आजचा दिवस तसा बर्यापैकी कल्लोळ माजवतच सुरू झाला होता. चोहोबाजुंनी होणारा निरनिराळ्या जातीच्या पक्ष्यांचा किलकिलाट वातावरणातील जिवंतपणा स्पष्ट करत होता. पसरवलेल्या आपल्या फांद्या हलवत बहुतांश डेरेदार वृक्ष त्या प्रसंगी आपणही या जीवसृष्टीचाच एक भाग आहोत असेच काहीसे दर्शवीत होते.
चिंच, फणस, आंब्याची झाडे आपल्या अगणित अश्या लवलवीत फुटलेल्या पानांचा सळसळाट करत त्या ध्वनीनिर्मितीशी आपल्या परीने जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत होती. दूरच्या एका कोपर्यात विरळ वाढलेल्या बोरीच्या झाडांखाली तीन-चार सांबरं हालचाल करत दिसत होती. पुढचे पाय वर करून आणि दोन पायांवर उभे राहून त्यातले एक सांबर बोरीचा पाला खात होते.
जमिनीच्या निसर्गनिर्मित दगडी बांधाला खाली लागूनच असलेला ओढा पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत होता. पावसाळ्याशिवाय तो कधी ओला होण्याची कसलीच शक्यता वाटत नव्हती. अनायासे आता उन्हाळा असल्याकारणाने तो तसाच भकास वाटत होता. बांधालगतच्या झाडांची सुकलेली पाने, तुटक्या फांद्या आणि दगडगोट्यांचा अधिकाधिक सहवास लाभलेल्या त्या ओढ्याशेजारीच दोन भलीमोठ्ठी वारूळे होती. ओढ्यातल्या सुकलेल्या पालापाचोळ्यावरून एक साप सळसळत जात असल्याने अवतीभवती बिळ असण्याचीही दाट शक्यता होती.
त्या परिसराच्या अगदी उजव्या अंगाला आपल्या बोटावर मोजता न येण्याइतक्या फांद्या खोलून एक विस्तीर्ण पिंपळ जणू काही तो तिथला राजाच असावा असा दिमाखात उभा होता. हो राजाच असावा तो. कारण काहीकाळ त्याच्याकडे एकटक पाहत राहीले की लक्षात आले असते की त्याची रचना एखाद्या विलक्षण आत्मविश्वासाने भरलेल्या योद्ध्यासारखीच होती. भलामजबूत खोडाचा पाया, रूबाबदार बुंधा, मजबूत आणि दाटीच्या फांद्या त्यावर एका नजरेत न सामावणारी भडक हिरवी पाने. जमिनीवर दूरपर्यंत पसरलेल्या त्याच्या सावलीमुळे कदाचित आपण इतरांवर दाखवत असलेली कृपा त्याच्या ऐटीतून सपशेल स्पष्ट होत होती.
त्याच्या सावलीखाली दोन रानकोंबडे गस्त घालत असल्याप्रमाणे फिरत होते. काहीश्या अंतरावर असलेल्या एका धाकट मुंगुसाची बारीक नजर त्यातल्या एका कृश रानकोंबड्यावरती होती. त्या मुंगुसाने आपल्या हालचालीतून अजून आपली उपस्थिती दर्शविली नव्हती. तो वाट पाहून होता एका सुयोग्य क्षणाची..
अनिमिष नेत्रांनी एखाद्याने ते संपूर्ण दृश्य पहावे आणि पहावेच काय पण त्या सभोवताली सुरू असलेल्या घडामोडींचा, निसर्गाच्या कलाकृतीचा, त्याच्या आविष्काराचा संबंध आस्वाद घेत पहात ऐकावे आणि तृप्त होऊन जावे असा विलक्षण नजारा तो.
इतक्यात 'धप्प्' असा आवाज येऊन जमिनीवर काहीतरी पडले. ओढ्याच्या पलीकडे असलेल्या जांभळीच्या झाडावरून खाली झेपावलेल्या तिने दुसरी झेप थेट त्या ओढ्यात घेतली. वातावरणातील त्या बदलाने झाडांवरील पक्ष्यांच्या आवाजातही बदल जाणवले. तूर्तास तरी जांभळीच्या झाडापास असलेले पक्षी किलकिलाट करत भुर्र्कन उडू लागले.
कर्र्करा....चर्र...क..अ...र्चर्...... त्या सुकलेल्या पालापाचोळ्याचा आवाजही त्या पक्ष्यांच्या आवाजाइतकाच तीव्रतेने पण क्षणभंगूर असल्यासारखा काही अवधीसाठीच झाला. ओढ्यातल्या सापाला अचानक मार्गात अडथळा आल्याने धोक्याची जाणीव झाली. म्हणून त्याने थबकून सावध पवित्रा घेतला.
तिची तिसरी झेप ओढ्याच्या अलिकडच्या पिंपळाच्या झाडापाशी होती. आणि गस्तीचे रानकोंबडे फडफडत उड्या मारत इकडेतिकडे पांगले. त्यांच्यावर डोळा ठेऊन असलेले मुंगुस आपल्या चेहर्यावर मख्ख भाव ठेवून गमावलेल्या संधीने खिन्न उदासिन झाले. एका अल्पश्या अवधीतच संबंध परिसरातील देखाव्याचा अर्थ बदलला होता.
ती झरझर पिंपळाच्या झाडावर चढली. मागून पुन्हा तोच ओढ्यातल्या पालापाचोळ्याचा आवाज.. यावेळी काहीसा अधिक प्रमाणात.. जाणूनबूजून केल्यासारखा.. ओढ्यातल्या सापाने एव्हाना तिथून हलण्याची तसदीही घेतली नव्हती वा तो काही कळत नसल्याकारणानं ढिम्म् निष्क्रीय होऊन थांबलेला.
आणि पुढच्या क्षणाला तो ही पिंपळाखाली काळाप्रमाणे उभा होता. हो... काळाप्रमाणेच.. काळ्या तोंडाचा वानर.. चेहर्यावर सभोवताली मातकट गडद रंगाचे दाट केस. त्या काळ्या चेहर्यामधले बटबटीत हिरवे-पिवळे डोळे. मजबूत बांधा आणि दणकट शरीरयष्टी. त्यामुळेच हुकूमत गाजवणार्या मनोवृत्तीचा तो काळा वानर.. काळच तो.. आज तिच्यासाठी काळ बनून आला होता.
ती मादी वानर पिंपळाच्या झाडाच्या शेंड्यावर पोहोचली होती. आपल्या उराशी घेतलेल्या पिल्लाला सावरत खाली पाहत होती. मघापासूनच्या धावपळीमुळे ती काहीशी थकलेली वाटत होती. तिच्या काही दिवसांपूर्वीच जन्मलेल्या पिल्लाने तिला घट्ट पकडले होते. ते पिल्लू बिचारे चांगलेच भेदरलेले दिसत होते. आणि त्याची माता त्याला कवटाळुन गोंजारत होती. पण तिचे तपकिरी रंगाचे डोळे मात्र अजूनही पिंपळाखाली उभ्या असलेल्या त्या काळाकडे होते.
पिंपळाच्या दाट पानांच्या अधल्यामधल्या चिंचोळ्या पोकळ्यांतूनही त्या दोघांची नजरानजर झाली. तो काहीसा सुस्त झाल्याच्या आविर्भावात दिसला. तिला क्षणभर वाटले की आता तो आपल्या मागे येण्याची काही चिन्हं दिसत नाही. परंतु पुढच्याच घटकेला तिला वाटत असलेली शक्यता धुसर झाली. आणि काही क्षणांच्या उसंतीनंतर तो काळ पिंपळाच्या त्या विस्तीर्ण झाडावर चढण्यास झेपावला.
आता मात्र तिचे धाबे दणाणले, आज हा काळ आपला पिच्छा सोडणार नाही याची पुरेपुर जाणीव तिला झाली. आणि मग ती पळण्यासाठी इतर मार्ग धुंडाळू लागली. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच त्या वृक्षाच्या पसरलेल्या फांद्याच्या या शेंड्यावरून त्या शेंड्यावर असे करत ती डाव्या बाजूच्या डहाळीपर्यंत येऊन पोहोचली. मागे पहावे, तर तो उपल्याही त्याच मार्गक्रमणाने तिच्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेला. त्याच्या डोळ्यांत एखाद्या खवीसाप्रणाने क्रौर्य झळाळून दिसत होते.
तिने समोर पाहीले, सहा-सात फुटांवर बाजूच्या झाडाची फांदी होती. पोटाशी असलेल्या पिल्लासोबत उडी मारणे काहीसे धोक्याचे वाटत होते. परंतु तेथेच थांबणं त्याहुनही अधिक घातक होते. विचार करायला जितका वेळ खर्ची पडेल तितके आपण अजूनच मरणाच्या गर्तेत अडकू, असे काहीसे तिच्या मनात आले असावे बहुधा. कारण तिने स्वतःला संपूर्ण बळानिशी पुढ्च्या झाडाच्या दिशेने झोकून दिले.
पुन्हा पानांचा सळसळाट होत गेला. आणि ती जिवाच्या आकांतानी या झाडावरून त्या झाडावर झेप घेत पळत सुटली. मागून येणार्या काळाची चाहूल तिला पळण्यासाठी अजूनच बळ देत होती. पळता पळता मानवी वस्तीच्या अगदी जवळच्या शेतांपाशी ती येऊन पोहोचली. आणि आता आपण त्या काळाच्या तावडीतून सुटणार नाही या कल्पनेने ती भेदरली.
ती पोहोचली त्या ठिकाणाहून मनुष्यवस्ती अगदी हाकेच्या अंतरावर होती. पण मादी वानर जेथे उभी होती तिथपासून ते त्या वस्तीपर्यंत एकही झाड नव्हते. फक्त मोकळ्या जमिनीशिवाय तिथे बारीकसारीक झुडपे तीसुद्धा एकमेकांपासून अंतर ठेवून वाढली होती. समोरच्या पन्नाससाठ फुटांपर्यंत फक्त भाग पाडलेल्या शेतजमिनींच्या फटी होत्या. आणि त्या मैदानी सदृश्य जागेवर पाठीमागून येणारा काळ तिच्यापर्यंत घटकाभर आधिच पोहचू शकत होता. त्याची क्षमता अर्थातच तिच्याहुन अधिक होती. त्यात तिच्याजवळ तिचे पिल्लूही होते. पिल्लाची फिकर नसती तर तिने कधीचेच त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता.
पण आता पळून फायदा नव्हता, आणि तिने निश्चय केला. मागे वळून येणार्या काळाकडे जळजळीत नजरेने पाहत तिने पिल्लाला हातात घेऊन आपल्यापासून मागे काही अंतरावर ठेवले. समोरून येणारा नर वानर ती थांबलीय हे पाहून काहीसा चेकाळला, आणि आता तो लयबद्ध हालचाली करत तिच्या दिशेने धावू लागला. त्याची शेपटी कधी डावीकडून उजवीकडे पुन्हा उजवीकडून डावीकडे नाचत होती. आणि तो काळ तिच्यापर्यंत अवघ्या वीसएक फुटांवर येऊन पोहोचला.
जे होईल ते होईल असे मनात आणून ती त्याच्याशी दोन हात करण्यास सुसज्ज झाली होतीच. इतक्यात जोरजोरात भुंकण्याचा आणि मध्येच विव्हळण्याचा आवाज करत पश्मिमेकडून पाचसहा कुत्र्यांचे टोळके त्यांच्या दिशेने धावत येत असलेले त्यांना दिसले.
काळ्या वानराने त्या कुत्र्यांना पाहून नाईलाजाने आपली पाऊले मागे फिरवली, परंतु त्याचे लक्ष तिच्याकडे होतेच. तिनेही वेळ वाया न घालवता पिल्लाला लगबगीने पोटाशी कवटाळले आणि मनुष्य वस्तीच्या दिशेने धाव घेतली. मागे जाण्याचा प्रश्नच नव्हता कारण हे कुत्रे तिच्या मागावर येणारच होते आणि जरी त्या कुत्र्यांपासून वाचले तरी तो नर वानर तिला सोडणार नव्हता.
कदाचित हे कुत्रे विचलीत होऊन त्या काळ्या नराच्या मागे जातील आणि आपण वाचून जाऊ असेही तिला वाटले. इतक्या वेळाने काहीतरी चांगले होईल या भाबड्या आशेने तिला थोडं हायसं वाटलं. पण तिचं नशिब आज तिला अजिबात साथ देत नव्हतं. त्या कुत्र्यांमधला काळसर म्होरक्या तिच्यादिशेनेच फिरला. आणि कसलाही विचार न करता सुसाट तिच्यावर धावून गेला. तिचा पाठलाग करताना त्या काळ्या कुत्र्याच्या कानांमागील केस एखाद्या नटासारखे हवेत उडत होते.
काळ... होय काळ तिच्यामागे लागलाच होता.. फक्त या वक्ताला त्याने आपले रूप बदलले होते.
काळ्या कुत्र्याच्या मागोमाग इतर कुत्रेही तिच्या दिशेने कुच करू लागले. आता प्रसंग अधिकच धोकादायक होता. ती कशीबशी धावत मानवी वस्तीत घुसली आणि इकडेतिकडे पाहत धावतपळत सुरक्षित जागा शोधू लागली.
साधारण वीसएक घरांची एका खेडेगावातली ती एक छोटीशी वाडी होती. काही पत्र्यांची सुस्थितीत असलेली घरे वगळता इतर घरे कौलारू होती. लहानसहान मुले आपल्या खेळात मश्गुल असतानाच तिथे आलेल्या वानरीच्या अस्तित्वाने त्यांची घाबरगुंडी उडाली आणि एकच गलका झाला. बायकामाणसे त्या गोंधळाने गडबडून बाहेर आले.
मागून येणार्या कुत्र्यांचा आवाज आता अगदी तिच्या कानाजवळ आला. रस्त्यावरचे दगडधोंडे तुडवत ती जीवाच्या आकांताने पळत होती. आणि बाहेर पडलेली माणसेही तिला अधिकच गोंधळवत होती. त्या गडबडीतच कशीबशी तिला एक सुरक्षित जागा दिसली आणि दोनचार झेपेत ती मादी वानर कोपर्यातल्या एका घराच्या पत्र्यावर पोहोचली.
ते घर तसे चांगले पंधरा फुट उंच तरी होते. आणि तिथे आता ती कुत्र्यांपासून सुरक्षितही होती. हाताशी आलेलं सावज निसटल्याने तीळपापड झालेले ते कुत्रे गुरगुरत जोरजोरात भुंकू लागले. तो काळा कुत्रा तर निकराने उड्या मारत त्या घराच्या पत्र्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. पण ती जागा त्याच्या आवाक्याबाहेरची वाटत होती. पण काही क्षणात मादी वानर समजून चुकली की पत्र्याचे असले तरी ते घर जुनाट होते. आणि त्या जागेच्या मजबूतीची कुणीही शाश्वती देऊ शकले नसते.
थोडा दम खावून इथून निघण्याचा मार्ग शोधावा म्हणून ती शांतपणे कुशीतल्या पिल्लाला धीर देत आजूबाजूला न्याहाळू लागली. पण तितक्यात त्या पत्र्याच्या एका टोकाला अगदी तिच्या पाठमोर्या बाजूने त्या काळ्या कुत्र्याचे मुंडके वर डोकावत असलेले तिला दिसले. अवघडलेल्या स्थितीत तो काळा कुत्रा कसाबसा वर चढू पाहत होता व त्यात त्याला काही प्रमाणात यश प्राप्त होत होते.
आता मात्र तिच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. आणि पिसाळून ती त्या कुत्र्याच्या अंगावर चालून गेली. चवताळेल्या अवस्थेत तीने कुत्र्यावर झडप घातली आणि....
पत्र्याच्या त्या भागातल्या पानाच्या तुकड्याचे मोडकळीस आलेले अवशेष खाडकन आवाज येऊन आत घरात पडले आणि तत्क्षणी मादी वानर आपला पाय त्यामधल्या पोकळीत अडकवून बसली. तिच्या बाहूच्या फटक्याने तो काळ्या कुत्रा घसरून खाली पडला खरा पण या क्रियेच्या परीणामस्वरूप तिला बसलेला झटका आणि न सावरता येण्याजोगा तोल इतक्या तीव्रतेने सुटला की त्या काळ्या कुत्र्याच्या मागून तिच्या कुशीतलं पिल्लू पंधरा फुट उंचीवरून खाली आदळलं.
खाली पडल्या पडल्या आधिच अर्धमेल्या झालेल्या त्या पिल्लावर इतर जमा झालेले कुत्रे तुटून पडले. पण एकदोन सेकंदाच्या अवधीतच तो काळा कुत्रा उठून त्यांच्या अंगावर धावून गेला. बाकी कुत्र्यांना बाजूला पिटाळत त्याने ओरबाडून त्या वानर पिल्लाला जबड्यात घट्ट पकडले. वानर पिल्लाची केविलवाणी धडपड पाहण्यायोग्य निश्चितच नव्हती. काळा कुत्रा आसपास नजर फिरवत त्या पिल्लाला फरफटत तेथून लांब घेऊन जाऊ लागला. त्याच्यामागे उरलेल्या कुत्र्यांचे लटांबळही निघाले.
हा सगळा प्रकार पाहताना वर पत्र्यावर मादी वानराचं काळीज तुट तुट तुटत होतं. अडकलेला पाय सोडवताना तिची झालेली दमछाक स्पष्ट दिसत होती. आणि नेमके तिच्या पिल्लाची वाताहत झाल्यानंतर तिच्या पायाची सुटका झाली, परंतु तोपर्यंत त्या बिचार्या पिल्लाची हालचाल बंद झालेली तिने पाहीली.
आतापर्यंत बचावासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे फळ मिळावं. आपलं पिल्लू गमावल्याचं अपार दुःख तिच्या चेहर्यावर दाटून आलं होतं. पण नियतीपुढे ती ही हतबल होती. खिन्न मनाने तिने वर आसमंताकडे पाहीले. खाली माणसांचा गोंधळ अजूनच वाढला होता. जवळच राहणारे काही लमानी देखिल एव्हाना तिची खबर ऐकून खाली जमा झाले होते. चपळ अन् काटक अंगकाठीचे ते लमानी लोक लज्जेपुरत्या कपड्यांनिशी जमले होते. त्यांच्या चमडीवर उन्हात भाजून काढल्याप्रमाणे काळ्या रंगाचा राप बसलेला असावा.
वर पाहता पाहता तिला अचानक काही अंतरावर तो नर वानर दिसला. मनुष्यवस्तीत येऊन काहीश्या सुरक्षित अंतरावर असलेल्या झाडाच्या शेंड्यावर तो दात विचकत विजयोत्सव साजरा करत असल्यासारखा दिसला. तिच्या मनात सुडाची भावना पेटली.. पण क्षणभरच. तेथून निघायला पहावं तर मघाशी पत्र्यात अडकलेला पाय जायबंदी असल्याचे तिच्या लक्षात आले.
सुडाच्या विचारावर मायेच्या भावनांनी मात केली. आपल्या पिल्लाची विरहवेदना तिला सुन्न करून गेली. अंग तिथेच टाकून तिने निष्क्रीयता स्विकारली. आणि तिच्या नकळत अथवा तिला चाहूल लागली असावी कुणास ठावूक, थबकत काहीच आवाज न करता वर चढून मागून आलेल्या एका लमान्याच्या हाती ती लागली. तिने अजिबात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही. त्या काळ्या लमान्याने एकदोन हिसके देत तिचे शेपूट तिच्याच गळ्याभोवती गुंडाळून करकचून फास पक्का केला आणि शेवटचं एखाददुसरं कण्हणं तिच्या मुखातून बाहेर पडलं.
दूर झाडावरून पाहत असलेला काळा नर वानर कुत्सित नजरेने त्या दृश्याचा आस्वाद घेत होता. लांबून रक्ताने माखलेला जबडा हलवत काळा कुत्रा ही असूयेने त्या दिशेने पाहत होता. त्या दोघांची नजर जिथे एकत्र येऊन मिळत होती त्या त्रिकोणाच्या मुख्य बिंदूवरती काळा लमानी समोर पाहत समाधानाने खांद्यावर तिचं धूड घेऊन चालला होता.
काळानं याघडीला पुन्हा रूप पालटून आपलं इप्सित साधलं होतं.
समाप्त
© https://www.marathistory.online/
Email : desai.nilesh199@gmail.com