Mi Vikat ghetle - raa-fail in Marathi Comedy stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | मी विकत घेतले ... रा-फेल!

Featured Books
Categories
Share

मी विकत घेतले ... रा-फेल!

मी विकत घेतले ... रा-फेल!
'अग, मी विकत घेतले रा-फेल.......विकत घेतले रा-फेल....' असे पुटपुटत मी माझ्या घरात शिरलो. परंतु बैठकीत बायको नाही हे पाहून मी हिरमुसलो परंतु मी एवढा आनंदित होतो की, त्या किंचित नाराजीचा माझ्या आनंदावर काहीही परिणाम झाला नाही. उलट मी जरा जास्त उल्हासित अवस्थेत आवाज दिला,"अग, अग बायकोबाई, कुठे आहेस?"
तुम्हाला एक गुपित सांगतो, ज्यावेळी मी अतिशय आनंदात असतो ना त्यावेळी सौभाग्यवतीला 'बायकोबाई' याच नावाने बोलावतो. त्यापुढे जाऊन सांगतो, माझे हे संबोधन, ते व्यक्त करण्याचा खास अंदाज माझ्या पत्नीलाही खूप आवडतो. अगदी आमचे लग्न झाले तेव्हापासून म्हणजे आमच्या लग्नात भटजींनी हिच्या गळ्यात हार घालायला सांगितला आणि मी हार घालताना पुटपुटलो, 'काय मग बायकोबाई, छान वाटते ना?' त्यावेळी हिने ज्या आनंदी नजरेने माझ्याकडे पाहिले ना बस्स त्यावरून मी ठरविले की हेच नाव पक्के....अर्थात आम्ही दोघेच असताना... असो. माझी हाक ऐकून सौभाग्यवती स्वतःचे वजनदार शरीर सांभाळत बैठकीत आली. तेवढे चालण्यामुळे लागलेल्या श्वासावर नियंत्रण मिळवत म्हणाली,
"काय म्हणता? काय झाले?"
मी पुन्हा शायराना अंदाजात म्हणालो,"अग, मी विकत घेतला...."
"श्याम... व्वा! आज अचानक कृष्णभक्ती कशी काय उफाळून आली म्हणायची?"
"कृष्णभक्ती नाही ग? आणि श्यामही नाही. मी म्हणत होतो...'मी विकत घेतले रा-फेल... 'हे नाव असलेले ..."
"का ss य ? राफेल नावाचे विमान विकत घेतले? तुम्ही? काहीही हं..."
"अग, नाही ग. राफेल विमान नाही ग... ते तसे राफेल घ्यायला का आपण उद्योगपती आहोत की, मंत्री किंवा पंतप्रधान? मी विकत घेतलाय रा-फेल... या नावाचा बंगला... अग,तुला आठवतंय का? पंधरा वर्षांपूर्वी आपण एका घराचा सौदा ठरवला होता...पंधरा लाखाला....परंतु त्यावेळी तेवढे कर्ज मंजूर झाले नाही म्हणून तो व्यवहार पूर्ण झाला नव्हता. आज त्याच घराचा सौदा करून आलोय. गंमत म्हणजे आपला सौदा मोडल्यानंतर त्यानेही घर कुणाला विकलेच नव्हते. शिवाय आता एवढे सुंदर केले आहे ना, ओळखूही येत नाही. सगळ्या सोई सवलती करून घेतल्या आहेत...."
"खरे सांगता? कमाल झाली बाई तुमची. पंधरा वर्षे झाली पण तुम्ही तुमचा हट्ट सोडला नाहीत. महत्त्वाचे म्हणजे त्याच किंमतीत घेतले...."
"अग, नाही. त्या किंमतीत कसा घेणार ..."
"म्हणजे अजून कमी किंमत दिलीय ? व्वा! व्वा! व्यवहार शिकावा तर तुमच्याकडून. खरेच किती हुशार आहात हो तुम्ही..."
"अग, तसे काही नाही.."
"हा तुमचा माठेपणा झाला. पण मला सांगा असा व्यवहार कुणी केल्याचे मला आठवत नाही. पंधरा वर्षांपूर्वी मोडलेला सौदा पुन्हा जुळवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी ठरलेल्या किंमतीपेक्षा कमी किमतीत घेणे...."
"अग, ऐकून तर घे. पंधरा लाख नाही थोडे जास्त मोजावे लागले पण काही हरकत नाही. ते घर तुला त्यावेळेस खूप खूप आवडले होते ग. गेली पंधरा वर्षे ती जखम माझ्या मनात खोल कुठेतरी सलत होती, भळभळत होती ग. आज संधी मिळाली आणि केला सौदा पक्का..."
"तुम्ही पण ना....." सौभाग्यवती म्हणाली आणि नेहमीप्रमाणे तिच्या त्या खास अदेवर.... काय म्हणतात ते... कातिलाना अंदाजावर मी मनोमन खुश झालो.
"जाऊ द्या. थोडेच जास्त दिले ना.... तुम्ही खुश आहात ना मग हजार-दोन हजाराचे काय?"
"अग, नाही. नाही. चांगली डबल किंमत मोजलीय.... तीस लाख..."
"काssय ssय ? तीस लाख ? पंधरा-वीस वर्षांपूर्वी बांधलेल्या जुनाट घराला एवढी मोठी रक्कम?" सौभाग्यवतीचा क्षणापूर्वीचा आनंद, नवऱ्याबाबतचा गर्व, कौतुक, अभिमान सारे सारे नाहीसे झाले आणि त्या ठिकाणी माझ्याबद्दलचा संताप, तिटकारा, माझा मुर्खपणा, नाकर्तेपणा, धांदरटपणा असे अनेक भाव दाटून आल्याचे मला जाणवले.
"अहो, एवढा मोठा सौदा करण्यापूर्वी बायकोला, मुलाला, सुनेला एकदाही विचारावेसे वाटले नाही? मला ते घर कधीकाळी आवडले होते म्हणून काय कितीही पैसा ओतायचा....."
"अग, तू बघ तरी एकदा ते घर. तू सुद्धा ते घर ओळखू शकणार नाही. खूप बदल केले आहेत ग त्यांनी..."
"अहो, एखाद्या साठ वर्षाच्या बाईला अत्याधुनिक पोशाख, प्रचंड प्रमाणात मेकअप केला म्हणून काय ती सोळा वर्षाची षोडशी दिसणार आहे का? बरे, समजा दिसली तरुण तरी तिला ते तारुण्य सोसणार आहे का? उसने सौंदर्य झेपणार आहे का? वरवरच सिमेंट, रंग, दारं, खिडक्या बदलल्या म्हणून त्याकाळी वापरलेले सिमेंट, गजाळी आणि पाया, भिंती तर त्याच असणार आहेत ना?.."
"अग तस नाही ग..."
"तुम्हाला माझ्यासाठीच, मला खुश करण्यासाठीच घर घ्यायचे होते तर शहरात सुंदर सुंदर घरांची काय कमी होती? एखाद्या ब्रोकरला..."
"ब्रोकर फार लुटतात ग."
"आता काय लुटले नाही तुम्हाला? ओरबाडून काढलय तुम्हाला. दूर कशाला जायचं माझ्या मावसभावाचा मुलगा ह्याच व्यवसायात आहे. त्याने एक तर स्वस्तात घर मिळवून दिले असते आणि तुम्ही म्हणता तसे लुटायचं सोडा एक रूपयाही कमिशन घेतले नसते हो. अहो, काय करून बसलात हो. काही आगाऊ रक्कम तर दिली नाही ना?"
"दिली. थोडीबहुत दिलीय. त्याशिवाय का सौदा पूर्ण होतो?"
"ठिक आहे. थोडीच दिलीय ना? सोडा त्या हजार पाचशेवर पण पाणी... मुर्खखाती द्या टाकून.."
"थोडीथोडकी नाही ग, चांगली पाच लाख रुपयांची रक्कम दिलीय ग..."
"क..क...काय? प.. प...पाच लाख? मला तुम्ही एवढे वेंधळे असाल असे वाटले नव्हते हो. त्याहीवेळी ...पंधरा वर्षांपूर्वी कर्ज किती मिळते, किती दिवसात मिळते याचा सारासार विचार न करता पन्नास हजाराने त्याचे हात भरून मोकळे झालात. बँकेने लाथाडलं तेव्हा आलात तोंड लपवत. पन्नास हजार गेले आणि समाजात नाचक्की झाली ती वेगळीच. ..."
"त्याची काळजी करू नकोस. या सौद्यात त्याला तेवढी रक्कम कमी द्यायची आहे..."
"अहो, पन्नास हजार परत देतो म्हणून त्याने तुम्हाला दुसऱ्या पंधरा लाखाला चुना लावलाय हो. कसे कळत नाही तुम्हाला? मला सांगा पंधरा वर्षांपूर्वी विकायला काढलेले घर, पंधरा वर्षे झाली तरी का विकल्या जात नाही हा साधा विचार तुमच्या डोक्यात का नाही शिरला?....." पत्नी रोखठोक प्रश्नांची सरबत्ती करत असताना बाहेरून आमच्या एकुलत्या एक चिरंजीवाचे त्याच्या बायकोसह आगमन झाले. घरातील वातावरण विशेषतः त्याच्या आईचा संतापाने लालेलाल झालेला चेहरा पाहून मुलाने विचारले,
"काय झाले आई, तू अशी टेन्शनमध्ये का?"
"टेन्शन... तुझ्या बाबांनी गळ्यात वरमाला नाही टाकली रे तेंव्हा तर टेन्शनमाळ घातलीय. लग्न लागल्यापासून सारखे टेन्शन आणि टेन्शन..."
"झाले काय असे?" सूनबाईने विचारले.
"विचार तुझ्या बाबाला...... घराचा सौदा करून आलेत...."
"काय?सौदा?घराचा?केव्हा?कधी?कुठे?...." मुलासोबत सुनेनेही जणू काही एक प्रश्नपत्रिका मला सोडवायला दिली. यावेळी बायकोला बोलण्याची संधी न देता मी म्हणालो,
"अरे, तू लहान असताना म्हणजे तसा मोठाच होता तू. आपण भाग्योदय कॉलनीत एक घर घेतले होते. तेच घर मी पुन्हा..."
"बाबा, भाग्योदय कॉलनी फार जुनी आहे हो. तिथली घरे मोडकळीस आली आहेत."
"बघा. जे आपल्या मुलाला समजते ते तुम्हाला समजू नये?"
"आई, शांत व्हा थोडे. जुने असले तर काय झाले, स्वस्तात मिळत असेल तर काय हरकत आहे? थोडे पैसे लावले तर अशी घरे नवीन घरांना मागे टाकतात. माझा मामेभाऊ अशीच जुनी घरे नवीन घरात परावर्तीत करून देतो. आपले घर म्हणल्यावर तो अगदी वाजवी दराने...ना नफा ना तोटा याप्रमाणे रिन्युवेशन करून देईन..."
"अग, पण पैशासारखा पैसा खर्चून जुने कशाला पदरात घ्यायचे? तुझा मामेभाऊ, माझ्या मावसभावाचा मुलगा याच व्यवसायात आहेत कुणीही नवे कोरे घर कमीतकमी किंमतीत मिळवून दिले असते."
"बरोबर आहे. माझे ही दोन मित्र हिच कामे करतात. बाबा, एकदा चर्चा तर करावी. आम्हाला घर तर दाखवले असते. ते जाऊ द्या. घेतले तर घेतले जुने. ही म्हणते तसे रिन्युवेशन करून घेऊया. केवढ्याला घेतले?"
"प.. प...पस्तीस लाखाला...." सारे विरोधी पक्ष एक झाल्याचे पाहून माझी बोबडी वळल्यागत झाली. मात्र ते ऐकून माझ्या घरात जणू बाँबस्फोट झाला. मुलगा-सून आश्चर्यात पडले परंतु बायकोच्या चेहऱ्यावर वेगळेच आश्चर्य दिसले कारण तिला मी खरेदी किंमत तीस लाख सांगितली होती. परंतु दुसऱ्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावरील आश्चर्य संतापात बदलले.ती रागारागाने म्हणाली,
"प...प...पस्तीस लाख? मला तर तीस लाख म्हणालात. असे का? काही लपवताय का? कुणी मध्यस्थ होता काय?"
"काय झाले बाबा, तुम्ही असे खोटे का बोलताय?"
"मी का खोटे बोलू? पैसे माझे, घर घेतले मी...."
"असे का? तुमचे पैसे का? असे असेल तर तुम्हीच त्या घरात जाऊन रहा. मी त्या घरात राहायचे तर सोडा ढुंकूनही पाहणार नाही..." असे म्हणून ती तणतणत आतल्या खोलीत निघून गेली.
"बाबा, काही अडचण आहे का? असे का केले? खरे सांगतो, तो फार जुना भाग आहे हो. माझ्या एका मित्राने त्याच्या बाजूच्या वसाहतीत अठरा लाखाला घर घेतले हो. बरे, तुम्ही असे का केले? घरातल्या घरात आईला एक किंमत सांगितली. दहा मिनिटे गेली नाही तर लगेच आईच्या समोरच वेगळी किंमत सांगितली....." मुलाने सुरू केलेली उलटतपासणी पाहून मी मनोमन चिडलो.'एक तर मी एवढ्या उल्हासाने, प्रयत्नपूर्वक, अर्धांगिनीचे वर्षानुवर्षे असलेले स्वप्न खास तिच्यासाठी पूर्णत्वास नेले आणि तिनेच मला समजून घेतले नाही. पोटचं पोरं...ज्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं. ऐपत नसताना कर्ज काढून त्याच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण केल्या त्याने माझ्यावर अविश्वास दाखवावा... नाही. हे मी चालू देणार नाही. मी असे केले तरी काय? केवढ्या उत्साहाने मी घरी आलो होतो. बरे, घर घेतले ते का माझ्या एकट्यासाठी घेतले काय? एकच तर काट्ट आहे. मला, माझ्या कुटुंबाला आनंदात राहता यावे, स्वतःच्या घरात राहता यावे म्हणून मी सारा खटाटोप केला....' मी मनाशी संवाद साधत असताना मी गप्प बसलोय हे पाहून मुलाला वाटले असावे त्या सौद्यात काही तरी काळेबेरे आहे. बाबा, शांत आहेत त्याअर्थी त्यांनी काहीतरी घोळ घातलाय. तो तसे उघड काही न म्हणता जे बोलला त्यावरून बरेच काही लक्षात आले.
"बाबा, बोला काही तरी. असे शांत बसून चालणार नाही. पस्तीस लाख फार छोटी रक्कम नाही. "
त्यावर काहीही न बोलता मी आमच्या खोलीत गेलो. मला पाहताच बायको कडाडली,
"तुम्ही वेगवेगळ्या किंमती का सांगत आहात? अहो, मान्य आहे पैसा तुमचा पण त्यावर आपल्या कुटुंबाचे भवितव्य अवलंबून आहे.अशाने संशयाची सुई तुमच्याकडे वळतेय..."
"वळली तर वळली. जे आहे ते हे सत्य आहे. ..."
"सत्य? दहा मिनिटात तुम्ही एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे दोन वेगवेगळ्या किंमती सांगता आणि वर सत्य म्हणता माणसाने समजावे तरी काय? घरी बायको आहे, कमावता...लग्न झालेला मुलगा आहे. असा एखादा मोठा निर्णय घ्यायचा म्हणजे सर्वांना विश्वासात घ्यावे, चर्चा करावी आणि मग ठरवावे. तुम्ही तर मला आवडतो म्हणून गजरा आणावा त्याप्रमाणे चक्क घर विकत घेऊन आलात. नाव तरी काय तर राफेल! याच नावाने झालेला सरकारी सौदा गाजला ना? नाव तरी केवढे अपयशी... राफेल! काही सांगू नका ते राफेल होते तुमचे रा-फेल! शेवटी फेल आहेच ना दोन्ही बाजूला. किती गंमत आहे ना... रा-फेल म्हणजे राव फेल! नापास! तुम्ही चक्क नापास झालात. काय हो, रा-फेल नावाचे घर म्हणजे काय तुम्हाला ताजमहाल वाटला? तुम्ही विनोद तर करीत नाही आहात ना? असे बाष्कळ विनोद करायची तुम्हाला पहिल्यापासूनच सवय आहे. बोला. काय ते सत्य बोला..."
"जे आहे ते खरे आहे...."
"अहो, पण असे जुने घर अव्वाच्या सव्वा पैसा देऊन घ्यायची काय गरज होती? किती महागात पडले ते तुम्हाला? तेच घर घ्यायचे तर मग पंधरा लाखालाच घ्यायचे. दुसरा कुणी असता तर ते घर तीस-पस्तीसचे तर सोडा परंतु पंधरा लाख न देता दहा लाखालाच विकत घेतले असते.."
"हा गोंधळ घालण्यापूर्वी एकदा घर पाहून घे. हवे तर त्याला किंमत विचार..."
"कुणाला? तुम्हाला फेल करणारास किंमत विचार म्हणे? तो काय सांगणार, त्याला पट्टी पढवून ठेवली असणार ना..." सौभाग्यवती बोलत असताना मुलगा धावत येऊन म्हणाला,
"बाबा, रा-फेल नाव असलेले घर तुम्ही घेतले ना? त्याच्या बाजूलाच 'बोफोर' नावाचे घर आहे का ?"
"हो. काय झाले?"
"बाबा, त्या बोफोरमध्ये माझा मित्र राहतो. तो तर म्हणत होता की, ते घर पंचवीस लाखाला विकल्या गेले आहे म्हणून...."
"सांगा आता खरी किंमत....पस्तीस.... तीस की पंचवीस लाख? एखाद्या व्यवहारात मंत्री त्याच्या खात्याने केलेला आर्थिक व्यवहार जाहीरपणे सांगत नाही किंवा पंतप्रधानांनी देशहितासाठी केलेली खरेदीची जशी खरीखुरी किंमत जनतेपुढे येत नाही तसे बोलता तुम्ही.. . एकदा एक...पुन्हा वेगळेच..."
"देशहितासाठी? अगदी तसेच आहे. कुणाची तुलना कुणाशी? आले लक्षात विरोधी पक्षांनी पंतप्रधान, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात रान माजवावे त्याप्रमाणे तुम्ही माझ्या घरातील माझे सारे विरोधक एकत्र येऊन उठाव करणार आहात काय? पत्रकार परिषद घेणार आहात का? मोर्चा काढणार आहात का? उपोषण करणार आहात की न्यायालयात जाणार आहात?..."
"बाबा, तुम्ही उगाच पराचा कावळा करू नका हं..."
"मी कावळा करीत नाही. बावळा समजून तुम्हीच मला आरोपीच्या सापळ्यात अडकवत आहात."
"अहो, त्याने तुम्हाला पिंजऱ्यात अडकवले आहे...."
"पिंजऱ्यात अडकावयाला का मी पिंजरा सिनेमातला मास्तर नाही. कुणालाही उत्तर द्यायला बांधील नाही."
"बाबा, एवढा पैसा तुम्ही आणला कुठून? परवा मला एक काम होते तर तुम्ही चक्क नाही म्हणालात? माझी फार मोठी संधी गेली हो..."
"साहेबांना चार लाख रूपयांची लाच देऊन तुला वरचे पद मिळवायचे होते परंतु असा कोणताही भ्रष्टाचार मला खपणार नाही, मी खपवून घेणार नाही. स्वतःच्या अक्कल हुशारीने बढती मिळवायची असते. कुणाला डावलून त्याच्या हक्कावर डल्ला मारायचा नसतो..."
"गेले ते तुमचे दिवस.... आता असेच चालले आहे. ते जुनाट, पडके घर घेण्यापेक्षा मला बढतीसाठी मदत केली असती ना तर दोन वर्षात एखादा राजमहल बांधला असता..."
"बांध बाबा, बांध. राजमहल कशाला ताजमहलच बांध ना...पण कोणत्याही पापात ना मी सहभागी होणार ना तुला सहभाग घेऊ देणार. आले लक्षात, तुला पैसा दिला नाही म्हणून तुझे आकांडतांडव चालू आहे ना, पण लक्षात ठेव.. 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा..' अशी मी आजीवन वाटचाल केली आहे. पुढेही करणार आहे."
अशा प्रकारे दुपारची जेवणे तशी शांततेत झाली. मी वामकुक्षीसाठी पाठ टेकली असताना नेहमीप्रमाणे बायकोने माझा भ्रमणध्वनी घेतला. मला त्याचे काही वाटले नाही. कारण दिवसातून एकदा तरी बायको माझा भ्रमणध्वनी घेऊन फेसबुक आणि व्हाट्सअप् बघत असे. काही वेळाने ती फोनसह दुसऱ्या खोलीत गेली. माझा नेहमीप्रमाणे डोळा लागला. थोड्याच वेळात ती तणतणत आली. तिच्या दाणदाण पावलांच्या आवाजाने माझ्या झोपेची दाणादाण उडाली.
"अहो, किती खोटे बोलणार आहात तुम्ही?" तिने रागारागाने विचारले.
"आता काय झाले?"
"मी रा-फेल सौद्यात तुम्हाला फसवलेल्या, तुम्हाला अव्वाच्या सव्वा दराने घर विकणाऱ्या पंतप्रधानांना फोन ...."
"काय बोलतेस तू? पंतप्रधानांना फोन काय... काही तरी काय बरळतेस?"
"बरळत मी नाही. चुकून पंतप्रधान म्हणाले. परंतु बरळतोय तो तुम्हाला फसवणारा....लुच्चा....मी त्याला फोन लावला होता..."
"कुणी सांगितले तुला हा असा कारभार करायला? काय गरज होती..."
"गरज होती. तुम्ही वेगवेगळ्या किंमती सांगता मग काय करू? बायको या नात्याने मला सारे काही जाणून घेण्याचा हक्क आहे...खरी किंमत जाणून घ्यायचा मला हक्क आहे आणि तो मी बजावणारच."
"एखाद्या विरोधी पक्षनेत्याप्रमाणे बोलतेस तू..."
"होय.आहेच मी तुमची विरोधक. तोही माणूस असाच तोंड वर करून म्हणाला, झालेला व्यवहार, सौदा हा दोन व्यक्तींमध्ये झालेला आहे. तिसऱ्या व्यक्तीला सांगायला आम्ही बांधील नाही आहोत आणि सौद्याची मूळ रक्कम कुणालाही सांगायची नाही हे आमच्या दोघांमध्ये ठरलेले आहे. त्यामुळे ही गोपनीय माहिती आम्ही कुणालाही अगदी खरेदीदार किंवा विक्री करणारांच्या घरच्यांना ..त्यांच्या धर्म पत्नीलाही सांगता येणार नाही..."
"बरोबर आहे...."
"काय डोंबलं बरोबर आहे. मंत्रिमंडळात कोणते निर्णय होणार हे बैठकीच्या आधी वाहिन्यांवर येते. परदेशातील सरकारसोबत काय चर्चा होणार.... कोणते डिल होणार ह्याचे ते दोन नेते एकमेकांना भेटण्यापूर्वी वाहिन्यांवर चर्चेचे गु-हाळ होते... त्या दोन व्यक्ती भेटेपर्यंत रवंथही होऊन जाते आणि हा तुमचा दीडदमडीचा व्यवहार म्हणे गुप्त ठेवायचा. 'मी टू ' प्रकरणात थेट शयनगृहातील गोष्टी सार्वजनिक होत असताना तुम्ही म्हणे गोपनीयता पाळणार....."
"अग, इन्कम टॅक्सवाल्यांचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून हा व्यवहार, त्याची किंमत जाहीर नाही करता येत.खरी रक्कम जाहीर झाली तर आम्हाला दोघांनाही खडी फोडायला जावे लागेल. नाहीतर दसपट टॅक्स भरावा लागेल..."
"म्हणजे टॅक्सची चोरीच ना? हे तुमच्या नीतीमत्तेला..... ना खाउंगा, ना खाने दुंगा या वर्तनाला, घोषणेला धरून आहे का हो?"
"असेल किंवा नसेल. केलेला प्रण मरेपर्यंत पाळायला मी साधूसंत सोड पण पंतप्रधान किंवा मंत्री नाही की, केलेल्या प्रतिज्ञा आजीवन पाळू...."
"काय पण उदाहरणे देता, मंत्री, पंतप्रधान आणि मंत्र्यांनी केलेले निश्चय कधी पाळलेत काय? ही राजकारणी माणसे रात्री दिलेला शब्द सकाळी विसरून जातात. मी असे बोललोच नाही अशी सोईस्कर भूमिका घेतात. पण आजचा तुम्ही केलेला रा-फेल घोटाळा आणि त्यानंतर तुम्ही घेतलेली संशयास्पद भूमिका लक्षात घेता तुम्ही राजकारणी माणसांप्रमाणे वागायला लागलात की...."
"व्वा! काय पण बोलतेस रा-फेल घोटाळा काय, संशयास्पद भूमिका काय .... अस्सा कोणता घोटाळा केलाय ग मी .... एक घर तर घेतलय...तेही ज्या घरावर तुझा जीव बसला होता....."
"एकच एक लावू नका... तुझ्यासाठी... तुला आवडले म्हणून......" बायको त्राग्याने बोलत असताना अचानक बाहेरून आवाज आला,
"आहात काय घरात?...." तो आवाज ऐकून मी म्हणालो,
"झालं. बातमी शेवटी चाळीच्या चालत्या बोलत्या टीव्ही चॅनेलवर पोहोचली वाटते. आता सगळ्या शहरभर पसरणार...." म्हणत मी बाहेर आलो. मला पाहताच आमच्या शेजारी राहणारे आणि ज्यांच्याकडे पोहोचलेली बातमी एका क्षणात वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरते अशी ख्याती असलेले, नाना नावाने ओळखले जाणारे गृहस्थ उभे होते. मला पाहताच आनंदाने माझा हात हातात घेऊन जोरजोराने हलवत म्हणाले,
"अभिनंदन! त्रिवार अभिनंदन! काय पण बाजी मारली.....बंगला घेतला म्हणे....चाळीस लाखाला... कुठून बाजी मारली म्हणायची?"
"समजले का तुम्हाला?" मी उपहासाने विचारले. तिकडे दुर्लक्ष करून नाना म्हणाले,
"अशा बातम्या लपतात का? अहो, आजकाल कितीही काळजी घेतली तरी वाहिन्यांच्या सुक्ष्म नजरेतून काहीही लपत नाही...."
"ते तर दिसतेच आहे, माझी खरेदीची बातमी तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचली त्यावरुन."
"नाही. नाही. तसे नाही. त्याचे काय झाले, तुम्ही घेतलेल्या रा-फेल बंगल्याच्या शेजारी माझ्या चुलतभावाचेही घर आहे. महत्त्वाचे म्हणजे रा-फेलचा मालक माझ्या चुलतभावाचा मेहुणा आहे.
त्यामुळे तुम्ही केलेला रा-फेल घोटाळा सॉरी सौदा मला तुम्ही घरी येण्यापूर्वीच समजला..."
"तरीही बराच दम धरला की तुम्ही..."
"बोला. तुम्ही उपहासात्मक बोला परंतु आम्हाला खूप आनंद...." नानाला मध्येच अडवत सौभाग्यवतीने विचारले,
"तुम्ही काय म्हणालात चाळीस लाखाला? खरे की काय?"
"हो. चाळीस लाखच. तुम्ही चाळीस हजार सांगितले की, काय वहिनीला? काय पण अहो, बाहेर सोडा घरी तरी योग्य किंमत सांगायला पाहिजे." नाना सांगत होते असताना माझ्या भ्रभणध्वनीवर मी नुकतीच सेट केलेली रिंगटोन...'बाई मी विकत घेतले रा-फेल..'
"व्वा! काय पण उतावळेपणा हा. लगेच रिंगटोन?..."
पत्नीच्या उपहासात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी बाल्कनीत आलो. फोन माझ्या बहिणीचा होता. मी उचलताच ती म्हणाली,
"दादा, अभिनंदन! नवा म्हणजे तसा जुना असलेला फ्लॅट घेतला म्हणे....पन्नास लाखाला? काय पण हिंमत तुझी. दादा, मान गए। पण मला मात्र नाराज केलेस हं. तुझ्याकडे एवढा पैसा असताना सहा महिन्यांपूर्वी माझ्या सोनीचा मेडिकलचा चान्स हुकला रे. शेवटी ती बिच्चारी बीएस्सी करतेय रे. मी काही फार मागितले नव्हते. पाच लाख फक्त पाच लाख रूपये हवे होते. पण तेवढेही तुला द्यावे वाटले नाही. ही गोष्ट माझ्या कायम लक्षात राहील. तुला वाटत असेल ही बातमी माझ्यापर्यंत कशी आली? दादा, तुझा जो कुणी रा-फेल सौदा करणारा आहे ना, त्याचं पोट्ट माझ्या राहुलचा मित्र आहे. त्यानेच सांगितले की, माझ्या बाबांनी तुझ्या मामाला कसे गंडवले ते..."
"गंडवले? ते कसे?"
"सरळ सरळ आहे दादा, शंभर वर्षापूर्वीचे जुने, मोडकळीस आलेले घर पन्नास लाखाला जो कुणी विकेल तो महाभाग्यवानच की. अरे, ते पोट्ट असेही सांगत होते की, त्या घराची घरपट्टी, नळपट्टी कितीतरी वर्षांपासून भरलेली नाही म्हणे. जवळपास दहा लाखाची थकबाकी आहे म्हणे. आता ती कुणाला भरावी लागणार? अरे, दादा तुला भरावी लागणार म्हणजे केवढ्याला पडेल ते तुला...साठ लाखाला...मला पाच लाख न देणारा तू आता असा फसविला, ठगवला केलास रे बाबा. माझे सोड मी तुझी पाठची बहीण. काही बोलणार नाही. पण सोनी खूप नाराज झाली रे. तिला तुझ्याकडून खूप आशा होती रे, मी तिचा तळतळाट म्हणणार नाही पण .....जाऊ दे. पुन्हा अभिनंदन!"
मला शब्दानेही बोलण्याची संधी न देता तिने फोन बंद केला. मी हताशपणे आत आलो. नाना ठाण मांडून बसले होते. मला पाहताच त्यांनी विचारले,
"एक काम करा. रजिष्ट्री पाच-सात लाखाची करा. रेडीनेकनरप्रमाणे त्या जुनाट घराची किंमत फार तर चार लाख असेल. कराल पंचवीस-तीस लाखाची तर दोन प्रकरणात नुकसान होईल तुमचे..."
"अजून नुकसान? नाना, जे झाले ते काय कमी आहे का? अजून कोणते?" बायकोने विचारले.
"वहिनी, अहो, रजिस्ट्रेशनचे खर्च फार गगनाला भिडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एवढी किंमत देऊन तो फ्लॅट घेण्यासाठी प्रचंड पैसा आणलात कुठून ही चौकशी होईल?"
"नाना, मी बँकेचे कर्ज घेणार आहे."
"कुणाला सांगताय? बँक किती कर्ज देणार आहे? निवृत्तीला किती वर्षे बाकी आहेत? समजा, तुमच्या म्हणण्यानुसार बँकेने तेवढे म्हणजे सौद्याच्या ऐंशी टक्के कर्ज दिले तरी वीस टक्के रक्कम तर भरावी लागणारच ना? ती का कमी असणार आहे? उद्या चौकशी झाली तर काय सांगणार? खडी फोडायला जावे लागेल? बघा बुवा. वर्षानुवर्षे आपण शेजारी आहोत म्हणून सांगितले." असे म्हणत नाना माझ्या बायकोकडे बघत निघाले.......
रात्री मी आणि पत्नी जेवायला बसलो होतो. दुपारपासून आमचा संवाद थांबला होता. माझेही जेवणात लक्ष लागत नव्हते. पत्नी तर केवळ उदास चेहऱ्याने बसून होती. मी तिला म्हणालो,
"अग, तुला खरेखुरे सांगू का...." मी बोलत असताना माझा मुलगा तिथे धावत आला आणि श्वासावर नियंत्रण मिळवत म्हणाला,
"ब...ब....बा...बा...माझ्या मित्राचा...रा-फेल शेजारी असलेल्या बोफोर या बंगल्यात राहणाऱ्या मित्राचा फोन आला होता की, सायंकाळी खूप सारे पोलीस तिथे आले होते...."
"केली का अटक त्या मेल्याला. यांची फसवणूक केली म्हणून फोडून काढा म्हणावे त्याला..."
"आई, ऐकून घे. फसवणुकीचे सोड....दुसरेच कारण आहे..."
"दुसरेच कारण? ते कोणते?" मी अगतिकतेने विचारले.
"आता कसे सांगावे तुम्हाला? बाबा, पोलिसांचा असा संशय आहे की, त्या इमारतीत म्हणे काही अतिरेकी लपून बसले आहेत. परवा आपल्या शहरात झालेल्या बाँबस्फोटातील काही अतिरेकी तिथे लपले आहेत.... "
"अरे पण, ते घरमालकाला...."
"माहिती असेल किंवा नसेल.....कदाचित घरमालकाचाही त्यात हात असण्याची शक्यता...."
"ते काहीही असो. कुणाचा हात असेल किंवा नसेल आपण अशा शापित, खुन्यांच्या रक्ताने, वासाने गजबजलेल्या घरात राहायचे नाही म्हणजे नाही. शेवटचे सांगते, तुम्हाला ते घर घ्यायचे असेल तर आधी त्या घरात कुण्या देवतेच्या तसबिरी ठेवण्याच्या आधी माझी लाश नेऊन पुरा आणि मग...." म्हणत बायको संतापाने आत निघून गेली....
मी बायको गेली त्यादिशेने पाहात राहिलो...........प्रचंड अविश्वासाने!
॥॥॥॥॥॥॥॥॥॥
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका फेज ०१
क्रांतिवीरनगर लेन ०२
संचेती शाळेजवळ, थेरगाव, पुणे-३३
९४२३१३९०७१