अचानक भेटलेले मित्र आणि आठवणी
कधीतरी मार्केटमध्ये चुकून एखादा मित्र - मैत्रीण भेटते.
नजरानजर होते आणि मन कनेक्शन्स शोधायला लागत.
जुन्या कंपनीतला, शाळेतला, गावाकडचा की कॉलेजमधला मन विचार करायला लागत.
चेहरा तर ओळखीचा वाटतो पण बहुदा नाव विसरलेलं असतं.
मग आपसूकच कॉलेजच्या रंगीबेरंगी आठवणी जाग्या होतात...
कॉलेजचे सुरुवातीचे मयुरपंखी दिवस...
सारखं आरश्यात पाहणं अन हेयर स्टाईल सावरणं...
मुलींशी बोलताना कचरणारा स्वभाव...
अन नंतर आलेला थोडासा धीटपणा...
कँटिनमधला वडापाव... टी कॉर्नरचा चहा...
बागेतल्या गप्पा... लायब्ररीतला दंगा...
कुणाशी खुन्नस... तर कुणाशी पंगा...
रूमवर केलेला मित्राचा वाढदिवस...
हिसकावून खाल्लेला केक...
रडेस्तोवर बसलेले बर्थडे बम्पस...
चोरून पाहिलेला पहिला अडल्ट पिक्चर...
ते ऑकवर्ड फिलिंग... ती चोरलेली नजर...
कॉलेजमधल्या मुली.. अन क्लासमधला सॉफ्ट कॉर्नर...
लेक्चर्सला बंक मारणं... बाहेर पोरी पाहत हुंदडणं...
तिच्या मागे कधी कॅन्टीन तर कधी लायब्ररी...
तिच्याकडे चोरून नकळत पाहणं...
अन तिनं पाहिलं कि, नजर फिरवणं...
लॅबमधल्या गमती... अन प्रॅक्टिकल्सची धांदल...
रात्र रात्र जागून केलेला अभ्यास...
कधी कधी एटीकेटी तर कधी तडीपार फर्स्टक्लास...
नकळत मन फ्लॅशबॅक मध्ये जाऊन येतं...
मग आठवतात कॉलेज नंतरचे दिवस...
जॉब मिळवण्यासाठीची धडपड...
इंटरव्हिव-साठीची पळापळ...
ऑफीसचा वर्क लोड...
लेट नाईट कामं...
अन्युअल फंक्शन्स...
कधी मित्रांबरोबरच्या लेट नाईट ड्रिंक पार्ट्या...
मग पुन्हा कॉलेज, पुन्हा जुने मित्र,
अन तिच्या सुप्त आढवणींनी डोळ्यांत आलेलं पाणी...
तिचं हसणं...
तिचं रुसणं...
तिचं चालणं...
तिचं बोलणं...
तिची नजर...
तिची फिगर...
तिचे तांबूस काळे रेशमी केस...
तिची धनुष्याकृती भुवई ...
तिचे काळेभोर डोळे...
अन गालावरची खळी...
तिच्या आठवणीत रात्र कधी सरून जाते, कळतंच नाही.
काही वर्षांत मग लग्नाच्या मुहूर्ताचे दिवस येतात.
मुलं मुली पाहण्याचे कार्यक्रम...
चहा - पोह्याची संगत...
कधी होकार तर कधी नकार...
कधी आशा, कधी इच्छा..
मग लग्नाचा बस्ता...
कुणाचा आहेर तर कुणाला मानपान...
त्या स्वप्नील रात्री...
फोनवरचं अगणिक बोलणं...
एक अनामिक हुरहूर...
ते चोरून भेटणं...
नकळत जडलेली ओढ...
अन मनाची चलबिचल...
एका वेगळंच विश्व...
मग घोड्यावरची वरात...
कधी डीजे तर कधी बेंजो...
अंतरपाट पडायची वाट...
हार घालायची लगीनघाई...
मग शुभमंगल सावधान...
अन प्रतिक्षेची मधुचंद्राची रात्र...
तो पहिला स्पर्श...
अंगावरचे शहारे...
तो उत्साह, तो जोश...
तो आवेग, तो रोमांच...
घाबरत मारलेली मिठी...
अन पहिलं वहिलं चुंबन...
ते सारं काही औरच...
कॉलेज सोडून आता दहा बारा वर्षे झालेली असतात.
विस्मृतीत गेलेले मित्र... अन दुरावलेल्या भेटी...
मागे लागलेला संसार... डेली बसलेलं रुटीन...
बायकांची कटकट... घरातली धुसफूस...
नियंत्रणात आलेला राग, जोश,...
कमी झालेला अहंभाव... अन बऱ्यापैकी आलेला संयम...
सुरवातीला आई बापाची उडणारी धांदल आता कमी झालेली असते.
चालू झालेली मुलांची शाळा...
कुणाची पहिली दुसरीत...
तर कुणाची बालवाडीत...
छे हो ! बालवाडी मागं पडलं!
आता नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी...
पुरुषांचं ऑफिस...
स्त्रियांचं घर / काम...
सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित नियोजन...
बायकांची शॉपिंग...
अन कंटाळलेले नवरे...
कधी मुव्हीज तर कधी विकेंडसचे प्लॅन्स...
चकाचक मॉल्स अन नको ती फंक्शन्स...
तरीही अधून मधून फेरफटका ठरलेलाच...
मुलांच्या शाळेच्या फी...
घरखर्च अन घराचे इएमआआय...
एलआयसी अन पोलिसीजचा ताळमेळ...
विनाकारण खर्चांवर घातलेली बंधनं...
अन कळायला लागलेलं पैशांचं नियोजन...
कुणाची नौकरी... तर कुणाचा धंदा...
प्रत्येकाचं बसलेलं एक पक्क रुटीन...
कुणाची ऑफिसची कंटाळवाणी कामं...
तर कुणाची पहाटेपासून पळापळ...
सुटलेल्या ढेऱ्या अन फुगलेले गाल...
चालण्या बोलण्यात आणि वागण्यात,
आलेलं एक प्रकारचं वेगळेपण...
मग कधीतरी चुकून पुन्हा एखादा कॉलेजमधला मित्र भेटतो...
मग पुन्हा जाग्या होतात, कॉलेजच्या आठवणी...
जुन्या मित्रांना भेटायची इच्छा...
अन अजून पर्यंत जपून ठेवलेली मनातली गुपितं...
जीवन क्षणभंगुर आहे हो. पैसा, घर, कामं, बायका, पोरं, नवरा, सासू - सासरे, नातलग हे चालूच असत.
तसंच मैत्रीच नातंही टिकवलं पाहिजे. मैत्री नकळत होऊन जाते. पण तिला जपणं महत्वाचं असतं.
नाहीतर दुरावा वाढतो, अन एकदा दुरावा वाढला, कि संवाद संपून जातो.
मग मित्र मैत्रीण कुठं हरवून जातात, आपल्यालाही कळत नाही.
म्हणून मैत्री जपा. त्यासाठी आपल्या मित्रांना भेटत चला.
एखाद्या बागेत, मंदिरात, हॉटेलात, कुठेही भेटा.
बोला, भांडा, खळखळून हसा.
चेष्टा करा, मस्करी करा.
सुख दुःख शेयर करा.
कुणीतरी म्हटलंय ना ,
दुःख वाटल्याने कमी होतं अन आनंद द्विगुणित होतो.
जीवनात कुणी जरी साथ नाही दिली, तरी मित्र शेवटपर्यंत आपल्याला साथ देतात.
- ईश्वर त्रिम्बकराव आगम
वडगांव निंबाळकर, बारामती