नाथा मुंबईमध्ये एस.टी. डेपोत ड्रायव्हर होता.तो महिन्यातून एकदा-दोनदा घरी यायचा.पण त्याला घरातील वातावरण नेहमीपेक्षा काहीसे वेगळे वाटले.त्याला एक मुलगी होती.तीचं नाव जान्हवी.दोन दिवसांनंतर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली
ती म्हणजे कधीही कॉलेज न चुकवणारी जान्हवी, दोन दिवसांपासून कॉलेजमध्ये गेली नव्हती.न राहून नाथाने जान्हवीला विचारले,"पोरी कॉलेजला का नाही जात?."
"पप्पा...मी.... पप्पा..."जान्हवी पुढे काय बोलणार इतक्यात तिची आई बोलली,"पोरगी घाबरली आहे."
"अगं रकमे.., नेमकं काय झालं ते तरी सांग."नाथा कासावीस होऊन म्हणाला.
"अहो,कसं सांगू तुम्हाला."रकमा रडू लागली.
नाथा वैतागून,"आता सांगतेय की हाणू टाळक्यात?."
अहो, तीन दिवसांपूर्वी पोरगी घरी येत होती.वाटेत तिच्या समोर जीप गाडी येवून उभी राहिली.जीप गाडीतला एक जण तिला म्हणाला,"येतेस का?, घरी सोडतो."
पोरगी म्हणाली,"नाही,घर जवळच आहे."
"अगं,बस गाडीत."असे म्हणून तो माणूस गाडीतून खाली उतरला आणि जबरदस्तीने तिला गाडीत घालू लागला.जान्हवीने त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला पण त्या माणसांच्या ताकदीसमोर तिचा टिकाव लागला नाही.एकाने जान्हवीला गाडीत घालून दुसऱ्याने जीप गाडी चालू केली, पण तितक्यात तिनं गाडीतून खाली उडी मारली अन् पळून आली.तेव्हापासून ती घाबरलेली आहे.त्यामुळे ती कॉलेजला जात नाही.",रकमाने सविस्तर सांगितले.
नाथाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.तो रागाने लालबुंद झाला.बसलेल्या जागेवरून ताडकन उठला.घरातून बाहेर आला.मोटारसायकलला किक मारली आणि तडक दारुच्या अड्ड्यावर गेला.एक कॉर्टर बीन पाण्याचीच मारली.आणि गाडी सुसाट वेगाने कॉलेजच्या दिशेने पळवू लागला.कॉलेजमध्ये जाऊन एका शिक्षकाला सगळा प्रकार सांगितला.
"माझी पोरगी घाबरलेली आहे,ती इथून पुढे शाळेत येणार नाही, तुम्ही आमच्या घरी चला तेही आत्ताच."
शिक्षकाने त्यांना सर्व लेक्चर्स संपवून येण्याचं आश्वासन दिले.पण नाथा कॉलेज संपेपर्यंत कॉलेजच्या गेटजवळ उभा राहिला.त्यानंतर चार-पाच शिक्षकांना घेऊन तो घरी आला.
घरी आल्यावर नाथाने आवाज दिला,"जान्हवी...पोरी जान्हवी, मास्तरांना बसायला चटई टाक." जान्हवी आतल्या घरातून चटई घेऊन आली.बसायला टाकली.आणि काहीही न बोलता आतल्या घरात जाऊ लागली.इतक्यात. एका सरांनी तिला,"थांब जान्हवी, आमच्या जवळ बस."
"चहा करून घेऊन येते.", असे म्हणून ती आतल्या घरात निघाली, इतक्यात नाथा बोलला,"थांब, तुझी आई आणल,तू इकडं ये,बस.आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं ते सांग." जान्हवीच्या डोळ्यांत पाणी आलं,"पप्पा...मी....प्पपा...."आणखी जास्त रडू लागली.
"सांग, घाबरु नकोस, आम्ही आहोत ना.",एका शिक्षकाने आधार देण्याचा प्रयत्न केला.
"मी कसं सांगू?" (जान्हवी अजून काही बोलणार इतक्यात तिची आई चहा घेऊन आली)"आई तुच सांग ना.",जान्हवी हुंदके देत कशी बशी बोलली.
"अहो, जान्हवी कॉलेजातून घरी येताना तिला रस्त्यात अडवून गाडीत घालून नेण्याचा प्रयत्न केला.तवापासुन पोरगी शाळंच नाव घेत नाही."आईने सविस्तरपणे सांगितलं.
जान्हवी,त्या गाडीतील लोकांना आओळखतेस का?."एक सर या प्रकरणाचा निकाल लावायचाच असे ठरवून बोलले.
"नाही,ती एकालाही नाही ओळखत.",तिची आई बोलली.
जान्हवीच्या घरी सर का आलेत पाहण्यासाठी शेजारचा शाम,जो जान्हवीच्याच कॉलेजमध्ये शिकत होता.तो घराजवळ आला.दाराजवळ चप्पल काढून जान्हवीच्या घरात जाणार इतक्यात, घरातून सरांचा आवाज आला," याचा अर्थ असा की, तुमच्या आसपासचा कोणीतरी यात सहभागी असणार."असा आवाज शामच्या कानावर पडताच तो तसाच माघारी फिरला.
"ठिक आहे, जान्हवीचे पप्पा, तिला काहीही होणार नाही याची काळजी आम्ही घेतो.तिला उद्यापासून कॉलेजला पाठवून द्या.असे म्हणून सर्व शिक्षक निघून गेले.
शाम घरी जात असताना त्याला त्याचा मित्र,जो जान्हवीचाही खास होता,रवी भेटला.त्याला जान्हवीच्या अपहरणाची माहिती दिली.त्यावर रवी बोलला,"असं काही नाही,तिचं आणि माझं प्रेम प्रकरण चालू आहे.हे तिच्या आईला माहीत झाले.तिच्या आईने तिचे लग्न एका श्रीमंत नात्यातील मुलाशी लाऊन द्यायचा निर्णय घेतला आहे.त्यावर जान्हवीने मला विचारले,"काय करू?." अरे असा प्रश्र्न मनात येतोच कसा.मग मी रागात तिला बोललो,"गाडीत घालून पळवून घेऊन जाईन." त्याच्यावरुन ती इतकं रामायण घडवेल असं वाटलं नव्हतं.ठिक आहे, जाऊ दे.तिच्या मनात प्रेमच नव्हतं माझ्याबद्दल."असे म्हणून तो भरलेल्या डोळ्यांनी निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी,शाम कॉलेजला निघाला.जाताना रवी किंवा जान्हवी किंवा दोघेही.यांच्यापैकी रोज कुणी ना कुणी सोबत असायचे.पण आज रवी कॉलेजला सोबत न येता एक चिठ्ठी शामजवळ देऊन गेला.जाताना बोलला,"हि चिठ्ठी जान्हवीला दे." शाम विचार करत कॉलेजच्या दिशेने चालू लागला.जाताना रस्त्यात जान्हवी भेटली.शामने जान्हवीला विचारले,"तुझं आणि रवीचं भांडण झालं आहे का?."
"नाही.पण,काल आईनेच खोटी अफवा पसरली आहे की मला कोणी पळवून नेत होते", असं सहज जान्हवी शामला बोलली."मग रवीने हि चिठ्ठी लिहून माझ्याकडे का दिली?."असे म्हणत शाम ती चिठ्ठी जान्हवीकडे देऊ लागला.इतक्यात ती त्याला म्हणाली,"वाच.तुझ्यापासून काय लपवायचे.तुला आमचं प्रेम माहीत आहेच की."
शामने पत्र वाचायला सुरुवात केली,"
'अखेरचा प्रणाम,
गेल्या काही महिन्यांपासून तू माझ्याशी जे बंध जुळवलेस ते बंध अगदी सहज तोडून टाकताना तुला थोडं ही दुःख झाले नाही.कारण ते बंधच पोकळ होते.मला खेळवलंस,माझा कंटाळा आला, झिडकारलेस.
पण, एक गोष्ट लक्षात असू दे.तुझ्यावर अंतःकरणापासून प्रेम केलं.नुसतंच प्रेम केलं.तुला देण्यासाठी माझ्याकडे फक्त गुलाब होते.पैसा,सोनं-नाणं नव्हते.मी गरीब आहे हे तुला माहीत होतं.तरीही तू माझ्याशी प्रेमाचा खेळ केलास.
पाण्यानं आपली पातळी शोधावी हे ठिक आहे, पण तू माझ्या जवळ का आलीस?. माझ्या जीवनाचा खड्डा भरून काढण्यासाठी?.तो खड्डा भरून काढलास आणि त्यातून बाहेर पडून पुढे वाहू लागलीस.तुझा प्रवाह पुढे पुढेच जाणार आणि माझा मात्र डोह होणार.
तू माझ्या ह्रदयावर कठोर घाव केलास.तरीही तुझा मला राग येत नाही.जर,मी तुझा राग केला,तर माझं तुझ्यावरच प्रेम खोटं ठरेल.म्हणूनच मला तुझा राग येणार नाही.दुःख खूप होतंय.आपल्या प्रेमातून शेवटी दुःखच निर्माण झालं.माझं प्रेम तुझ्याजवळ राहू दे.दुःख माझ्या जवळ ठेवून घेतो.
आयूष्यात कुठेही रहा, पण सुखी रहा.आजपर्यंत माझ्या सहवासातलं सुख मिळवायचे होते,ते मिळवलंस.आता श्रीमतीचं, बॅंकेच्या पासबुकाचं सुख मिळवायचे आहे.तर ते जरूर मिळव,पण एक गोष्ट मनात ठेव रवी नावाच्या एका खुळ्याने आपणावर अगदी खरंखुरं प्रेम केलं होतं.
घाबरु नकोस, तुझी सर्व पत्र मी जाळणार आहे.त्यात माझं ह्रदयही जळणार आहे,पण त्यातून एकच आवाज येईल,
जान्हवी.... जान्हवी....आणि फक्त जान्हवी."
प्रेमात जान्हवीने विश्वास न दिल्यामुळे रवीने पत्रांसोबत स्वतःला संपवले होते.
जान्हवीच्या पायाखालची जमीन सरकली, आभाळ फाटलं,मन सुन्न झालं, तिच्या तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता, डोळ्यातील अश्रूंनी मात्र जोर धरला होता............