नागपंचमी
हा नाग पूजनाचा दिवस.
श्रावणातल्या ह्या दिवसात पावसामुळे सर्प बागेत, शेतात, अगदी घरातहीनिवा-याला येतात. तीन हजार वर्षांपासून नागदेवतेची पूजा माणूस करत आला आहे. शेतातल्या उंदराचा नायनाट करणारा हा प्राणी शेतक-याला आपला मित्र वाटतो.
पुराणातही नागांचा उल्लेख आढळतो जसे की कालिया, शेष, अनंत, वासूकी, तक्षक, पद्म इत्यादी. आजच्या दिवशी नागदेवतेची मनोभावे पूजा केली जाते
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.
कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचलित झाली असे मानले जाते. दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी संगमावर स्नान करतात.
नागपंचमीची कहाणी अशी आहे
एका शेतकऱ्याच्या नांगराचा फाळ लागल्याने नागिणीची तीन छोटी पिल्ले मृत्युमुखी पडली.
त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला.
त्या कोपा पासून वाचण्या साठी शेतकर्याने या दिवशी काहीही शेतीचे काम करणार नाही असे नाग देवतेला वचन दिले.
त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाहीत. कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही, असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात. आपले संरक्षण कर, अशी प्रार्थना करतात. अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया याआठ नागांची यादिवशी पूजा केली जाते.
नागपंचमी उपवासाचे महत्त्व
सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता.
सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला.
त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्नग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख व संकट यांतून तारला जावा, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे.
पूजा करण्यामागील शास्त्र
सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.
नवीन वस्त्रे व अलंकार
सत्येश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाले. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्वर समाधानी झाला. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात.
नागपंचमीच्या उगमाची कथा सांगितली जाते ती अशी की, पुरुवंशीय राजा परीक्षित याचा मृत्यू तक्षक नावाचा एक नाग चावल्यामुळे झाला.
परीक्षिताचा पुत्र जनमेजय याला याची माहिती मिळाल्यावर तो जगातील सर्व सर्पांचा नायनाट करण्याच्या हेतूने सर्पयज्ञ सुरू करतो.
त्यानुसार या यज्ञात सर्पांच्या आहुत्या पडायला सुरुवात होते. या सर्पयज्ञात आता आपलाही बळी जाणार, या भीतीने राजा परीक्षिताला चावलेला तक्षक हा नाग इंद्राच्या आश्रयाला जातो. त्यामुळे सर्पयज्ञात अन्य सर्पांच्या आहुत्या पडत असताना ज्याच्या आहुतीसाठी म्हणून हा यज्ञ चालू केला, तो तक्षक मात्र निर्धास्त असतो. तक्षकाला इंद्राने आश्रय दिल्याचे जनमेजयाला कळते आणि तो ‘इंद्राय स्वाहा...तक्षकाय स्वाहा’ अशी आहुती देतो. त्याबरोबर तक्षकासह इंद्रही आहुतीच्या दिशेने येऊ लागतो.
त्यामुळे घाबरून इंद्र अस्तिक ऋषींची माता मनसे हिचा धावा करू लागतो.
इंद्राच्या प्रार्थनेनुसार माता मनसे जनमेजयाला सर्पयज्ञ थांबविण्याची आज्ञा करते. त्यानुसार जनमेजय सर्पयज्ञ बंद करून सर्पकुळाला अभय देतो. जनमेजयाने सर्पकुळाला अभय दिल्याचा दिवस हा श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीचा होता .
या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने पाटावर नवनागांच्या आकृत्या काढतात. त्यांना हळदकुंकू वाहून पूजा करतात. नंतर दूधलाह्यांचा नैवेद्य दाखवतात होता. त्यामुळे या दिवशी सर्पकुळाविषयी आणि प्रामुख्याने नागाविषयी आदरभाव व्यक्त केला जातो.
भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपासून नागपूजा चालत आलेली आहे.
देशातील बहुतेक सगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते. केवळ देशातच नव्हे तर व्हिएतनाम, कंबोडिया, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देशसह अन्य काही देशांमध्ये हजारो वर्षांपासून नागपूजा प्रचलीत आहेत. जगात सर्पकुळात हजारो जाती आहेत, मात्र आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांमुळे केवळ नागच या अग्रपूजेचा मानकरी ठरलेला आहे.
समाप्त