Bhatkanti - punha ekda - 5 in Marathi Fiction Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ५)

Featured Books
Categories
Share

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ५)

" चला .. आम्ही निघतो... ती बॅग सापडली बसमध्ये, एका ठिकाणी अडकून बसली होती. म्हणून कळलं तुमचा माणूस गेला ते... ते सांगायला आलेलो. डेड बॉडी मिळाली तर कळवू. एक फोटो देऊन ठेवा त्याचा. " आकाशच्या वडिलांनी त्याचा फोटो आणला होता सोबत. देऊन टाकला. सगळे निघाले. सुप्री एका ठिकाणी तशीच उभी.
" काका... मी येऊ का तुमच्या सोबत... " सुप्री त्या पोलिसांना उद्देशून बोलली.
" कुठे ? " ,
" आकाशला शोधायला.. " ,
" काय वेड-बीड लागला आहे का तुम्हाला... महापूर आला आहे तिथे... ",
" प्लिज .. प्लिज... काका मला सुद्धा घेऊन चला... " सुप्री त्यांच्या पाया पडू लागली.
" अहो मॅडम... काय तुम्ही हट्ट करता... कुठे सांभाळणार तुम्हाला आम्ही... आमचे प्रयत्न सुरु आहेत ना.. ",
" मी येते तरीही... चला ना घेऊन... " सुप्री रडत रडत बोलत होती. तसे संजना आणि इतर सगळा ग्रुप पुढे आला.
" हो.. हो.. आम्ही सुद्धा येतो सोबत... तुमच्या मदतीला, घेऊन चला ना.. " सर्वच बोलले.
" तुमचा कोण लागायचा तो... ? " त्या पोलिसांनी विचारलं.
" खूप जवळचा होता तो आमच्या ..." संजना ,सुप्रीच्या खांद्यावर हात ठेवतं बोलली. " मित्रांसाठी जीवाला जीव देणार होता तो.. त्याच्यासाठी एवढं तरी केलं पाहिजे ना आम्हाला... तुम्ही घेऊन नाही गेलात तर आम्हाला पत्ता द्या. आम्ही जातो त्याला शोधायला. " सर्वच तयार झाले. पोलिसांनी एकदा सर्वाकडे पाहिलं.
" ठीक आहे. चला सोबत. पण जास्त अपेक्षा ठेवू नका... आणि स्वतःला अडचणीत टाकू नका. एका व्यक्तीसाठी एवढ्या जीवांची बाजी लावू शकत नाही आम्ही. "


पुढच्या दिवशी, सुप्री-संजनाचा सगळा ग्रुप , आकाशचे वडील आणि ते पोलीस असे सगळे निघाले. मजल-दरमजल करत पोहोचले. खरंच नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. अनेक गावे पाण्याखाली गेलेली. कुठे जाऊन शोधणार आकाशला. जवळजवळ १ महिना होतं आलेला आता. त्यात आकाशला पोहोता येत नव्हतं. त्याच्या जिवंत असण्याच्या शक्यता अंधुक झालेल्या. तरी नदीच्या काठा-काठाने रोज सगळेच शोधकार्य करायचे. सरतेशेवटी, दोन महिन्यांनी पोलिसांनी शोधकार्य थांबवलं. पुढे शोधण्यात काहीच अर्थ नव्हता. शहरातले सर्व पुन्हा घरी निघाले. जाता - जाता वाचलेल्या लोकांना भेटून जाऊ असं ठरलं.


" एक होता बस मध्ये... त्याने वाचवलं आम्हाला... " एकाने सांगितलं.
" कोण होता... ",
" माहित नाही.. त्या बस मध्ये एकच होता शहरातला.. मोठी बॅग पाठीला.. गळ्यात कॅमेरा.. बस पाण्यात गेल्यावर त्यानेच तर मागचा दरवाजा उघडला. स्वतः बाहेर जाऊ शकला आता तो, पण त्याने आम्हाला बाहेर काढलं आधी. पाण्याचा वेग एवढा होता कि आम्ही ३-४ जणच बाहेर आलो. बाकीचे त्या बस बाहेर आले पण वाहून गेले. आम्हाला वाचवणारा सुद्धा वाहून जाताना पाहिलं मी... " संजनाने ओळखलं. आकाश असावा. आकाशचा फोटो दाखवला तिने.
" हो... हाच होता तो, वाचला पाहिजे होता. " खात्री पटली होती. आकाश खरंच नाही आपल्यात, सर्वात महत्त्वाचं कि सुप्रीने मान्य केलेलं. निर्विकार चेहऱ्याने सर्वच शहरात आले.


सुप्रीच्या डोळ्यासमोरून तो कालावधी , एखाद्या सिनेमा प्रमाणे झर्रकन निघून गेला. डोळ्यात पाणी आलं. आकाशने सांगितलं होतं ना, रडायचं नाही कधी... प्रॉमिस केलेलं ना... सॉरी आकाश... नाही रडणार.. तिने वर आभाळाकडे पाहत मनात म्हटलं. तसंच डोळ्यात आलेलं पाणी पुसून टाकलं. आणि गच्चीवरून खाली आली.


तिकडे , कोमलला करमत नव्हतं. संजनाला भेटून आल्यापासून, ती तळमळत होती. शिवाय काही माहिती तिला मिळाली होती. संजनाला भेटलंच पाहिजे, म्हणत तिने फोन लावला.
" हॅलो संजना, मी कोमल.. ओळखलं का.. १५ दिवसांपूर्वी आपण भेटलो होतो... ",
" हो हो... आठवलं ना.. बोल तू... " ,
" मला भेटायचं होतं.. येऊ का... " ,
" हो.. ये ना.. ऑफिस मधेच ये.. ",
" उद्याच येते.. " कोमल आणि संजनाचे संभाषण जलद संपले. दुसऱ्या दिवशी, सकाळीच कोमल संजनाला भेटायला आली.
" सुप्रियाला बोलवतेस का ? " कोमलने पहिला प्रश्न केला.
" ती कशाला ? " ,
" तीची गरज आहे... प्लिज.. बोलावतेस का तिला " संजनाने सुप्रियाला बोलावलं.


" थेट पॉईंट वर येते. " कोमल. " माझी एक मैत्रीण आहे, ती आताच २ दिवसापूर्वी शहरात आली, गावाला गेली होती. " ,
" बरं .. पुढे.. " सुप्री.
" तर ती सांगत होती... एका व्यक्तीबद्दल,....... म्हणे तिथे तो फेमस आहे सध्या... " ,
" कोण.. आकाश का... " संजनाने घाईत विचारलं.
" नाही... but वाटलं तसं... म्हणून सांगायला आले तुला...वेडा भटक्या बोलतात गावात त्याला सगळे...",
" वेडा भटक्या ?? " सुप्री.
" हो... वाढलेली दाढी, मानेपर्यंत वाढलेले केस, कधी कधी समोर चेहऱ्यावर येतात केस , एवढे मोठे वाढलेले केस... कपडे, जीन्स आणि शर्ट... ते हि मळलेले... म्हणजे एखाद्या साधूला जर शहरातले कपडे घातले ना... तर तो कसा दिसेल हे इमॅजिन कर... पाठीला सॅक... ते ट्रेकिंग साठी असते ना तशीच... त्यात त्याचे कपडे असतात असं लोकं बोलतात. आणि गळ्यात एक तुटलेला, बिघडलेला कॅमेरा. शिवाय काही जुनं लक्षात नाही त्याच्या. म्हणून वेडा... काही पण बडबडत असतो...... आणि एका गावातून दुसऱ्या गावात असा फिरत असतो तो... म्हणून भटक्या... असा तो वेडा भटक्या.. " कोमलने बोलणं पूर्ण केलं.
" कॅमेरा !! कॅमेरा बोललीस का तू... " संजना आनंदात बोलली.
" हो ... पण बिघडलेला आहे तो.. तिने जसं वर्णन केलं तसंच सांगितलं मी. ",
" त्याचा फोटो वगैरे. " संजना.... सुप्री एवढा वेळ शांत ऐकत होती फक्त.
" नाही.. तो जास्त थांबत नाही एका ठिकाणी... आणि ती बोलली कि , मराठी एवढा छान बोलतो कि गावातला किंवा साधू वाटत नाही तो.. गावा - गावात फिरून लोकांना मदत करतो, चांगली काम करायला सांगतो. झाडं लावायला सांगतो.. पाणी कसं वाचवायचे ते सांगतो.. आता पर्यंत किती तरी ठिकाणी त्यांनी असं छान छान कामे करून ठेवली आहेत.. म्हणून फेमस झाला आहे तो... लोकांना पटते त्याचे बोलणे... पण त्याचं काम झालं कि निघून जातो. अचानक गायब होतो... कसा जातो माहित नाही. गावातल्या बसमधले ड्रायव्हर सुद्धा त्याला ओळखतात आता, तिकीट न काढताच फिरत असतो तो. असा आहे तो... फोटो काढायचा प्रयन्त केला तिने.. पण तोपर्यंत गेलेला तो... " ,
" म्हणजे तुझं म्हणणं आहे कि तो आकाश.... " संजना मधेच बोलली. सुप्रीने थांबवलं तिला.
" थांब संजू... मला बोलू दे... पहिली गोष्ट, कोमल.... गेल्या एका वर्षातली , हि पाचवी घटना आहे. कोणीतरी येते सांगत, आकाश सारखा दिसला होता... मग पुन्हा शोध सुरु... हातात अपयश येते फक्त. त्यानंतर , हे जे वर्णन सांगितल ना तू... वेडा भटक्या वगैरे... तर तो आकाश असणं शक्यच नाही... दाढी , ती पण साधू एवढी... आकाश , तो किती clean असायचा.. तुम्ही होता ना ४ दिवस एकत्र.. तुही बघितलं असशील ना.. केस वगैरे कापलेले, दाढी केलेली असायची... चल , ते एक वेळ मानू शकते. but तुटलेला , बिघडलेला कॅमेरा... ते possible च नाही. जिवापेक्षा जास्त जपायचा तो कॅमेरा... त्याचा जीवच होता त्या कॅमेरा मध्ये... so, मी आधीच मान्य केलं आहे आकाशचे नसणे. तुम्ही हि तसंच समजा . " ,
" तरीही.. " कोमल
" मला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून मी निघाली आहे... मला वाटलं तुम्ही येणार माझ्या सोबत... ",
" हो.. मी तयार आहे .. " संजना
" तुम्हाला जायचे असेल तर जा तुम्ही ... " सुप्री बोलली.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: