Maitrin.. - 2 in Marathi Moral Stories by Shubham Sonawane books and stories PDF | मैत्रीण भाग 2

Featured Books
Categories
Share

मैत्रीण भाग 2

मैत्रिण... भाग २

मैत्री हे नातं इतकं सुंदर आहे की, आपण त्याला कुठल्याही नात्यात सहज बसवू शकतो. म्हणजे मी बऱ्याच फॅमिली आशा पाहिल्या आहेत की, त्याच्यातील वातावरण अगदी फ्रेंडली असत. आई वडील आणि मुले, भाऊ-बहीण, आज्जी- नात, मामा-भाजे, दाजी-मेहुणे, असे कितीतरी नातेसंबंध सांगता येतील की ज्यात प्रेम, आदर या बरोबरच मैत्री हे ही एक नात असत. मैत्रीच्या नात्याला कसलीही अपेक्षा नसते, असत केवळ समर्पण...
स्नेहा, नित्या आणि मी आता चांगले मित्र झालो होतो. एकत्र बसने, एकत्र कॉलेज ला येणे, एकत्र टाईमपास करणे, एकत्र कधी कधी आम्ही अभ्यासही करत असायचो. परंतु तेवढाच एक काळ हा आमच्यातला कंटाळवाणा असतो. अभ्यास, पाठांतर, असाइनमेन्ट, परीक्षा, कामठे सर आशा शब्दांनी नित्याला तर घेरीच येते. नोट्स काढायला तेवढे त्याचे फुकटात राबणारे कामगार सकाळ पासून तयारच असतात म्हणून त्याच त्याला तेवढं टेंशन नसत.
स्नेहाच अक्षर फार सुंदर होत. माझं एक निरीक्षण आहे की, मुलींची अक्षर ही एकजात सुंदर असतात. माझ्या अक्षरा बाबत बोलायचं झालं तर ते मलाच काही वेळाने समजत नाही.
आणि नित्याच अक्षर पाहण्याचा योग या पामराच्या नशिबात आजतागायत आलेला नाहीये. मी दोन तीन वेळा घोळत घेऊन त्याच्याकडून लिहून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याने तो अत्यंत खुबीने हाणून पाडला.
मला राहून राहून प्रश्न पडतच होता. इतक्या झटपट स्नेहाने माझ्याशी मैत्री का केलेली असावी. आज हिम्मत करून मी तिला याबाबत विचारणार होतो. नित्या आज सकाळ पासून दिसला नव्हता. म्हणून त्याला कॉल केला. तर हा प्राणी आपल्या कामगार वर्गाला कामाला लावत होता. त्याच एक बर होत त्याला कसलेच प्रश्न पडत नव्हते आणि माझं डोकं प्रश्नांनी भांबावून गेलं होतं.

बराच वेळ एकटाच कट्ट्यावर बसलो. तेवढ्यात स्नेहा येताना दिसली. मी तसाच तिला सामोरा गेलो. ती नेहमी प्रमाणे आनंदातच होती. आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो आणि कॅन्टीग मध्ये गेलो. आजच वातावरणही भन्नाट होत. पावसाची संततधार सुरू होती. पावसाच्या पाण्याचे थेंब स्नेहाच्या केसांवर कोणीतरी अलगद मोती ठेवावेत तसे भासत होते. आणि कॅन्टीग मध्ये किशोरदांच्या आवाजालं 'एक लडकी भिगी भागी सी...' हे सदाबहार गाणं हलक्या आवाजात लावलं होत. किशोरदांचा तो आवाज वातावरण अजूनच रोमँटिक करून टाकत होता. किशोरदांच्या त्या सदाबहार आवाजात मी काही काळ तसाच हरवून गेलो.
स्नेहाने मला भानावर आणत विचारलं,
"समीर , कुठे हरवलास ?"

मी उत्तरलो, " किशोर कुमार.... काय सुंदर आवाज आहे. काळ कुठलाही असो ... किशोरदां सदाबहार आहेत.

तीही म्हणाली, " हो ना... गरमागरम वाफाळलेला चहा, समोर कोसळणारा पाऊस आणि हलक्या आवाजात लागलेलं किशोरदांच गाणं....."

" आणि आपलं माणूस " तिला मधेच तोडत मी म्हणालो.

" काय.... काय म्हणालास का ?" तिला नीटसं ऐकू न आल्याने तिने विचारले.

मी स्वतःला सावरत म्हणलो, " नाही.... काही नाही. ते सोड, स्नेहा मला तुला एक विचारायचे, विचारू..? "

" अरे विचार ना, परवानगी कसली घेतोस."
अस म्हणत तिने चहाचा एक घोट घेतला.
मी म्हणालो, " तू इतक्या पटकन आमच्याशी मैत्री काशी काय केलीस? नाही म्हणजे आपली नीटशी ओळखही नाही. तुला अस काय दिसलं की तु इतका पटकन विश्वास टाकला ? "

ती चहाचा एक घोट घेत म्हणाली, " विश्वास टाकावा लागतो, त्या शिवाय का नाती जुळतात ? मी तुम्हाला बरेच दिवस पाहते. नित्या थोडा फ्लर्ट करत असेलही पण त्याच्या मनात कोठेंहि पाप नसतं. मनंमौजी आहे तो. आणि तुझं म्हणाला तर तु भोळा आहेस, शांत आहेस त्या मुळे तुही निर्मळ मनाचा आहेस आणि मलाही चांगले मित्र हवे होतेच की. त्यात तुम्ही मिळालात. जास्त विचार केला ना मग आपलं कोणाशीही जुळत नाही. झोकून द्यायचं असत स्वतःला मैत्रीत. भावना प्रामाणिक असल्या ना मग अडचणी येत नाही. "

चहा संपला होता आणि तीच बोलणंही. थोडा वेळ आम्ही तसेच शांत बसलो. किशोरदा आणि पावसाची संततधार यांची सोबत होतीच.
काही वेळाने नित्याची तेथे आला. तो येताना कधी एकटा येत नाही. त्याच्या बरोबर उत्साह येत असतो.
मोठं मोठ्याने हसत, उगाचच कोणालाही हात दाखवत, मुलींचे हात हातात घेत, कोणालाही टाळ्या देत, कोणाच्याही डोक्यात टपली हाणत, एखांद्याच्या टेबलावरील बिस्कीट उचलून एक गिरकी घेऊन एखाद्या मुलीला गुलाब द्यावा तशा पद्धतीने गुढग्यावर बसत तो बिस्कीट देतो, मुलींना डोळे मारत.... तो आमच्या पर्यंत पोहचतो. तसा तो आजही पोहचला. त्या नंतर नित्याने आम्हाला टाळ्या दिल्या. आणि हात उंचावून वेटर ला हाक मारत कटिंग मागवून घेतली.
चहा आला आणि मी नित्याला म्हणालो, " काय नितीनराव नोट्स झाल्या का काढून ?"

नित्या म्हणाला," दिल्यात लिहायला. पण हल्ली लै किर किर करतायत राव त्या.."

" म्हणजे तू त्यांना त्रास देतो की काय..?" स्नेहाने जरा खोचक पणे विचारलं.

"मी कशाला त्रास देतोय त्यांना. पण ती पूनम आहे ना... आज जरा नाटकच करत होती. माझा हातच दुखतोय, माझं आमकच दुखतंय, माझं तमकच दुखतंय.." नित्याने त्याच दुखणं सांगायला सुरुवात केली.

मी म्हणालो, " अरे मग, खरच दुखत असेल. "

"काही दुखत वैगेरे नाही . फक्त कंटाळा आलेला असतो, नाटक दुसर काय... " नित्याच्या या उत्तरावर आम्ही खळखळून हसलो.

" अरे मग तू काय केलंस..? स्नेहाने विषय पुढे नेला.

" स्नेहा... हा नितीन आहे नितीन... अशा भूलथापांना बळी पडत नसतो. लगेच मनाली ला फोन केला... You know.. ना.. मनाली.. अर्थशास्त्र..." नित्या.

" हा... हा...I know... You continue... "
स्नेहा म्हणाली.

नित्या पुढे म्हणाला, " हा... तर मी काय म्हणत होतो, मी मनाली ला फोन केला. तिला थोडासा भाव दिला , तिच्या दिसण्याची तारीफ केली. आली ना पूनम वठणीवर.. आता लिहितेय नोट्स "
नित्याची ती आयडिया आम्हाला ही आवडली आणि आम्ही खळखळून हसलो.
थोडा वेळ क्लास मध्ये, थोडा वेळ लायब्ररीत घालवत आम्ही घरी आलो.

घरी जेवण झाल्यावर मी व पु काळे याच 'पार्टनर' हे पुस्तक वाचायला घेतलं. त्यात एका ठिकाणी वपु लिहितात,

' लक्षात ठेव दोस्त,
तुला मी हवा आहेस
म्हणून मला तु हवा आहेस.'

खरच इतकी निखळ मैत्री करायला मला जमलीय का? स्नेहाने नित्याला किती परफेक्ट ओळखलं होतं. तो फ्लर्ट करतो पण मनात काहीही नसत. तो मुलींशी कसाही वागला तरी त्याच्या मनात वाईट विचार कधीच नसतो. तो मुलींचा आदरही तितकाच करतो. पण स्नेहा मला निर्मळ मनाचा म्हणाली होती. पण मी आहे का निर्मळ मनाचा? आजही स्नेहा समोर आली तरी माझ्या हृदयाची धडधड वाढू लागते. तिच्या गालावर अल्लड चाळा करणाऱ्या बेटे पासून तिच्या पायातील पैंजणा पर्यंत माझी नजर फिरू लागले. ती कायम माझ्या बरोबर असावी, तिने माझाच विचार करावा असा वाटत.
हे प्रेम आहे का ? का.... नुसतंच आकर्षण...? पण प्रेम असो वा आकर्षण जिथे या दोन भावना येतात.... तिथे मैत्री कुठे असते.

मी ही मैत्रीशी करत असलेली प्रतारणा ठरत नाही का ? स्नेहा मैत्रीत स्वतःला झोकून देते. मैत्री व्यतिरिक्त कुठल्याही भावनेने ती आपल्याकडे पाहत नाही. आणि मी..... छे.... मला माझाच राग येऊ लागला. पोटात एक ओठांवर एक असा स्वभाव आहे का माझा ? का जे मी दाखवतोय ते माझं खोट रूप आहे ? स्नेहा मला निर्मळ मनाचा म्हणते पण आहे का निर्मळ मनाचा ? प्रेम आणि मैत्री यात एक धूसर रेषा असते का मला ती दिसत नाही..? स्नेहाशी बोलून प्रश्न सोडवण्याच्या नादात मी प्रश्न वाढवून बसलो होतो.
मला हे थांबवावं लागणार होतं. मला स्नेहाचा विश्वास तोडायचा नव्हता. मी निर्मळ मनाचा आहे हे मला माझ्याच नजरेत सिद्ध करायचं होतं. स्नेहाने केलेली निखळ मैत्री मला जपायची होती.
पण मला ते जमणार होत का ? कारण मी जगाला फसवू शकतो पण स्वतःला कस फसवणार होतो ? विचार थांबत नव्हते आणि ते थांबणार पण नव्हते.
' पार्टनर ' तसच उशाशी सारून झोपी गेलो.

क्रमश

---------------------------------- सत्यशामबंधु