Toch chandrama - 10 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | तोच चंद्रमा.. - 10

Featured Books
Categories
Share

तोच चंद्रमा.. - 10

१०

पुन्हा ब्रुनी!

दोन दिवसांनी संध्याकाळी कृष्णन सरांनी बोलावून घेतले.

"यंग मॅन.. अजून गेला नाहीस?"

"सर इट्स जस्ट फाईव्ह ओ क्लाॅक.."

"आय नो. पण तुझी ती पार्टी आहे ना?"

"यस सर.. पण तुम्हाला कसे माहिती?"

"इट्स मून यार. सगळ्यांना सगळे माहिती असते इथे. मि. कांदळगावकर इज माय गुड फ्रेंड. ही इज अ यंग टॅलेंट इन द गव्हर्नमेंट जाॅब. आहे एंटरप्रायझिंग अगदी. हीज वाईफ मस्ट बी व्हेरी लकी टू गेट समवन लाईक हिम!"

बिचारे कृष्णन.. किती सीधेपणाने सांगत होते! तेही वर्षाबद्दल. आणि माझ्यासमोर. इथे जुन्या मराठीत 'हाय रे दैवा' म्हटले असते कुणी. पण काय गंमत बघा.. माझ्याच ( वन वे म्हणजे एकतर्फी ) एक्सच्या नवऱ्याचे गुणगान माझ्यासमोर माझ्याच कानांनी ऐकतोय मी आणि तिच्याच नवऱ्याने अरेंज केलेल्या पार्टीसाठी माझा बाॅस मला आग्रह करून पाठवतोय! पण राॅबिनला प्राॅमिस दिलेय मी. वर्षाचे नाव कटाप. म्हणजे ते गाणे आहे ना जुने पुराणे.. जब याद कभी तुम आओगे सोचेंगे तुम्हे चाहा ही नहीं.. आणि.. राहोंमें कभी मिल जाओगे.. सोचेंगे तुम्हें देखा ही नही.. थोडक्यात काय.. जिस राह पर तुम चलती हो उस राह पे चलना छोड देंगे आणि काय! त्यामुळे अगदी रिकाम्या आणि कोऱ्या करकरीत मनाने पार्टीला जायला निघालो मी.

घरी येऊन तयारी करून आम्ही दोघे निघालो. म्हणजे राॅबिन आणि मी. हाॅल थोडा दूर असल्याने राॅबिन यान घेऊन निघाला. त्यात जाण्याचा पत्ता फीड करून जाता जाता पार्टीसाठी टिप्स देऊ लागला.

"ब्रो.. लिसन.. कांदळगावकर असणार म्हणजे वर्षा पण असणार.."

"सो?"

"सो काय? अॅज इफ तुला माहिती नाही मी काय सांगतोय ते..'

"माहिती आहे.."

"काय?"

"तेच. तू म्हणालास त्या दिवशी. ज्या गावी जायचेच नाही, त्याचे तिकिट काढू नये! जय जय राॅबिन समर्थ!"

राॅबिन त्याच्या मशीनीत समर्थचा अर्थ शोधू लागला! कितीही समर्थ ट्रान्सलेटर सर्विस असो, ती असे सगळे कसे भाषांतरित करू शकणार होती?

"ओ के.. सो आय अॅम पाॅवरफुल!"

वा! या मशीनीत जय जय रघुवीर समर्थचे भाषांतर उद्या 'हेल रघुवीर पाॅवरफुल' होईल! पण राॅबिनला त्याबद्दल काही न बोलता म्हणालो, "यार राॅबिन.. डोन्ट वरी. मी सारे हँडल करीन. तू फक्त तुझ्या क्युरीची काळजी घे म्हणजे झाले!"

"तुला येऊन जाऊन क्युरीच दिसते कारे?"

"साॅरी, अजून कोण आहेत? हॅझल की मार्था?"

"सोड, नीट वाग, उगाच तोंड पाडून बसू नकोस.."

"तुला गंमत सांगू, लहानपणीची आठवण आली. आई असेच सांगायची, नीट वाग, मस्ती करू नकोस.. मला कुठल्याच तक्रारी नकोत टीचर कडून! राॅबिन, आईबरोबर राहून तूही हे शिकलायस वाटते!"

"थोडक्यात अंबर बाळ मोठा झाला नाहीय तर.. आणि तरीही.."

"तरीही काय?"

"काही नाही ब्रो.. जाऊ देत.."

आम्ही हाॅलवर पोहोचलो आणि अगदी आगमनाच्या द्वारावरूनच परीक्षा सुरू झाली. क्रिकेटमध्ये एखाद्या तळाच्या बॅट्समनला पहिलाच बाॅल बाऊन्सर मिळावा तसे झाले माझे. कारण स्वागताला खुद्द श्री आणि सौ. कांदळगावकर उपस्थित होते. अगदी प्रवेशद्वारावर. पण मी मनोमन ब्रुनीचे स्मरण केले आणि वर्षा विचारास मागे ढकलले. नामस्मरणाचा महिमा असा असावा हे सांगूनही एरव्ही पटले नसते मला! त्यामुळे झाले इतकेच .. जे राॅबिनलाही मान्य करावे लागले.. माझ्या ब्रेन मॅपिंग मध्ये मी वर्षाला पाहून बिलकुल विचलित झालो नव्हतो. याचे श्रेय ब्रुनीचे हे मात्र त्या बिचाऱ्या राॅबिनला कसे कळणार?

"वेलकम मि.अंबर राजपूत. आपल्या वर्किंग मेन्स असोसिएशन मध्ये तुझे स्वागत आहे.." कांदळगावकारांनी असे स्वागत केले माझे.

"वा! काही दिवसांत दुसऱ्यांदा भेटतोय आपण!" वर्षा मान वेळावत म्हणाली. मोठया कष्टाने तिला हिंदीत नजरअंदाज म्हणतात ना तसे करत मी परत ब्रुनीचे नामस्मरण केले मनातल्या मनात नि म्हणालो,

"थ्यांक्स! मला देखील इकडे येऊन आनंद झाला फार."

आम्ही आत गेलो. फंक्शन सुरू व्हायला वेळ होता म्हणून गप्पा मारत बसलो. रघुवीर कांदळगावकर.. ऊर्फ मिस्टर वर्षा काळे समोर बसलेला. माणूस खरेच चांगला होता. कुठल्याशा चांद्र भारतीय सरकारी आॅफिसात होता नोकरीस. आणि हे असोसिएशनचे काम. त्यांची वार्षिक संमेलने असतात म्हणे. आणि इतरही काही काम. आणि वर्षा चक्क हाऊस वाईफ! असेल.. त्याचे काय आता..

"वर्षा सांगत असते तुझ्याबद्दल.." रघुवीर म्हणाला.

"होपफुली चांगलेच सांगत असावी.." मी विनोदाने म्हणालो.

"यस्स. यू वेअर व्हेरी स्टुडियस इन काॅलेज म्हणाली ही."

"अरे हो ना. रघु तुला सांगू, ही वाॅज व्हेरी पाॅप्युलर अमंग अस. पण गंमत माहितीय.. ते त्यालाच माहिती नसणार. हा आपला लायब्ररीत बसलेला सदा अभ्यास करत. नाहीतर असा पोहोचला नसता इकडे!"

हिला काय माहिती लायब्ररीत मी तिलाच बघत बसायचो..

"असा म्हणजे?"

"असा म्हणजे? सिंगल! अरे आमच्या गृपच्या किती मुली होत्या.. पण हे साहेब आपल्यातच मग्न!"

मला ही न्यूज इतक्या उशीरा मिळावी? कदाचित वर्षा पण त्यात होती की.. नाही हा विचार हद्दपार आता.. लुक फाॅरवर्ड! कदाचित नशिबात ब्रुनीशीच जोडी लिहिलीय त्या तिकडे, म्हणून हे सारे घडतेय..

मग पार्टी सुरू झाली. वर्षाने वेलकम साँग म्हणून कुठले गाणे म्हणावे?

'हमको था जिनका इंतजार.. वो आज आके बैठे हैं महफिल में..

मालूम नहीं क्यूं उनको.. लिए फिरते हैं उनको हम दिलमें!'

हे जुन्या पुराण्या हिंदी सिनेमातल्यासारखे तर नाही ना? म्हणजे तिकडे हिराॅइनचे लग्न लागतेय दुसऱ्या कुणाशी नि हिरो हृदय पिळवटून गाणे गातोय.. मुबारक हो सबको समा ये सुहाना.. असेल किंवा नसेल ही. ब्रुनी नामाचा विचार करावा नि हा विचार मागे ढकलावा! वर्षा गाते फार सुंदर त्यामुळे तिच्या गाण्याला टाळ्या पडल्या खूप. वन्स मोअर पण झाले. चार लायनी ती परत गायली. पुढे अजून काही कार्यक्रम झाले. डान्सेस झाले. एक छोटे नाटुकले झाले..

असोसिएशन मध्ये सारे तरूण सदस्य त्यामुळे जुजबी भाषणांव्यतिरिक्त अजून भाषणं नाहीत. साराच कार्यक्रम खेळीमेळीचा. मला आवडले ते. नाहीतर अख्ख्या कार्यक्रमात भाषणं फार नि लोक जांभया आवरत बसलेले असलेच दृश्य दिसत असते. पण इथे ते नव्हते. फक्त जेवणानंतर एक सरप्राइज आयटम होईल अशी घोषणा झाली आणि सगळे जेवायला लायनीत उभे राहिले!

जेवण छान होते. रघुवीर जातीने मला हवे नको ते पाहात होता. सगळे पोटभर चापून जेवत असताना अचानक मला आठवले.. आमच्या आॅफिसात पार्टीचे जेवण ब्रुनीच्या कंपनीने अरेंज केलेले .. इथे कोण असावे? जेवता जेवता रघुवीरला विचारणार मी तोच ब्रुनीच स्वतः येताना दिसली नि काळजाचा ठोकाच चुकला माझा. हे कमी की काय तर येऊन माझ्या पुढे उभी राहिली नि म्हणाली, "हाय अंबर!"

"हाय! नाईस टू सी यू हिअर ब्रुनी!"

"वाॅव! यू हॅवन्ट फरगाॅटन माय नेम!"

मी म्हणणार होतो.. हाऊ कॅन आय.. पण नाही म्हणालो. प्रगट फक्त म्हटले, "वुई मेट द अदर डे.. अँड यू टू रिमेंबर माय नेम!"

शेवटचे वाक्य हे माझ्या वाढत्या अात्मविश्वासाचे द्योतक होते! फक्त त्याला ब्रुनीचे उत्तर अगदी कोरडे म्हणावे असे होते..

"आॅफकोर्स, वुई डोन्ट फरगेट अवर क्लायंट्स सो फास्ट!"

फक्त क्लायंट! मला हात दाखवून अवलक्षण झाल्यासारखे वाटले उगाच. खरेतर माझी अपेक्षाच चुकीची होती. याशिवाय वेगळे उत्तर तिने काय दिले असते?

"अोह! तुम्ही भेटलायत आधी?" रघुवीरने विचारले ..

"होय आॅफिसच्या पार्टीत."

"अंबर, ही ब्रुनी.. तू ओळखतोस.. चांगले आहे. फार हुशार आहे ही. ब्रुनी नाही ब्रेनी नाव हवं होतं हिचे.."

"काय हे रघुवीर .. पाय ओढायला कुणी भेटले नाही तुला सकाळपासून?"

"बघ. अंबर बघ. किती परफेक्ट मराठी बोलते ही. तिला आपल्या जगातील खूपशा भाषा येतात ज्यांची आपल्याला नावे पण ठाऊक नाहीत.. शी हॅज सुपर आय क्यू.. आणि हिच्या कंपनीचे जेवण.. शी इज टू गुड!"

"खरंय!" मी भीड चेपल्यासारखा बोललो, "आॅफिस लंच वाॅज टू गुड ब्रुनी. आणि हे पण!"

"थँक्स.."

"पण ब्रुनी तू पण जेव आमच्याबरोबर.. जाॅईन अस."

"असे म्हणतोस? ओके.."

रघुवीरने कुणाला तरी हाक मारून एक डिनर कुपन मागवले नि ब्रुनी आमच्या बरोबर जेवणात सामील झाली. थोड्या वेळात वर्षा पण येऊन बसली जवळ. माझी अवस्था विचित्र झाली.. एक एक्स आणि एक.. नशिबात असेल तर फ्युचर.. दोघी आजूबाजूला माझ्या. मी गप्पांत रंगलो. ब्रुनी पण बोलण्यात हुशार. आणि वर्षाचा तर प्रश्नच नाही. वेळ कसा गेला मला कळलेच नाही. पण राॅबिनचे मात्र दूरून बारीक लक्ष होते! माझ्याकडे! हे मला त्यानेच नंतर सांगितले.

जेवणाच्या निमित्ताने का होईना ब्रुनीशी ओळख झाली चांगली. मुलगी चांगलीच आहे. हुशार आहे. आणि एकदम मोकळ्या मनाची आहे.. मी पण आता कात टाकून स्मार्ट व्हायचे ठरवतोय.. म्हणजे कदाचित ये रिश्ता पक्का हो जाएगा? मनात मांडे खायची माझी सवय कधी जाणार कुणास ठाऊक. काॅलेजची इतकी वर्षे वर्षाला पाहात गेली आणि आता ह्या ब्रुनीला पाहात की काय?

जेवण झाले. आता सरप्राईज प्रोग्रामची घोषणा झाली. रघुवीर बोलायला उभा राहिला ..

"आपल्याकडे आज दोन सरप्राईज घोषणा आहेत..

एक .. लकी ड्राॅ.. सगळ्या डिनर कूपन्समधून एक विजेता घोषित होईल. आणि त्याचे किंवा तिचे प्राईझ असेल..बिईंग अवर स्पेशल गेस्ट फाॅर पिकनिक टू द नॅचरल पार्क.. अलाँग विथ अवर न्यू गेस्ट.. अॅज पर अवर ट्रॅडिशन. धिस विल बी अनाउन्सड लेटर.."

हाॅल मध्ये थोडा गलका झाला. तो शांत झाल्यावर परत रघु बोलता झाला..

"आणि दुसरे सरप्राईज.. जुन्या हिंदी गाण्यांत गिटारवर एक प्रसिद्ध गाणे आहे.. चुरा लिया है तुमने जो दिल को.. आज आपल्याकडे एक स्पेशल गिटारिस्ट आहे.. त्याच्या बोटांत जादू आहे.. वाजवण्यात लय आहे.. त्याच्या सुरांच्या या जादूचा अनुभव सगळ्यांनाच घ्यायला आवडेल.. सो ही विल प्रेझेंट.. चुरा लिया.. आॅन गिटार.. एनी गेसेस.. हू इज ही?"

जमलेल्या लोकांत थोडा आवाज झाला. मी मागे वळून पाहिले .. वर्षा ब्रुनीबरोबर उभी होती. हात उंचावत म्हणाली, "कॅन आय गेस?"

माझी उत्सुकता ताणली गेली. गिटारीला कित्येक दिवसांत हात नव्हता लावला. मी माझी गिटार आणली असती तर? त्यातही हे 'चुरा लिया है तुमने जो दिलको' गाणे माझे काॅलेज वीक मध्ये प्रसिद्ध होते.. आज इकडे कोण वाजवतोय .. हा विचार करेतोवर वर्षाचा आवाज आला..

"अंबर राजपूत!"

आणि पाठोपाठ रघुवीरची घोषणा.. "यस.. अवर न्यू गेस्ट हिअर इज अ गिटारिस्ट.गिव्ह हिम अ बिग हँड!"

त्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला..

मी शहारलो. वर्षा हे देखील विसरले नव्हती म्हणजे. पण मी वर्षाला विसरणारच होतो.. समोर ब्रुनी होती आणि हे प्रसंगाला अगदी अनुरूप गाणे!

मी स्टेजवर आलो. गिटार हाती घेतली. थोडी ट्यूनिंग केली.. आणि ब्रुनीकडे पाहात वाजवू लागलो..

'चुरा लिया है तुमने जो दिल को

कहीं नजर ना चुराना सनम..'

गाणे मस्त जमले माझे. एक माहोल निर्माण झाला असावा. कारण एक झाले, पाठोपाठ दुसरे, तिसरे झाले. फर्माइशीवरून. गिटार नि मी तिकडे .. म्हणजे पृथ्वीवर असताना अभिन्न असल्यासारखे होतो. आज खूप वर्षानी हाती अालेली ती. भरपूर वाजवून घेतली.

आता फक्त ती लकी ड्राॅची घोषणा बाकी होती. माझ्या इतक्या वर्षांच्या जुन्या सिनेमांचा अभ्यास सांगत होता.. ती लकी व्यक्ती ब्रुनीच असेल! आणि ती तीच असेल तर खरा लकी मी असेन! खरेतर काहीही करून हिरोला हिराॅइन मिळवून द्यायला सिनेमात शोभतात या गोष्टी. पण रियल अायुष्यात?

सगळ्या कार्यक्रमात मी हा असा होतो. सगळ्या कार्यक्रमाचा भाग असूनही अलिप्तपणे मनात विचार चक्रे चालू होती सतत.. आणि घोषणा झाली कुपन नंबराची.. आणि तो कोणाचा निघावा.. तो नंबर ब्रुनीचाच होता!

आजचा दिवस खास होता काही. नक्कीच काही दैवयोजना दिसतेय! नाहीतर अगदी कुपन घेऊन स्वत: जेवण पुरवणारी.. अन्नदात्री कशाला आमच्याबरोबर येऊन जेवली असती? आणि तिचा नंबर पण पिकनिकला माझ्या बरोबर लागावा! काहीतरी सकारात्मक संकेत दिसताहेत .. नक्कीच!