Gadhav Prem in Marathi Comedy stories by Pradip gajanan joshi books and stories PDF | गाढव प्रेम 

Featured Books
Categories
Share

गाढव प्रेम 



गाढव प्रेम
सकाळी गच्चीवर जावून फेऱ्या मारणे, योगा करणे हा माझा नित्याचा क्रम. त्या दिवशी मी असाच सकाळी लवकर उठलो. गच्चीवर जाण्यास निघालो. माझे लक्ष गेटकडे गेले. गेटपाशी एक गाढव अगदी निर्विकार चेहऱ्याने उभे होते. गेटच्या आत येण्याचा जरादेखील प्रयत्न करीत न्हवते. त्याच्या चेहऱ्यावर मला उदासीनता स्पष्ट दिसत होती. बिचारे खाली मान घालून उभे होते. त्याला पाहताच माझ्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले. विना तक्रार ओझी वाहणाऱ्या गाढव नावाच्या प्राण्याला खरच आपण योग्य न्याय देतो का? व्यायाम करता करता मी विचारात रममाण झालो. माझ्या समोर त्या गरीब मुक्या प्राण्याचा सारा जीवनपट उभा राहिला.
गाढव गरीब बिचारा निमुटपणे ओझी हाकणारा प्राणी. आपल्या शरीरावर कोणाचे ओझे लादले आहे ते कोठे घेवून जायचे आहे त्यात आपला फायदा काय याचा कोणताही विचार न करता प्रामाणिकपणे काम करणारा एकमेव प्राणी. चेहऱ्यावर कधीही हास्य नाही, सदैव चिंताक्रांत चेहरा. कधी खाण्याची तक्रार नाही. मिळेल ते मिळेल तेंव्हा खावून आयुष्य व्यतीत करणारा प्राणी. एवढे राब राब राबून पदरी काय तर समाजाचा हेटाळणीचा सूर. बघा ना. सिंहाला काहीही कष्ट न करता वनराजाची उपमा. वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा. पण गरीब बिचाऱ्या गाढवाचे काय? त्याला ना कोणता दर्जा. ना कोणती पदवी. त्याच्या नशिबी केवळ आणि केवळ हेटाळणीचा सूर.
समाज त्याच्याकडून खूप कष्ट करून घेतो मात्र त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप कधी टाकत नाही. उलट त्याच्या नावाचा वापर उपरोधाने दुसऱ्याला उपदेश करण्यासाठीच केला जातो. एखाद्या व्यक्तीला एखादा पदार्थ आवडत नसेल तर लगेच गाढवाला गुळाची चव काय? असा शेरा मारून आपण वेगळे होतो. मला सांगा गाढवाचा यात काय दोष? वयाने वाढलेल्या पण वागण्याची जाणीव नसलेल्या व्यक्तीला घोडा झालास पण गाढवासारखा वागतोस असे म्हणून आपण मोकळे होतो. त्यातही घोड्याला मोठेपणा गाढवाला मात्र तुच्छता. कधी बदलणार गाढवाकडे पाह्ण्याचा आपला दृष्टीकोन. ओझी वाहणाऱ्या गाढवाबाबत गाढव मेलं ओझ्याने असा हेटाळणी वजा सूर आपण व्यक्त करतो हे कितपत बरोबर आहे. गाढवाला काहीच समजत नाही अशा भ्रमात आपण वावरत असतो. त्यामुळेच गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता असे म्हणण्यास आपण जरा देखील कचरत नाही.
आपल्या पुरोगामी विचार सरणीच्या राज्यातून गाढवांची संख्या कमी होणे हे आपल्याला जरा सुद्धा भूषणावह नाही. याचा आपण काही विचार करणार की नाही. वाघ सिंह नष्ट होत असताना चिंतातूर झालेल्या समाजात प्रभावी उपाययोजना करण्यासाठी समिती बनवली जाते. आपली तर चालण्या, वागण्या, बोलण्यातून गाढवाशी एवढी जवळीक असताना त्याच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष होणे बरोबर वाटत नाही. राज्यात केवळ २९१३२ गाढवे आहेत. मी मोजली नाहीत पण माझ्या कानावर ही माहिती आली आहे. आपल्या पुर्वजा पासून आपण या जमातीच्या वाढीसाठी प्रयत्नशील आहोत. मग आताच हा वेग मंदावून कसे चालेल? गाढव किती उपयोगी पडत ते कस मदत करत हे आपण गाढवच लग्न या चित्रपटात पहिलेच आहे.
मला राहून राहून लोकांचे देखील नवल वाटते. कोंबड्या, शेळ्या, मेंढरे, बकरी या प्राण्यावर ही मंडळी जीवापाड प्रेम करतात. मग गाढवाचेच त्यांना एवढे वावडे का? कुठ गेल्या आमच्या प्राणीमित्र संघटना. त्या बिचाऱ्याना कोणी वाली नाही म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडून कसे चालेल? आज कुक्कुटपालन, वराहपालन, म्हशी पालन करत असताना गाढव पालन करणारांची सख्या मात्र वाढू नये हे थोड अजबच वाटते. माझ्या मते गाढवांची संख्या कमी होण्यामागे सुंदर शहर स्वच्छ शहर या योजनेचा मोठा वाटा असावा. शहरातील उकिरडे काढले अन बिचाऱ्या गाढवांना आपण बेघर करून टाकले. मानवजात किती निष्ठुर आहे नाही?
माझा एक मित्र मला म्हणाला सध्या शहरीकरण वाढले आहे. बहुतांशी लोक खेड्यातून शहराकडे वाटचाल करू लागले आहेत. कदाचित गाढवे देखील शहरात गेली असावीत. मला त्याचे म्हणणे काही खरे वाटले नाही. मी अधिक चौकशी केली असता शहरातही ओरिजिनल गाढवे कमी असल्याचे दिसून आले. संख्या वाढली होती पण ती खरी गाढवे न्हवती. गाढवासारखी वागणारी डुप्लिकेट गाढवे होती. आजकाल माध्यमे समाज माध्यमात कोणताही लाईव्ह शो केला जातो मात्र ती देखील या ज्वलंत प्रश्नावर काहीही भाष्य करायला तयार नाहीत. असा दुजाभाव बरोबर नाही.
मला माणसात व गाढवात आणखी एक साम्य आढळते. सभ्य माणसे व गाढवे हे दोघेही आपण बरे आपले काम बरे या विचारसरणीचे असतात. त्यांचे समाजाशी किंवा समाजातून येणाऱ्या प्रतीक्रियाशी काहीही देणेघेणे नसते. कोणी काहीही म्हणो आपण आपले काम करत रहाणे हा गाढवाचा एक चांगला गुण आहे. परमेश्वराने ज्यावेळी गाढवाची निर्मिती केली त्यावेळी त्यांला गुणदोष भरभरून दिले. कुत्र्या मांजरासारखे लांगूलचालन न करणे, कोणत्याही कामाला नकार न देणे, मालकाने कितीही अन्याय अत्याचार केले तरी ते निमुटपणे सहन करणे, बेसूर आवाजाची खंत ण बाळगणे असे कितीतरी गुण मला या प्राण्यात पहावयास मिळतात. इतर प्राण्यासारखा बडेजाव मिरवण्याचे धाडस कधी गाढव करते का?
आणखी एक मुद्दा मला सुचतो. इतर सर्व प्राण्यांना जपावे लागते. गाढवाला कधी कोणी जपल्याचे ऐकले आहे का? त्याला कोणता डोस पाजावा लागत नाही. कोणते लसीकरण करावे लागत नाही. कधी निरमा वापरून आंघोळ घालावी लागत नाही. कधी रंगरंगोटी करावी लागत नाही. कोणते शिक्षण ध्यावे लागत नाही. हे सर्व असून देखील त्याने किमतीच्या बाबतीत मात्र कधीही तडजोड केलेली नाही. इतके सारे (अव) गुण असून देखील त्याच्या किमती मात्र गगनाला भिडलेल्या आहेत. नदीची वाळू असो, पाटी खोरे असो, भंगाराची पोती असोत, माणसे असोत फक्त वाहून नेणे हीच एकमेव जबाबदारी ते प्रामाणिकपणे करीत असते. कोणी मायेने पाठीवरून हात फिरवा, हौस करा, कोणी हाकलून ध्या त्याचा आनद दुख त्याला कधीच नसते. ते कधीही तक्रार करत नाही. मुळात त्याला भावनाच नसल्याने त्या दुखावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
एक मात्र नक्की त्याचा रुबाब साहेबासारखा नसला तरी त्याची तुलना मात्र साहेबाशी केली जाते. साहेबाच्या पुढे अन गाढवाच्या मागे कधी उभे राहू नये असे उगीच नाही म्हटले जात? त्यांच्या मुडवर त्यांचे काम असते. साहेब कधी काय बोलेल व गाढव कधी लाथ मारेल याचा नेम नसल्याने साहेबाच्या पुढे व गाढवाच्या मागे उभे राहताना ध वेळा विचार करावा लागतो. गाढवाला तुम्ही काहीही म्हणा ते तुमच्या विरोधात कधी तक्रार करत नाही. त्याला अब्रू असली तरी त्याची फारशी जाणीव नसल्याने ते तुमच्या विरोधात कधी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत नाही. त्याचा आपणास कोणताही त्रास नाही मग आपण त्याची काळजी नको का घ्यायला?
गाय, बैल, म्हैशी यांची काळजी आपण जशी घेतो तशी गाढवाची घेत नाही ही वस्तुस्थिती आहे. जनावरांना आपण गोठ्याच्या रूपाने निवारा करतो. दुष्काळात त्यांच्यासाठी छावण्या उघडतो. गाढवांना कधी तरी आपण अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देतो का? ते बिचारे काही करू शकत नाही. त्याला कोणत्या संघटनेचा आधार नाही की कोणते सुरक्षा कवच नाही.

तुम्ही गाढवाचे सूक्ष्म निरीक्षण करा. तुम्हाला अनेक गोष्टी दिसून येतील. एक म्हणजे बराचसा घोड्यासारखा दिसणारा हा प्राणी आकारमानाने घोड्यापेक्षा लहान असतो. शेपटीच्या टोकाला लांब केसांचा झुपका असतो. गाढवाची आयाळ ताठ आणि आखूड केसांची असते. अंगावर केसांचे दाट आवरण असते. रंग पिवळसर करड्यापासून गडद तांबूस अथवा तपकिरी रंगाच्या दरम्यान असतो. सामान्यत: नाक आणि पोटाकडील भाग फिक्कट असतो. खांद्याजवळ आणि चारही पायांवर काळे पट्टेही असतात.
गाढवांची गुजराण निकस चार्‍यावर आणि कमी पाण्यावर होत असते.गाढवाची मादी वर्षभरात प्रजननक्षम होते. गाढवांमध्ये वसंत ऋतूत प्रजनन होते. गर्भावधी सुमारे वर्षभराचा असतो. एका वेळी एकच पिलू होते. हेही लक्षात घेण्यासारखे आहे. गाढवाचा आयु:काल २५-४६ वर्षे इतका असतो.
गाढवे खूप वर्षापासून पाळली जात असावीत असा अंदाज आहे. सुमारे ३,००० वर्षांपूर्वीपासून ईजिप्तमध्ये ओझी वाहून नेण्यासाठी आणि सवारीसाठी गाढवांचा वापर होत आला आहे. काटकपणा आणि सहनशीलता या गुणांमुळे दुर्गम डोंगराळ प्रदेशात दूरवर ओझी वाहून नेण्यासाठी गाढवे अतिशय उपयुक्त ठरतात. प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीने काम करण्यात गाढवे प्रसिद्ध आहेत. ती रडगाणी कधी गात नाहीत. गाढवांसाठी ‘अ‍ॅस’ हा इंग्रजी शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो . डाँकी, मोक, जेनेट, बरो असे शब्दही अ‍ॅसच्या समानार्थी आहेत. त्यांचा वापर विशेषकरून स्थानपरत्वे होतो.
गाढव म्हणजे निर्बुद्ध, असा समजच समाजात असल्यानं, काही चूक झाल्यास "गाढव आहेस, तुला काडीची अक्कल नाही.' अशा शब्दात संभावना केली जाते. प्राथमिक शाळेत तर ढ विद्यार्थ्याची गणना गाढव म्हणूनच परंपरेनं केली जाते. गाढव हा प्राणी निर्बुद्ध तर नाहीच, उलट तो अधिक बुद्धिमान आणि माणसाच्या उपयोगाचा असतानाही, त्याच्यावर अन्याय होतो आहे.
बिचारं गाढव दिवसभर मालका-साठी मर मर मरतं. पाठीवरची मालाची-मातीची जड ओझी बिनतक्रार वाहून नेतं. काम संपल्यावर मालक त्याला सोडून देतो. ते उकिरडे फुंकत मिळेल ते खातं. त्याचा कुणाला, कधीच त्रास होत नाही. भारतीय लष्करात पर्वतीय प्रदेशात अरुंद पायवाटा असलेल्या ठाण्यापर्यंत शस्त्रापासून ते अन्नधान्यापर्यंतचा सारा पुरवठा गाढवांच्या जथ्यामार्फतच होतो. गाढव हा शिस्तबद्ध प्राणी आहे. गाढवांचं खिंकाळणं, त्याचं पाठीमागच्या लाथा उडवत धुमाकूळ घालणं एवढंच लोकांना माहिती असतं. पण, गाढवाचा उपयोग सध्याच्या यांत्रिक युगातही होतो, याचा विसर मात्र लोकांना पडतो. प्राचीन संस्कृत साहित्यापासून ते मराठीसह प्रादेशिक भाषेतही गाढवाचा समावेश लोककथात आवर्जून आहेच आणि त्याला निर्बुद्धच समजलं गेलं आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगातही गाढव म्हणजे निर्बुद्ध, असाच समज असल्यानं तिथल्या लोकभाषातही गाढवाची गणना मूर्ख प्राणी अशीच केली जाते. पण गाढव आज्ञाधारक असतं. ते मालकाची आज्ञा कधीच मोडत नाही. दिलेलं काम अर्धवट सोडत नाही. माणूस मात्र कामचुकारपणा करतो. दिलेलं काम अर्धवट सोडून देतो. टाळाटाळ करतो. अशा स्थितीत त्या आळशी माणसाला गाढवाची उपमा देणं, कितपत बरोबर ठरतं?
गाढवाचा उल्लेख प्राचीन काळापासून इतिहासात आणि विविध भाषातल्या साहित्यात सापडतो. इजिप्तची राजकुमारी-सौंदर्यवती क्लिओपात्रा दररोज गाढविणीच्या दुधानं आंघोळ करीत असे. आपलं सौंदर्य टिकवायसाठी सातशे गाढविणींचं दूध तिला स्नानासाठी लागत असे, असे उल्लेख आहेत. पाश्चिमात्य राष्ट्रात सौंदर्य प्रसाधनासाठीही गाढविणीच्या दुधाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तर असे हे गाढव. मलाच नव्हे तर साऱ्या मानव जातीला त्याच्याविषयी सहानुभूती वाटते. आजही आपण झाडे वाढवा झाडे जगवा या घोषवाक्याप्रमाणे गाढवे वाढवा गाढवे जगवा असे म्हटले तर त्यात वावगे काय?
प्रदीप जोशी,विटे
भ्रमणध्वनी ९८८११५७७०९