प्रतिबिंब
भाग २
परत येऊन दोघे जेवले पण जाईचे मुळीच जेवणात लक्ष नव्हते. तिला राहूनराहून ती बाई गेली कुठे हाच विचार त्रास देत होता. दुपारी पलंगावर पडली, तरी तिची ती एकटक नजर जाईच्या डोळ्यांसमोरून जाईना. शेवटी जाई उठली आणि परत त्याच खुर्चीत येऊन बसली. तिला आता त्या माडीवरच्या दालनांना पाहण्याची आस लागली. किल्ल्या यशकडे होत्या. शिवा आणि रखमा जिना, दरवाजा साफ करून घेत होते. साफसफाई झाली. रखमाने चहा केला. मग सगळेच वर आले. यशने चाव्या काढून शिवाच्या हातात दिल्या. प्रथम एक चावी शिवाने पूर्ण फिरवून बाहेर काढली. मग दुसरी, नंतर तिसरी. चौथी चावी पूर्ण फिरवल्यानंतर खट्कन कुलूप उघडले. शिवाने कडी काढून दरवाजा हळूहळू हलवून मग एका धक्क्यात उघडला. दारातच भरपूर जाळीजळमटं भरली होती. सगळेच थोडे मागे सरकले. रखमाने पदर तोंडाला लावत कापडाने सर्व साफ केले. मग सर्वजण आत शिरले. खालच्या दिवाणखान्याच्या निम्मा एक हॉल होता. मधोमध एक अंडाकृती टेबल आणि बाजूने दहा खुर्च्या होत्या. त्यावरचे कापड शिवाने बाजूला केले. जाई पहातच राहिली. अत्यंत नाजूक अशा कलाकुसरीचे लाकूडकाम केले होते टेबलाला आणि खुर्च्यांनाही. जरा लहान असतं तर सरळ उचलून घरी नेलं असतं असा विचार तिच्या मनी आला. हॉलमधून तीन खोल्यांचे दरवाजे दिसत होते.
यश त्या खोल्यांकडे वळला. पहिली खोली ऑफीसची असावी. लिहिण्याचा डेस्क वगैरे सामान होतं. लहानच होती ही खोली. दुसरी रावसाहेबांची, पर्यायाने वाड्यातील प्रमुख पुरुषाची असावी. भलामोठा पलंग, जाळीदार, सुंदर विणकामाची परंतु जुनी मच्छरदाणी कम पडदा, पलंगावर आच्छादलेला होता. पुर्णाकृती दिसावी असा आरसा होता. तीन भलीमोठी शिसवी कपाटं होती. तिसरी खोली उघडली. जाई आत गेल्यागेल्याच तिला एक अनामिक ओढ जाणवली. ती आत आली. छोटासा पलंग, तशीच सुंदर पण जुनी मच्छरदाणी, छोटसं ड्रेसींग टेबल आणि त्यावरचा सुंदर वेलबुट्टीने सजवलेला आरसा. आश्चर्यकारकरित्या या खोलीत धूळ मुळातच कमी होती आणि तो आरसा तर नव्यासारखा दिसत होता. अतिशय सुंदर अशा कोरीव कामाने सजवलेला तो आरसा. पाहाताक्षणीच जाई जणू त्याच्या प्रेमातच पडली.
"आपण हा आरसा घेऊन जाऊ". ती पट्कन म्हणाली.
"काहीतरीच काय, आपल्या मॉडर्न घरात, मॉडर्न फर्निचर बरोबर हा किती ऑड दिसेल? आणि ठेवणार तरी कुठे हे एवढं मोठं ड्रेसिंग टेबल?"
"ते बघू, मी काढीन काहीतरी मार्ग, पण हा आरसा आपण न्यायचाच," जाईने हट्ट धरला.
"बघू", एवढेच बोलून यश बाहेर पडला.
शिवा आणि रखमाही त्याच्या पाठोपाठ गेले. जाई तिथेच रेंगाळली. आरशाच्या जवळ जाऊन त्यात स्वत:ला निरखत त्याच्या कोरीव कामावरून हात फिरवत राहिली. बराच वेळ झाला, संध्याकाळ व्हायला आली तरी जाई अजून खाली आलीच नाही म्हटल्यावर यश वर आला, तेव्हा जाई अजून तिथेच आरशासमोर बसलेली दिसली. जवळ गेला तर तिचे लक्ष नाही असे त्याच्या लक्षात आले, म्हणून त्याने खांद्याला हात लावून हलवले तेव्हा कुठे जाई भानावर आली. एखादे सुंदर स्वप्न पहात असावे आणि मधेच कुणी जागे करावे तसे तिचे झाले.
डोळ्यात एक वेगळीच चमक, ओठांवर हसू, असे तिने यशकडे पाहिले तेव्हा त्याला लग्नापूर्वी प्रथम पाहिलेली आणि मनात घुसलेली जाई आठवली.
“काय मॅडम, कुठे हरवलात, येवढा आवडला हा आरसा की आमचाही विसर पडला?” असे म्हणून हसत हसत त्याने तिला हाताला धरून उठवले. दोघं खाली आली. पण खोलीतून बाहेर पडताना जाईने परत एकदा आरशाकडे नजर टाकली, जणू आरशाला सांगून गेली "आलेच". खाली आल्यावर तिला रखमा दिसली तशी ती दुपारची बाई आठवली. तिने रखमाला विचारल्यावर ती कावरी बावरी झाली आणि "बापूना इचारा त्येच सांगत्याल" असं म्हणून सटकली. आता मात्र जाई इरेलाच पेटली. तिने शिवाला हाक मारली. शिवा आला तसं तिने त्याला त्या बाईबद्दल विचारलं.
तो चाचरत म्हणाला, "वैनीसाब बेगिनं कामं उरका आन् सुकरूप शहराला जावा झालं.”
मग मात्र जाईचा पारा चढलाच. "मी विचारतेय काय तू बोलतोस काय? मला स्पष्ट सांग कोण आहे ती बाई? आणि आपल्या वाड्यात काय करतेय?"
यश पट्कन मधे पडला. म्हणाला "जाऊ दे ना जाई, असेल कोणीतरी. गेलीय ना आता".
"अरे, गेली म्हणजे? कुठे गेली ? हवेत विरघळली म्हणायची का? "
"व्हय वैनिसाब, तसंच म्हनाचं. तुमी शहरातल्या, तुमचा इस्वास नाय बसायचा, पर ह्या वाड्यात पूर्वी बी दिसली ती आन् मग भुर्र न्हायशी जाली. सगळे सांगाचे पर थोरल्या वैनिसाब इस्वास न्हवत्या ठिवत. मंग त्याना दिसली येक दिस, त्या दिसाला जे हातरून धरलं त्ये हुटल्याच न्हाईत. म्हनून म्हनतो बेगिनं जा शहराला, सुकरूप ऱ्हा थितं. हितं काय नाय बगा, समशान जालय निस्तं. आमिबी यायला घाबरतूय. आता तुमी येनार म्हनून सांगावा आला तवा नावीलाज जाला. सफाईसाठीबी कुनी याया बगत न्हाईत".
जाई प्रचंड संतापाने जागेवरून उठली. "मूर्खासारखं बोलू नका काहीतरी. ती बाई मला दिवसा ढवळ्या स्पष्ट दिसली इथे जिन्यात. चेहरा आठवतोय ना मला स्पष्ट".
"पन् घटकेत न्हायशी बी जाली न्हवं? हाय का असं घटकेत न्हायसं व्हायाला जागा? तुमीच बगितलं की वर कसं भक्कम कुलुप व्हतं ते. वैनिसाब, धाकल्या धन्याना आंगाखांद्यावर खेळवलाय म्या. त्याना, तुमाला काय व्हाया नगं म्हनून सांगतूय. ऐका या म्हाताऱ्याचं".
जाईचा अर्थातच अजिबात विश्वास बसला नाही. पण शिवा खोटं बोलतोय असंही वाटेना. मग तिने तात्पुरता तो विषय थांबवला. रात्रीची जेवणे उरकून रखमा आणि शिवा निघून गेले. ”रामपाऱ्यालाच येतू जी” असं सांगून गेला. जेमतेम नऊ वाजले असतील, शांतता मात्र मध्यरात्रीसारखी होती. यश लॅपटॉपवर काम करत बसला. जाई, बरोबर आणलेलं पुस्तक काढून वाचण्याचा प्रयत्न करू लागली. शेवटी कंटाळून पुस्तक बंद करून डोळे मिटून पडून राहिली. काही वेळानंतर तिला अचानक बाहेर कसली तरी चाहूल लागली म्हणून ती उठून बाहेर आली. बघते तर तीच बाई, जिन्यात पाठमोरी वर जात होती. जाई ओरडणारच होती, पण मग, तिच्यामागे जाऊन पहावे कुठे जाते, काय करते असं म्हणून हळूहळू तिच्यामागून निघाली.
ती बाई एक एक पायरी चढत वर निघाली, जाई तिच्या मागे. वर गेल्यावर ती सावकाश वरच्या खोल्यांकडे वळली. सरळ आरशाच्या खोलीत जावू लागली, मागोमाग जाई. दरवाजापर्यंत गेली, मग थबकून आत गेली. पाठोपाठ जाई होतीच. ती आरशासमोर जाऊन उभी राहिली. जाई तिच्या मागे अगदी थोड्याच अंतरावर होती. मग ती सावकाश वळली. जाई तिच्या अगदी समोरच उभी होती. तिने हात पुढे केला. काही न बोलता जाईचा हात हाती घेतला आणि आरशाच्या दिशेने चालत निघाली. ती आता आरशावर आदळणार असे वाटत असतानाच तिने आरशात पाऊल टाकले आणि जाईसह ती आरपार गेली