Pratibimb - The Reflections - 4 in Marathi Fiction Stories by Mrs. Mrinmayee Shirgaonkar books and stories PDF | प्रतिबिंब - 4

Featured Books
Categories
Share

प्रतिबिंब - 4

प्रतिबिंब

भाग ४

त्या दिवशी वाडा संपूर्ण सजवला होता. नव्यानेच रंगरंगोटी करण्यात आली होती. भाऊसाहेब खुशीत होते. बऱ्याच वर्षांनी वाड्याला नवी मालकीण मिळणार होती. त्यांच्या मुलाची, अप्पासाहेबाची बायको, म्हणजेच, भाऊसाहेबांची सून वयात आली होती. व्याह्यांचा तसा निरोप आला होता. आज सूनबाई कायमच्या वाड्यावर राहायला येणार होत्या. एका मोठ्या जबाबदारीतून मोकळं झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. मंडळी पोचली. रितीरिवाज, परिवारातील इतर स्त्रियांनी पूर्ण केले. भाऊसाहेबांच्या पत्नीचे अकाली निधन त्यांना फार एकटे करून गेले होते. पण मुलाला सावत्रपणा नको म्हणून त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचारही मनात आणला नव्हता. रितीप्रमाणे गावातील कलावंतीण, सूनेची दृष्ट काढायला आली होती. तिच्याबरोबर तिची उफाड्याची मुलगी शेवंताही आली होती. खाली कार्यक्रम सुरू झाले. पुरूषमंडळींची व्यवस्था वरच्या खोल्यांमधे केली होती. खाली बायकांचे कार्यक्रम सुरू होते. अप्पासाहेब आपल्या खोलीत बसला होता. आज त्याची पत्नी त्यास तशी प्रथमच भेटणार होती. इतक्यात शेवंता त्याच्या खोलीत आली आणि तिने दार लावून घेतले. ती सरळ अप्पासाहेबाच्या समोर येऊन उभी राहिली आणि तिने वस्त्रं उतरवण्यास सुरूवात केली.

तो प्रचंड हबकला. "अगं काय करतेस हे?" असं जवळपास ओरडलाच.

शेवंताही संतापूनच आली होती. "का कालपर्यंत हेच गोड वाटत होतं ना. मला कायमचं आपलं करण्याचं आमिष दाखवून आता सवत आणून बसवता होय माझ्या छातीवर?"

"काहीतरी बडबडू नकोस. आजपर्यंत तुला काही कमी पडलं नाही, पुढेही पडणार नाही. कलावंतीण आहेस हे विसरू नकोस." असं म्हणून तो तरातरा खोलीच्या बाहेर जावू लागला.

तशी शेवंता इरेला पेटली. "अश्शी अर्ध्या कपड्यात बाहेर येऊन तमाशा करीन" तिने धमकावले.
अप्पासाहेबाने तिला झिडकारले आणि तरातरा बाहेर निघून गेला. भाऊसाहेब शेजारच्या खोलीतून सर्व ऐकत होते. ते आतील दरवाजा उघडून आत आले. त्यांनी रागाने बेफाम बाहेर जाणाऱ्या अर्धवस्त्रा शेवंतास, हाताला धरून आत खेचले. नकळत घडलेल्या या प्रकाराने ती धडपडली आणि दोघं खाली पडली. भाऊसाहेबांना पाहून प्रथम भीती, मग राग, अशा अनेक भावनांनी ती बेफाम झाली. ओरडण्यास तिने आ वासला पण त्याचक्षणी भाऊसाहेबानी तिचाच पदर तिच्या तोंडी कोंबला. अनेक वर्षांनंतर झालेला स्त्रीचा हा असा स्पर्श त्यांना बेभान करून गेला आणि त्यांच्या हातून नको ते घडले. शेवंता हातपाय झाडत राहिली पण तिचा विरोध दुबळा होत गेला.

भाऊसाहेब भानावर आले तेव्हा ती निपचित पडली होती. डोळे सताड उघडे. त्यांनी तिला हलवले पण तोंडात कोंबलेल्या पदराने गुदमरून तिचा केव्हाच मृत्यू झाला होता. भाऊसाहेबांना दरदरून घाम फुटला. काहीतरी लगेच करणे निकडीचे होते. पण काय हे त्यांच्या घाबरलेल्या बुद्धीस समजेना. ते धडपडत उठले. प्रथम दरवाजा बंद केला. शेवंताचे शव हळूहळू ओढत आरशाच्या कपाटापर्यंत आणले आणि कपाटात कसेबसे कोंबले. मग घाईघाईने खोली पूर्ववत केली. स्वत:चे कपडे ठीकठाक केले आणि परत एक नजर खोलीभर फिरवली. त्यांची नजर सजवलेल्या पलंगाकडे गेली. प्रचंड अपराधी भावनेने त्यांना घेरले. पण विचार करत बसायला वेळच नव्हता. त्यांनी कपाटास कुलूप लावले. मग खोलीस कुलूप लावले. सावकाश सर्व बसले होते तेथे आले. खालचा कार्यक्रम संपतच आला होता. जेवणाचे बोलावणे आले. सर्व खाली आले. कलावंतीणीस तिचा मोबदला दिला तशी ती परत निघाली. शेवंता कुठे दिसेना. ती तिला शोधू लागली. ‘कुठे गेली?’ पण थोरामोठ्यांच्या गडबडीत विचारायचं तरी कोणाला? भिवा सुतार दिसला, त्याला म्हणाली ‘दिसली तर दे लावून घराकडे.’ तो ‘बरं’ म्हणाला. इकडे नव्या नवरीला सजवून तयार केली गेली. सगळे गेल्यावर तिला दुधाचा पेला घेऊन वरच्या, अप्पासाहेबाच्या खोलीत पाठवण्यात आले. अप्पासाहेब स्त्रीसुखास नवखा नसला तरी नव्या नवलाईने नव्या वधुकडे आकर्षिला गेला. दोघांची पहिली रात्र रंगत गेली आणि आरशापलीकडे शेवंताच्या निर्जीव डोळ्यांमधून आग बरसू लागली. संताप, मत्सर, द्वेष, सूडभावना या सर्व जाळणाऱ्या दाहक भावना तिच्या डोळ्यातून आग ओकत होत्या. त्याच विषारी नजरेने शेवंताने आरशातून वळून जाईकडे पाहिले.

इतका वेळ सिनेमाप्रमाणे आरशात भान हरपून सर्व घटना पाहणारी जाई दचकून भानावर आली. एकाच वेळी सर्पासारखी थंड संवेदना तिच्या शरीरभर फिरली आणि तिला दरदरून घाम फुटला. वाड्यातल्या जिन्यातली भावनारहीत नजर, तिला आरशापलीकडे नेतानाची निर्विकार खुनशी नजर आणि आत्ताची ही भयानक जाळणारी विखारी नजर! भयंकर होतं हे सगळंच. तिची नजरही आणि पाहिलेली घटनाही. काही कळायच्या आत जाई स्टडीमधून हेलपाटत बाहेर आली आणि बेडरूममधे पलंगाच्या कोपऱ्यात अंगाचं मुळकुटं करून थरथरत बसून राहिली. स्वप्न आणि सत्याच्या सीमारेषेवर ती हेलकावत होती. काय होतंय हे कळण्याच्या पलीकडे ती गेली होती. डोकं सून्न झालं होतं. बराच वेळ असं बसून राहिल्यावर जाई हळूहळू उठली. किचन मधे जाऊन गटागटा पाणी प्यायली. शरीर चिपाडासारखं वाटलं तिला, जीवनरस कुणीतरी पिळून घेतल्यासारखं.

सकाळी यश बाहेर पडल्याबरोबर ती स्टडी मधे गेली होती. दार पुढे करून खुर्चीत बसावं म्हणून दाराला, पर्यायाने आरशाला हात लागला आणि बटन दाबून टीव्ही चा पडदा ऑन व्हावा तसा चित्रपटच सुरू झाला. आता यश यायची वेळ झाली होती पण जाईच्या पोटात अन्नाचा कणही सकाळपासून गेला नव्हता. जे घडत होतं ते एकाच वेळी प्रचंड ओढीने आपल्याकडे खेचणारं पण त्याचवेळी जाईला स्वत:च्या अस्तित्वाच्याच सुरक्षिततेची भिती वाटावी असं होतं.

बघता बघता जाईला हुडहुडी भरली आणि ताप आला. ती बेडरूममधे जाऊन निजून राहिली. यश आल्यावर मात्र त्याने ताबडतोब डॉक्टरांना फोन केला. त्यांनी डोक्यावर पट्टया ठेवायला सांगितल्या. गोळीही घेण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी तिच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. वैद्यकिय चाचण्यांमधून काहीही रोग नाही हे सिद्ध होत होते. साधा व्हायरल फिवर आहे, होईल कमी असा दिलासा डॉक्टरांनी दिला.