Pratibimb -The Reflection - 8 in Marathi Fiction Stories by Mrs. Mrinmayee Shirgaonkar books and stories PDF | प्रतिबिंब - 8

Featured Books
Categories
Share

प्रतिबिंब - 8

प्रतिबिंब

भाग ८



शेवंता सावकाश स्टडीतून बाहेर आली. ऑफिसच्या दिशेने जाऊ लागली. तिच्या पायातल्या पट्ट्यांचे आवाज छूम छूम छूम..., जाई एकदम सावध झाली. बाहेर आली, तर शेवंता तिला ऑफिसच्या दारातून आत जाताना दिसली. धास्तावलेल्या मनाने जाई ऑफिसच्या दाराशी पोचली. यश आत होता. त्याने अंगातला शर्ट उतरवला होता. दरवाजाकडे त्याची पाठ होती. शेवंता त्याच्या अगदी जवळ उभी होती. नुसती. जराही हलली असती तरी त्याला स्पर्श झाला असता. आसुसलेल्या नजरेने ती त्याला पहात होती. जाई ओरडणारच होती, तेवढ्यात यश मागे वळला, "झालं तुझं मेडिटेशन? छान तंद्री लागली होती तुझी."

जाईची क्षणभर नजर यशकडे वळली आणि तेवढ्यात शेवंता दिसेनाशी झाली. पण जाईला मात्र अंतर्बाह्य हादरवून गेली. तिचा पांढरा फटक पडलेला चेहरा पाहून यश झट्कन तिच्या जवळ आला.

"अगं काय होतय तुला? अशी काय बघते आहेस?” त्याने तिला हाताला धरून आत आणले. खुर्चीत बसवले.

“काय होतय जाई तुला? पूर्वीसारखी हसत नाहीस, बोलत नाहीस, सतत कसल्यातरी विचारात, काळजीत असल्या सारखी वाटतेस. आज तुझ्या डॅडचाही मला युएसहून फोन आला होता. तू खूप दिवसात बोललीच नाहीस म्हणाले. काळजी वाटतेय त्यांनाही तुझी. मी त्यांना तुला मध्यंतरी ताप आला होता, ते सांगितलं, आता बरी आहेस, असंही सांगितलं. पण मला तू बरी दिसत नाहीस. काय चाललय तुझ्या मनात हल्ली? मला कळत नाही."

यशच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघून तिला गलबलून आलं. ‘पण काय सांगायचं? आणि कसं पटवायचं?’ मग ती काही न बोलता त्याच्या हाताला धरून तशीच बसून राहिली. मग म्हणाली, "काही होत नाहीय रे मला, पण शक्ती कमी पडतेय माझी." खरंच बोलत होती ती. "आपण एकदा डॉक्टरांशी बोलू, आणि नेहमीची सोडून इतर काही व्हिटामिन्स वगैरे घ्यायला हवीत का विचारू." यशने मान हलवली पण त्याचा या वेळेस तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही.

या प्रकारानंतर मात्र जाई प्रचंड दडपणाखाली वावरू लागली. आपण आगीशी खेळतोय आणि नागिणीला पाळतोय हे तिला जाणवले. पण आता आर या पार एवढाच पर्याय होता. मधला मार्ग उरलाच नव्हता.

त्या वर्षातच पत्नीला दिवस राहिले तेव्हा दादासाहेबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तो तिचे अधिकच कोडकौतुक करू लागला. त्याची पत्नी अत्यंत देवभक्त होती. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करत राहिली. तिने लवकरच आपले बस्तान तळमजल्यावर हलवले. वरची खोली फक्त दादासाहेब वापरे. शेवंतास तो फक्त आपलाच असल्याची भावना काही अंशी शांत करी. एक दिवस सकाळीच अप्पासाहेब काही कामाने दादासाहेबाच्या खोलीत आला. पलंगावर त्याच्या शेजारी स्त्री दिसली. तो पट्कन परत जाण्यास मागे वळला. सूनबाई दरवाजा लावण्यास विसरली कशी, असा विचार मनात येतोय तोच पायातल्या पट्ट्यांचा, विस्मृतीत गेलेला चिरपरिचित आवाज आला. तो गर्रकन वळला. शेवंता दादासाहेबाच्या अंगावर नागिणीसारखी पसरली होती. अप्पासाहेबाची बोबडीच वळली. थरथर कापत तो धाडकन् कोसळला आणि क्षणात गतप्राण झाला. सगळे हळहळले. आता कुठे मुलगा-सून जवळ राहण्यास आले होते पण सुखच नव्हते नशिबी. काही जणांनी ओटी न ठेवण्याचा परिणाम असाही अर्थ लावला.

पत्नीचे दिवस भरण्यापूर्वी तिला माहेरास पाठवणे आवश्यक होते, म्हणून दादासाहेब तिला सोडून आला. शेवंताला आता मालकीण झाल्यासारखे वाटू लागले. तिची आरशातील दुनिया वाडाभर फिरू लागली. चुकून एखाद्यास दिसू लागली. बातम्या गांवभर पसरू लागल्या. दादासाहेबास खरंतर याचा मागमूसही नव्हता, पण शेवंताने त्या वाड्यास पकडले असे गांव बोलू लागले. त्याची पत्नी मुलाला घेवून परत आली तेव्हा कुजबुज वाढली. आता शेवंता, हिचा बळी घेणार, असे सर्व आपसात बोलू लागले.

शिवाची आई एक दिवस म्हणालीच, “वैनीसाब ईकाची परक्सा काय हून बगावी? चला आपून शेवंताची वटी ठिवून येऊ.”

ओली बाळंतीण, घरात मोठं माणूस म्हणजे हीच शिवाची आई, मोठ्या बहिणीसारखी. तिला नाही म्हणवेना. मग दोघी जाऊन ओटी ठेवून आल्या. काही दिवस बरे गेले. काही दिवसांनी पत्नीने बस्तान वर हलवले. इतके दिवस बायकोची आतुरतेने वाट पाहणारा दादासाहेब, त्याला काय करू नी काय नको असे झाले. दोघे एकमेकांत जगाला विसरून गेले. आरशापलीकडे शेवंता दात ओठ खाऊ लागली. हातपाय आपटू लागली. शेवटी तिने संतापातिशयाने आरोळी ठोकली. अर्थातच जाईशिवाय तो आवाज इतर कुणाला ऐकू जाणारच नव्हता. दादासाहेबाच्या पलंगाशेजारील पाळण्यातील बाळ मात्र जोरजोरात रडू लागले. जाईचे काळीज चिरत गेले ते दोन्ही आवाज.