एक टायटॅनियनही ठाऊक आहे!"
मी चेहऱ्यावरचे भाव न बदलता म्हणालो, "अगं आई, टायटन हा शनिचा चंद्र आहे! म्हणजे सॅटेलाईट आॅफ सॅटर्न! फार प्रगत आहे म्हणतात.."
"आणि तिकडचे लोकही सुंदर असतात खूप.. म्हणजे अंबर सांगत होता."
"बापरे! आणि मला पत्ता ही नाही अजून! आणि मी एलियन्स असतात का कुठे याचा विचार करत बसलेय इथे!"
"अगं एलियन्स नसायला काय झाले. हे टायटनवाले सुपर हुशार आणि महत्त्वाचे म्हणजे कल्चर्ड लोक आहेत. प्रगत म्हणजे सुसंस्कृत! आता येतील तेव्हा बघशीलच तू!"
"हो ना!"
"आणि त्यांच्याकडची एक ब्रुनी म्हणून मुलगी आहे इकडे.. ती पण येणार आहे संध्याकाळी."
मी शक्य तेवढा चेहरा सरळ ठेवत म्हणालो, "कधी येताहेत ते?"
"आज संध्याकाळी!"
"मी येतो लवकर. आयॅम इगर टू मीट देम."
मी हे बोलताना राॅबिन माझ्याकडे बघून हसत होता! जणू 'मीट देम' नाही 'मीट हर' म्हणत असावा तो! ब्रुनी अशी आॅफिशियली घरी येईल याचा विचारही केला नव्हता मी. अगदी न प्लॅन करता ब्रुनी आई बाबांना भेटणार .. आजच! राॅबिन म्हणाला ते खरंच.. सारे काही सुपर फास्ट!
मला वाटले ब्रुनीला फोन करून सांगावे .. बाई आज तुझ्या सासरी येणारेस तू.. पण म्हटले सरप्राईज द्यावे तिला. आज त्या सगळ्यांबरोबर ती येईल तर काय गंमत होईल! आॅफिसचे काम जितक्या लवकर संपेल तेवढे संपवून बसलेलो तर फोन वाजला.. चक्क ब्रुनी होती लाइनवर.
"हाय! काय करतोयस?"
"काही नाही. निघणार आहे आज लवकर."
"वा! म्हणजे काम संपले.."
"यस. येतेस इकडे?"
"वुड लव्ह टु.. पण आज एका ठिकाणी जायचेय.."
"ते संध्याकाळी ना?" मी बोलून गेलो.
"हाऊ डू यू नो?"
"मी? नाही जनरली लोक संध्याकाळीच जातात ना म्हणून!"
"वा! वाॅट अ लाॅजिक!"
"पटलं ना? आयॅम आॅलवेज राइट! येतेस तर ये पटकन् .."
"नो
यार! नो सच लक. वेळ नाही .."
"बट
शु
ड आय बेट..?"
"काय?"
"की वाॅट एव्हर हॅपन्स .. तू आज मला भेटणारेस.. तेही संध्याकाळीच!"
"नो चान्स डियर.. आय हॅव अ डिप्लोमॅटिक ड्युटी टुडे!"
"अँड स्टिल इफ आय से.. बेट.. यू आर मीटिंग मी?"
"देन यू आर क्रेझी अंबर.. नो.. वेट अ मिनिट .. अंबर.. राजपूत .. राइट.."
"काय राइट?"
"आय नो.. मला ठाऊक आहे तू का बेट लावतोयस ते.. आयॅम व्हिजिटिंग युवर हाऊस टुडे.. राजपूत'स रेसिडेन्स.. द टायटॅनिक डिप्लोमसी डिनर!"
"वाॅव! हुशार आहेस.. सो मीटिंग इन द इव्हिनिंग?"
"आॅफकोर्स. माय प्लेझर!"
"पण आता रिकामी आहेस तर ये ना.."
"नो डियर.. लाॅट टू डू हिअर. सी यू इन इव्हिनिंग. इगर टू मीट युवर पेरेंट्स.. बाय."
तिने फोन ठेवला. कदाचित इगर टू मीट इन लाॅज म्हणता म्हणता चुकली की काय! अाणि दहा मिनिटांत ब्रुनी माझ्या आॅफिसात माझ्या समोर होती!
तू इथे?
"का आले असेन एनी गेस?"
"सी, वुई अर्थ पीपल आरन्ट अॅज इंटलिजंट यार!" मी हसत बोललो. त्याच क्षणी लक्षात आले माझ्या .. ती एलियन असल्याचे तिने प्रत्यक्ष न सांगता मी तिला सांगत होतो!
"तुझं काहीतरीच अंबर! पण मी आले ते सांगायला ..
काय?"
"आय वुड बी अ पार्ट आॅफ डिप्लोमॅटिक टीम. तर मी तुझी फ्रेंड असल्याचे तिथे कुणाला लक्षात येणार नाही माझ्या वागण्यातून. आय वुड बी अॅज डिस्टंट अॅज एनी अदर पर्सन टू यू. उगाच तुला वाटेल ही अशी काय वागतेय.. पण डिप्लोमसी रूल्स पाळावे लागतील मला तिथे!"
"पाळ की! पण तू येतेस आयॅम हॅपी! आणि तेवढयासाठी आलीस?"
"यस. तुला वाटेल ही अशी विचित्र का वागतेय?" "आणि तूही जास्त ओळख दाखवू नकोस.."
"ओके मॅम. अॅज पर युवर अाॅर्डर! आलीस तर काॅफी पिऊन जा.."
"आय वुड लव्ह टू.. पण निघते मी. खूप काम बाकी आहे यार. संध्याकाळी भेटू.."
"यस. अँड कम एम्प्टी स्टमक.. माझ्या आईच्या हातचे जेवण खाऊन बघ. शी इज अॅन अमेझिंग कुक.."
"ओके.. डिअर. धिस केटरींग पर्सन विल्बी डेफिनेटली इंटरेस्टेड.. सी यू."
ती निघून गेली. मला गंमत वाटली तिची. तिचे टायटनवरचे असणे म्हणजे काही वेगळे असावे असे तिला वाटतच नव्हते की ती ते दाखवत नव्हती. तसे नसावे. तिच्या वागण्यात एक पारदर्शीपणा होता. नाहीतर ती अशी फक्त एवढेच सांगायला आली नसती वेळ काढून.
संध्याकाळी ते टायटॅनियन आले घरी. त्यांच्याबरोबर ब्रुनीही. आईने स्वतः खास बनवलेले महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण. अगदी पुरणपोळी, कटाची आमटी, अळूवडी आणि डाळिंबी! त्या शिष्टमंडळात तीन जण अजून होते. सारेच वागण्यात अतिशय नम्र. अतिशय मृदू स्वभाव सगळ्यांचा. मला ब्रुनीच्या मृदू हातांची आठवण झाली. हा मऊपणा स्वभावातून येत असेल का हातात? चापून जेवणखाण करून नि जेवणाची स्तुती करून सारे निघून गेले. डिनर डिप्लोमसी प्रकार चांगला दिसतोय. जेवायला मिळणारी कुठलीही गोष्ट चांगलीच म्हणावी की नाही? आणि तिथे ब्रुनी स्वतः असावी! म्हणजे दुधात साखर. ती होती तेव्हा मी जास्त न बोलता तिच्याकडे पाहात राहिलो. तीही मध्ये मध्ये कटाक्ष टाकत राहिली. आजवर जेवढे बोलले नसू तेवढे त्यादिवशी न बोलता बोलले असू. म्हणजे हे जाणवले आम्हाला दोघांनाही पुढच्या वेळी आम्ही भेटलो तेव्हा. म्हणजे आई एक गाणे लावून बसते त्यात एक आहे.. 'शब्दांवाचून कळले सारे .. शब्दांच्या पलिकडले' तसे झाले खरे.
या डिनर डिप्लोमसीने अजून एक गोष्ट घडली.. जी मला राॅबिनने नंतर भर मध्यरात्री सांगितली.
मी पाय पसरून पडलेलो.. अर्धा झोपेत. आजच्या दिवसाचा रिकॅप पाहात. सिनेमात एक बरे असते, रिकॅपची सोय असते. फ्लॅशबॅक्स.. पण एकदा गेलेले क्षण .. ते नाही परत येत. माणूस कितीही प्रगत झाला तरी वेळेच्या मागे जाऊ शकत नाही नि पुढेही.. बाकी टाइम मशीन वगैरे नुसते विज्ञान कथांच्या विषयापुरता. तर असला मनातल्या मनात ब्रुनीला पाहात होतो.. तर हा आला..
"अंबर ब्रो, गेस न्यूज काय आहे?"
"अरे भर रात्री दोन वाजता न्यूज?"
"अरे बातमीच अशी भारी आहे म्हणून आलो.."
"काय? क्युरी हो म्हणाली ..?"
"यू आर व्हेरी नियर टू द सबजेक्ट यार.."
"ओह! मग राॅबिनभय्या कधी उरकताय शुभमंगल.."
"शुभमंगल? मला त्या मशीनीत तुझ्या बोलण्याचा अर्थ शोधण्यात वेळ नाही घालवायचा.. ऐक.. मॅडम हॅज गिव्हन ग्रीन सिग्नल .."
"कशाला?"
"तू आणि सायली..!"
"साय..ली? ती कुठून टपक..ली मिस्टर राॅबिन ली?"
"मला काय ठाऊक. त्या आता म्हणाल्या.. लवकरच बात आगे बढाई जाए!"
"टेन्शन यार!"
"का? ब्रुनी फायनलाइज्ड?"
"चूप.. तुला ठाऊक आहे. अजून काही नाही पण आय नीड टाइम बाबा. हे असे कुठलीही पोरगी पटवणे सोपे नसते बाबा. वेळ लागतो. तुला काय.. तू आणि तुझी मॅडम क्युरी.. काय बातमी अाणतोस रे.. झोपमोड्या आहेस तू.."
"हुं.. झोप तर उडेलच तुझी पुढे ऐकलेस की.."
"बाप रे. अजून काय?"
"अजून .. जस्ट रिप्लेस द नेम सायली फाॅर समवन विथ नेम स्टार्टिंग विथ बी.."
"ब्रुनी?"
"यस माय फ्रेंड. मॅडम म्हणाल्या, ही ब्रुनी एकदम अायडियल आहे अंबरसाठी.."
"गधड्या.. यू मेड मी स्कीप फ्यू हार्टबीट्स.."
"राँग इंग्लिश डिअर.."
"सोड. आई काय बोलली सांग ना.."
"म्हणजे ब्रुनी स्तुती? ब्रुनी चालिसा? की ब्रुनीची आरती?"
"राॅब .. यू आर ग्रेट. आणि ही बातमी खरीच आहे ना? की लपेट?"
"भरपेट खानेवाले लपेट नहीं मारा करते ब्रदर .. मॅडम म्हणाल्या, अशी मुलगी असेल तर अंबरची नैया पार होईल. नाहीतर वेंधळा आणि बावळट आणि धांदरट आहे तो.. ब्रदर, व्हाॅट्स द मिनिंग आॅफ वेंधळा आणि ते बाकी अॅडजेक्टिव्हस?"
"गप रे राॅब. एवढी चांगली बातमी आणलीस, तुला शिव्यापण नाही घालू शकत.."
थोडक्यात हे असे झाले. त्या टायटॅनियन्सनी मार्ग मोकळा करून दिला. आणि आता मिशन ब्रुनी फक्त आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आहेच मी तसा मातृभक्त श्रावण बाळ!
पण एकूण सारे पाहता एक खूपच जुना सिनेमा आठवला. त्यात शाहरूख खान नामक तेव्हाचा सुपर स्टार म्हणतो, 'जब कोई किसीको दिलसे चाहता है तो सारी कायनात जुट जाती हैं उन्हें मिलाने!' इकडे कायनात म्हणजे पृथ्वी.. तिचा चंद्र .. आणि शनि आणि त्याचा चंद्र एकत्र आलेले दिसत होते! एकूण ग्रहमान अनुकूल दिसत होते!