विश्वास जिंकला!
विश्वास! दहा वर्षीय चुणचुणीत मुलगा. मराठी चौथी वर्गात शिकत होता. घरची आर्थिक परिस्थिती तशी यथातथाच होती. त्याच्या घरी तो, त्याचे आई-वडील, मोठा भाऊ आणि त्याच्या पेक्षा मोठी एक बहीण! पाच जणांचे कुटुंब! विश्वास आणि त्याचे भावंडं सारे शिकत होते. वडील एका खाजगी शाळेत शिक्षक होते. आई घरीच असायची. ती चाळ तशी मध्यमवर्गीय लोकांची होती. परंतु काही घरे मात्र त्यामानाने श्रीमंत होती. विश्वासच्या घराला लागून एक खूप मोठी इमारत होती. इमारतीचा बाह्य भाग पाहताक्षणी जाणवायचे की, त्या घरात लक्ष्मी नांदते आहे. त्या इमारतीमध्ये एक कुटुंब राहत होते. अरुण आणि अरुंधती अशी त्या घरात राहणाऱ्या जोडप्याचे नाव होते. त्यांना सुमित नावाचा एक मुलगा होता. सुमित विश्वासच्या वयाचा होता. तोही चौथी इयत्तेत शिकत होता पण त्याचे इंग्रजी माध्यम होते. तसे असले तरीही दोघांमध्ये खूप छान मैत्री होती. म्हणतात ना, निखळ मैत्रीमध्ये जात, धर्म, पैसा, शिक्षण काही काही आडवे येत नाही. तसेच त्या दोघांच्या मित्रत्वाचे होते. दोघेही शाळेतून घरी आले की, एकमेकांना भेटत असत. खेळत असत. गप्पा मारत असत. अभ्यासही एकत्र बसून करीत असत. कधी कधी दोघांमध्ये वादही होत असत पण तो अबोला फार वेळ टिकत नसे. बहुतेक दोघांची बैठक विश्वासच्या घरीच होत असे. कारण सुमितच्या आईला सुमितने विश्वासबरोबर खेळलेले, बसलेले आवडत नसले तरीही ती विश्वासच्या हट्टापुढे नमते घेत असे.
त्यादिवशी दुपारी सुमितचे आई-बाबा दुपारी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. सुमित घरी एकटाच होता. त्याने विश्वासला घरी बोलावले होते. दोघांनी मिळून आपापला अभ्यास केला. खेळले. गप्पागोष्टी केल्या. दोघांनी मिळून जेवण केले. टीव्ही लावून कार्टून पाहिले. साधारण दोन वाजता सुमितचे आईबाबा घरी परतले आणि विश्वास त्याच्या घरी निघून गेला.
"आई, तुम्ही लवकर कसे आलात ग? चार वाजता येणार होता ना?"
"हो बाबा. पण एक फार मोठा घोळ झालाय.." असे म्हणत आई काही तरी शोधू लागली. दुसरीकडे बाबाही कशाचा तरी शोध घेत होते. ते पाहून सुमितने विचारले,
"तुम्ही दोघे काय शोधत आहात? काही हरवले आहे का?" सुमितने विचारले.
"मला सांग, सुमित घरी कुणी आले होते का?"
"नाही. कुणीच नाही. मी आणि विश्वास इथेच खेळत होतो. पण झाले काय?"
"अग, पण तू तुझी छोटी पर्स नक्की इथेच ठेवली होती का?" सुमितच्या बाबांनी विचारले.
"होय हो. आता किती वेळा तेच तेच सांगू? तुमच्यासमोर मी तीनदा, तुम्ही दोन वेळा माझी मोठी पर्स शोधली. मॉलमध्ये जाण्यापूर्वी आपण कुठेही गेलो नाहीत. माझ्या या मोठ्या पर्समधून ही पर्स काढली त्यातून छोटी पर्स काढली. मला नक्की आठवते या इथेच मी पर्स काढली होती. तुम्हाला पैसे दिले आणि पुन्हा सगळ्या पर्स एकात एक टाकताना पैशाची ती छोटी पर्स आत टाकली की नाही? नक्कीच टाकली नसणार कारण आपण थेट मॉलमध्ये गेलो. याचा अर्थ ती पैशाची पर्स इथेच राहिली. सुमित, आम्ही गेल्यानंतर कोण कोण आले होते? कामवाली बाई? नाही. ती तर आपण जायच्या आधीच येऊन गेली होती. दुसरे कोणी आले होते का?"
"नाही ग आई, दुसरे कुणीही आले नव्हते. फक्त विश्वास आला होता...."
"विश्वास! का कोण जाणे हा पोरगा नेहमीच माझ्या डोक्यात जातो. मला सांगा, दुसरे कुणीही आले नव्हते फक्त तेच कार्ट आलं होतं. सारे काही स्पष्ट आहे..."
"म्हणजे तुला असे म्हणायचे आहे का, विश्वासने तुझी पर्स नेली?" सुमितच्या बाबांनी विचारले.
"अजून काय म्हणायचे आहे? सरळ सरळ आहे, विश्वास शिवाय कुणीही आले नव्हते. असे पाहता काय? लावा. पोलिसांना फोन लावा. दोन चार रट्टे पडले की, आपोआप कबूल करेल...."
"आई, नाही. विश्वासला पोलिसात देऊ नकोस. तो तसा नाही ग." रडवेला होत सुमित म्हणाला.
"हे बघ. असा आततायीपणा करु नकोस. आपल्याला तशी पक्की माहिती नाही. कोणताही पुरावा नाही." सुमितचे बाबा म्हणाले.
"पुराव्याचे काय घेऊन बसलात? पोलिसांचे दोन रट्टे पडले की, सुतासारखा सरळ होईल आणि मग कबूल करेल."
"बाबा, पोलीस मारतात का हो? मग नको ना. विश्वासला पोलिसांकडे देऊ नका ना हो. आईला सांगा ना, बाबा..." सुमित काकुळतीला येत म्हणाला.
"मलाही तसेच वाटते, आपणच त्याला बोलावून विचारु या. नाही तर एक काम करुया..." असे म्हणत सुमितच्या बाबांनी हळू आवाजात त्या दोघांना काही तरी सांगितले. ते ऐकून सुमित विश्वासकडे गेला आणि त्याला घेऊन आला. त्याला पाहताच सुमितचे बाबा म्हणाले,
"विश्वास, अरे, आम्हाला महत्त्वाच्या कामासाठी अर्धा तास बाहेर जायचे आहे. नेमके त्याचवेळी काही पाहुणे आपल्या घरी येणार आहेत. तू जरा आमच्या घरी थांबतोस काय?"
"ठिक आहे काका. मी थांबतो. तुम्ही जाऊन या..." विश्वास असे म्हणत असताना त्याचे लक्ष समोरच्या टेबलवर टोपलीत ठेवलेल्या हापूस आंब्याकडे गेले. विश्वासला आंबा खूप आवडायचा. त्याची ती आवड लक्षात घेऊन सुमितच्या आईने मुद्दाम विश्वासची परीक्षा घेण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेले आठ हापूस आंबे दिवाणखान्यातील टेबलवर आणून ठेवले होते. विश्वास आंब्यांकडे पाहतोय हे पाहून सुमितच्या आईने सूचक नजरेने सुमित आणि त्याच्याकडे पाहिले आणि ते तिघेही घराबाहेर पडले.
विश्वास एकटाच तिथे बसून राहिला. त्याने दिवाणखान्यात इकडेतिकडे पाहिले. टीव्ही लावून कार्टून पहावे अशी त्याला इच्छा झाली पण त्याने ती टाळली. टीव्हीच्याजवळ एक पाकिट त्याला दिसले. पाकिटात असलेल्या पाचशे, दोन हजारांच्या नोटांवर त्याचे लक्ष गेले. तो मनाशी म्हणाली,
'अरे, हे तर काकांचे पाकिट आहे. विसरून गेले. वाटते उचलून आत ठेवावे का? नको. आपण तर इथेच आहोत. राहू देत.'
त्याचे लक्ष राहून राहून आंब्यांकडे जात होते. त्याच्या तोंडाला पाणी सुटत होते. एक मन आंबा खावा असे सुचवत होते तर दुसरे मन ठामपणे नकार देत होते. तितक्यात त्याला आठवले की, दुसऱ्या दिवशी शाळेची फिस भरायची होती. बाबा म्हणत होते की, सध्या पैसे नाहीत. समोर पाकिटात असलेल्या नोटा पाहून त्याने एक क्षण विचार केला की, 'घ्यावेत का पाकिटातून रुपये? उद्या फिस भरता येईल.' पण दुसऱ्या क्षणी अजून एक विचार आला, 'नाही. काकांना न सांगता पैसे काढून घेतले तर ते आईबाबांना आवडणार नाही. शिवाय असे न सांगता पैसे घेणे म्हणजे चोरीच आहे. नको. बाबा आहेत ना, मग करतील ते व्यवस्था. आपण कशाला काळजी करायची.' विश्वास दोलायमान स्थितीत असताना सुमित आईबाबांसह परत आला. त्यांना पाहताच विश्वास म्हणाला,
"काका, तुम्ही पॉकेट घरीच विसरून गेलात की...." तो बोलत असताना सुमितच्या बाबांनी पॉकेट उचलून आतले पैसे सहज मोजले आणि ते बरोबर असल्याची खात्री होताच त्यांनी सुमितच्या आईकडे पाहिले. टोपलीतले आंबे जशास तसे पाहून तिने विचारले,
"सुमित, आंबा नाही खाल्ला? तुला आंबा आवडतो ना?"
"हो काकू, मला की नाही, हापूस आंबा खूप आवडतो."
"अरे, मग खायचास ना..." सुमितचे बाबा म्हणत असताना विश्वास म्हणाला,
"काका, तुम्ही कुणीही घरी नसताना मी आंबा कसा काय खाऊ? कुणी घरी नसताना, त्यांना न विचारता आपला आवडता पदार्थ खाणे बरोबर नाही. आई म्हणते की, असे करणे म्हणजे चोरी करण्यासारखे आहे आणि चोरी करणे अत्यंत वाईट गोष्ट आहे. एक प्रकारे ते पाप आहे. "
"अरे, सुमित तुझा मित्र आहे ना?"
"म्हणून सुमित घरी नसताना आंबा खाणे बरोबर नाही. सुमित असता तर आम्ही दोघांनी मिळून हे सारे आंबे फस्त केले असते. हो ना रे सुमित?"
"येस! आताही आपण सारे आंबे गट्टम करणार आहोत..." सुमित आनंदाने बोलत असताना सुमितच्या आईचे लक्ष दिवाणखान्यातील एका कोपऱ्यात असलेल्या चप्पलच्या कपाटाकडे गेले. कपाटाखाली काही तरी दिसत होते म्हणून त्या कपाटाजवळ गेल्या. खाली बसून हात लांबवून त्यांनी ती वस्तू काढली आणि अत्यानंदाने ओरडल्या,
"अहो, माझी पर्स सापडली. तेव्हा बाहेर जाताना चप्पल काढत असताना पडली असावी..." असे म्हणत सुमितच्या आईने सर्वांकडे पाहिले. तिचे लक्ष विश्वासकडे गेले. ती विश्वासकडे धावली. भरलेल्या डोळ्यांनी त्याचे दोन्ही हात हातात घेऊन त्यावर तिने स्वतःचे ओठ टेकवले. विश्वास असमंजसपणे कधी विश्वासकडे तर कधी त्याच्या बाबांकडे बघत होता.....
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१,
क्रांतिवीरनगर, लेन०२,
हॉटेल जय मल्हारच्या समोर,
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१