Chandani ratra - 16 in Marathi Love Stories by Niranjan Pranesh Kulkarni books and stories PDF | चांदणी रात्र - १६

Featured Books
Categories
Share

चांदणी रात्र - १६

वृषालीच्या अकस्मात मुत्यूमुळे राजेश पूर्णपणे खचला होता. अजूनही तो धक्क्यातून बाहेर आला नव्हता. त्याचे आईवडील सुद्धा फार काळजीत होते. संदीप आणि मनालीनेसुद्धा राजेशला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण राजेशवर काहीच परिणाम होत नव्हता. त्याला ते स्वप्न आठवत होतं. काही महिन्यांपूर्वी त्याला जे अभद्र स्वप्न पडलं होतं त्याप्रमाणेच सगळं घडलं होतं. मग ते स्वप्न म्हणजे एक प्रकारची पूर्वसूचनाच होती का? राजेशला काहीच समजत नव्हतं.

एक दिवस रात्री राजेश त्याच्या खोलीत झोपला होता. खिडकी जोरात आपटल्यामुळे मोठा आवाज झाला व त्या आवाजामुळे राजेशला जाग आली. राजेशने खिडकीच्या दिशेने पाहिलं. एक प्रकाशाचा लालसर गोळा खिडकीतून आत आला. ‘आपण स्वप्नात तर नाही ना’ राजेशच्या मनात विचार आला. त्याने हाताला हळुच चिमटा काढला. हे स्वप्न नव्हतं. राजेश घाबरला. तो प्रकाशाचा गोळा पुढे येऊन राजेशसमोर थांबला. हळूहळू तो प्रकाशाचा गोळा नाहीसा झाला व त्याच्या जागी एक मनुष्याकृती प्रकट झाली. राजेशची झोप आता चांगलीच उडाली होती. त्याला ओरडायचं होतं पण तोंडातून शब्दच निघत नव्हते. “घाबरू नकोस” त्या आकृतीच्या तोंडून आवाज आला. “मला माहितीये तू मला ओळखणार नाहीस पण आपण यापूर्वी भेटलोय.” ती आकृती म्हणाली. राजेश वेड्यासारखा पाहत होता. ती आकृती पुढे बोलू लागली, “काही महिन्यांपूर्वी तू तुझ्या मित्रांबरोबर अलिबागला गेला होतास. तिथेच आपली भेट झाली होती, पण आता तुला यातलं काहीच आठवत नसेल.” राजेशने नुसती मान डोलावली. “तिथेच थांब” असे म्हणून ती आकृती राजेशजवळ गेली व तिने आपला एक हात राजेशच्या डोक्यावर थोडा वेळ ठेवला. हात काढताच ती आकृती म्हणाली, “आता तुला सगळं आठवेल.”

त्या आकृतीने डोक्यावरून हात काढताच मुंबईच्या लोकलमध्ये माणसं चढावीत त्याप्रमाणे राजेशच्या मनात विचारांची गर्दी झाली. आता त्याला सर्वकाही आठवत होतं. राजेश त्याच्या गावी गेला होता. तेव्हा त्याच्या गावातल्या मित्रांचं अलिबागला जायचं ठरलं. राजेशही त्यांच्या बरोबर निघाला. ते सर्वजण सकाळी लवकर निघाले व दुपारी अलिबागला पोहोचले. जेवण वगैरे आटोपून सर्वांनी तिथेच आराम केला. थोडावेळ आराम करून सर्वजण समुद्राच्या पाण्यात उतरले. मित्रांची पाण्यात मस्ती चालू होती. सगळे एकमेकांवर पाणी उडवत होते. राजेश एकटाच बाहेर थांबला होता. त्याला पाण्याची फार भीती वाटायची. सर्वांनी आपले कपडे, पाकीट, मोबाईल, चष्मा ई. साहित्य राजेशजवळ दिलं होतं.

त्यांचा खेळ बराच वेळ चालू होता. सूर्य आता पूर्ण मावळला होता. एकेकजण बाहेर येत होता. राजेशमात्र पोहत पोहत बराच पुढे गेला होता. गणेशने राजेशला हाक मारली पण राजेशपर्यंत त्याचा आवाज पोहचला नाही. राजेशने मागे वळून पाहिलं. त्याचे मित्र किनाऱ्याकडे जाताना त्याला दिसले. राजेशसुद्धा परत फिरला व किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागला. आता लाटांचा आकार वाढला होता. एखादी मोठी लाट आली की राजेशच्या नाकातोंडात पाणी जात होतं त्यामुळे त्याला पोहणं कठीण होत होतं. अचानक एक प्रचंड आकाराची लाट आली, त्सुनामीच जणू. त्या लाटेच्या प्रचंड वेगामुळे राजेश खोल पाण्यात बुडाला. तो वेगात खाली गेल्यामुळे समुद्राच्या तळाला एका दगडावर आपटला. कपाळावर आपटुन राजेश बेशुद्ध झाला.

त्या दगडा शेजारीच एक माणूस ध्यानावस्थेत बसला होता. समुद्राच्या तळाशी पाण्याच्या प्रचंड दबावाखाली देखील तो माणूस अतिशय निश्चल, स्थिर होता. तो समाधी आवस्थेत होता. त्याच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता जो शब्दात वर्णन करण्यासारखा नव्हता. राजेश दगडावर आपटताच त्या माणसाला कसलीतरी जाणीव झाली व त्याने डोळे उघडले. समोर राजेशचं शरीर पडलं होतं. त्याच्या कपाळातून रक्त वाहत होतं. राजेशच्या शरीराभोवती वेगवेगळ्या प्रकारचे मासे जमले होते. काही मासे राजेशच्या कपाळावरून वाहणारं रक्त पित होते. राजेशला पाहताच तो माणूस जागचा उठला. त्याने राजेशचा हात पकडला व तो पोहत वर आला. ते किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा सगळीकडे गडद अंधार पसरला होता. अमावस्या असल्याने आकाशात ताऱ्यांची गर्दी झाली होती व ताऱ्यांच्या मंद प्रकाशाने समुद्राचं पाणी चमकत होतं. किनाऱ्यावर ना कोणतं हॉटेल होतं ना कोणी माणूस दिसत होता. किनाऱ्याच्या मागे घनदाट जंगल दिसत होतं.

राजेश अजून शुद्धीवर आला नव्हता. किनाऱ्यावर पोहोचताच त्या माणसाने राजेशला वाळूत झोपवलं व त्याच्या छातीवर दाब देऊन त्याच्या छातीतलं पाणी काढलं. पण तरीही राजेश शुद्धीवर आला नाही. जवळच एक कापड पडलं होतं. ते उचलून त्याने राजेशच्या जखमेभोवती गुंडाळलं. त्याने आपला हात राजेशच्या डोक्यावर ठेवला व काही क्षणात राजेश शुद्धीवर आला. राजेशला काही कळायच्या आतच त्या माणसाने राजेशच्या तोंडावर हात ठेवला. राजेशला काहीच समजत नव्हतं. अंधारामुळे काहीच दिसत नव्हतं. फक्त एक सावळी आकृती दिसत होती. राजेशचं डोकं प्रचंड ठणकत होतं. पण त्या माणसाने तोंडावर हात ठेवल्यामुळे ओरडताही येईना. त्या माणसाने राजेशच्या डोळ्यांसमोर दुसरा हात धरला व एका विशिष्ट पद्धतीने तो हाताची बोटे हलवू लागला. थोड्याच वेळात राजेशच्या मनातील सर्व विचार थांबले. आता त्याच्या मनात एक वेगळाच आवाज घुमू लागला. त्या आवाजाने राजेशला आज्ञा दिली. “एक शब्दही न बोलता माझ्या मागून ये.” राजेशही मनातच “हो” म्हणाला व उठून उभा राहिला. तो माणूस जंगलाच्या दिशेने चालू लागला. राजेशही त्याच्या मागून चालत होता. ते दोघेही बराच वेळ चालत होते. वाट जंगलातली होती. आजूबाजूला गर्द झाडी होती. रातकिड्यांची किरकिर सतत सुरू होती. थोड्यावेळाने ते एका झोपडीपाशी पोहोचले. त्या माणसाने झोपडीचं दार वाजवलं. एका स्त्रीने दार उघडलं. तो माणूस आत गेला. त्याने राजेशला आत यायची खूण केली. राजेशही आत गेला. कंदिलाच्या उजेडात त्या स्त्रीचा सावळा चेहरा चमकत होता. तिचा पेहेराव एखाद्या आदिवासी स्त्रीप्रमाणे होता. तिचं शरीर अतिशय बांधेसूद, आकर्षक होतं. कंदिलाच्या उजेडात पहिल्यांदाच राजेशला त्या माणसाचा चेहेरा दिसला. तो माणूस देखील सावळा होता. त्याची उंची जेमतेमच होती. पण त्याचं शरीर अतिशय मजबूत दिसत होतं. त्याने केवळ कम्बरेभोवती वस्त्र गुंडाळलं होतं. त्याचं बाकी शरीर पूर्ण उघडं होतं. आत येताच त्याने त्या बाईला काहीतरी सांगितलं. त्याची भाषा मराठीसारखीच होती पण मराठी नव्हती. ती बाईही काहीतरी बोलली आणि जवळच पडलेलं एक फडकं त्या माणसाच्या हातात दिलं. त्या माणसाने ते फडकं राजेशकडे दिलं व तो म्हणाला, “अंग पूस या फडक्याने.” राजेशने फडक्याकडे संशयाने पाहताच तो माणूस म्हणाला, “फडकं स्वच्छ आहे.” राजेशने ओलं अंग त्या फडक्याने पुसलं. त्या माणसाने राजेशला खाली अंथरलेल्या कापडावर बसावयास संगितलं व तो म्हणाला, “थोडा वेळ आराम कर मी चहा घेउन येतो.” तो माणूस आत गेला. चहाचं नाव ऐकून राजेशला नुसत्या विचारानेच तरतरी आली. या अशा ठिकाणी आपल्याला चहा मिळेल असा त्याने विचारच केला नव्हता.

थोड्या वेळाने तो माणूस एका ताटात दोन मातीची वाडगी घेऊन आला. त्यातलं एक वाडगं त्याने राजेशच्या हातात दिलं व तो म्हणाला, “चहा घे.” राजेशला नुसत्या वासानेच घेरी आली. “वासावरून जाऊ नकोस. चहा पिऊन बघ. एकदा प्यायलास की तुमच्या त्या दुधातल्या चहाचं नावसुद्धा काढणार नाहीस.” तो माणूस राजेशला म्हणाला. राजेशने तोंड वाकडं करतच चहाचा एक घोट घेतला. एका घोटानेच राजेशच्या मनावरची मरगळ नाहीशी झाली. डोकं दुखायचंही कमी झालं. खरंच त्या चहात काहीतरी जादू होती. चवीला थोडा कडवट होता पण तो माणूस म्हणाला ते राजेशला पटलं.

चहा पिऊन झाल्यावर तो माणूस बोलू लागला, “मला माहितीये तुझ्या मनात आता खूप प्रश्न असतील. पण जरा धीर धर तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील.” राजेशचा चहा पिऊन झाला. त्याने वाडगं ताटात ठेवलं. आता त्याला अतिशय ताजंतवानं वाटत होतं. पण तो माणूस म्हणाल्याप्रमाणे राजेशच्या मनात अनेक प्रश्नांची गर्दी झाली होती. हा माणूस कोण? हा इथे जंगलात का राहतो? आदिवासी म्हणावा तर मराठी इतकं शुद्ध कसं काय बोलतो? हे आणि यासारखे बरेच प्रश्न राजेशला पडले होते पण तो काही बोलला नाही. शेवटी तो माणूसच सांगू लागला, “माझं नाव रिवा. आमच्या भाषेत सूर्याला रिवा म्हणतात म्हणून माझ्या वडिलांनी माझं नाव रिवा ठेवलं” राजेशने नुसती मान डोलावली. रिवा पुढे बोलू लागला, “ही माझी बायको. हिचं नाव जांदी. आमच्या भाषेत जास्वंदीच्या फुलाला जांदी म्हणतात. त्यांमुळे हिचं नाव जांदी.” राजेशने रिवाच्या बाजूलाच बसलेल्या बाईकडे पाहिले. रिवा पुढे सांगू लागला, “तुला आमचे कपडे, आमची राहणी बघून आम्ही एखाद्या आदिवासी जमतीतले लोक वाटत असू. हो, आम्ही आदिवासीच आहोत. पण काही गोष्टींमध्ये आम्ही तुम्हा शहरी लोकांपेक्षा खूप प्रगत आहोत. जसं की आम्ही एकमेकांशी मनातूनच संवाद साधू शकतो. जसं थोड्यावेळापूर्वी मी तुझ्या मनाशी बोलून तुला सूचना दिल्या.” राजेशला आता आठवलं जेव्हा तो शुद्धीवर आला होता तेव्हा त्याच्या मनात काही शब्द उमटले होते त्या शब्दांच्या आज्ञेनुसारच तो रिवाच्या मागे गेला होता. राजेश हे ऐकून अचंबित झाला. आता पर्यंत आशा गोष्टी त्याने पुस्तकात वाचल्या होत्या. आत्ता पहिल्यांदाच तो प्रत्यक्षात अनुभवत होता. “अजूनही बऱ्याच गोष्टी आम्ही करू शकतो ज्याची प्रचिती तुला उद्या येईलच.” रिवा पुढे म्हणाला, “आता तुला हाही प्रश्न पडला असेल की आदिवासी असून पण मी मराठी इतकं चांगलं कसं बोलतो.” राजेशने पुन्हा मान डोलावली. “सांगतो, आमची जी भाषा आहे ती मराठीपासूनच तयार झाली आहे. खरंतर काहीशे वर्षांपूर्वी आमचे पूर्वज मराठीच बोलायचे पण मग आमच्या त्यावेळच्या राजाला असे वाटले की आपली स्वतः ची भाषा असायला पाहिजे. तेव्हा त्याने आमची भाषा तयार केली.” रिवा म्हणाला. “ठीक आहे. आता तू आराम कर. उद्या सकाळी पुन्हा बोलूयात.” एवढे बोलून रिवाने झोपडीचा आतला पडदा सरकवला व तो पलीकडे गेला. राजेशच्या मनातले विचार थांबत नव्हते. त्याला सर्वकाही एखाद्या गूढ स्वप्नाप्रमाणे वाटत होतं. रात्री बऱ्याचवेळाने राजेशला गाढ झोप लागली.
सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने राजेशला जाग आली. चांगलं उजाडलं होतं पण जंगलातल्या दाट झाडीमुळे सूर्याची किरणे कुठेच दिसत नव्हती. राजेश उठून ऊभा राहिला. त्याने झोपडीचा आतला पडदा सरकवला व आत डोकावून पाहिलं. आत कोणीच नव्हतं. एका बाजूला चूल होती. चुलीजवळ मातीची भांडी होती. एका कोपऱ्यात एक लोखंडी पेटी होती. राजेश आत गेला व त्याने हळूच पेटीचं झाकण उघडलं. पेटीत काही पुस्तके होती. राजेशने वरचं पुस्तक ऊचललं. पुस्तकावर काहीतरी लिहिलं होतं पण वेगळ्याच भाषेत असल्यामुळे राजेशला काही समजलं नाही. त्याने पुस्तकाची पानं उलटली. पानांवरचा मजकूर समजत नव्हता. राजेशने पुस्तक बंद करून परत पेटीत ठेवलं. पेटी बंद केली व तो जाण्यासाठी वळला. समोर रिवा उभा होता. रिवाला असा अचानक समोर उभा पाहून राजेश दचकला. “घाबरू नकोस. मी काहीही करणार नाही.” रिवा शांतपणे म्हणाला. “माणसाच्या मनात उपजतच भीती असते पण जेव्हा त्याला एखाद्या गोष्टींबद्दल कुतूहल वाटतं तेव्हा काही वेळासाठी ही भीती नाहीशी होते.” रिवा एखाद्या तत्वज्ञाच्या आवेशात म्हणाला. रिवाचे विचार ऐकून याला आदिवासी म्हणावं का असा राजेशला प्रश्न पडला. “मला माहिती आहे तुला त्या पुस्तकात नक्की काय लिहिलंय याबद्दल कुतूहल आहे. पण ती भाषा तुला समजत नसल्यामुळे तुला वाचता येत नाहीये. तर सांगतो. ते आमच्या जमातीचं मुख्य पुस्तक आहे. तुम्हा हिंदूंसाठी जशी भगवतगीता तसं आमच्यासाठी हे पुस्तक आहे. आज आम्हाला ज्या काही विद्या, ज्या काही सिद्धी प्राप्त आहेत त्या आम्ही या पुस्तकातूनच शिकलोय.” रिवा सांगत होता. “बरं आता मी आपल्या दोघांसाठी चहा बनवतो.” असे म्हणून रिवाने चहाचं पातेलं चुलीवर ठेवलं.


क्रमशः