Holi Purnima in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | होळी पोर्णिमा

Featured Books
Categories
Share

होळी पोर्णिमा

होळी पौर्णिमा

अनिष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे.
होळी वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.
रंगांच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात.
पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते.

या सणाची कहाणी अशी आहे
हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा.
स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते.
परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता.
आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते.
तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल.
परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न घाबरता भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे.
ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली,
आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही अशा होलिकेला प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले.
प्रल्हाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली
या वेळेस एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं कि तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेंव्हा ती स्वतः जळून राख होईल.
भक्त प्रल्हादला अग्नी काहीही करू शकला नाही
मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली.
अश्या प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.

होळी संपूर्ण भारतात साजरी केली जाते परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहात साजरी केली जाते. होळी चा हा सण पाहण्यासाठी लोक वज्र, वृंदावन, गोकुळ अश्या ठिकाणी जातात. आणि ह्या ठिकाणी होळी देखील बरेच दिवस साजरी केली जाते.
ब्रज ला होळीच्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात.
ही उत्तर भारतातील एक प्रसिद्ध प्रथा आहे जी पाहण्यासाठी लोक खासकरून ब्रजला जातात.
बऱ्याच ठिकाणी फुलांनी होळी खेळली जाते, नाच गाण्यांसोबत एकमेकांनाबरोबर आनंदाने सण साजरा करतात.
मध्य भारत तसेच महाराष्ट्रात रंग पंचमीला अधिक महत्त्व आहे. इथे लोक टोळी बनवून एकमेकांच्या घरी जाऊन गुलालाने एकमेकांना रंगवतात आणि म्हणतात " बुरा ना मानो होली है !"

उत्तर भारतातील इंदोर शहरात होळी अनोख्या प्रकारे साजरी केली जाते आणि इथे होळीची एक वेगळीच शान आहे.
होळीच्या दिवशी शहरातील सगळे लोक एकत्र निघून राजवाडा या ठिकाणी जमतात आणि रंगीत पाण्याच्या टाक्या भरून , ह्या रंगीत पाण्याने होळी खेळली जाते तसेच नाच गाण्या सोबतहोळी आनंद आणि उत्साहात साजरी करतात.
अश्या ह्या होळीची तयारी लोक १५ दिवस अगोदर पासूनच करतात.

काही ठिकाणी भांग पिणे हा देखील होळी चा एक भाग आहे.
भांग पिऊन नशेत मदमस्त होऊन एकमेकांची चूकभूल माफ करून वाजत गात आणि नाचत होळी खेळली जाते.

होळीच्या दिवशी घरी बरीच पक्वान्न केली जातात. स्वादाने भरलेल्या ह्या भारत देशात सणाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट जेवण केले जाते.
महाराष्ट्रात पुरणपोळी करतात व दुसर्या दिवशी समिष आहार घेतात .

फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

उत्तरेत याला होरी, दोलायात्रा,
तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव अन् होलिकादहन
आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत.
बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण साजरा करतात.
याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतागमनोत्सव’ म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नावही आहे .

याची पुराण कथा अशी आहे

पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची.
ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले,पण ती जाईना.

नगरातील मुलांना त्रास देणार्‍या ‘ढुंढा’ नावाच्या राक्षसिणीचा प्रतिकार कसा करावा ?’
याविषयी नारद मुनी सम्राट युधिष्ठिराला पुढील उपाय सांगतात.
ते युधिष्ठिराला म्हणाले
नगरातील सर्व लोकांना तू अभय दे. त्यामुळे ते आनंदित होतील. त्यांची मुले आनंदाने घराबाहेर पडू देत. त्यानंतर वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या यांचा ढीग रचून अग्नी प्रज्वलित करा
त्यानंतर लहान मुलांप्रमाणे टाळ्या वाजवत अग्नीला ३ प्रदक्षिणा घालून गाणे गावे आणि आनंदाने हसावे. लोकांनी निःशंकपणे आणि स्वेच्छेनुसार त्यांच्या मनातील पाहिजे तेवढे बोलावे.
अशा आनंदी शब्दांनी आणि होमाने लहान मुलांना त्रास देणारी ती पापी राक्षसीण लोकांची दृष्टी पडल्याविनाच क्षीण होईल.
फाल्गुन पौर्णिमेला सर्व दुष्ट शक्ती पळवून लावणारा आणि सर्व रोगांचे शमन करणारा होम करतात; म्हणून या तिथीला विद्वानांनी ‘होलिका’ असे म्हटले आहे

उत्तरेमध्ये होळीच्या आधी तीन दिवस बाळकृष्णाला पाळण्यात निजवतात आणि त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला पूतना राक्षसीची प्रतिकृती करून ती रात्री पेटवतात.

दक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात.
याची कथा म्हणजे ..एकदा भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधी अवस्थेत असतांना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. तेव्हा ‘मला कोण चंचल करत आहे’, असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले.
या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव साजरा करतात.
या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाच्या वेळी विष्णूला यज्ञकुंडातून बाहेर येण्यास ऋषींनी प्रार्थना केली.
भगवान विष्णूने धरतीवर पाय ठेवताक्षणीच स्वर्गातून त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली.
स्वर्गातून झालेली ती प्रथम पुष्पवृष्टी होय. याच कारणास्तव उत्तर हिंदुस्थानात आजही फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या ठिकाणी होळीचे प्रदीपन केल्यानंतर ओंजळीत फुले घेऊन ती हवेत उडवली जातात. त्या फुलांना ते ‘पलाश के फूल’, असे म्हणतात .

ओरिसामध्ये तेथील चैतन्यपंथी लोक कृष्णाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढतात. प्रत्येक घरातील सुवासिनी त्या मूर्तीला अत्तर लावून गुलाल उधळतात. ऐपतीप्रमाणे दक्षिणा देतात. काही ठिकाणी लहान मुलांना कृष्णाची वेशभूषा करून त्याच्याभोवती टिपर्‍या खेळतात.’

थंडीच्या दिवसांत शरिरात साठलेला कफ दोष होळीच्या काळात सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि त्याच्यामुळे विकार उत्पन्न होतात. होळीच्या औषधी धुरामुळे कफ न्यून होण्यास साहाय्य होते. सूर्याच्या उष्णतेमुळे पित्त काही प्रमाणात वाढते. गाणे, हसणे आदींनी मन प्रसन्न होते आणि पित्त शांत होते. होळीच्या वेळी म्हटलेल्या मंत्रांनी वाईट शक्तींचा त्रासही नाहीसा होतो.
अनेक हिंदी चित्रपटातून होळी साठी असलेली गाणी आहेत .
हल्ली नोकरी धंद्या निमित्त वेगवेगळ्या गावात विविध प्रदेशातील ओक असल्याने होळी व रंगपंचमी दोन्ही वेळेस रंग खेळले जातात .