Jugaari - 1 in Marathi Love Stories by निलेश गोगरकर books and stories PDF | जुगारी - (भाग-1)

Featured Books
Categories
Share

जुगारी - (भाग-1)

वाचक मित्रांनो ,
ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. ह्यात असलेली पात्रे , प्रसंग , स्थळ सर्व काल्पनिक आहेत. पण ह्यात लिहलेले कोणतेही जुगाराचे प्रकार तुम्ही कोणीही खेळू नका.. जुगार मग तो कोणताही असुदे तो वाईटच.. म्हणून मी ही मनापासून विनंती करत आहे. ही कथा केवळ मनोरंजन ह्याच हेतूने लिहली असून त्याबद्दल ची माहिती मी इकडून तिकडून मिळवली आहे.

खरंतर मी एक दर्दी वाचक पण सहज गमतीने म्हणून एक कथा लिहली आणी ती वाचकांना खूप आवडली आणी त्या मुळेच त्यांच्या आग्रहाने पुढे लिहीतच राहिलो..प्रतिलिपीवर 4700/ फॉलोवर आणी 97/98 कथा (भागासह ) त्यामुळे लिहण्याचा अनुभव आहे असे म्हणायला हरकत नाही. काही कारणाने आता मी तिथे फारसा लिहीत नाही. मातृभारती ह्या app बद्दल मला कालच कळले आणी त्यामुळे आता इथे लिहण्याचा श्री गणेशा करीत आहे. आशा आहे कि आपल्याला माझ्या कथा आवडतील. माझ्या कथा कश्या वाटतात हे जरूर सांगा. म्हणजे मी आणखीन नवनवीन विषय घेऊन नवीन कथा आपल्या समोर ठेवीन...


राज नेहमी प्रमाणे गार्डनच्या आपल्या बाकावर येऊन बसला. दुपारचा एक वाजत आला होता त्यामुळे आता ह्या वेळी गार्डन ला फारसे कोणी नव्हते. काही लोक होते पण ते दुपारच्या उन्हापासून बचाव म्हणून गार्डन मधील मोठ्या झाडांच्या आश्रयाने सावलीत बसले होते. सगळी कडे शुकशुकाट होता. असे पण ह्या कडक उन्हात कोण कशाला बाहेर पडेल..

पण राज ला बाहेर पडणे गरजेचे होते. कारण त्याची रोजीरोटी त्याच कामावर चालत होती. आता ही तो बैचेनीने पुन्हा पुन्हा घड्याळ बघत होता. तो कोणाची तरी वाट बघत होता. आणी ती व्यक्ती अजून तरी आली नव्हती. सहज वेळ घालवण्या साठी त्याने आजूबाजूला पाहायला सुरवात केली. तेव्हा त्याच्या लक्षात आले कि काहीश्या बाजूला असलेल्या एका दुसऱ्या बाकावर एक मुलगी बसली आहे. आता वेळ घालवायला काही नसल्यामुळे तो तिचे निरीक्षण करायला लागला.

ती तरुण होती साधारण पंचवीस-सत्तावीस वय असेल. गोरीगोमटी , तरतरीत नाक , बांधेसूद. पण तिच्या अंगावर जुने कपडे होते. केस काहीसे विस्कटलेले होते. चेहऱ्यावर चिंतेच्या छटा होत्या. ती ही कोणाची तरी वाट पाहत असावी. राज ने निरीक्षण करून तिच्यावरून आपली नजर काढून घेतली. आणी आपल्या विचारत गढून गेला... किती वेळ गेला त्याला कळलेच नाही. अचानक राजूभाय च्या हाकेने तो भानावर आला.

" कहा खोये हुवे हो...? "

" नही बस ऐसे ही... राजूभाय आप कहा थे? "

" क्या बोलू राज... ये ट्रॅफिक कि वजहसे लेट हो गया... "

" ह्म्म्म... "

" गेम निकाला है...? "

" हा... इसलिये तो बुलाया नां...? आज 550 से मेंढी आयेगी कल्याण में "

" पक्का है क्या..? "

" क्या राजूभाय !... मटकेमें पक्का कुछ होता है क्या ? हम लोग तो बस जजमेंट लगा सकते है...पर मेरा जजमेंट कितना अच्छा है ये तो आप को भी मालूम है... "

" वो तो है... और जोडी? "

" मेरे ख्याल से... 05 का जोडी करेगा "

" फिर लाल घर करेगा ? "

" उसके गेम से तो ऐसाही लग रहा है.. "

" ठीक है... मै गेम डाल देता हू... "

" ठीक है... "

आणी राजू भाई निघून गेला.. आणी आता राज ला भुकेची जाणीव झाली. रात्री गेम काढण्याच्या नादात तो धड जेवला पण नव्हता.. आता अण्णा कडे जेवायला जायलाच हवे.. असा विचार करून तो उठला आणी त्याच वेळी त्याचे लक्ष तिच्या कडे गेले ती पण त्याच्या कडेच बघत होती. तिचे ते स्वतःत हरवून एकटक लावून बघणे त्यामुळे राज काहीसा गडबडला आणी तिच्या वरील नजर काढून रस्त्या पलीकडे असणाऱ्या अण्णा च्या हॉटेल ला जेवायला गेला.

अण्णा ने त्याला बघूनच त्याच्या जेवणाची ऑर्डर सोडली आणी अण्णा कडे एक ओळखीची स्माईल देत राज बेसिन वर हात धुण्यासाठी गेला. छान हात, चेहरा धुवून तो परत आपल्या टेबलकडे आला तर त्याच्या टेबलवर ती बसली होती. तीच जी मगाशी त्याला गार्डन मध्ये दिसली होती. त्याने आजूबाजूला नजर फिरवली तर कुठे बसायला जागाच नव्हती. नाईलाजाने तो तिच्या समोर जाऊन बसला.

ती त्याच्या कडेच बघत होती.

" तू मला ओळखतेस का ? " तिच्या तश्या बघण्याने वैतागून राज ने विचारले.

" नाही.. "

" मग सारखी माझ्या कडे का टक लावून बघते आहेस ? "

" काही नाही रे.. तू माझ्या समोर बसला आहेस म्हणून तुझ्या कडे बघते आहे.. बाकी काही नाही.. "

" जेवायचे आहे ? "

" ह्म्म्म.. "

त्याने अण्णाला अजून एक ताट लावायला सांगितले. त्याचे ताट आल्यावर त्याने जेवायला सुरवात केली. तो शांत पणे जेवत होता. प्रत्येक घास बत्तीस वेळा चावलाच पाहिजे ह्यावर त्याचा विश्वास असावा ते बघून ती हसली.. आणी त्याने पुन्हा रागाने तिला पाहिले..

" सॉरी... " ती कसाबसा आपला चेहरा गंभीर करत म्हणाली.

त्या नंतर तिचे ही ताट आले. आणी ती ही जेवायला लागली. जेवण झाल्यावर तो हात धुवून गल्ल्यावर गेला.

" दोन्ही ताटाचे पैसे माझ्या नावावर लिहून ठेव अण्णा.." अण्णा ला सांगून तो बडीशोप खात बाहेर पडला... पुन्हा आपल्या नेहमीच्या बाकावर बसण्यास आला तर तिथे आता एक प्रेमी जोडपं बसले होते. म्हणून मग त्याने काहीश्या एकाबाजूला असलेल्या एका बाकड्याकडे आपला मोर्चा वळवला... काही वेळाने ती त्याला शोधात आली.

" इथे बसलास तू ? मी कुठे कुठे शोधले तुला? "

" का काय झाले ? " पण उत्तर देण्याऐवजी ती त्याच्या बाजूलाच बसली.

" थँक्स.. जेवणाचे पैसे दिल्या बद्दल... "

" त्यात काय एव्हडे .. तुझ्या कडे नसतील असे मला वाटलेच होते... "

" ए.. असे काही नाही.. जेवणा साठी होते माझ्या कडे पैसे. पण तू भला वाटलास म्हणून म्हणले काही वेळ मारू तुझ्या बरोबर गप्पा... "

" माझे नाव सुषमा..." ती पुढे म्हणाली..

" मी.. राज.. "

" ह्म्म्म... " तू रोजच इथे बसतोस का ?

" रोज नाही.. पण बऱ्याचदा असतो इथे... "

" मग कामधंदा काय करतोस..? "

" काही नाही... असाच आपला.... " पण त्याचे बोलणे ऐकायचे अर्धवट सोडून ती पटकन उठली आणी एका बाईला भेटायला निघून गेली. त्या बाईला बघून राज च्या मस्तकाची शीर उठली. त्या बाईला तो ओळखत होता. ती मुली पुरवण्याचे काम करत होती. आता त्याच्या लक्षात आले कि ही आपल्याला का चिटकत होती. रागाच्या भरात तो तेथून उठला आणी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसला..

काही वेळाने ती पुन्हा त्याच्या कडे आली.

" ह्म्म्म... काय म्हणतं होतास तू? "

" तुला आज कोणी गिऱ्हाईक नाही भेटले का ?" त्याचे ते शब्द ऐकून तिचा चेहरा पडला.

" तू त्या बाईला ओळखतोस ? "

" अहं...फक्त तोंड ओळख आहे..ती मुली पुरवते ते मला माहित आहे त्यामुळे मी तिच्याशी जास्त ओळख वाढविण्याच्या भानगडीत पडलो नाही . अश्या बायकांचा मला खुप राग आहे. " तिच्या कडे एक रागाचा कटाक्ष टाकत तो पुन्हा उठला.

" कुठे निघालास ? "

" दुसरी कडे कुठे तरी जाऊन बसतो.. आणी आता तू तिथे येऊ नको माझ्या मागेमागे..." त्याच्या शब्दा शब्दात राग जाणवत होता.

" पण माझे ऐकून पण नाही घेणार.. तसाच जाणार..? "

" तुझ्या सारख्या धंदेवालीचे काय ऐकायचे.. " तो खाडकन म्हणाला... आणी त्याच्या त्या वाक्यासरशी ती उठली आणी तिने एक सणकून त्याच्या कानाखाली ओढली. तिच्या त्या पवित्र्याने तो ही काहीसा भांबावला त्याला ही तिचा राग आला एक धंदेवाली आपल्या कानाखाली मारते काय म्हणून तो त्वेषाने तिच्या कडे वळला. त्याच्या हातांच्या मुठी आवळल्या होत्या एक सणसणीत कानाखाली तिच्या पण ओढायची म्हणून त्याचा हात शिवशिवत होता . पण तिच्या कडे लक्ष जाताच तो थंड झाला. ती ओक्सबोक्शी रडत होती. तिला रडताना बघून राजला सुचेना कि काय करावे म्हणून तो चुपचाप उभा राहिला. तिला रडताना बघून दोन शहाणे तिथे उपटले.. त्यांना वाटले कि ह्यांनी नक्कीच हिची काहीतरी छेड काढली असणार आणी मग फुकटची हिरोगिरी करायची संधी काय ते फुकट घालवणार होते..
ते रुबाबात छाती पुढे काढून नसलेले आर्म्स उगाचच दाखवत पुढे आले. पण त्यांना राज काय आहे ते कुठे माहित होते. राज जसा मटक्याचा गेसर होता तसाच भाईगिरीत मुरलेला होता.

" ए काय झाले ? तिला छेडतो काय ?" एकाने आवाज मोठा चढवत विचारले.

" अहं..... काय म्हणाला काय ? ... मला नीट ऐकू आले नाही.... " आपल्या खिशातील लांबलच्चक रामपुरी काढत राज ने विचारले.. तशी त्या दोन्ही हिरोची हातभार फाटली.. ते पटकन राज पासून लांब झाले...

" काही काम नाही का ? नसेल तर माझ्या कडे एक काम आहे.. कराल का? " त्याच्या दिशेने सरकत राज त्यांना म्हणाला...

" नाही.... नाही... आहे नां.... " ते आणखीन मागे सरकत म्हणाले...

" मग निघा इथून... "

" हा... जातो.. आता घरची बात आहे म्हंटल्यावर आपण तरी काय बोलणार नां..! " त्यातल्या त्यात पण आपली बाजू सेफ करत एकाने म्हंटले आणी दोघे त्वरेने तिथून पळत सुटले.. आणी त्या परिस्थिती पण राज त्यांची तारांबळ बघून हसला.. त्यांचे ते बोलणे ऐकून आणी ते जे पळत सुटले ते बघून ती पण हसू लागली... ते बघून तो तिच्या बाजूला बसला..


पुढील भाग लवकरच.......