Toch chandrama - 4 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | तोच चंद्रमा.. - 4

Featured Books
Categories
Share

तोच चंद्रमा.. - 4

कृत्रिम बागेत

दोन आठवड्यात मी बऱ्यापैकी रूळलो होतो चंद्रावरच्या आमच्या घरात. जेटलॅग मधून बाहेर यायला तेवढा वेळ तरी लागतोच. तरीही मेलॅटोनिनच्या गोळ्या घेत होतो. बाॅडी क्लाॅक सेट झालेले आता. इकडे सलग चौदा तासाचा दिवस नि चौदाची रात्र. मी पोहोचलो तो चांद्रदिवस होता. दिवस म्हटले की प्रचंड उष्णता.. इकडे सारी घड्याळे पृथ्वीवरच्या वेळानुसार अॅडजस्ट केलेली. त्यामुळे बारा तास झाले.. सहा वाजले.. की संध्याकाळ झाली असे समजायचे. मग अंधार पडो न पडो! घराच्या आत खास अंधाऱ्या खोल्यांची रचना केली जाते इथे. चौदा दिवसांच्या रात्रीत तर बारा तास अती तीव्र दिवे लावून दिवस केला जातो! अशी चांदरात कवी कल्पनेत किती रोमँटिक वाटते.. पण शेवटी कविकल्पनाच ती!

अजून घराबाहेर पडलो नव्हतो मी. त्या तंबूत सुरक्षित होतो. आई दिवसभर काय करत असेल गेले एक वर्ष? विचारले तर म्हणाली, "कंटाळा नाही येत मला. इकडे मून टीव्हीवर एकूणच प्रोग्राम चांगले असतात. नि राॅबिनमुळे घरच्या कामाचे टेन्शन नाही. मग माझा जुना छंद आठवला. लिहित बसते. . एक पुस्तक लिहायला घेतलेय..तोच चंद्रमा नभात.. त्यातच वेळ जातो खूप. पृथ्वीवर प्रकाशित होणारे इकडून लिहिलेले पहिले पुस्तक असेल ते! म्हणजे ललित साहित्य हां. बाकी शास्त्रीय पुस्तके आहेत बरीच!"

मला गंमत वाटली. आईला लिहायची हौस आहे हे माहिती होते मला. पण हा छंद पुरा करायला तिला इकडे यावे लागावे? आणि म्हणजे तिकडे पृथ्वीवर असे राॅबिनसारखे रोबो आले तर कित्येकांना आपापली स्वप्ने पुरी करायला वेळ मिळेल?

मी मात्र आता बसून बसून कंटाळलो. कुठे जावे? अजून आठवड्यानंतर मला जाॅबसाठी इंटरव्ह्यूला जायचे होते. तोवर असाच बसून नि झोपून काढत होतो वेळ. राॅबिन होता, तो खाऊपिऊ घालायचा. सॅटेलाईट फोनवरून पृथ्वीवरच्या मित्रांना फोन केले काही. पण थोडाच वेळ. सॅटेलाईट फोनमध्ये अजून इनकमिंगला पैसे लागतात. त्यामुळे कोणाला किती आणि कशाला पाडा खर्चात?

संध्याकाळी बसला होतो असाच तर पाठून राॅबिन आला.

"येस ब्रो.. अंबर. हाऊ आर यू? झोप झालेली दिसतेय."

"हो रे. हा जेट लॅग.. तुला बरंय.. नो जेट लॅग.. नथिंग!"

"खरंय, मग आज काय प्लॅन?"

"काही नाही."

"थांब.."

राॅबिनने आपल्याजवळच्या मशीनीत काहीतरी पाहिले, म्हणाला, "चल. आॅल क्लियर. आज इकडे हवामान साफ. वेबसाईटने सांगितलेय. माणसांना बाहेर पडायला हरकत नाही."

राॅबिन आनंदाने सांगत होता नि मी विचार करत होतो.. आपल्याकडे हा मनुष्य जन्म मोठ्या कष्टाने मिळतो म्हणतात ना तसा हा ह्युमनाॅईड जन्मही पुण्यवानांना मिळत असावा. मी म्हणालोही त्याला, "बेटा, हा जन्म भाग्यवंतांनाच मिळतो बरे!"

त्यावर राॅबिनने काय म्हणावे? म्हणाला, "भाग्यवंत म्हणजे काय?"

"अरे पुण्यवान!"

"म्हणजे?"

"म्हणजे या किंवा मागील जन्मी चांगले काम केले असेल असा .."

"म्हणजे? मागचा जन्म?"

तो आणि मी सुद्धा गोंधळणे साहजिकच होते. बोलूनचालून राॅबिन ह्युमनाॅईड होता. माणूस नव्हता! आणि मी त्याला पृथ्वीवरचे आणि तेही पापपुण्याचे .. ते ही कुणीही कधी न सिद्ध केलेले नियम लावू पाहात होतो! आणि ते ही कोणाला .. तर एका विज्ञानाने निर्माण केलेल्या रोबोला! अर्थात हे राॅबिन किती मानवी वाटत होता याचेच प्रतीक होते!

आम्ही निघालो बाहेर. आज चंद्रावरची पहिली सफर. काही दशकांपूर्वी आर्मस्ट्राँगने चंद्रावर टाकलेल्या पहिल्या पावलानंतर किती प्रगती केलीय मानवी विज्ञानाने. आणि तरीही माणसाला अनाकलनीय अजूनही कितीतरी गोष्टी बाकी आहेत! बाबा आधी, म्हणजे पृथ्वीवर असताना आध्यात्मिक गप्पा मारत, त्यात ही हेच असे, सारे काही अथांग आहे. अनंत आहे! त्यात हे अनादि, अनंत, अथांग, दुस्तर, भवसागर असले अनघड, अवजड नि बोजड शब्द असत.. आणि त्या गप्पांतील मला अगम्य असेच सारे होते. त्यामुळे मी त्यातील काहीच अंगास चिटकवून घेतले नव्हते. इकडे आल्यावर मात्र बाबांनी ते अध्यात्म बाजूला ठेऊन दिले असावे. आणि आता विज्ञानात पण हेच.. माणसाला जगाबद्दल फारच थोडे ठाऊक आहे अजूनही! म्हणजे हिमनगाचे टोक म्हणता यावे इतपत! तेही विज्ञानाने इतकी प्रगती केली असूनही.

तर आम्ही निघालो. समोरच्याच रस्त्याच्या कडेला एक मोठी बाग होती.

"चल बसूया इथे." राॅबिन म्हणाला.

समोर झाडे, हिरवीगार. मधूनच कारंजी. आणि चक्क बदके नि कोंबड्या देखील!

आम्ही जाऊन बसलो. असली बाग बनवणे, तेही चंद्रावर?

माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह वाचत राॅबिन म्हणाला,

"छान आहे ना सारे?"

"हुं. मस्तच. कोण काळजी घेते यांची? नाही बाग म्हटली म्हणजे .."

"फसलास ना? अरे आॅल आर्टिफिशियल. हे उडणारे पक्षी, बदक नि कोंबड्या पण. नथिंग इज रियल. ही झाडे पण नकली आहेत.. पक्षी आणि प्राणी पण."

"ही कारंजी?"

"पाणी खरेय बाबा!"

जीवन म्हणून संबोधतो ते पाणीच माणसाला प्रयोगशाळेत बनवता आले तर? इतक्या सगळ्या शोधांहून भारी शोध असेल तो! नक्कीच. म्हणजे मग कुठल्याही ग्रहावरून जाऊन बसायला मोकळा माणूस. एक पाणी बनवा, नि दुसरा आॅक्सिजन!

आॅक्सिजन वरून आठवले, चंद्रावर तसे वातावरण विरळच. त्यात माणसाला आॅक्सिजन कसा मिळणार? पण इकडे आल्यावर पाहिले मी, जिकडेतिकडे मोठमोठया अाॅक्सिजनच्या टाक्या. तिथून रोज आवश्यक तितका प्राणवायू सोडला जातो. घरोघरी त्याचे कनेक्शन्स. आपल्याकडे स्वयंपाकाचा गॅस येतो तसा प्राणवायू येतो घरी. आणि बाहेर तो असाच सोडून दिला जातो वातावरणात श्वासोच्छवासासाठी. पूर्वी कुठेतरी वाचलेले आठवले मला, झाडे आॅक्सिजन निर्माण करतात .. इकडे झाडे नाहीत खरी पण मानवी मेंदूची पाळेमुळे मात्र पार खोलवर गेलीत हे खरे!

राॅबिन बसलेला. मी त्याच्याकडे पाहात बसलेलो. या राॅबिनला पण मन असेल का? कितीही प्रगत यंत्रमानव झाला तरी त्याला त्याच्या बनवित्या धन्याहून प्रगती करता येईल? बुद्धिमत्ता कृत्रिम म्हटली तर, कृत्रिम बुद्धी जन्मजात बुद्धीवर मात करेल कधी? आणि या ह्युमनाॅईडसचे काय? यांना कधी माणसासारखे जगता येईल? म्हणजे कितीही प्रगत झाले तरी?

बहुधा आठवडाभराचा प्रवास नि तेवढाच जेट लॅग, यामुळे मी सैरभैर विचार करत होतो की काय कोण जाणे. त्यामुळे मी बोलत जास्त नव्हतो. मनात विचारांचे काहूर. बहुधा चेहऱ्यावर दिसत असावे.

मी गप्प गप्प पाहून राॅबिन म्हणाला, "तू कसला विचार करतोयस? तसा तू जास्त टेन्शनमध्ये नाहीस म्हणजे तुझ्या मेंदूची मी रिडिंग घेऊन सांगतोय असे. पण विचार करतोयस कसला तरी."

"हुं. तुझाच."

"माझा? म्हणजे?"

"राॅबिन, तू असा तरूण अाणि हुशार. आणि हँडसम."

"मग? म्हणजे अशा वेळी थ्यांक्स फाॅर काॅम्प्लिमेंटस् म्हणावे असे अाहे प्रोग्राम मध्ये पण तुला मी माझ्या ह्युमन ब्रेन इंटरफेज वरून विचारतोय मी. माझा कसला विचार?"

"ह्युमन ब्रेन इंटरफेज?"

"यस.. सारे काही प्रोग्राम केलेय आत माझ्या.. त्यात काही उत्स्फूर्तपणाही प्रोग्राम केला गेलाय. तो वापरून मानवी मेंदू सारखे काही वेळेस वागू शकतो अाम्ही.. तर कसला विचार करतोयस? तो ही माझा?"

"हाच! तारूण्य सुलभ!"

"एक सेकंद!"

त्याने हातातले मोबाईल सारखे मशीन हाताळले काही क्षण .. बहुधा तारूण्यसुलभ म्हणजे नक्की काय हे शोधले असावे.. नि मग एकाएकी म्हणाला,

"हां. कळले तू म्हणतोस ते. त्याचे काय आहे.. अरे मी ह्युमन नाही. ह्युमनाॅईडच आहे. आय हॅव नो सच फॅकल्टीज इन माय ब्रेन! आयॅम नाॅट प्रोग्राम्ड दॅट वे.."

विचार करा.. ह्युमनाॅईड आपापसात प्रेमात पडू लागले तर. ही ह्युमनाॅईड आणि शी ह्युमनाॅईडच्या जमतील जोड्या! असा विचार करत मी म्हणालो,

"पण इफ वुई प्रोग्राम इट?"

"बापरे! हॅवाॅक! म्हणजे नक्की काय होईल माहित नाही मला. पण तुला पाहून सांगू एक?"

"बोल."

"तुझ्या मेंदूत इकडे कुणी भेटेल तुला.. त्या टीव्हीवर दाखवतात तशी प्रेमकथेची नायिका .. याचा विचार होतोय! राईट अाॅर नाॅट?"

राॅबिन माझा मित्र होता. नि तो म्हणाला ते ही खोटे नव्हते. माझा पृथ्वीवरचा भूतकाळ मागे सोडून

आलेलो मी. काॅलेजच्या तिसऱ्या वर्षातली वर्षा काळे.. तिची नि माझी एकतर्फी प्रेमकथा संपवून आलेलो इकडे मी. आणि हा त्या जखमेवरच्या खपल्या काढतोय की काय? पण नाही, हे ह्युमनाॅईड या बाबतीत माणसाहून जास्त ह्यूमन असावेत. उगाच कुणाला डिवचणे वा टोचून बोलणे त्यांच्या स्वभावात नसावे. राॅबिन माझ्या मेंदूच्या मॅपिंग मधूनच बोलत असणार! आणि ते जास्त चुकू शकत नाही हे खरे! तेव्हा हे लपवून ठेवण्यात शहाणपण नव्हते हे खरे.