कथा –
आईचा वाढदिवस.
---------------------------------------------
गेल्या महिन्यापासून सुजित पहात होता की , त्याचा मित्र सचिन सध्या खूपच घाईत असल्या सारखा वागतो आहे .
शाळेत ,वर्गात , नंतरच्या ट्युशन क्लासमध्ये तो स्थिर नसतो हे सुजितला जाणवत होते . या मित्राच्या
मनात सतत काहीतरी वेगळेच विचार चालू आहेत “,आणि त्यामुळे त्याचे इतर गोष्टीत अजिबात लक्ष नसते,
वरवर तो व्यवस्थित आहे असे दाखवतो . पण तसे नाहीये ..हे सुजितला जाणवत होते.
असे असले तरी , सचिन कडून चुका होत आहेत , त्याचे नीट लक्ष नाही , अशी तक्रार करण्याची एक ही संधी सचिन कुणाला देत नव्हता.
कारण ..प्रत्येक गोष्ट सचिन अगदी व्यवस्थित करतो, त्याच्या कडून चुकापण होत नाहीत ,हे सगळ्यांना दिसत असायचे .
सुजित आणि सचिन हे खूप दिवसांचे जुने मित्र आहेत असे पण नव्हते ,थोडक्यात गेल्यावर्षीपासून ते एका वर्गातले म्हणून मित्र
झाले , एकाच बेंचवर बसून हळूहळू मैत्री वाढत गेली , मधल्या सुट्टीत सोबत एकमेकंचा डब्बा सोबत खाणे , शाळा सुटल्यावर
सायकलने सोबत घरी जाणे .अशा सततच्या सहवासाने ते जवळचे मित्र झाले , एकमेकांच्या घराबाद्ल ,घरातील सगळ्या
माणसांबद्दल दोघांनाही माहिती झालेली होती.
दोघांची शाळा एकच होती , कोचिंग क्लास एकच होता , या दोन सारख्या गोष्टी सोडल्या तर ,दोघांची घरे मात्र गावाच्या अगदी दोन टोकाला .
.विरुध्द दिशेला असणारी होती.. सुजीतचे आई-आणि बाबा दोघे ही नोकरी करणारे . त्यांचे पगार खूप मोठे नव्हते .
त्यामुळे आहे त्या पगारात व्यवस्थित राहायचे हा त्यांचा नियम होता. “उधार-उसनवारी , कर्ज घेऊन स्वतःच्या
डोक्यावर पैश्याचे ओझे वाढवून घेणे नको रे बाबा !” असे ठरवून वागणार्या सुजीतच्या आई-बाबा बाबांची आर्थिक परिस्थिती
खूप चांगली नसली तरी , एक स्थिरता त्यांच्या घराला आहे त्यांच्या घरात येणाऱ्या प्रत्येकाला हे जाणवत असे.
आपल्या आई-बाबांच्या स्वभावातील चांगल्या सवयी सुजितच्या स्वभात आल्या होत्या ..त्यामुळे तो आपल्या आई-बाबांच्याकडे
काहीही गोष्टी मागून हट्टीपणा करीत नसायचा , त्याच्या या वागण्याचा आई-बाबांना आनंदच होत असे.
सुजीतचा मित्र सचिन .त्याचा परिवार साधा-सुधा होता कष्ट करून , मेहनतीने मिळवलेला पैसा घराला सुख आणि समाधान देत असतो "
ही भावना सचिनच्या आई-वडिलांनी आपल्या परिवारातील सर्वांच्या मनावर बिम्ब्व्लेली होती..
सचिनचे आई म्हणे- सचिन , मनावर ताबा असला की ,आपल्याला मोह टाळता येतो.
आईचे हे वाक्य सचिनच्या पक्के लक्षात असायचे ,त्याच बरोबर आपल्या मित्रांना देखील ते आईचे हे विचार सांगत असायचा .
त्याची आई नेहमी म्हणे - सचिन, आपण आहोत तसेच राहावे , परिस्थिती लपवण्यात अर्थ नसतो. आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये",
असे वागले तर ..सर्वांशी आपले नाते प्रेमाचे राहू शकते.
दोन घरातील अशा संस्कारी वातावरणामुळे .सुजीत आणि सचिन .हे समविचारी मुले मित्र झाले"यात नवलाचे ते काय ?
काही महिन्यापूर्वीची गोष्ट
-सुजितच्या आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस त्यांच्या सोसायटीच्या हॉलमध्ये साजरा झाला .या कार्यक्रमासाठी ,तयारीसाठी
सुजितच्या इतर मित्रांच्या सोबत सचिन देखील मदतीला अगोदर पासूनच आलेला होता.
हा समारंभ पाहून सचिनला वाटले - आपण देखील असाच कार्यक्रम करू या का ?
कारण त्याच्या सभोवताली असणार्या साधारण परिस्थिती असलेल्या घरातील माणसांचे वाढदिवस वगेरे समारंभपूर्वक करण्याची पद्धत नव्हती ",आणि
करण्याची ऐपत पण नव्हती ,त्यामुळे अशा आयडिया पण त्यांच्या मनात येत नसत. मुलांचे वाढदिवस ..आता सगळेच करतात ,मग, आपण पण केले पाहिजे ,
हे आता कुठे या सर्वांना पटायला सुरुवात झाली होती.
सचिनच्या बाबांची नोकरी फिरतीची होती.एका प्रवासी कंपनीत ते काम करणारे ,कधी कोणत्या टूर-प्रोग्रामवर असतील" सांगता यायचे नाही, कधी आजूबाजूला
असतील तर कधी ,देशाच्या कोणत्या तरी टोकाला असायचे . आणि सुट्टीवर असले तर "त्यांना त्यांची दोस्त कंपनी -सोडीत नसे . एकूणच सचिनचे बाबा घरी
सापडणे कठीण होते.
सचिनची आई, एक सामाजिक कार्यकर्ती होती. महिला विषयक सेवा-कार्य करणाऱ्या संघटनेची ती पदाधिकारी असल्यामुळे "आपली आई निवांत आणि आरामशीर आहे",
हे सचिनला फार कमी वेळा दिसायचे . आईची संघटना ..भुकेल्या ,गरजू आणि निराधार लोकांना रोज अन्न-पदार्थ देण्याचे सेवा -कार्य करीत असे.या कार्यात आई आणि तिच्या
कार्यकर्त्या मैत्रिणी अगदी जीवापाड मेहनत घेऊन कार्य करीत . या कामात मनापासून सहभागी असणर्या आपल्या आईच्या आवडी-निवडी काय आहेत ? याबद्दल तिच्याकडून
ऐकल्याचे सचिनला आठवत नव्हते , असा निवांत वेळ नासतो आपल्या आईकडे
त्यादिवशी ..रोजच्या प्रमाणे आई आणि तिच्या मैत्रिणी कामासाठी बाहेर पडल्या ,प्रत्येकीच्या हातात वाटप करायच्या .पिशव्या होत्या .ज्यात पोळी-भाजी व इतर पदार्थ
होते. छान बोलत बोलत ,चालत असतांना , फुटपाथवरून जाणाऱ्या एक बाईक-स्वाराने वेगात पुढे जाण्याच्या नादात कट मारतांना ,त्याच्या बाईकचे पुढचे चाक
बाजूने जाणाऱ्या सचिनच्या आईच्या पायाला लागले, ब्रेक लावून गाडी थांबली म्हणून पुढचा अनर्थ टळला होता ,
पण पायाला मार लागायचा तो लागलाच.
सचिनची आई तोंडावर पडली ,त्यामुळे चेहेर्याला थोडा मार लागला , पायाला नेमके काय झाले ? हे हॉस्पिटल मध्ये गेल्यावरच कळणार होते .
या गडबडीत बाइकस्वार पळून नाही गेला , तो तिथेच थांबला होता , त्यानी अगदी पाया पडून सगळ्यांची माफी मागत म्हटले ..
तुम्ही काही काळजी करू नका ..या आईंना आपण समोरच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ या , त्यांचे उपचार होई पर्यंत सगळी जबाबदारी माझी .
अपघात करून पळून जाणरे जास्त , अशी मदत करणरे खूपच कमी असतात ", हा तरुण बेजबाबदार नाहीये, हे बरे वाटले सगळ्यांना .
या अचानक आपत्तीने सचिनच्या घराचे सगळे वेळापत्रक बदलून गेले . पायाला प्लास्टर लावल्यामुळे अनेक दिवस आईला घरातच पडून राहावे लागणार ,
सचिन आईला म्हणाला -
आई ,तू अजिबात काळजी करायची नाहीस .तुझे रोजचे सेवा-कार्य मी बंद पडू देणार नाही .माझ्या वेळेत जितके जमेल ,तितके काम मी नक्की करेन.
तुमच्यामुळे ज्यांना दोन घास खायला मिळतात , ते किती आतुरतेने ,भुकेले होऊन वाट पाहत असतील ", हे समजू शकतो आपण .
सचिनकडे पाहत आई म्हणाली -
बेटा , तुला मनापासून हे सेवा कार्य करावे वाटते आहे " याचा मला आनंद आहेच पण, तू ज्या समजूतदारपणाने या कार्याची गरज आणि महत्व समजून घेतलेस "
त्याचा मला जास्त आनंद होतो आहे..असा समंजसपणा "चांगल्या स्वभावाचे लक्षण आहे सचिन.
आईने सचिनला कामाची कल्पना दिली ,कोणत्या वेळेत करायचे "त्यात उशीर करून चालणार नाही , भुकेल्याना वेळेवर अन्न मिळाले तर त्याचा उपयोग.
आणि सचिन शाळा ,अभ्यास , कोचिंग क्लास ,हे सांभाळून , आईची सेवाकार्य करू लागला . पण, आपण या कामात आहोत, हे मात्र त्याने कुणालाच सांगणे
ठीक मानले नव्हते .
यामुळेच गेल्या अनेक दिवसापासून .सचिन वेगळाच वागतोय, कशात तरी बिझी आहे, पण सांगत नाही काही ,असे मित्रांना वाटत होते.
सुजित तर सतत विचारत होता , मी घरी येऊन काकूंना बोलू का ? म्हणजे त्यातरी सांगतील तू असा का वागतो आहेस ते.
असे म्हटल्यावर सचिनचा नाईलाज झाला , मग, त्याने आपण सध्या कोणत्या कार्यात गुंतलो आहोत ते सांगितले , घरी आईची ताव्येत कशी आहे हे ही सांगितले .
सुजितने सगळ ऐकून घेतले . सचिनचे खूप कौतुक वाटले त्याला . आपण ही त्या मदत करू शकलो तर छान होईल, पण सचिन नाही करू देणार असे काही.
तो एकटाच करील सगळ सांभाळून.
सुजितला अचानक एक गोष्ट आठवली .. त्याच्या आई-बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची . ही पार्टी झाल्यावर एक दिवस सचिन त्याला
म्हणाला होता ..
सुजित ,असे काही आमच्या घरी करावे असे खूप वाटते आहे रे, पण, काय करू, इतका मोठा ,असा कार्यक्रम आम्ही करूच शकणार नाहीत .
नंतरच्या आठवड्यात ,सुजित म्हणाला , सचिन प्लीज एक काम कर ..काकूंच्या वाढदिवसाची तारीख सांग मला , आम्ही मित्र मिळून , तुझ्या घरी
काकूंचा -तुझ्या आईचा वाढदिवस साजरा करू या. साधा आणि छान .आणि हो..एकदम सिक्रेट ..काकूंना आश्चर्याचा धक्का देऊया.
शाळेत गेल्यावर सचिनने आईच्या वाढदिवसाची तारीख सांगितली .
सुजित म्हणाला - आम्ही निवडक वर्ग-मित्र या दिवशी काकूंच्या साठी बर्थडे केक घेऊन येतो.
अशा रीतीने कार्यक्रम ठरला .
त्यात आणखी एक आनंदाची गोष्ट घडली ..सचिनच्या बाबंना कधी नव्हे तो दोन आठवड्यांची रजा मिळाली होती , त्यामुळे बाबांच्या उपस्थितीत
आईचा वाढदिवस साजरा होणार .म्हणून सचिन अधिकच खुश झाला . फक्त ..ऐन वाढदिवसाच्या दिवशी बाबंनी कुठे बाहेर जाऊ नये ",ते गेले तर
काय मजा , म्हणून मग, बाबाना सांगून टाकावे लागले . बाबांना आनंदच झाला ,ते म्हणाले माझा तुमच्या सिक्रेट प्लानला पाठींबा आहे.
आपण सारे मिळून कार्यक्रम करू या.
त्या दिवशी सचिन शाळेला गेलाच नाही, त्यांने सगळे घर आवरून ,नीट-नेटके ठेवले , बाबा -आई पाहत होते हे काय चालू आहे पोराचे ?
संध्याकाळ झाली, आणि सुजीत आणि त्याच्या सोबत सचिनचे वर्ग-मित्र आलेले पाहून .हे कशासाठी आलेत ?
आईला कळेना ,आणि कुणी सांगेना पण.
सुजितने सचिनच्या आई-बाबांना खुर्च्यावर बसवले , मधोमध टेबल ठेवला आणि एका खोक्यातून ..छान ,रंगीबेरंगी सजावट केलेला केक , ज्यावर
आईचे नाव लिहिलेले होते .काढून ठेवला ,आणि म्हटले चला .साजरा करू या ..काकूंचा बर्थ -डे.
सचिन म्हणाला - बाबा -आज पहिल्यांदा आपल्या घरात आपण आईचा वाढदिवस साजरा करीत आहोत . माझ्या मित्रांनी माझी इच्छा आज पूर्ण केली आहे.
तुम्ही आमचा हा बहुमान स्वीकारावा .आई, नाही म्हणू नको .
सचिनला आपल्या जवळ घेत बाबा म्हणाले -
अरे बाला , कसे रागावूत रे आम्ही तुझ्यावर ? आमच्याबद्दल तुझ्या मनात इतकी माया ,इतका आदर आहे हे जाणवून आमचे मन भरून आले आहे.
बाबा म्हणाले - सचिन , आपण श्रीमंत नाहीत ,पण, गरीब आहोत असे मात्र नाही . पण ,आपली परिस्थिती अशी आहे की , या नव्या गोष्टी आम्हाला
सुचत नाहीत म्हणून आम्ही करीत ही नाहीत.. .पण, यापुढे तुला असे सुचले तर जरूर करीत जा , पण, त्यासाठी आपल्या खिशाचा सल्ला " घेणे आवश्यक असते,
तो घेतला पाहिजे. ऋण काढून सण साजरे करणे ", नेहमीच चुकीचे असते. हे लक्षात ठेव.
सचिनला आणि त्याच्या मित्रांना -सचिनच्या बाबांचे सांगणे अगदी योग्य आहे असेच वाटत होते.
सगळे सभोवताली उभे राहिले .मध्यभागी ,,टेबलावरील केक ..,सचिनच्या आईने स्वतःच्या हाताने कापला ",
सगळ्या मुलांनी बर्थ - डे सॉंग, टाळ्या वाजवीत म्हटले , शुभेच्छा दिल्या .
हे सगळ होत असतांना सचिनच्या आईला सर्व मुलांचे ,सचिनचे कौतुक वाटत होते . आपला मुलगा खूप समजदार आहे, याचा अभिमान वाटत होता.
या आनंदाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले होते .
सचिनला आई म्हणाली -बेटा , आज साजरा झालेला माझा हा वाढदिवस खूप खास आहे स्पेशल आहे माझ्यासाठी. मी कधीच विसरणार नाही.
तू आणलेला हा बर्थ -डे-केक ", तुझ्या आईला मिळालेली सर्वात मोठी आणि बेस्ट गिफ्ट आहे . थांक्यू रे.
सचिन ने आपल्या मित्रांना आणि सुजितला आई समोरउभे करीत म्हटले -
आई ,आजच्या तुझ्या बर्थ-डे चे सगळे क्रेडीट या सुजितला देऊ या , त्याचीच ही कल्पना आहे, त्याने माझ्या मित्रांना सोबत घेत , आपल्या घरी येऊन ,
सर्वांनी मिळून आज तुझा वाढदिवस साजरा केलाय.. त्यात बाबा पण हजर राहिले आणखी एक खास गोष्ट झाली ही.
आईनी सगळ्या मित्रांना शाबासकी दिली ,आशीर्वाद दिले..
आज सचिनचे छोटेसे घर..खूप मोठ्या आनंदाने अगदी भरून गेले होते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कथा -
आईचा वाढदिवस
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------