Chandani ratra - 17 in Marathi Love Stories by Niranjan Pranesh Kulkarni books and stories PDF | चांदणी रात्र - १७

Featured Books
Categories
Share

चांदणी रात्र - १७

थोड्यावेळाने चहा पिऊन झाल्यावर रिवा आणि राजेश झोपडीच्या बाहेर आले. आता अंधार थोडा कमी झाला होता. काही सूर्यकिरणे झाडांचा अडथळा पार करून जमिनीपर्यंत पोहोचली होती. झाडांच्या फांद्यांना चुकवत मातीला स्पर्श करण्याची जणू त्यांच्यात स्पर्धा सुरू होती. राजेशने समोर पाहिले. पुढच्या बाजूला वेगवेगळ्या आकाराच्या बऱ्याच छोट्या मोठ्या झोपड्या दिसत होत्या. रिवा आणि जांदी सारखा पोशाख केलेले बरेच स्त्री-पुरुष दिसत होते. काही लहान मुलेही होती. रिवाच्या मागून राजेश चालत होता. वाटेतली माणसं राजेशकडे एखादा एलियन दिसल्याप्रमाणे आश्चर्य आणि कुतूहलाने पाहत होती. त्या सर्व लोकांकडे पाहून राजेशला आपण फार उंच असल्यासारखं वाटत होतं. कारण ती माणसं रिवाप्रमाणेच उंचीला कमी होती. विशेष म्हणजे स्त्रियाही पुरुषांच्या इतक्याच उंच होत्या. सर्व स्त्री-पुरुष अतिशय निरोगी आणि काटक दिसत होते. काही वृध्द पुरुष सोडले तर कोणाच्याच शरीरावर चरबी दिसत नव्हती. सर्वांचा रंगदेखील अगदी एकसारखा सावळा होता. एका माणसाने राजेशचं लक्ष वेधून घेतलं. त्या माणसाचा वेषसुद्धा आदिवासींसारखाच होता. पण तो दिसायला इतर आदिवासींपेक्षा अगदीच वेगळा होता. त्याचा चेहेरा जरी थोडा काळवंडला असला तरी मूळचा गोरा रंग लपत नव्हता. तो राजेशपेक्षाही उंच होता. हा माणूस इथे काय करतोय असा राजेशला प्रश्न पडला. जणू राजेशच्या मनातलं ओळ्खल्याप्रमाणे रिवा म्हणाला, “तो समोरचा माणूस थोडा वेगळा वाटतो ना? हो तो वेगळाच आहे. तो मूळचा आमच्यातला नाही. तुला त्याच्या बद्दल माहिती हवी असेल तर तोच तुला सांगेल. चल आपण त्यालाच विचारू.” असे म्हणून रिवा राजेशला त्या माणसाकडे घेऊन गेला. ज्या आश्चर्याने राजेश त्या माणसाकडे पाहत होता तीतक्याच आश्चर्याने तो माणूस राजेशकडे पाहत होता. रिवाने त्या माणसाला त्याच्या भाषेत काहीतरी सांगितलं. त्या माणसाने राजेशला बसण्याची खूण केली. राजेश समोरच्या दगडावर बसला. तो माणूस बोलू लागला, “माझं नाव मंगेश देसाई. पण मला इथे सगळे गरू नावाने ओळखतात. गरू म्हणजेच मराठीत गोरा.” मंगेश म्हणजेच गरू पुढे सांगू लागला, “आता तुला प्रश्न पडला असेल की मी इथे काय करतोय. तर ऐक, मी पूर्वी एक संशोधक होतो. कॅन्सर पूर्णपणे बरा करण्यासाठी औषध बनवण्याचं माझं स्वप्न होतं. त्यासाठी वेगवेगळ्या दुर्गम भागात जाऊन तिथल्या दुर्मिळ वनस्पती मी गोळा करायचो व त्यावर संशोधन करायचो. माझ्या एका मित्राकडून मी या जंगलाबद्दल ऐकलं होतं. म्हणून काही नवीन मिळतंय का पाहायला मी इथे आलो होतो. गावातल्या लोकांनी मला आडवायचा खूप प्रयत्न केला. बऱ्याच कथा मला ऐकवल्या. इथे भुताटकी आहे, एकदा आत गेलेला माणूस परत येत नाही, वगैरे. पण मी काही त्यांचं ऐकलं नाही. मी इथे एक टेंट टाकुन राहात होतो. पण एक दिवस तीनचार लोकांनी मी झोपलो असतानाच मला उचललं व एका झाडाला बांधून ठेवलं. आशी माणसं मी पहिल्यांदाच पाहत होतो. पण मला का बांधलंय तेच कळत नव्हतं. कदाचित त्यांना माझ्यापासून काहीतरी धोका आहे असं वाटत असेल असा मी विचार केला. मी त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो की मी तुमचा मित्र आहे, मला सोडा पण ते मला सोडायलाच तयार नव्हते आणि त्यांच्यातला कोणी काही बोलतही नव्हता. थोड्या वेळाने एक वयस्कर माणूस तिथे आला आणि त्याने मला “तू इथे का आला आहेस?” असं विचारलं. त्याचं मराठी ऐकून तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं होतं. मी त्याला माझ्या संशोधनाबद्दल सगळं सांगितलं. त्या माणसाने मला लगेच मोकळं केलं. तो माणूस एकाला त्यांच्या भाषेत काहीतरी बोलला. तो दुसरा माणूस एका झोपडीत गेला व थोड्यावेळाने हातात एक मातीचं वाडगं घेऊन आला. “चहा घ्या.” ते वाडगं माझ्या हातात देत तो म्हणाला. त्या वाडग्यातून खूप उग्र वास येत होता. त्यात चहा नव्हताच. वेगळंच लालसर रंगाचं द्रव्य होतं. मला काही ते प्यावसं वाटेना. थोडावेळ मी नुसताच पाहत होतो. त्या माणसाने मला सांगितलं, “एकदा पिऊन तर बघा.” मी नाईलाजाने त्या द्रव्याचा एक घोट घेतला आणि एका घोटातच मला फार ताजतवानं वाटू लागलं. चवीला थोडा कडवट होता पण नक्कीच काहीतरी जादू होती त्या चहात. चहा संपवताच मला जणू हवेत असल्यासारखं वाटत होतं. मी त्या माणसाला चहाबद्दल विचारलं तेव्हा त्याने मला सांगितलं की हा औषधी वनस्पतींपासून बनवलेला चहा आहे. पुढे तो मला म्हणाला की या जंगलात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती आहेत. आमच्या पूर्वजांनी फार वर्षांपूर्वीपासून संशोधन केलं आहे. तुम्ही दोन दिवस इथे राहिलात तर तुम्हाला अजून बरच काही पाहता येईल. मी इथे अजून दोनचार दिवस राहायचं ठरवलं. त्या दोन दिवसात मी जे काही पाहिलं जे काही अनुभवलं ते खरच फार अद्भुत होतं. तेव्हापासून म्हणजेच दोन वर्षांपासून मी इथेच राहतोय.”
आता राजेशचं कुतूहल चांगलंच वाढलं होतं. राजेशने गरूला विचारलं, “तुम्हाला दोन वर्षात इथे काय अनुभव आले मला सांगाल का?” “मी सांगण्यापेक्षा तूच थोडे दिवस इथे रहा आणि स्वतः च अनुभव घे.” गरू म्हणाला. राजेशलाही ते पटलं. “तुम्ही म्हणालात की तुम्ही इथे दोन वर्षांपासून राहताय. मग तुमच्या घरच्यांनी तुम्हाला किती शोधलं असेल.” राजेशने गरूला विचारलं. “जवळचं असं मला कोणीच नाही. आईवडील दोघेही मी लहान असतानाच आजारपणामुळे वारले. घरची परिस्थिती बेताची होती त्यामुळे उपचारासाठी पैसे नव्हते. मी लग्न केलं नाही त्यामुळे बायकोमुलांचाही प्रश्न नाही.” गरू राजेशला म्हणाला.
स्वतःच्या कुटुंबाबद्दल मात्र राजेश पूर्णपणे विसरला होता. त्या वातावरणातच जादू होती. त्याचं मन एका वेगळ्याच गूढ शक्तीने व्यापलं होतं. राजेशने अजून काही दिवस तिथे राहायचं ठरवलं. गरूचा निरोप घेऊन रिवा आणि राजेश एका मोठ्या झोपडीपाशी पोहोचले. “इथे आमच्या जमातीचे प्रमुख राहतात.” रिवा म्हणाला. रिवा झोपडीत गेला व थोड्या वेळाने बाहेर आला. त्याच्या मागून एक वृद्ध माणूस बाहेर आला. रिवाने त्यांच्या भाषेत त्या माणसाला काहीतरी सांगितलं. त्या माणसाने राजेशकडे पाहिले व तो म्हणाला, “आमच्या वस्तीत तुझं स्वागत आहे. आता थोडे दिवस राहूनच जा. इथलं जग बाहेरच्या जगापेक्षा फार वेगळं आहे.” “हो मी नक्की राहीन.” राजेश म्हणाला. तिथून थोडे पुढे गेल्यावर रिवा राजेशला म्हणाला, “तुला आता भूक लागली असेल ना? हे पान खा.” असे म्हणून रिवाने जवळच एक पिवळ्या रंगाची पानं असलेल्या झाडाचं एक पान तोडलं व राजेशच्या हातावर ठेवलं. “हे कसलं पान आहे?” राजेशने विचारलं. “अरे खाऊन तर बघ.” रिवा म्हणाला. राजेशने पान तोंडात टाकलं व तो ते चावू लागला. वरून जरी कोरडं वाटत असलं तरी आतून ते पान रसरशीत होतं. जसा जसा त्या पानाचा रस राजेशच्या पोटात जात होता तसं राजेशला पोट भरल्यासारखं वाटत होतं. पूर्ण पान खाऊन झाल्यावर तर राजेशने चक्क ढेकर दिली. पूर्ण ताट भरून जेवल्याप्रमाणे राजेशचं पोट भरलं होतं. त्याने रिवाकडे आश्चर्याने पाहीलं. “हे पान तर फार छोटी गोष्ट आहे, अजून बरच काही पाहायचं आहे तुला.” रिवा राजेशला म्हणाला.

थोडं पुढें जाताच समोरचं दृश्य पाहताच राजेशचे पाय अचानक थांबले. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. समोर एका झाडाखाली एक मोठा वाघ बसला होता. दोन लहान मुलं त्या वाघाशी खेळत होती. वाघाची शेपटी ओढ, त्याच्या पाठीवर बस असे त्यांचे रानटी खेळ सुरू होते. आता मात्र राजेश खरच घाबरला. रिवा त्या वाघाजवळ गेला व त्याने वाघाच्या डोक्यावरून हात फिरवला. रिवाने वाघासमोर हात धरला. एखाद्या पाळीव कुत्र्याप्रमाणे त्या वाघाने अतिशय लाडीकपणे आपला भव्य पंजा अलगद रिवाच्या छोट्या हातावर ठेवला. आता वाघाच्या डोळ्यात मैत्रीपूर्ण भाव दिसत होते. हे सर्व पाहून राजेश जागीच थिजला होता. “अरे ये ना इकडे. तो काहीही करणार नाही तुला.” रिवा राजेशला म्हणाला. पण काही केल्या राजेशचे पाय जागचे हालेनात. तेव्हा रिवाने वाघाच्या गळ्याला कुरवाळले व त्यांच्या भाषेत काहीतरी बोलला. तसा वाघ जागेवरून उठला. रिवा राजेशजवळ आला. वाघही रिवाच्या मागे गेला. “लाव हात काहीही करणार नाही तो तुला आणि अशी संधी पुन्हा मिळणार नाही तुला.” रिवा म्हणाला. रिवाच्या बोलण्याचा राजेशवर परिणाम झाला व तो घाबरतच वाघाजवळ गेला. त्याने हळूहळू एक हात वाघाच्या डोक्याजवळ न्हेला व डोक्यावरून अलगद हात फिरवला. तसं ते उमदे जनावर लाडात आलं व राजेशला घासू लागलं. राजेशच्या मनातली भीती आता कुठल्याकुठे पळाली होती.

रिवाने सांगताच वाघ राजेशपासून दूर गेला व पुन्हा त्या झाडाखाली बसला. रिवा आणि राजेश पुढे चालू लागले. “तुला फार आश्चर्य वाटलं असेल ना वाघाला असा शांत बसलेला, लाडात आलेला पाहून? खरंतर हे वन्यजीव आपण समजतो तेवढेही क्रूर नसतात रे. तेही प्रेमाचे भुकेले असतात.” रिवा राजेशला म्हणाला. थोड्यावेळाने ते परत रिवाच्या झोपडीपाशी पोहोचले. झोपडीत पोहोचताच राजेशने रिवाला विचारलं, “तुम्ही लोक टीव्ही, मोबाईल काहीच वापरत नाही. मग तुमचा वेळ कसा जातो?” “आम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहतो आणि निसर्गालाच देव मानतो. इथे राहिल्यावर वेळ कसा जातो कळतच नाही. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी आम्हाला टीव्ही, मोबाईलसारख्या कृत्रिम साधनांची गरजच नाही.” रिवा राजेशला म्हणाला.

X X X X X X

राजेशला तिथे राहून आता आठ दिवस झाले होते. विशेष म्हणजे या आठ दिवसात त्याला आई-वडिलांची, मित्रांची आठवण एकदाही आली नव्हती. तो एका वेगळ्याच मानसिक अवस्थेत वावरत होता. इतक्या दिवसात त्याला त्या जमातीतील माणसांकडे असलेल्या वेगवेगळ्या अद्भुत शक्तींबद्दल समजलं होतं. काही शक्तींचा तर प्रत्यक्ष अनुभव देखील आला होता. लहान पणापासूनच राजेशला एका गोष्टीबद्दल जाणून घ्यायची फार इच्छा होती. ती गोष्ट म्हणजे भविष्य. एक दिवस त्याने रिवाला विचारलं, “तुम्हा लोकांना इतक्या वेगवेगळ्या सिद्धी अवगत आहेत. मग तुम्हाला भविष्यात काय होणार आहे हे सांगता येतं का?” “हो, भविष्यात काय होणार आहे हे मी पाहु शकतो.” रिवा सहजपणे म्हणाला. राजेश काहीतरी बोलणार होता तेवढ्यात एक माणूस धावतच झोपडीत आला. तो त्यांच्या भाषेत रिवाला काहीतरी म्हणाला. “आमच्या प्रमुखाने तातडीने सर्वाना बोलावलंय. मी थोड्यावेळात परत येतो. तू इथेच थांब.” एवढे बोलून रिवा झोपडीतुन बाहेर पडला. थोड्यावेळाने रिवा परत आला. चेहेऱ्यावरून तो फार चिडलेला दिसत होता. तो रागातच राजेशला म्हणाला, “तुम्ही शहरातले लोक समजता काय स्वतःला? हे जग काय तुमच्या बापाचं आहे काय! निसर्गाची हानी करण्याचा आधीकार दिला कोणी तुम्हाला?” “तुम्ही जरा शांत व्हा आणि काय झालंय मला सविस्तर सांगा.” राजेश रिवाला म्हणाला. रिवा आत जाऊन माठातलं पाणी प्यायला व थोडा शांत झाला. तो बाहेर आला व बोलू लागला, “आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतल्या एका उद्योगपतीला आमच्या जंगलाच्या जागेवर मोठं हॉटेल बांधायचं आहे. त्यासाठी पाहणी करायला तो गावात आलाय. गावातल्या लोकांनी त्याला बरच समजावलं की ही जागा शापित आहे, इथे भुताटकी आहे, पण तो काही ऐकायला तयार नाही. कोणा मंत्र्याच्या नात्यातला हा माणूस आहे. त्यामुळे त्याला वरून मंजुरीही मिळाली आहे.” राजेशलाही अशा राजकारण्यांचा पहिल्यापासूनच राग होता आणि अश्याप्रकारे निसर्गाची हानी करून आपण निसर्गाचच नाही तर स्वतःचही नुकसान करतोय असं राजेशचं स्पष्ट मत होतं. “मग आता तुम्ही काय करणार आहात?” त्याने रिवाला विचारलं. “आम्ही पहिलं त्याला समजावणार पण तरीही नाही ऐकलं तर त्याचं काही खरं नाही.” रिवा म्हणाला.

क्रमशः