प्रतिबिंब
भाग ११
अचानक शेवंता अक्राळविक्राळ रुपात आरशात दिसू लागली. तिचा हात बाहेर आला आणि जाईच्या गळ्याला पकडायला पुढे झाला. पण तिला गळा पकडता येईना.
"फॅन निर्जीव आहे शेवंता. त्यावर अधिकार गाजवणे सोपे. काही अनीष्ट शक्तीही तुला साहाय्यभूत झाल्या असतील. पण सुजाण मनाला कह्यात घेणे फार सोपे नव्हे. शक्ती वाया घालवू नकोस. ह्या अहंकाराने बराच उत्पात माजवला आहे. आता पुरे.”फट्कन ती दिसायची बंद झाली.
“आता, मी तुझ्या मनाला, योग्य मार्गावर घेऊन जाणार आहे. निदान तसा प्रयत्न तरी करणार आहे. जशी तू या सर्व उत्पाताला निमित्तमात्र ठरलीस तसाच माझाही सहभाग निमित्तापुरताच आहे, हे मी जाणून आहे. मी माझ्या जीवाचंच दान टाकलंय. त्यामुळे मला मृत्यूची भीती दाखवू नकोस. ज्यांना तू मारलंस असं तुला वाटतंय, त्यांचे मृत्यू अटळ होते. दुसरे असे की, काहींना तू तुझ्या सापळ्यात अडकवू शकलीस. उदा. आप्पासाहेबाची पत्नी, माझ्या सासूबाई. मलाही प्रथम तू अडकवलेस. माझ्याच मनात शिरून मलाच कैद करण्याचा प्रयत्न केलास, पण तुझे आणि माझे सौभाग्य, ते फार काळ टिकले नाही. या घराण्याच्या पुरूषांचा अट्टाहास सोड. मार्गस्थ हो. मनुष्य जन्म केव्हा मिळेल कोण जाणे पण प्रथम या योनीतून सुटका करून घे. ज्या योनीत मिळेल त्या योनीत जन्म घे. पण परत मर्त्ययोनीत ये. स्वत:च्या मनापासून ते सूक्ष्म शरीर मुक्त कर. आपोआपच, त्याबरोबरच्या इच्छा तुला पुढे जाण्यात अडथळा बनणार नाहीत. सूडभावनेपासून मनास मुक्ती दे. तुझ्या पवित्र आत्म्याचा शोध घे. वरील दोन गोष्टी केल्यास तर तो तुला मिळेलच असे मला वाटते. हे करणेही तसे सोपे नाही. पिळ घट्ट आहे. जाळून टाकलास, मुळापासून उपटलास तरच मुक्ती मिळेल. नाहीतर परत परत फिरून गुंतत जाशील. आतापर्यंत आमचे घर होते धरून ठेवायला. पण आता ना हा वाडा उरणार ना आम्ही. काही वर्षात आम्ही दोघे जाऊ. किंवा तू आम्हाला संपवशील, जर योग तसाच असेल तर. पण मग तुझी अवस्था दोर तुटलेल्या पतंगासारखी होईल. अधिक अधिक भरकटत जाशील." शेवंता गरागरा जाईभोवती फिरू लागली. भयंकर आवाज काढू लागली. पण ते जाईला घाबरवण्यापेक्षा, तिची अगतिकताच दर्शवत होते. हे प्रथमच घडत होते की, दुसरे कोणी तिच्या मनावर काही बिंबवू पहात होते.
"नुसत्या मनाच्या इच्छेला आणि तिच्या पूर्ततेला काय अर्थ आहे? मर्त्य योनीत प्रवेश कर, जिथे इच्छेचा उपभोग घ्यायला शरीर असेल. तुझ्यासाठी मी, आता त्या सर्वव्यापी शक्तीस आवाहन करून प्रार्थना करणार आहे. तू त्यात सहभागी झालीस तर उत्तमच. नसेल शक्य तर अडथळा बनू नकोस." असे म्हणून जाईने पद्मासन घालून मन एकाग्र केले. शेवंताचा धीर सुटू लागला. पुढच्या अनोळखी प्रवासाची धास्ती वाटू लागली. मन आहे त्यालाच घट्ट धरून ठेवण्यास आसुसले. तिने जाईला यातून उठवण्याचा आणि परत कह्यात घेण्याचा चंग बांधला.
यश कितीतरी वेळ, कॉन्फरन्स कॉलमधे बिझी होता आणि तो तसाच रहावा अशी प्रार्थना सोफी करत होती. जाईला तिने प्रॉमिस केले खरे, पण आपण कसे यशला थांबवणार, हे काही तिला समजत नव्हते. पण लवकरात लवकर काही करणे गरजेचे होते. मग तिने भराभर काळजी बाजूला ठेवून डोकं वापरायला सुरवात केली. बरेच नवे क्लायंट्स, यशबरोबर मिटींग करण्याची वेळ मागत होते. त्यातल्या काही प्रॉमिसींग क्लायंट्सना तिने ‘प्रत्यक्ष भेट होणे कठीण आहे एवढ्यात, पण आज फोनवर भेटतील’, असे सांगितले. ‘फ्री झाले की मीच फोन जोडून देईन’, असेही सांगितले. संध्याकाळचे पाच वाजत आलेच होते. दोन कॉल्स म्हणजे किमान दीड दोन तास. मग तिने एका खूप महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या माणसाबरोबर डिनर मिटींग फिक्स केली. याची बायको यशवर लटटू होती. यशला तिचा तिटकारा होता. त्याचे इन्व्हीटेशन यशला मेल केले आणि तो अॅक्सेप्ट करतोय असा मेलही. तो वाचल्यावाचल्या फोनवर बोलताबोलताच यश खुर्चीत उभा राहीला आणि रागारागाने सोफीकडे पाहू लागला. तिने खांदे उचलून अगतिकता व्यक्त केली आणि आज येण्यासाठी त्या माणसाने अल्टीमेटम दिल्याचे यशला मेलवर सांगितले. मग गडबडीने जाईला निरोप दिल्याचेही सांगितले. चला, म्हणजे रात्री ११पर्यंत तरी चिंता नव्हती. पुढचे पुढे पाहू. असा विचार करून, यशचा चालू फोन कॉल संपण्याची ती वाट पाहू लागली.
सोफी, गरीब ख्रिश्चन कुटुंबातील मुलगी. ग्रॅज्युएट झाल्याझाल्या, यशच्या ऑफिसमधे नोकरीला लागली. जोसेफच्या, यशचं ऑफिस सुरू झाल्यापासूनचा त्याचा सेक्रेटरी, ओळखीने आली, म्हणून यशने नोकरीला लावून घेतली. पण लवकरच ती अॅसेट बनली. एक तर तिला नोकरीची अत्यंत गरज होती. काम शिकून घेण्याची आवड होती. मग जाई आली आणि सोफीने लवकरच तिचेही मन जिंकले. लहान मुलासारखा निरागस स्वभाव, कामात हुशारी आणि उत्साह, आणि या दोघावर प्रचंड भक्ती. जाईला या आणीबाणीच्या क्षणी तिची आठवण येणे अगदीच स्वाभाविक होते.
प्रथम, जाईला आपल्या अंगभर मुंग्या फिरताहेत, असा भास झाला, पण अनुभवाने हे काय आहे हे जाणून तिने दुर्लक्ष करत, परत मन एकाग्र केले. काही वेळाने तिला सर्व अंगभर आग होवू लागली. ती ही जाणीवपूर्वक मनावेगळी करत तिने परत एकाग्रता साधली. काही काळाने अनेक हिंस्त्र श्वापदांचा, आसपास फिरण्याचा, ओरडण्याचा आवाज येऊ लागला. तरीही ती बधत नाही म्हटल्यावर तिला खोलीत पाणी शिरत असून ते वरवर चढत पार गळ्यापर्यंत आल्याचा भास होऊ लागला. काही क्षण जाईला आपला जीव जाणार असे वाटले. श्वास गुदमरतोय, असं वाटू लागलं. मन निश्चयापासून हटू लागले पण मग ती तयारी केलीच होती मनाची असा विचार करून तिने एकाग्रता कायम केली. जाईला मनाची एकाग्रता टिकवून ठेवणे जेवढे जड जाऊ लागले तेवढाच तिचा निश्चय पक्का होत चालला. हे सर्व भास निर्माण करेपर्यंत शेवंताची शक्तीही संपत चालली. तिची अस्तित्वासाठीची धडपड, कित्येक पटींनी वाढली. रात्र चढत होती.
डिनर मिटींगही संपण्याच्या मार्गावर होती. यशने सोफीवर कधी नव्हे ते तोंडसूख घेतले होते, पण ते अपेक्षितच होते. या माणसाच्या लोचट बायकोचा त्याला किती पराकोटीचा तिटकारा आहे हे ती जाणून होती. पण इतका वेळ तरी प्रॉमिस टिकवून ठेवले याचा आनंद होता. पण आता पुढे काय? तरी डिस्कशन्स लांबवत तिने बारापर्यंत ही मिटींग ताणली होती.
यश सारखे घड्याळ पहात होता. शेवटी त्याने जाईला फोन करण्यासाठी मोबाईल उचलला, तेव्हा सोफी पट्कन म्हणाली, ‘तासाभरापूर्वीच आमचे बोलणे झाले. जाई लवकर झोपते म्हणालीय’.
त्याला जरा आश्चर्य वाटले. ‘मला कसा नाही केला फोन? झोपली असेल आता, नको डिस्टर्ब करायला,’ असा विचार करून तो गप्प बसला.
मिटींग संपवून दोघे निघाले.
“सोफी तुला घरी सोडून मी पुढे जातो. एवढ्या रात्री टॅक्सीने नको,” यश म्हणाला.
तिचा जीव भांड्यात पडला. नाहीतरी ती म्हणणारच होती, ‘मला घरी सोडा बॉस.’
जसजसं तिचं घर जवळ येऊ लागलं, तसतसं तिला काही सूचेना. ‘आता काय करावं? कसं थांबवावं?’
तिची बिल्डींग आली. यशने गेटमधून आत गाडी घेतली. मग म्हणाला “वर पोचलीस घरात की कॉल कर, मग मी जातो.”
‘आता काय करावं, कसं थांबवावं’ असा प्रश्न पडला. मग म्हणाली "मला जाईबद्दल जरा बोलायचय."
यशचे डोळे बारीक झाले. "जाईबद्दल काय?"
“इज शी ऑलराईट?"
"का, असं का विचारतेस? " आणि मग तिने सरळच तिचे जाईबरोबर झालेले बोलणे त्याला सांगितले.
यशच्या चेहऱ्यावर, आश्चर्य, संताप, काळजी, हजार भावना उमटल्या आणि पुढे एक क्षणही न थांबता त्याने सोफीसकट गर्रकन गाडी वळवून रस्त्याला लागला.
"सोफी, तुझी ही मैत्रिण मला एक दिवस वेडं करणार. काय चाललय तिच्या डोक्यात? काही कळत नाही मला. मला परत एकदा तुमचं बोलणं नीट सांग."
जाई एकाग्रतेच्या परमबिंदूपर्यत पोहोचू लागली. शेवंता निकराने तिचा निश्चय मोडण्याचा प्रयत्न करू लागली. मधेच घरात काही धडाधडा पडण्याचा आवाज आला. पाठोपाठ धरणीकंप व्हावा तसा सगळा जमिनीपासून भिंतींचा भाग हादरू लागला. जसजशी जाई एकाग्रतेच्या टोकावर पोचत होती, शेवंता हवालदिल होऊन उत्पात माजवण्याच्या हेतूने आभास निर्माण करत होती. जाईचे मन त्यात गुंतते, तर तो आभास खरा ठरला असता. पण तसे न होता शेवंताचे मन गाठी सोडू लागले. शेवंता पार हादरून गेली.
यशने गाडीचा स्पीड जराही कमी न करता सोफीचे बोलणे नीट ऐकले. ‘आमच्या जीवन मरणाचा प्रश्न? म्हणजे काय?’ त्याचा श्वासोच्छवास जलद गतीने होऊ लागला. सोफीच्या कानफटात मारावी अशी इच्छा झाली त्याला. पण शेवटी तिच्यामुळे आत्ता तरी कळले होते. ‘युज युवर चार्म? हेच ओळखलस का मला जाई? मनात खोल एक कळ उमटली.’ गाडी आता काही मिनिटांच्या अंतरावर होती घरापासून. यशला ती तासांएवढी वाटत होती.
जाई एकाग्रतेच्या परमशिखरापर्यंत पोहोचली. इथे सर्व शांत होतं. साधा एक तरंगही नव्हता. तिला आपले सर्वच पूर्वज एकत्रच दिसू लागले. आणि शेवंताही. जणू नाटक संपल्यावर नायक, खलनायक, सगळेच एकत्र बसून चहा पितात तसे. आत्म्याला काळवेळाची बंधने नसतात, भौतिक अंतराची बंधने नसतात, हे वाचलेल्याचा अर्थ प्रत्यक्षात दिसू लागला. तिच्यातील मूळ शक्तीतत्त्व आणि इतरांतील शक्तीतत्त्व एकच आहे याची आतून जाणीव उमलली. शेवंताविषयी फक्त अपरंपार प्रेमाने मन भरून आले. त्याच क्षणी कैदाशिणीसारख्या भडकलेल्या शेवंताने करकचून जाईची मान आवळली. जाईच्या मन:स्पर्शाने शेवंता शांत शांत होत गेली. तिचा सर्व द्वेष, संताप, मत्सर क्षणात कुठल्या कुठे भिरकावले गेले.
सगळे आभास संपले. मनाला चिकटलेले हे सर्व थर नाहीसे होताच, शुद्ध स्वरुपातील मन पंचतत्त्वात विलीन होण्यास आसुसले. पहाता पहाता विलीन झाले. तिच्या अस्तित्वाची शेवटची खूणही शिल्लक राहू नये असा संकेत असावा. ती विलीन होत असतानाच यश धाडकन् दरवाजा तोडून आत आला. त्याचबरोबर त्या आरशाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. त्याने आत येताच जाईला असे बसलेले पाहिले. तो चट्कन तिच्याजवळ गेला. तिने हात वर केला. त्याच्या हाताच्या सहाय्याने ती उभी राहिली. कित्येक तास पद्मासनात बसल्याने, भौतिक शरीर कुरकुरू लागले होते. पण तिच्या चेहऱ्यावरचे शांत, समाधानी, आनंदी भाव पाहताना, तो आश्चर्यचकितही झाला आणि आश्वस्तही झाला. पूर्वीची, आपली जाई परत मिळाल्यासारखं वाटलं त्याला. पाठोपाठ आलेल्या सोफीला पूर्ण विसरून त्याने जाईला मिठीत घेतले. जाईही कोणत्याही भयाशिवाय कित्येक दिवसांनी त्याच्या मिठीत विसावली.
मग हाताने खूण करून तिने सोफीला जवळ बोलावले आणि म्हणाली "थॅंक यू सोफी".
मग अचानक यशला आठवले, तो डोळे फिरवत म्हणाला "येस, थॅंक यू सोफी, फॉर नॉट युजींग युवर सो कॉल्ड चार्म".
सगळेच हसू लागले. कित्येक दिवसांनी जाईच्या खळखळून हसण्याने घर आणि यशचे मन भरून गेले.
सकाळी शेजारची चिमुरडी शिरीन सांगत आली, "आन्टी, माझ्या गच्चीत बुलबुलने घरटं केलं होतं ना, त्यातल्या अंड्यातून बेबी बुलबुल बाहेर आलं." जाईच्या ओठांवर एक वेगळंच हसू उमटलं.
__समाप्त__