पोस्टाचा चेहराच पूर्णपणे बदलून गेला आहे
बऱ्याच वर्षांनी पोस्टात काही कामानिमित्त जाण्याचा योग आला. आवारात जाता क्षणीच मी अवाक झालो. पोस्ट इतक्या झपाट्याने बदलेल असे स्वप्नात देखील वाटले न्हवते. काळानुरूप पोस्ट बदलले हे पाहून मला देखील खूप बरे वाटले. जी कार्यालये कितीही डिजिटलायझेशन झाले तरी बदलणार नाहीत त्यापैकी पोस्ट असा काहींचा समज होता मात्र तो आज पूर्णपणे खोटा ठरला आहे.
ग्रामीण व्यवहारात सर्वात जवळचा संपर्क असलेले कार्यालय म्हणजे पोस्ट. खेडेगावात तर पूर्वी पोस्टमास्टरचा रुबाब काही आगळा वेगळा होता. गावच्या समस्या सोडवण्यात विकास करण्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. माझे वडील पोस्ट खात्यात सेवेला होते. आमची ठिकठिकाणी बदली होत असल्याने मी बहुसंख्य टपाल कार्यालये प्रत्यक्ष पाहिलेली होती. वडील पोस्टमास्टर असल्याने आम्ही बिनदिक्कत पणे वेळ मिळेल तेंव्हा पोस्टात जात असू. त्यावेळी स्टाफ देखील कमी असे. पोस्टमास्टर, क्लार्क, असला तर एखादा शिपाई अशी रचना. एकाच खोलीत सर्वजण. तिथेच फोन, तार सुविधा. एकाच खिडकीत पार्सल, पोस्टकार्ड, पाकिटे, मनिऑर्डर याचे व्यवहार.
फोनची खणखण, तारांचा कडकडाट, सारे बोलणे पोस्ट व्यवहाराविषयी. कोणतेही हास्य नाही विनोद नाही , सारे वातावरणच गंभीर. कोण तार लिहून घेण्यासाठी, कोण पत्र वाचून घेण्यासाठी, कोण आपल्या पत्राच्या प्रतीक्षेत येथे ये जा करीत असे. गावात एकच पोस्टमन तोही पायी चालत टपाल वाटप करीत असे. त्याला गावची रेघ ना रेघ माहीत असे. महिन्याच्या पावत्या फायलिंग करून ठेवण्याचा प्रकार त्यावेळी होता. सारे व्यवहार लिखित स्वरूपात होते.
काळ बदलला पोस्ट रचना देखील बदलली. एका खोलीतून अध्ययावत इमारतीत पोस्ट कार्यालये गेली. अत्याधुनिक सुधारणा झाल्या. सर्व व्यवहार डिजिटल झाले. कर्मचारी वाढले. प्रत्येकापुढे संगणक आले. लेखनाचे काम थांबले. पूर्वी पोस्ट कर्मचारी म्हणजे राब राब राबणारा व कमी वेतन घेणारा अशी झालेली प्रतिमा आज पुसली जात आहे. आमचे मिस्टर पोस्ट मास्टर आहेत असे बायका मोठ्या प्रौढीने सांगू लागल्या आहेत. आजकाल पोस्ट कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील त्रासिकपणा कमी झाला आहे. पोस्ट ऑफिस हसत खेळत झालं आहे. मोबाईल मुळे तारा, फोन यंत्रणा जवळजवळ बंद झाली आहे. स्पीडपोस्ट, बचत खात्याच्या विविध योजना, एटीएम सुविधा, ऑनलाईन व्यवहार यामुळे पोस्ट समाजाभिमुख झाले आहे.
अगदी ग्रामीण भागात देखील पोस्ट सुविधा उपलब्ध झाली आहे. पोस्टमन सायकल, मोपेड वरून टपालचे वाटप करीत आहे. या कर्मचारी वर्गाला एक दर्जा प्राप्त झाला आहे. असे असले तरी प्रेमपत्राची ती आतुरता मात्र कमी झाली आहे. पत्र माध्यमातून जो जिव्हाळा होता तो संपला आहे हे मात्र खरे!
पूर्वीचा एक काळ होता. पोस्टल सिस्टीम खरे तर ब्रिटिशांनी सुरू केली. पोस्टमनला पत्राचा बटवडा पायी चालत जाऊन करावा लागत होता. त्यानंतर घोड्यावररून टपाल वाटप केले जाऊ लागले. जंगलातून जाताना पोस्टमनला हिंस्र प्राण्यांचा धोका होता तो टाळण्यासाठी विशिष्ट वाध्ये वाजवली जात होती. वाध्ये वाजवणाऱ्या व्यक्तीला दुगदूगिवाला म्हणत. तो पुढे व त्याच्या पाठीमागे पोस्टमन असा हा लवाजमा जात असे. त्या पूर्वी कबुतरे टपाल पोहचवायची. कबुतर जा जा हे गाणे त्यावरूनच सुचले असावे. चिठ्ठी, पत्र, संदेश असा हा सारा प्रवास सुरु होता.
प्रख्यात साहित्यिक पू ल देशपांडे यांनी पोस्टाचे वर्णन खूप चांगल्या पद्धतीने केले आहे. तारेची कडकट्ट ही भाषा तर फक्त पोस्टातील लोकांनाच समजत असे. सकाळी आपल्या प्रियजनांची पत्राची वाट पाहणाऱ्या लोकांमुळे हा परिसर गजबजलेला असायचा. आज मात्र दुर्दैवाने हे चित्र पहावयास मिळत नाही. काहीही म्हणा पण पोस्टात काम करणारे तसे स्वभावाने गरीबच. आपणहून कोणाशी वाद घालणार नाहीत. वाद झालाच तर लगेच माघार घेऊन समेट घडवून आणतील. ही किमया त्यांनाच जमते.
जोशीं, मुक्त पत्रकार, मोबाईल क्रमांक 9881157709