प्रतिबिंब
भाग ७
एव्हाना शेवंताची दहशत सर्वांनाच बसली होती. कधीकधी कुणाकुणाला ती दिसायची. तिच्यासाठी वाड्यावर आणि गावातही, प्रत्येक शुभकार्यापूर्वी, पौर्णिमा, अमावास्येला, ओटी काढून ठेवण्याची प्रथा पडली होती.
आज बेडवर पडल्यापडल्याच चलचित्र सुरू होते. स्टडीमधे जाण्याचीही गरज उरली नाही.
जाई विचार करू लागली, शेवंता थोडी शांत झाली असावी. माणसाचा जसा "मी" सुखावतो तसाच तिचाही "मी" सुखावला असेल का, या नव्या मिळणाऱ्या मानामुळे? अचानक तिला तिच्या आजीची आठवण झाली. तिचं बोलणं, जे तेव्हा काही म्हणजे काही कळलं नव्हतं ते आज आठवलंही आणि समजलंही.
केव्हातरी, श्राद्धविधी पाहताना जाईने विचारले “आपण हे असे जेवण पणजोबा पणजींसाठी ठेवतो, पण त्यांना हे आवडतं का? दर वर्षी तेच ते?”
तेव्हा आजी म्हणाली होती "बरोबर गं बाई माझी. अशा थातूरमातूर कर्मकांडानी पितरं उद्धरती, तर अजून काय हवं होतं. पण त्यांना विचारतो कोण? आपल्याच मनीचे करत बसतात. तो भट सांगणार आणि हे शहाणे ऐकणार झालं."
मग सायंकाळी केव्हातरी आजी डॅडला बोलावे, चिनी मातीच्या फुटक्या कपात त्यांना थोडी व्हिस्की (तिच्या भाषेत “तुझी ती विलायती ओत रे घोटभर”) द्यायला लावे, थोडी भजी तळे, गोडाचं काहीतरी बनवे, मग सर्व काही घेऊन मागीलदारी ओढ्याजवळ एक मोडकळीला आलेली भिंत होती त्यावर ठेवून येई.
"कधीमधी इतर वेळीही यांचे असे काही चालू असते" असं काकू आईला सांगत राही हळू आवाजात.
आजीला कसं कळत असेल मृतात्म्यांना काय हवय? तिचं कम्युनिकेशन होत असावं का? मिडीयम, म्हणजे माध्यम, होती का ती? प्रश्न, प्रश्न, प्रश्न!
मग तिने माध्यमे, म्हणजे त्या व्यक्ती, ज्यांना मृतात्म्यांशी या ना त्या पद्धतीने संवाद साधता येतो किंवा मृतात्म्यांना त्यांच्याशी संवाद साधता येतो, अशा व्यक्तींविषयी अधिक माहिती काढण्यास सुरवात केली. वाचताना तिच्या लक्षात आले, या माहितीप्रमाणे तर, आपणही माध्यम आहोत एक प्रकारे. शेवंता आपल्याशी बोलत नसली, तरी दिसते आहे, दृक् माध्यमातून, आपल्यापर्यंत पोहोचते आहे. नंतर तिला एक मृतात्म्यांच्या मानसिकतेवरचा मोठा लेख मिळाला. पाश्चात्य माणसाने लिहीला होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, मृतात्मे काही वेळेस प्रचंड खोटंही बोलू शकतात. यांच्याशी डील करायला माणूस एकाच वेळी संवेदनशील, पण तितकाच बुद्धीमान असायला हवा. जितकी माहिती मिळत होती, ती अधिकाधिक बुचकळ्यात टाकणारी होती. जाईला जाणवले की अंती तिला तिच्या स्वत:च्याच जोरावर आयत्यावेळी सुचणाऱ्या शहाणपणानेच मार्ग काढावा लागणार होता.
दादासाहेब पत्नीस घेऊन वाड्यावर आला. शिवाच्या आईवडिलांनी आता वाड्याची चाकरी घेतली होती. अप्पासाहेबाच्या मनास एकाच वेळी आनंद आणि भीती या दोन्ही भावनांनी घेरले. तरण्याबांड मुलात त्याला आधार दिसला, पण मांत्रिकाने सांगितलेलेही आठवले, ‘या घरात सवाष्ण फार जगायची नाही’. त्या कोवळ्या पोरीस पाहून त्याचे मन भरून आले. अपराधी भावनेनेही अलीकडे कधी नव्हे ते त्यास घेरायला सुरूवात केली होती.
रात्री दादासाहेब आणि पत्नी खोलीत आले. दादासाहेबाच्या तरण्याबांड शरीराकडे शेवंता आरशातून आसुसून पाहू लागली. त्याच्याबरोबर त्याची पत्नी पाहून ती पुन्हा एकदा बिथरली.
तिची ती विखारी नजर पाहून जाईचा जीवही घाबरला.
नव्या सुनेने आल्याबरोबर नव्या घराचा भार आपल्या शिरी घेतला. बारीकसारीक गोष्टींचीही माहिती घेवू लागली. एका अमावास्येला शिवाची आई ओटी काढून घेऊन निघाली. लोकांनी कलावंतिणीच्या घरासमोरच शेवंताची मठी बांधली होती. तिथेच ओटी ठेवण्याची प्रथा रूढ झाली होती.
सुनेने विचारले "कोणती देवी?"
त्यावर शिवाच्या आईने तिला कर्णोपकर्णी कळलेली कथा सांगितली, अर्थातच त्यात अनेक काल्पनिक गोष्टी मिसळल्या होत्याच.
त्यावर नवी सून म्हणाली, "एका परमेश्वरावर विश्वास ठेवावा. तो ही काही मागत नाही. कृतज्ञता म्हणून कधी काही वहावे त्याला. पण अशा दु:शक्तींना थारा देऊ नये. चला आणा ती ओटी, तुम्ही काढलीच आहे तर गावातील भवानीदेवीस वाहून येऊ. माझे वडील म्हणतात, बरे वाईट घडणे प्राक्तनाचा खेळ, व्हायचे ते होतेच, पण अशा शक्तींचा मोठेपणा वाढवू नये. माणूस हळूहळू मन:शक्तीच हरवून बसेल अशाने."
शिवाची आई पाहतच राहिली. ती काय बोलली, फारसे कळले नाही तिला, पण एकदम आधार वाटला तिला या एवढ्याशा पोरीचा आणि तिच्याविषयी काळजीही. यानंतरचा शेवंताचा थयथयाट घाबरवून टाकणारा होता. केस पिंजारलेले, डोळे आधीच मोठे, त्यातून ते वटारलेले, चेहरा म्हणजे मूर्तिमंत कैदाशीण वाटावी.
जाईच्या मनाचा पाहूनच थरकाप उडाला. तिने पट्कन डोळे मिटले आणि तंद्री भंग पावली. आपल्या आक्रसलेल्या शिरा तिला जाणवल्या. पाहायला गेले तर सिनेमाच होता तो तिच्यासाठी. पण मानसिक आणि शारिरीक पातळीवर किती खोलवर परिणाम होतोय हे पाहून ती थिजली. हे असे किती दिवस सुरू रहाणार? कसे संपणार? की नाहीच संपणार? आपलाही बळी जायचेच ठरले आहे का? सरसरून काटा आला तिच्या अंगावर या विचारांसरशी. भीतीचे सावट मनावर पडण्यापूर्वीच तिने तो विचार झटकला. ती उठली आणि नेहमीप्रमाणे मन एकाग्र करत ध्यानाला बसली. यश आला तेव्हा त्याला ती ध्यानाला बसलेली दिसली. एकदमच वेगळी भासली त्याला जाई आज. ‘किती बदललीय ही. पूर्वी आपण आल्यावर चिवचिवत असायची नुसती. मग वीकएन्डचे प्लॅन बनवून ठेवायची, आणि आपण कामाची अडचण सांगितली की, ‘चल आजच संपवून टाकू’ म्हणत आपल्याला सगळी मदत करत खरंच संपवत आणायची. हक्काने मग ठरवलेला प्लॅन पूर्ण करायची. शिवपुरीला जाण्याचा प्लॅनही, असाच हट्टाने पूर्ण करून घेतला तिने. पण हरवली आपली जाई तिथेच कुठेतरी. शिवा सांगत होता ते खरं असेल का? मला तेव्हा तरी त्यात काही तथ्य वाटलं नाही. तरी मी कामं उरकून लगेच परत आणलं जाईला. मला विषाची परीक्षा नव्हतीच पहायची. पण आता जे काही जाईला होतंय, त्यात शिवा म्हणत होता तसं काही असेल? जाईशी बोलावं का? नकोच. आधीच ती स्वत:च्या कोषात असते. आता ती आपण समोर असलो की उत्साहाने बोलण्याचा प्रयत्न करते पण तो उसना उत्साह लगेच कळतो. काय होतंय हिला? आपलं लक्ष कमी पडतय का?’ यश तिची तंद्री भंग न पावेल अशा बेताने आपल्या घरातल्या ऑफिसमधे येऊन बसला.