डॉली आपल्या कार्यालयात कामात मग्न होती त्या वेळेस शेजारील फॅक्स मशीन वर ‘इनकमींग फॅक्स’ ची अक्षर उमटली. डॉली ने शेजारील ‘ऍक्सेप्ट’ लिहीलेले हिरवे बटन दाबले आणि फॅक्स चा पेपर रोल फिरु लागला. त्या फॅक्स पेपरवर उमटणारे ते विचीत्र चित्र बघुन डॉलीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिने तो पेपर उलटसुलट करुन पाहीला आणि मग तिचे लक्ष कोपऱ्या फिक्कट अक्षरात उमटलेल्या जॉनच्या अक्षरांकडे गेले.
डॉलीने तो कागद टेबलाच्या कडेला ठेवुन दिला आणि ती आपल्या कामात पुन्हा मग्न झाली.
संध्याकाळी घरी निघायच्या वेळेस टेबलवरील पेपर आवरताना तिचे लक्ष पुन्हा एकदा त्या फॅक्सकडे गेले. तिने तो कागद पुन्हा एकदा निरखुन पाहीला.
“कश्याला हवी असेल ही माहीती जॉनला? इतक्या दिवसांनंतर जॉनला पुन्हा एखादी केस मिळाली की काय?”, डॉलीच्या मनामध्ये प्रश्नांचे तरंग उमटत होते. तिने त्या कागदावरील उमटलेले ‘फॅक्स कुठुन आला?’ हे दर्शवणारा फोन नंबर पाहीला. मग शेजारी ठेवलेली टेलीफोन डिरेक्टरी उघडली आणि जिल्हा-तालुकाच्या यादींमध्ये तिने तो नंबर शोधायला सुरुवात केली.
“तरवडे..” शोधता शोधता तिला एका ठिकाणी त्या गावाचा कोड मिळाला. काही क्षणातच तिला काही दिवसांपुर्वी पेपरमधुन झळकलेल्या आणि टि.व्ही.वरील बातम्यांमध्ये ब्रेकींग न्युजच्या नावाखाली चघळल्या जाणार्या त्या दोन खुनांच्या बातम्या आठवल्या.
शेवटी तिने एक दीर्घ उसासा घेतला आणि हातातले काम बाजुला सरकवुन तिने गुगलची साईट उघडली आणि सुर्यांबद्दल अधीक माहीती देणाऱ्या वेब-साईट्स पडतायळला तिने सुरुवात केली.
बऱ्याच वेळ शोधाशोध केल्यावर तिला हवे असलेले चित्र एका वेब-साईटवर सापडले. तिच नक्षी, तेच चिन्ह, तोच आकार…
डॉलीने कडेचा एक कोरा कागद ओढला, चेहऱ्यावर कोसळणारे आपले काळे-भोर केस एका हाताने मागे सारले आणि पेन्सीलीने त्या कागदावर वेबसाईटवरील माहीती उतरवुन घ्यायला सुरुवात केली.
**********
डॉलीच्या मनातुन जॉन कधीच गेला नव्हता आणि आता जॉनला आपली गरज आहे असे राहुन राहुन डॉलीला वाटतं होते आणि म्हणुनच तिने ‘तरवडे’ गावाला जायचा निर्णय घेतला होता. काम आटोपताच ती घरी गेली चार-दोन दिवसांचे कपडे, थोडे पैसे आणि इतर साहीत्य घेउन तिने ‘तरवडे’ गावाकडे कुच केले. जॉनला फोन करुन ‘मी येत आहे’ असे सांगण्याचा मोह तिने टाळला होता.
असे अचानक जाऊन त्याला सरप्राईझ द्यायचे आणि त्या दिवशीबद्दल त्याची माफी मागुन त्याच्या बाहुपाशात शिरायचे ह्या सुखद विचारांनी ती आपली गाडी पळवत होती.
तारापुर एक्झीट घेउन शेवटचा घाट चढेस्तोवर रात्रीचे ९.३० वाजुन गेले होते. घाट म्हणल्यावरच डॉलीच्या पोटात गोळा आला. तिला घाटाचा नेहमीच त्रास व्हायचा आणि ह्या वेळेसही तस्सेच झाले होते. अगदीच सहन होईना तसे तिने गाडी एका कडेला उभी केली. गाडीतुन बाहेर येउन उभे राहील्यावर डोंगरावरच्या गार वार्याने तिला जरा मोकळे वाटले. गाडीच्या डिकीत ठेवलेल्या बॅटरीच्या
रेफ्रिजिएटर मधुन तिने मोसंबी ज्युसची एक बाटली बाहेर काढली. दोन घोट पोटात गेल्यावर आलेली उलटीची उमळ दुर झाली.
केसांना बांधलेली रिबिन काढुन तिने केस मोकळे सोडले. वार्याचा झोका तिच्या सर्वांगाला लपेटुन घेत होता. सुखाने तिने दोन क्षण डोळे मिटुन घेतले.
स्त्रियांना ‘सिक्स्थ सेन्स’ असतो असं म्हणतात. कसल्याश्या संवेदनेने डॉलिने अचानक डोळे उघडले. एक अनामीक भिती तिच्या अंर्तमनाला स्पर्शुन गेली. कोणीतरी नक्कीच आहे.. किंवा होते इथे!
एक क्षण पटकन गाडीत बसुन निघुन जावं असं तिचं मन तिला सांगत होतं, पण त्याच वेळेला जे जाणवलं ते खरं होतं का तो एक भास हे जाणुन घेण्यासाठी तिचे मन तिला पुढे ढकलत होते. शेवटी ती सावधपणे गाडीपासुन बाजुला झाली. दृष्टीपथात असलेल्या रस्त्यावर तरी कोणतीच हालचाल नव्हती. डॉली दबकत दबकत पुढं सरकली. चंद्राचा प्रकाश अगदीच अंधुक नसला तरीही पुरेसा नव्हता.
तिने समोरची झाडी हाताने बाजुला सरकवुन काही दिसते आहे का बघण्याचा प्रयत्न केला. पण झाडीमध्ये दाट अंधार होता. बाहेरुन आतले काहीच दिसत नव्हते. पण आत मधुन, कोणी असेलच तर त्याला डॉली स्पष्ट दिसु शकत होती. भितीची एक संवेदना डॉलीच्या शरीरातुन वाहत गेली. डॉली पटकन बाजुला झाली.
थोडी फार शोधाशोध करुनही काही सापडले नाही तसे डॉली माघारी परतली. गाडीचे दार उघडुन आतमध्ये बसणार इतक्यात तिची नजर एका ठिकाणी गेली. गाडीच्या थोडे पुढे एक शेणाचा ढिग पडला होता आणि त्याच्या एका बाजुला.. हो नक्कीच.. कुणाच्या तरी.. मानवी पायाचा ठसा होता..
‘मगाचपासुन हे असेच आहे? की आत्ता..’ डॉलीने खुप आठवण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच आठवेना..
‘कुठल्या गावकऱ्याचा असण्याची शक्यता कमी, कारणं तो बुटाचा ठसा होता आणि गावातले कोणी बुट घालत असेल ह्याबद्दल डॉलीचे दुमत होईना.’
इथे अधीक काळ थांबण्यात अर्थ नाही हे जाणुन तिने पटकन गाडी सुरु केली आणि सरळ तरवडे गाव गाठले.
अडीच-तिन हजार लोकवस्तीचे ते छोटेसे गाव डोंगराच्या कुशीत विसावले होते. डॉलीला जॉनचा पत्ता शोधायला फारसे प्रयास पडले नाहीत.
जॉन रहात असलेले हॉटेल यथातथाच होते. मंद दिव्यात धुवुन निघालेला पॅसेज, पोपडे उडालेल्या भिंती, जवळ जवळ काळोखच म्हणावा अशी लॉबी आणि फाटलेले- कापुस बाहेर आलेले सोफे!!
काऊंटरवरच्या मालकाने डॉलिला एकदा आपादमस्तक न्हाहाळले आणि जॉन खोलीत नसल्याची माहीती दिली.
थोड्याश्या त्रासीक चेहऱ्यानेच डॉली तेथील एका खुर्चीत रेलुन बसली. आजुबाजुला काहीच नसल्याने शेवटी तेथे पडलेले जुने पेपर तिने उचलले आणि गावात घडलेल्या त्या दोन खुनांबद्दलच्या बातम्या ती वाचु लागली. साधारणं एक तास गेला असेल. दाराचा आवाज ऐकुन तिने वर बघीतले.
डॉलीला पाहुन आश्चर्यचकीत झालेला जॉन दारातच उभा होता. जॉनला पाहुन तिने हातातला पेपर फेकुन दिला आणि धावत जाऊन जॉनला मिठी मारली..
“सरप्राईज…” जवळ जवळ किंचाळतच ती म्हणाली.. पण तिचा आनंद फार काळ टिकला नाही.. “श्शी.. किती घाण वास येतोय तुझ्या अंगाला, आंघोळ करत नाहीस की काय? चल आधी रुम वर आणि आंघोळ कर, मग बोलु” असं म्हणत तिने आपले सामान उचलले आणि ती जॉनच्या मागोमाग चालु लागली.
*******
जॉन आवरुन आला तेंव्हा डॉली सिल्की नाईटी घालुन बिछान्यावर पहुडली होती. जॉनला पहाताच ती उठुन जॉनपाशी गेली आणि त्याच्या मानेभोवती आपले कोमल हात लपेटुन तिने जॉनचे एक दीर्घ चुंबन घेतले..
“मिस्ड यु डीअर.. ऍन्ड आय एम सो..सॉरी…” लाडात येत डॉली म्हणाली..
“नो.. आय एम सॉरी डॉली.. ऍन्ड लेट मी अल्सो कन्फेस इट..” असं म्हणत जॉनने डॉलीला आपल्या बाहुपाशात ओढले आणि तिचे एक दीर्घ चुंबन घेतले.
“.. पण तु इथे कशी?? आणि तुला कसे कळले मी इकडे आहे ते??” जॉनने विचारले..
“मग.. डीटेक्टीव्हची गर्लफ्रेंड आहे म्हणलं.. थोडेफार गुण माझ्यात पण नकोत?”.. प्रश्नार्थक मुद्रेने डॉली उत्तरली.. “ए.. पण काय रे.. कुठले हे घाणेरडे हॉटेल शोधलेस? चांगली हॉटेल्स नाहीत का इथे?”
“..हम्म.. असो..” असे म्हणुन जॉनने आत्तापर्यंतचा प्रवास आणि तपास डॉलीला सांगीतला.. “तर असं आहे बघ सगळं.. ह्या केसला किती प्रसिध्दी मिळते आहे हे तु जाणतेसच..उद्या जर तपासात पोलीसांपेक्षा जास्त प्रगती करु शकलो तर ह्या केसबरोबर मलाही तितकीच प्रसिध्दी मिळेल.. मग भले केस सॉल्व्ह हो., वा न होओ… खुनी पकडला जाओ किंवा न जाओ.. एकदा का माझं नाव झालं की शहरात जाऊन पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करता येईल..”
“ते ठिक आहे रे.. पण पोलीस काही झोपा काढत नाहीत.. तुला फार कष्ट घ्यावे लागतील पोलीसांना मागे टाकायला..”.. डॉली कपाळावरचे केस सरळ करत म्हणाली.. “ए… किंवा तु असं का नाही करत? तुच अजुन एक दोन खुन कर ना! आणि तुच काहीतरी सलग्नीत पुरावे गोळा करुन पोलीसांना दे.. त्या स्पायडरमॅनसारखे..”
“स्पायडरमॅन??” जॉन.
“हो.. म्हणजे बघ ना.. तोच ’पिटर पार्कर’ द फोटोग्राफर असतो आणि तोच स्पाय-डी. स्वतःच स्वतःचे फोटो काढुन पैसे कमवत असतो.. तस्संच..” असं म्हणुन डॉली खिदळु लागली..
जॉन मात्र काहीच न बोलता खिडकीबाहेर बघत होता..
“ए.. मी मजा केली हं नाही तर खरंच करशील खुन-बिन.. चल आता झोपायला, मला जाम झोप आली आहे..” असं म्हणुन डॉलीने दिवे मालवुन टाकले..
.. रात्री काही केल्या डॉलीला झोप लागेना. सतत कुशीवर कुशी बदलुनही झोप लागली नाही तसे वैतागुन डॉली उठुन बसली. जॉन शेजारीच गाढ झोपलेला होता.
“कश्यामुळे झोप लागत नसावी?”, डॉलीने स्वतःशीच विचार केला. “कदाचीत, बदलेली जागा, कदाचीत ऐशारामी, मलमली बेड ऐवजी हा कडक गादीचा बिछाना.. नाही、कारणं काही तरी वेगळेच होते.. काहीतरी.. वैतागवाणे.. कसलातरी वास सुटला होता खोलीभर.. कसला?.. कदाचीत शेणाचा???”
डॉली ताडकनं उठली..”शेणाचा वास!!, त्या घाटात, तिथे, कोणी तरी होते नक्की, तेथील शेणात कुणाचीतरी पावलं उमटलेली पाहीली होती..”
डॉली बिछान्यातुन खाली उतरली. सावधपणे ती दरवाज्यापाशी गेली. तो वास उग्र होत गेला होता. डॉलीने हळुवारपणे जॉनचे बुट उचलले. तिचा संशय खरा होता, जॉनच्या एका बुटाच्या तळव्याला शेण चिकटलेले होते.
“जॉन? तिथे जॉन होता? नाही, शक्य नाही. तो तेथे असता तर मला पाहुन लपला कश्याला असता? त्याला तर आणि माहीत पण नव्हते की मी येणार आहे? मग हा फक्त योगायोग होता? की..!!”
*******
[क्रमशः]