६
पुन्हा राॅबिन
घरी आलो तर आई वाट पाहात होती. उगाच. अाई लोकांची ही सवयच असावी. पोर बाहेर पडले.. करा काळजी. लहानपणापासूनच पाहिलेय मी. आईच्या गळ्यातला ताईत मी. मला हवे ते आई देत असेच. लाडावले होते तिने मला कदाचित पण मीच बिघडणाऱ्यांतला नव्हतो. म्हणून मी बिघडलो नसावा! आई आम्हाला सोडून इथे वर्षभर आधी कशी अाली असेल? मला आश्चर्य वाटायचे. पण बहुधा बाबांची इकडे एकटेपणाची निकड कळली असावी तिला. त्यामुळे चक्क चंद्रावर चालण्याची कसरतही शिकायला तयार झाली असणार ती.
आम्ही आलो तर म्हणाली, "खूप वेळ झाला रे.."
"हुं. बागेत बसलो होतो. गप्पा मारत. ती कृत्रिम बाग आहे ना तिकडे."
"छान आहे ती बाग. नंतर त्याला ती दुसरी बाग पण दाखव. दूर आहे ती. पण छान आहे."
"होय मॅडम, तिथे यान घेऊन जाईन एकदा."
"चांगलीच गट्टी जमलेली दिसतेय तुमची.. राॅबिन, काय म्हणत होता हा अंबर.."
आता राॅबिनला सत्यवचनाचा झटका येइतो की काय? खरा माणूस असता तर खरा चिमटा काढला असता.. पण या ह्युमनाॅईडला काय काढणार चिमटा.. मी बोललेले सारे टेप झाले असेल त्याच्या मेमरीत, ते रिवाईंड ही करेल तो. पण हा हुशार निघाला ..
"काही नाही मॅडम. नवीन आहे तो. जरा बागेत बसून बाहेरचे जग बघत होतो.. इकडतिकडच्या गप्पा."
राॅबिनने तो लव्हस्टोरीचा मजकूर गाळला म्हणजे चांगलाच हुशार आहे हा! मी नि:श्वास टाकलेला त्याला कळला असावा. माझ्याकडे बघून त्याने चक्क डोळा मारला! हे ही आहे की काय त्याच्यात प्रोग्राम्ड?
एकूण हा लव्हेबल होता राॅबिन! अंगभूत हुशारी आहे त्याच्यात.. प्रोग्राम्ड!
बाबा आज आॅफिसातच रात्रभर राहणार होते. तसा संदेश आला त्यांचा. चायना मून नि मून अमेरिका मधले भांडण म्हणे! त्यामुळे इकडे रेड अॅलर्ट. असला अॅलर्ट कधी कधी चार पाच दिवसही असतो म्हणे. म्हणजे तेवढे दिवस आॅफिसातच बसून राहायचे. सरकारी आॅफिस म्हटले की हे सारे आलेच. तरीही प्रायव्हेट मधल्या जाॅबपेक्षा इथे सुविधा जास्त. उदाहरणच द्यायचे तर अर्थातच हा राॅबिन! हा सरकारी अधिकाऱ्यांनाच मिळतो सहज.
मी विचार करायला लागलो. पुढच्या आठवड्यात इकडे लोढा आणि गुंदेचा बिल्डरकडे इंटरव्हयू माझा. प्रायव्हेट जाॅबच. डायरेक्ट सरकारी नोकरीत रिक्रूटमेंट नाही होत इकडून. म्हणजे कुणी पृथ्वीवरून नेमणूक करून आला तर सरकारी नोकरीत! बोलून चालून सरकारीच ती नोकरी. तिच्यात घुसणे कठीणच असणार! आता मला ती प्रायव्हेट नोकरी मिळेल ना? अकाउंट्सचे काम. मी काॅमर्स फर्स्ट क्लासवाला. आणि असून असून असे किती जण चंद्रावर पोहोचले असणार नोकरीसाठी? तरीही गाफील राहून नाही चालणार. उद्यापासून थोडातरी अभ्यास केला पाहिजे. तशा नोट्स मी माझ्या काॅम्प मध्ये कंप्रेस्ड करून आणल्यात सगळ्या. फक्त आता मूड आला की झाले. अभ्यासाबाबतचा हा उद्या माझा कधी उगवेल कुणास ठाऊक! तरीही विचार करत पडून राहिलो. इकडे तंबूत एक बरे असते. उगाच त्या स्पेससूटचे जंजाळ वागवावे लागत नाही अंगावर. नाहीतर बाहेर गेलेलो तर त्या स्पेससूटचे धूड अंगावर बाळगत कंटाळलेलो. ह्या राॅबिनचे बरे.. बिनधास्त फिरत असतो कुठेही.
विचार करून गंमत वाटली मला. आज राॅबिनला माझा हेवा वाटत होता.. माझ्या लहानपणाविषयी. आणि आता मला त्याचा वाटतोय! इंग्रजीत 'ग्रास इज ग्रीनर अाॅन अदर साईड' म्हणतात त्याची आठवण झाली! आणि एखाद्या ह्युमनने ह्युमनाॅईडचा हेवा करावा हे म्हणजे जरा अति झाले नाही? काही असो.. असे झाले खरे! आणि त्याला कारण ही चंद्रावरची परिस्थिती होती! आणि गंमत म्हणजे मी आलो नसतो इथे तर राॅबिन भेटलाच नसता हेवा वाटायला! म्हणजे हेवा वाटणे ही गोष्ट स्थल, काल नि व्यक्ती सापेक्ष असते तर! विचार करून अशी सत्ये हाती लागतात तर! यांनाच विचार मौक्तिके म्हणतात की काय?
रात्री काॅम्प उघडून बसलो तर पाठोपाठ राॅबिन. म्हणाला, "ब्रो.. शो मी द अर्थ फोटोज्.."
"म्हणजे? तुझ्या त्या मशिनीत सारे काही दिसते ना?"
"नाही रे, ते जनरल असतात, तुझ्या घरचे.. काॅलेजचे.. मित्रांचे.. आणि अर्थात मैत्रिणींचे दाखव की.."
"वा! मैत्रिणी? चांगलाच बिघडलास तू राॅबिन .. कुठे प्रोग्राम चेंज तर नाही ना झाला ब्रेन मधला तुझ्या?"
"मी आणि ब्रेन?"
"आणि काय तर.. आईने विचारले तर बरे सारे काही वगळून सांगितलेस.. ब्रेन नाहीतर काय आहे?"
"हुं.. ब्रेन नाही ब्रो.. इट वाॅज फेस रीडिंग! मॅडम बोलत होत्या ना तेव्हा मी तुझ्याकडे पाहात होतो.. आय कुड रीड दॅट.. तुला वाटत होते आईला हे सारे नाही सांगू.. आय डोन्ट हॅव ओन माईंड.. बट कॅन रीड माईंड्स! आहे की नाही गंमत!"
"आहे! एक क्षण वाटले की तू सारे साग्रसंगीत सांगतोस की काय!"
राॅबिन साग्रंसगीतावर अडकला असावा.
"म्युझिक? इथे म्युझिकचा काय संबंध? संगीत ..?"
"अरे राॅबिन, साग्रंसगीत.. नाॅट ओन्ली संगीत .. साग्रंसगीत म्हणजे इन फुल डिटेल्स!"
"ओह.. ओके. नाही तुझा चेहरा वाचून मी नाही सांगितले काही.."
"इट मीन्स.. मी नसताना तुला काही विचारले असते तर.."
"आय डोन्ट नो.. तुला सांगितले मी.. आय डोन्ट हॅव ओन माईंड यार!"
हे म्हणजे टेन्शन. माझ्या फेस रिडिंग वर ठरणार हा काय डिटेल्स सांगणार ते! तरी त्याला फोटो दाखवत बसलो. आपल्याकडचे दिवाळी नि होळीचे सण.. त्याचे फोटो.. वाढदिवसाच्या औक्षणाचे नि रक्षाबंधनाचे फोटो.. काॅलेज डे नि काॅलेज कट्ट्यावरचे फोटो.. काय काय नि कसे काय समजावून सांगणार होतो मी त्याला? तरी जमेल तितपत सांगितले मी. तो ही आपली प्रोग्राम्ड मुंडी हलवत राहिला! आणि कदाचित मानवजातीचा त्याच्या नसलेल्या मनात हेवा करत राहिला असावा!
काही असो, अभ्यास मागे राहिला नि तो उद्यावर ढकलून अाम्ही इकड तिकडच्या गप्पा मारत बसलो. विचार केला तर वाटले, राॅबिन इकडे नसता तर? कुणाशी एवढा बोलू शकलो असतो? पृथ्वी बाहेर आयुष्य घालवायचे तर बोलायला कुणी हवे! आणखी एक आठवले मला, काही ग्रहांवर तर वातावरणच नाही म्हणे.. म्हणजे जिवंत राहण्याचा प्रश्न तर आहेच.. पण त्याहून कठीण.. जिवंत राहिलो जरी तरी आवाजाला एक ठिकाणाहून दुसरीकडे जायला माध्यम लागते म्हणे.. हवा हवीच! तीच नसेल तर बोललेले ऐकू जाणार कसे कुणाला? थोडक्यात हा चंद्र महत्वाचा.. त्याच्यावरचे जे आहे ते वातावरण महत्वाचे.. राॅबिन महत्त्वाचा .. त्याच्याशी बोलणे महत्त्वाचे .. पण आता राॅबिनच सगळ्यात महत्त्वाचा.. ज्याच्याशी संवाद साधता येईल असा!