" मराठी छान बोलतोस तू .. म्हणजे इथला या गावातला वाटतं नाही " सईने मागूनच आकाशला विचारलं. अजूनही ते त्या डोंगरावरच बसलेले होते.
" Actually, मला माहीतच नाही मी कुठला आहे ते... " आकाश तिच्याकडे न बघताच बोलला.
" अरे व्वा !! इंग्लिश शब्द सुद्धा माहित आहे का .. very good .. पण नक्की राहतोस कुठे तू... " ,
" सांगतो, आता पुढे जाऊया. तुम्ही तुमच्या वाटेने... मी माझ्या वाटेने.. " ,
" अरे !! आम्हाला आणखी फोटो काढायचे आहेत.. असा कसा जातोस सोडून.. by the way... कुठे निघाला आहेस.. ",
" माहित नाही... पाय जातील तिथे... चला निघूया.. पावसाला सुरुवात झाली कि अवघड होईल उतरणे. " आकाशचं बोलणं बरोबर होतं. म्हणून सईचा ग्रुप त्याच्या मागोमाग खाली उतरला.
" आज राहण्याची सोय कुठे करावी... गावात तुझी ओळख असेल ना.. " सईने हळूच विचारलं त्याला.
" मी गावात राहत नाही जास्त. या पाठीवरच्या बॅगमध्ये एक तंबू आहे. त्यात राहतो कधी नाहीतर हे आहेत ना पडके वाडे, किल्ले... त्यात जाऊन रात्रीचा झोपतो... दिवसा फिरत असतो... तुमच्याकडे नाहीत का तंबू वगैरे. " आकाशने उलटं प्रश्न केला.
" आहेत... आणले आहेत.. पण कसे उभं करतात ते माहित नाही.. तुला येते ना... करशील मदत.. " सईने विनंती केली.
" करिन... मला येते ते .. पण आधी एका सपाट जागी जाऊया. कारण ते आताच उभे केले पाहिजे. नंतर संध्याकाळ झाली तर पुन्हा अडचण... इथे गावात आणि पावसाळ्यात तरी काळोख लवकर होतो. शिवाय पाऊसहि सुरु होईल एका तासाने... तर " ,
" how he knew that ?? " एका मुलीने कुतूहलाने विचारलं. सगळे खाली उतरत असताना गप्पा मारत होते.
" पाऊस आणि मी... कधी पासून एकत्र आहे माहित नाही... पावसातल्या गप्पा... वेगळ्याचं असतात ना !! कधी कधी काय बोलतो , कोणाशी बोलतो तेच कळत नाही पावसात. पावसाचा आवाज कानात घुमायला लागला कि वारं भिनते अंगात. घोड्यासारखं उधळून धावावे, वाऱ्यासोबत शर्यत करावी असं वाटून जाते कधी नाही ते. पावसाच्या थंड थेंबाचा स्पर्श झाला कि भलतीच शिरशिरी येते अंगात. जसा जसा पावसाचा जोर वाढत जातो, तसा तसा "तो" अंगात भिनतो नुसता. मग कोणाचं का ऐकावं.. सैरावैरा पळू लागते मन, शरीराच्या पुढे धाव घेते मन. पावसाच्या कविता , चारोळ्या, कथा... सगळं सगळं... कसं ओसंडून वाहू लागतं मनातून... डोळ्यातून, मनातून , अंगा-खांद्यावरून, चहाच्या पेल्यातून, पागोळ्यातून, डबक्यातून, चिखलातून, तुटक्या छत्रीतून ... फक्त आणि फक्त "पाऊस" च बाहेर येऊ लागतो. मीही मग स्वतःला थांबवत नाही...त्यात मिसळून जातो ... आणि एका क्षणाला , मी स्वतःच पाऊस होऊन जातो... " आकाश छान बोलला. बोलता बोलता कधी खाली आले ते कळलंच नाही...
" एक मिनिट !! " सईने थांबवलं आकाशला. " तिने तर इंग्लिश मध्ये प्रश्न केला ना... मग तुला कसं कळलं ते... तुला फक्त इंग्लिश शब्दच नाही ... तुला पूर्ण इंग्लिश कळते ना... सांग ना.. कळते ना.. " सईची उत्सुकता वाढली.
" हो... सांगतो.. पहिलं तंबू उभारून घेऊ... " आकाशने त्याच्या सॅक मधून तंबू बाहेर काढला. आणि पुढच्या १० मिनिटांत उभा राहिला सुद्धा तंबू. बाकीचे तर तंबू बाहेर काढतच होते अजून.
" superman आहेस का तू... " सई हसत म्हणाली.
" येतो पट्कन मला उभा करता.. एक काम करूया.. दुपार झाली आहे.. मी खाली गावात जाऊन काही जेवणास मिळते का ते बघतो... पाऊस येण्याआधी... तोपर्यंत तुमचं होईल असं वाटते... " आकाशने बॅग पाठीवर लावली. आणि हसत हसत निघून गेला. सई आणि तिचे मित्र तंबू उभे करण्यात गुंतले.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
" अगं सुप्री... काय बसून आहेस नुसती... काम कर जरा... " आकाशने तिला दुरूनच आवाज दिला. आकाश पाण्यात उभा होता. सुप्री किनाऱ्यापाशी बसून होती कधीची.
" मला हाक मारतो आहेस का... " सुप्रीने उलट प्रश्न केला. हातातली पाण्याची बाटली त्याने एका ठिकाणी ठेवली आणि आकाश पाण्याबाहेर आला.
" या नदीच्या दोन्ही बाजूंना बघ आणि कसं वाटते ते सांग. " सुप्रीने पाहिलं.
दूरवर पसरलेला किनारा. एका ठिकाणी , किनाऱ्याला लागलेली तुटकी होडी... त्यावर बसलेले दोन - चार कसलेशे पक्षी... दुसऱ्या बाजूला , नजर जाईल तोपर्यंत झाडं-झुडुपं.. किनाऱ्यावर लहानशे दगड सगळीकडे.. आणि थंड हवा.
" किती छान वाटते ना इथे... शांत शांत.. " सुप्रीला शहारून आलं.
" हो ना... मग आपल्या दोघांशिवाय कोणी आहे का इथे.. संजना आणि बाकीचे कधीच गेले ना.. ",
" हो... माहित आहे मला... ",
" आणि सुप्री तुझंच नाव आहे ना...मग कसले फालतू प्रश्न विचारतेस... पाणी भरायचं आहे.. चल ना लवकर... " आकाश पुन्हा पाण्यात जाऊ लागला.
" बस ना रे.. जरा शेजारी.... कुठे वेळ मिळतो आपल्याला आता... किती छान वातावरण आहे ना... त्यात तुला कामाचं पडलंय ... गणू शप्पत नाही देणार त्रास... प्लिज बस ना खाली... " आकाश तिच्या शेजारीच बसला. सुप्री त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेली. किती वेळ तसेच बसून होते दोघे..
" सुप्री... सुप्री... झोपलीस का... सुप्री... " आकाशने आवाज दिला. सुप्री भानावर आली. समोर तसाच नदीकिनारा.. फक्त हाक मारणारी संजना होती. आकाशच्या आठवणीत गेलो होतो आपण. सुप्रीच्या लक्षात आलं. त्याचवेळेस तिला विजेचा अस्पष्ट असा आवाज आला तिला. दुपारचे १२ वाजून गेलेले, तरी दूरवरून काळे ढग येतं असल्याने काळोख होतं होता. पुन्हा पावसाची चाहूल लागलेली. " चला निघूया... पाऊस सुरु होईल परत.. " सुप्री बोलली. आभाळात पाहिलं. " अर्धा-पाऊण तास आहे आपल्याकडे... तोपर्यंत जेवणाची व्यवस्था करायला हवी. " सुप्रीनेच पुढाकार घेतला. थोडेच पुढे आले असतील. एक जोडपं उभं होतं बोलत. त्यांच्या बाजूनेच गेल्या तिघी. अचानक सुप्री थांबली. त्या दोघांजवळ आली.
" एक मिनिट !! तुम्ही काहीतरी बोललात ना हिला... " त्या मुलाकडे पाहत सुप्री बोलली.
" अहो... काही वाईट नाही बोललो... स्तुती करत होतो तिची... " मुलगा घाबरला.
" तसं नाही... तुम्ही एक वाक्य बोललात पावसाबद्दल.. ते ऐकून थांबली मी.. " ,
" काय झालं सुप्री... हा बोलला का तुला काही... " संजना त्या मुलाकडे रागात बघू लागली.
" नाही ताई... खरंच मी काही बोललो नाही यांना.. " सोबतची मुलगी हि घाबरली.
" अरे !! ... पावसाबद्दल काय बोलतात तुम्ही.. ते सांगा.. " सुप्री भरभर बोलली.
" काही नाही... हि नवीन आहे इथे.... तिला पाऊस बघायचा होता म्हणून आणलं. " ,
" हो.. मग काहीतरी बोललात ना तिला... ते ऐकलं म्हणून थांबली मी. ".... सुप्री.
" हो.. पाऊस बघितला आहेस का कधी... हे असं एवढंच बोललो. " त्या बोलण्यावर सुप्रीचा चेहरा विचारात पडला.
" याचा अर्थ माहित आहे का तुम्हाला.. " सुप्रीचा पुढचा प्रश्न.
" हो... तो काय पाऊस येतो आहे दुरून... इथे पाऊस नाही आणि तिथे पाऊस... दोन ऋतू एकाच वेळेस... " सुप्रीने वळून पाहिलं. खरंच तसं होतं. त्या उभ्या होत्या तिथे थोड़ का होईना ऊन होते, आणि दूरवर पाऊस येताना दिसत होता.
" काय झालं सुप्रिया.. " कोमलने विचारलं. सुप्री वेगळ्याच विचारात.
" हे तुम्हाला माहित होतं का ... कि कोणी सांगितलं " सुप्रीची अवस्था वेगळी झाली होती. तो मुलगा आणखी घाबरला.
" सांगा ना... कोणी सांगितलं हे सर्व... " सुप्रीचा आवाज जड झालेला.
" तो भटक्या आलेला ना गावात... तो बडबड करायचा असंच काही... एकदा त्याला विचारलं काय असते ते... तेव्हा आम्हा पोरांना घेऊन त्याने असं दाखवलं होतं. आणि बोलला, असा बघायचा असतो पाऊस.. " एवढा वेळ धरून ठेवलेले अश्रू मोकळे केले सुप्रीने. कोमल , संजनाने तिला एका बाजूला आणलं.
" काय झालं अचानक रडायला आणि त्याला एवढं काय विचारत होतीस. " संजना....
" आकाश !! " सुप्रीच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला.
" काय ? ".... कोमल..
" हे असं संभाषण फक्त आकाश आणि माझं होतं... 'पाऊस बघायला' तोच घेऊन जायचा मला... त्याच्याशिवाय असा विचार कोणीच करू शकत नाही. " सुप्री रडतच बोलत होती.
" म्हणजे भटक्या हाच आकाश आहे ... असं वाटते का तुला... " ....कोमल
" माहित नाही... पण वाटलं क्षणभरासाठी.. " सुप्रीने डोळे पुसले. " चला... जेवणाची तयारी करायची आहे ना... चला पाऊस येण्याआधी.. " पटापट निघाल्या तिघी. सुप्री-संजना मिळेल ते खाद्य घेऊन निघाल्या. कोमल , भटक्या संबंधी आणखी माहिती मिळते का ते बघायला पुढे गावात गेली.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश: