chandani ratra - 15 in Marathi Love Stories by Niranjan Pranesh Kulkarni books and stories PDF | चांदणी रात्र - १५

Featured Books
Categories
Share

चांदणी रात्र - १५

राजेश आणि संदीप हॉटेलात पोहोचले. थोड्याच वेळात मनाली आणि वृषलीही पोहोचल्या. जेवता जेवता चौघांच्या अगदी छान गप्पा रंगल्या होत्या. जेवून झाल्यावर राजेशने घड्याळात पाहिले. रात्रीचे दहा वाजले होते. आता निघायला हवं होतं. त्यामुळे त्यांनी गप्पा आवरत्या घेतल्या व चौघेही आपापल्या घरी जायला निघाले.

टेकडीवरच्या त्या क्षणांची जादू आता हळूहळू राजेश आणि वृषालीवरून उतरत होती. पूर्वीसारखेच ते आता एकमेकांशी मोकळेपणाने वागत, बोलत होते. कॉलेजमध्ये दोघांची भेट रोज व्हायची पण तिथे बोलायला फारसा वेळ मिळत नव्हता व इतर मुलामुलींसमोर मोकळेपणाने बोलताही येत नव्हतं. आज रविवार असल्यामुळे राजेशकडे वेळचवेळ होता. त्याने वृषालीला फोन लावला. “आज काय प्लॅन आहे तुझा?” राजेशने वृषालीला विचारलं. “खूप कंटाळा आलाय. नेमके आईबाबा पण बाहेरगावी गेलेत. येतोस का घरी? मस्त सँडविच बनवते तुझ्यासाठी. मग आपण मुव्ही पाहू.” वृषाली म्हणाली. “ठीक आहे. लगेच येतो. आणि चीझ वगैरे काही आणायच आहे का येताना?” राजेशने उत्साहात विचारलं. “काही नको आणूस. सगळं आहे घरात आणि गाडी जोरात नको चालवू. चल मी फोन ठेवते, बाय.” एवढं बोलून वृषालीने फोन ठेवला. राजेशने घाईतच कसंबसं आवरलं व तो घरातून बाहेर पडला. थोड्याच वेळात राजेश वृषालीच्या घरापाशी पोहोचला. त्याने बेल वाजवली. समोर नाईट गाऊन मधल्या वृषालीला पाहताच तिला मिठी मारायची तीव्र इच्छा त्याला झाली. पण त्याने स्वतःला आवरलं. खरंतर ती नुकतीच झोपेतुन उठून आल्यासारखी दिसत होती. पण तरीसुद्धा ती फार सुंदर दिसत होती.

राजेशची प्रश्नार्थक नजर पाहून वृषाली म्हणाली, “अरे मी आत्ताच उठले. सकाळी तुझा फोन आला तेव्हा नुकतीच जाग आली होती. पण फ्रेश वाटत नव्हतं. आधीच सर्दीमुळे काही सुचत नव्हतं म्हणून परत झोपले ते आत्ता उठले. मी जरा आवरते तोपर्यंत तू टीव्ही पाहा.” एवढे बोलून ती आत जाणार तेवढ्यात राजेश तिला म्हणाला, “कशाला आवरतेस, अशीच छान दिसतेस!” हे ऐकून वृषाली लाजली व “काहीतरीच काय” असं म्हणून आतल्या खोलीत गेली.

थोड्यावेळाने आंघोळ आटोपून वृषाली हॉलमध्ये आली. तिच्या एका हातात फोन तर दुसऱ्या हातात टॉवेल होता. ती तिच्या आईशी फोनवरून बोलत होती व दुसऱ्या हातातल्या टॉवेलने ओले केस पुसत होती. राजेशने तिच्याकडे पाहिले व बोटानेच “छान” अशी खूण केली. वृषाली राजेशकडे पाहून हसली. थोड्यावेळाने वृषालीने फोन ठेवला व राजेशला म्हणाली, “ही आईपण ना सारख्या सूचना देत असते. हे करू नकोस, ते करू नकोस, बाहेर जास्त फिरू नकोस. मी काय आता लहान आहे का?”

“इतकी सुन्दर मुलगी असल्यावर कोणत्याही आईला काळजी वाटणारच.” राजेश मिश्कीलपणे म्हणाला. राजेश आज जरा जास्तच रोमँटिक मूडमध्ये होता. राजेशच्या शब्दांनी वृषाली खुश झाली पण तसे दाखवू न देता विषय बदलून ती म्हणाली, “राजेश, माझी मैत्रीण सांगत होती की शाहरुखची परवाच रिलीज झालेली मुव्ही फारच छान आहे. खाऊन झाल्यावर आपण लगेच निघू.” खरंतर राजेशला शाहरुखच्या मुव्हीज फारशा आवडायच्या नाहीत. पण नाही म्हणायचं त्याचं धाडस नव्हतं. आणि तसही वृषालीच्या सानिध्यात राहायला मिळतय यातच तो खुश होता. वृषालीला सर्दी झाली होती. त्यामुळे खरंतर तिने जरा विश्रांती घेणं गरजेचं होतं. पण आता काही बोललं तरी वृषाली ऐकणार नाही हे राजेशला माहिती होतं. त्यामुळे तो म्हणाला, “जशी आपली आज्ञा राणीसरकार.”

थोड्याच वेळात खाऊन झाल्यावर ते घराबाहेर पडले. थेटरमध्ये पोहोचताच राजेशने दोन तिकिटे घेतली. वृषाली अतिशय मन लावून मुव्ही पाहत होती. राजेशचं लक्ष मुव्हीपेक्षा वृषालीकडेच जास्त होतं. पाहतापाहता मुव्ही संपली. तिथून ते थेट वृषालीच्या आवडत्या रेस्टॉरंटपाशी पोहोचले. “पुढचा काय प्लॅन आहे?” जेवण आटोपतच राजेशने वृषालीला विचारलं. “तुला कंटाळा नसेल आला तर मला थोडं शॉपिंग करायचंय. जवळच एक नवीन मॉल झालाय तिथे खूप छान ड्रेस मिळतात असं मी ऐकलंय.” वृषाली म्हणाली. “थोडं” या शब्दाला काहीच अर्थ नाही हे राजेशला माहिती होतं. तो “ठीक आहे” एवढंच म्हणाला. पण त्याच्या आवाजात नेहमीसारखा उत्साह नव्हता. हे वृषालीला जाणवलं. “काळजी करू नकोस. इतर मुलींप्रमाणे बॉयफ्रेंडच्या पैशांवर शॉपिंग करणारी मी नाही.” वृषाली म्हणाली. खरंतर राजेशला पैशांचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्याला शॉपिंगचा कंटाळा होता. तसा तो वृषालीबरोबर पहिल्यांदाच शॉपिंगला जात होता. पण त्याने बऱ्याच मित्रांकडून त्यांचे अनुभव ऐकले होते. वृषालीने पैशांवरून असं बोललेलं राजेशला आवडलं नाही. “मी पैशांचा विचार करतो असं तुला का वाटलं.” तो थोडा चिडून म्हणाला. “अरे मला तसं नव्हतं म्हणायचं.” वृषाली म्हणाली. यावर राजेश काहीच न बोलता बाईकवर बसला व त्याने बाईक चालू केली. “तुला कंटाळा आला असेल तर आपण पुन्हा कधीतरी जाऊ.” वृषाली समजावणीच्या सुरात म्हणाली. “बस बाईकवर.” राजेश म्हणाला. त्याच्या मनातला राग केव्हाच निवळला होता.
थोड्याच वेळात ते मॉलपाशी पोहोचले. मॉलमध्ये पोहोचताच वृषालीने बरेच ड्रेस पाहिले व एक ड्रेस निवडला. चेंजिंग रम मध्ये जाऊन ती ड्रेस चेंज करून आली. “कसा वाटतोय?” तिने राजेशला विचारलं. “छान” राजेश म्हणाला. तिने तो ड्रेस बास्केटमध्ये ठेवला. वृषालीने दुसरा ड्रेस घेतला व ती पुन्हा चेंजिंग रूममध्ये गेली. बाहेर येताच तिने राजेशला विचारलं, “हा कसा वाटतोय?” राजेशचं पुन्हा तेच “छान”. अजून दोन ड्रेस वृषालीने ट्राय केले. पण राजेशची प्रतिक्रिया एकच-छान. शेवटी वैतागून वृषाली राजेशला म्हणाली, “प्रत्येक ड्रेसला छान काय म्हणतोयस. यातला कुठला घेऊ सांग ना.” “तुझ्यावर कुठलाही ड्रेस छानच दिसतो.” राजेश म्हणाला. “तरीपण यातला कोणता घेऊ सांग ना?” वृषालीने पुन्हा विचारलं. “सगळे घे.” राजेश सहजच म्हणाला. वृषालीनेही आज्ञाधारकपणे सगळे ड्रेस बास्केटमध्ये टाकले व ती पेमेंट करायला काउन्टरपाशी गेली. राजेशही तीच्या मागे गेला. तिने बॅगेतून तिची पर्स काढली. पर्समधून ती तिचं कार्ड शोधत होती. एकदाचं कार्ड तिच्या हाताला लागलं. तिने कार्ड काउंटरमागे बसलेल्या मुलीच्या हातात दिलं. पण त्या मुलीने कार्ड वृषालीला परत दिलं व ती म्हणाली, “मॅडम सरांनी ऑलरेडी पेमेंट केलंय.” वृषाली राजेशकडे पाहतच राहिली. राजेश काही नबोलता मॉलमधून बाहेर आला. तो बाईकवर बसला व म्हणाला, “मला फार झोप येतीये. जवळच माझ्या एका मित्राचं कॉफीशॉप आहे. आपण मस्त कॉफी पिऊयात.” “अरे शॉपवर नको आपण माझ्या घरीच कॉफी पिऊयात. माझ्या हातची कॉफी एकदा पिऊन बघ. परत कधी बाहेरची पिणार नाहीस.” वृषाली उत्साहात म्हणाली. “जशी आपली आज्ञा राणीसरकार.” राजेश चेष्टेत म्हणाला. राजेशने बाईक चालू केली व ते दोघे वृषालीच्या घराकडे निघाले. घरी पोहोचताच फ्रेश होऊन कॉफी बनवण्यासाठी वृषाली स्वयंपाकघरात गेली. तिने दुधाचं पातेलं गॅसवर ठेवलं व कपाटात पाहिलं. कॉफी संपली होती. दुसरं पाकीट हॉलमधल्या कपाटात ठेवलं होतं. वृषाली ते पाकीट घेऊन स्वयंपाकघरात आली. तिने गॅस चालू केला. तेवढ्यात तिचा फोन वाजला. फोनच्या नादात ती बर्नर पेटवायला विसरली होती. शेगडीचं बटन तसच चालू होतं. तिला तिच्या एका मैत्रिणीचा कॉल आला होता. फोनवर बोलत ती हॉलमध्ये आली. थोड्यावेळाने अचानक फोन बंद झाला. तिच्या फोनची बॅटरी संपली होती. आपण गॅसवर दूध ठेवलय याची तिला आठवण झाली व ती स्वयंपकघरात गेली. पूर्ण स्वयंपाकघरात गॅस भरला होता. पण वृषालीला सर्दीमुळे वास येत नव्हता. तरीही तिला थोडा वास आल्यामुळे गॅस तसाच चालू राहिलाय हे समजलं व तिने लगेच शेगडीचं बटन बंद केलं. वृषालीने तिथल्याच एका पॉइंटला चार्जर लावला व स्वीच ऑन केला. हीच तिच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली. स्विच ऑन केल्यामुळे हवेत पसरलेला गॅस विद्युतलहरींच्या संपर्कात आला व एका क्षणात मोठा स्फोट झाला.

राजेश वरच्या खोलीत निवांत कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत होता. स्फोटाच्या प्रचंड आवाजामुळे तो भानावर आला व धावतच खाली गेला. तो स्वयंपाकघराच्या दाराशी आला व समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वयंपाकघराची एक भिंत अर्धी कोसळली होती. एका कोपऱ्यात वृषालीचा अर्धवट जळालेला देह निश्चेष्ट पडला होता. समोर जे होतं ते फक्त निर्जीव शरीर होतं. वृषाली केव्हाच हे जग सोडून गेली होती. समोरचं दृश्य पाहताच राजेशची शुद्ध हरपली. तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा डोळे उघडताच त्याला त्याची आई बेडच्या बाजूला बसलेली दिसली. ती राजेशच्या डोक्यावरून हात फिरवत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. राजेश तब्बल दोन दिवसांनी शुद्धीवर आला होता. तो शुद्धीवर येताच त्याच्या आईने डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी अजून थोडे दिवस तरी विश्रांती घ्यायचा सल्ला दिला. काही दिवसांनी पुन्हा तपासणी करून डॉक्टर त्याला डिस्चार्ज देणार होते.

राजेशच्या मनावर फार मोठा आघात झाला होता. त्याला घडलेलं सर्वकाही आठवत होतं. त्याचं शरीर जरी शुद्धीवर आलं असलं तरी त्याचं मन अजून ताळ्यावर आलं नव्हतं. त्याची लाडकी वृषाली त्याला कायमचं सोडून गेली होती. त्याच्या मनावरची जखम फार खोल होती. ती इतक्या सहजासहजी भरून निघणार नव्हती.

डॉक्टरांनी डिस्चार्ज देताच राजेश त्याच्या गावी गेला. त्याच्या आईवडिलांना त्याची फार काळजी वाटत होतं. सगळं चांगलं चाललं असताना नियतीने अचानक वेगळं वळण घेतलं होतं. वृषालीच्या आठवणीने राजेशचं मन वारंवार व्याकुळ होत होतं. घरीसुद्धा एरवी भरभरून बोलणारा राजेश आता दिवसभर त्याच्या खोलीत बसत होता. तो कोणाशीच बोलत नव्हता. अगदी आईशीसुद्धा नाही. अन्नही तो नुसतं पोटात ढकलत होता. त्याची जगायची इच्छाच हळूहळू मरत चालली होती. या प्रचंड दुःखात त्याच्या उदास मनात उमटणाऱ्या काव्योक्तींवरून त्याच्या मनातील दुःखाचा अंदाज येऊ शकतो.

ज्या पावसात चिंब भिजलो होतो तोच आज नकोसा वाटतोय
तुझी आठवण होताच नकळत कंठ दाटतोय
तुझं दिसणं, तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझं चालणं
सारच एखाद्या गोड स्वप्नासारखं होतं की स्वप्नच होतं?
जर स्वप्नच असेल तर या स्वप्नातच मला जगू दे
जर स्वप्न नसेल तर मी जगून तरी काय करू
विष पिऊन की उडी घेऊन, सांग मी कसा मरू

क्रमशः